READING TIME – 6 MINS

मुघल हे परकीय अशी आपली आत्ता धारणा आहे. तसं बघायला गेलं तर ते परकीयच,पण अठराव्या शतकात मात्र राजकारणं वेगळी घडत होती.

बाबर भारतात येऊन जवळपास दोनशे वर्षे झाली होती. या वेळी मुघलांचा तेरावा बादशाह दिल्लीच्या सिंहासनावर बसला होता. हिंदुस्थान बुंदेल्यांसारखी काही मोजकी संस्थानं सोडता पूर्णपणे मुघलमय झालं होतं.

राजपूत, जाट, पहाडी आदी सारे मुघलांचे मंडलिक झाले होते. ही परिस्थिती इथे दक्खनेत मात्र नव्हती.

पुढे जाण्याआधी दोन संज्ञा आधीच स्पष्ट करतो. यापुढे जिथे जिथे हिंदुस्थान हा शब्द येईल तिथे तिथे नर्मदेच्या वरचा आजचा उत्तर भारत अपेक्षित असून जिथे दख्खन हा शब्द येईल तिथे नर्मदेच्या खाली, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक अपेक्षित आहे.

तर, दख्खनेत मात्र या वेळेस मराठ्यांचं राज्य मोठ्या प्रमाणात विस्तार पावत होतं, आणि मुघलांना प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान देत होतं. आता सारी राजकारणं इथून सुरु होतात.

मुघल हे वास्तविक परकीय असले तरी इतकी वर्ष ते आपल्यावर राज्य करत असल्याने आपले मायबाप आहेत अशी हिंदुस्थानी लोकांची धारणा झाली. अशात, मराठ्यांच्या उत्तरेत स्वाऱ्या होऊ लागल्या तेव्हा त्यांच्या मनात मराठ्यांबद्दल एक प्रकारची असूया निर्माण झाली.

मुघल आमचे मायबाप असले तरी नवं राज्य निर्माण व्हायचं तर ते हिंदुस्थानी लोकांचं व्हायला हवं, हे कोण कुठले मराठे उत्तरेत येऊन आमच्यावर अधिकार कसा काय गाजवू शकतात? या प्रश्नाने अनेक जाट-राजपुतादी लोकांची माथी भडकली.

नेमका काळही असा होता, की आता मराठ्यांच्या मुख्य प्रधानपदावर अशी व्यक्ती विराजमान झाली होती, जिचा राजकारणात आणि युद्धक्षेत्रावर पराभव करणं सहजासहजी कोणालाही शक्य होत नव्हतं. ही व्यक्ती म्हणजे बाजीराव बल्लाळ, अथवा थोरले बाजीराव पेशवे.

पेशव्याचा धाकटा भाऊ चिमाजीअप्पा हाही तितकाच पराक्रमी निपजल्याने या दोघं भावांच्या विरोधात जायला कोणी धजावेना.

इ.स. १७२८-२९ मध्ये या राम-लक्ष्मणासारख्या या दोघाही भावांनी नर्मदा ओलांडून मध्य प्रांतातल्या मुघली प्रदेशावर आक्रमण केलं आणि हा सारा प्रदेश मराठा साम्राज्याला जोडला.

बादशहाचे इथले कडवे सरदार गिरीधर आणि दयाबहाद्दर हे अजिंक्य आहेत असं जनमत होतं, पण तेवीस वर्षांच्या चिमाजीअप्पांनी या दोघांचाही केवळ पराभव केला नाही तर दोघांनाही यमसदनाला धाडलं.

याच वेळेस इथे बाजीरावांनी बुंदेलखंडात जाऊन बादशहाच्या महम्मदखान बंगश नावाच्या आणखी एका सरदाराचा प्रचंड पराभव केला नि बुंदेल्यांना त्यांचं स्वातंत्र्य पुन्हा मिळवून दिलं.

यानंतरच्या घडामोडी इतक्या वेगाने घडल्या, की राजपुतांच्या दोन गाद्यांमधली भांडणं तात्पुरती विसरून सारे राजपूत एक झाले, मराठ्यांच्या पाठीशी आले.

मुघलांच्या दरबारातला एक मोठा गट बाजीरावाला आपण गोंजारून घेतलं पाहिजे, त्याच्याशी शत्रुत्व परवडणार नाही असं म्हणू लागला. तरीही, बादशाह आणि इतर सरदारांना मात्र हे काही पटत नव्हतं.

कोण हे मराठे? आमच्या आलमगीराने यांना केव्हाच नेस्तनाबूत केलं आहे अशी यांची अजूनही धारणा होती.

इ.स. १७३७ मध्ये बाजीरावांनी अटेरची मोहीम काढली आणि केवळ बादशाही सरदार सादतखानाच्या बढायांमुळे बाजीरावांना आपली मोहीम आणखी विस्तारून पुढे दिल्लीपर्यंत न्यावी लागली.

तो सगळा प्रसंग मी काही इथे सांगत नाही, पण फार गमतीशीर आहे. या मोहिमेत बाजीराव आपल्या फौजांसह चक्क दिल्लीत शिरले आणि तिथे त्यांनी गोंधळ माजवून दिला.

आत्तापर्यंत फुशारक्या मारणारा बादशाह लाल किल्ल्याचे दरवाजे लावून लपून बसला. बाजीरावांच्या सैन्यावर त्याने जी फौज सोडली त्