READING TIME – 6 MINS

डिसेंबर १७५९ मध्ये सरहिंद ओलांडून अब्दाली दिल्लीच्या आसमंतात प्रवेशता झाला. दत्ताजी शिंद्यांच्या शेलक्या तुकड्यांशी त्याचा सरदार शहापसंतखानाचे युद्धाचे प्रसंग आले, अन तोकडे विजय मिळवत, प्रत्यक्ष दत्ताजींशी समोरासमोर युद्ध करण्याचं टाळत अब्दाली यमुना ओलांडून सहारनपूरला नजिबाला येऊन मिळाला.

दत्ताजीही मल्हारराव होळकरांची वाट बघत सोनपतजवळ येऊन थांबले. मल्हारराव यावेळेस माधोसिंहाशी लढण्यात अडकून पडले होते. माधवसिंहाने त्यांना मुद्दाम अडकवलं होतं जेणेकरून दत्ताजींना कुमक पोहोचणार नाही, पण २ जानेवारीला अखेरीस मल्हारराव राजपुताना सोडून निघाले.

ते पोहोचायच्या आतच, दि. १० जानेवारी १७६०, संक्रांतीच्या दिवशीच भल्या पहाटे बुराडी घाटावर तळ दिलेल्या दत्ताजींवर अब्दाली आणि नजिबाच्या फौजांनी हल्ले चढवले. दत्ताजी गराडले गेले.

जानकोजींच्या दंडात गोळी लागल्यामुळे सैन्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं, पण डोक्यात गोळी लागून दत्ताजी जाया झाले. कुत्बशहाने दत्ताजींच्या शिरच्छेद केला आणि शीर नजीबाकरवी अब्दालीला पाठवून दिलं.

१४ जानेवारीला शिंद्यांच्या उरलेल्या फौजेची आणि मल्हारराव होळकरांची कोटपुतळीला भेट झाली. उत्तरेत हे सगळं होत असताना इकडे नानासाहेब आणि भाऊसाहेबांनी सहा सुभे दख्खन निजामाच्या तावडीतून मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली होती.

१७५७ पासून शिवनेरी, अहमदनगर आदी मुख्य मुख्य किल्ले जिंकत १७६०च्या फेब्रुवारीत उद्गिरला निजामाचा पराभव करण्यात आला. निजामाकडून या वेळेस अशेरी, दौलताबाद, विजापूर आदी अत्यंत महत्वाची ठाणी तहात कबूल करून ही जिंकण्यासाठी सैन्य पाठवलं गेलं होतं.

दि. ७ मार्च १७६० रोजी परतूडला छावणी पडली असताना, होळीच्या खेळात सारे दंग असताना एकाएकी वीज कोसळावी तशी दत्ताजींच्या खुनाची बातमी येऊन कोसळली. आघात झाला.

दत्ताजी म्हणजे नानासाहेबांचे अत्यंत लाडके, ईश्वराघरचे शिपाई. ताबडतोब खाशांनी उत्तरेत अब्दालीवर हल्ला चढवून या वेळेस अब्दालीला न सोडण्याचा निश्चय झाला.

पूर्वीप्रमाणे राघोबादादांनी जावं असा बेत होता, पण त्यांनी ऐनवेळेस एक कोटी रुपयांची मागणी केल्यावरून नानासाहेब भडकले आणि आयत्या वेळेस भाऊसाहेबांनी जावं असं ठरलं. भाऊसाहेब पन्नास हजारांची फौज घेऊन सिंदखेडमार्गे उत्तरेत निघाले.

भाऊंनी उत्तरेत जाताच सुरजमल जाट, माधोसिंह-बिजेसिंहासह साऱ्यांना आपल्याला येऊन मिळण्यासाठी पत्रं पाठवली खरी, पण आधीच्या राजकारणांवरून सुरजमल अंदाज घेत तटस्थ राहिला.

माधोसिंह-बिजेसिंह तर अब्दालीलाच मिळाले. बंगश बोलूनचालून पठाण असल्याने अब्दालीला मिळाला. आता उरला होता शुजा.

भाऊंनी शुजाला त्याच्या वडिलांची, सफदरजंगाची आठवण करून दिली आणि मराठ्यांशी पूर्वीपासून कसं सख्य होतं हे सांगितलं, पण नजीब-इमादसारख्या विरोधकांना मराठ्यांनी आधी चुचकारल्याने शुजाने चटकन निर्णय घेतला नाही.

त्याने वजिरीच्या बदल्यात मराठ्यांना मदत करण्याचं वचन दिलं खरं, पण अब्दाली तोवर शुजाच्या अगदीच जवळ जाऊन ठेपला होता. अब्दालीच्या धर्मयुद्धाच्या कल्पनेनं शुजाला भुरळ घातली आणि तो अखेरीस जुलै महिन्यात अब्दालीला जाऊन मिळाला.

जुलै १७६० मध्ये आधी दिल्ली शहर आणि नंतर इब्राहीमखानाच्या तोफखान्याच्या जोरावर भाऊंनी लाल किल्ला जिंकला. या घटनेचे पडसाद अब्दालीच्या छावणीत उमटले.

मागण्या मान्य होत असतील तर आत्ता भाऊंना तह हवा होताच, अब्दालीलाही हवा होता. पण अब्दालीचं म्हणणं मान्य करणं मराठ्यांसाठी नामुष्की ठरली असती.

इकडे पैशांची गरज असताना दिवाण-ए-खास मधील सिंहासनाच्या वरच्या छताचा चांदीचा पत्रा काढून भाऊंनी पैशाची निकड भागवली. आपल्याकडे भाऊंनी सिंहासन फोडलं असं कायम सांगितलं जातं त्याला काहीही अर्थ नाही.

ही परिस्थिती महिनाभर टिकली, पण सप्टेंबर नंतर मात्र पैशाची छानछान जाणवू लागली. अब्दालीने आधीच सगळं लुटलं असल्याने आणि आधीची तीन वर्षे सतत लढाया सुरु असल्याने मुलुख वैरण झाला होता.

पैशाची छानछान दूर करण्यासाठी भाऊंनी अचानक कुंजपुऱ्यावर हल्ला चढवला. अब्दालीने त्याचा बराचसा खजिना इथे ठेवला होता. दि. १७ ऑक्टोबर १७६० रोजी कुंजपुरा मराठ्यांनी जिंकला.

अब्दुस्समदखान आणि कुत्बशाह या दोघांचाही शिरच्छेद करण्यात आला. कुत्बशहाने दत्ताजी शिंद्यांचे जे हाल केले, तेच हाल भाऊंनी त्याचे केले. दोघांचीही डोकी भाल्यावर खोचून फौजेत मिरवण्यात आली.

दोनच दिवसात दसरा होता, तो उत्साहात साजरा झाला. या विजयाच्या उत्साहात फौजा आणि यात्रेकरू कुरुक्षेत्रावर गेले.

नेमकं इथे माघारी, कुंजपुरा हातचा गेल्याचं पाहून अब्दाली चवताळला. त्याने घाईने जिथून मार्ग मिळेल तिथून २६ आणि २७ ऑक्टोबरला यमुना ओलांडली.

सोनपतला असलेल्या एक हजार बेसावध मराठा सैन्याला याची खबर नव्हती. अचानक आलेल्या हल्ल्यात ते सारे मारले गेले. यथावकाश भाऊंना ही खबर कळल्यावर त्वरेने सारे दिल्लीच्या रोखाने जाऊ लागले.

ही दोन्ही सैन्य एकमेकांच्या जवळ येऊन पोहोचली तेव्हा मराठे पानिपत नावाच्या गावाच्या जवळ थांबले होते. इब्राहिमखान गारद्याने भाऊंना सल्ला दिला, की इथेच तळ ठोकावा.

पानिपतचं मैदान तोफखान्याच्या युद्धासाठी अनुकूल होतं. पानिपतच्या लहानश्या किल्ल्याचा आश्रय घेऊन मराठी तळ पडला. खंदक खणले गेले.

याच पानिपतच्या भूमीवर पूर्वी १५२६ मध्ये बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये, तर १५५६ मध्ये अकबर आणि हेमचंद्रदास यांच्यात लढाया झाल्या होत्या. या दोन्हीचाही आधी, जवळच असलेल्या कुरुक्षेत्राच्या भूमीवर महाभारत झालं होतं. आता ही भूमी नव्या युद्धाची चिन्हं पाहत होती.

पुढचे अडीच महिने दोन्ही सैन्ये एकमेकांच्या समोर उभी होती. अब्दाली आणि कंदाहारच्या वाटेवर भाऊ रस्ता अडवून बसले होते, तर मराठे आणि पुण्याच्या वाटेवर अब्दाली अडसर बनून थांबला होता.

पानिपतच्या युद्धाचं वर्णन आपल्याला सहजासहजी कुठेही वाचता येतं, अनेक ग्रंथ त्यावर उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाबद्दल आत्ता आपण चर्चा करायला नको.

दिवस जात होते, आणि अखेरीस निर्णायक दिवस उजाडलाच. दि. १४ जानेवारी १७६१ रोजी सकाळी उगवत्या सूर्याच्या साक्षीने दोन्ही फौजा एकमेकांवर तुटून पडल्या.

दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होते आहे, असं वाटत असतानाच अचानक विश्वासराव गोळी लागून ठार झाले आणि त्यांच्या मृत्यूने भाऊंचा धीर सुटला. तेही घोड्यावरून दिसेनासे झाले म्हटल्यावर मराठी फौज उधळली गेली.

दुपारपर्यंत विजयाची अशा नसलेल्या आणि मागच्या मागे कबिल्यासह पळून जाण्याची तयारी ठेवलेल्या अब्दालीचं नशीब पालटलं. संध्याकाळपर्यंत अब्दालीच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली होती.

भाऊसाहेब, विश्वासराव, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, सोनाजी भापकर असे खासे खासे वीर पडले. जनकोजी शिंदे आणि इब्राहिमखान पकडले गेले.

जनकोजींचा खून करण्यात आला तर इब्राहिमखान जखमा चिघळून गेला. समशेरबहाद्दर आणि अंताजी माणकेश्वर वाचून रणातून निघाले खरे, पण ते दोघेही लवकरच मृत्यू पावले.

मल्हारराव होळकर युद्धभूमीवरून निघाले. पानिपतच्या या भूमीतून दोन नररत्न मात्र वाचली, ज्यांनी पुढे दौलत अत्यंत समर्थ हातांनी सांभाळली. कोण? नावं पुढच्या भागात समाजतीलच.

  • कौस्तुभ कस्तुरे

या लेखमालिकेत एकूण सहा लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *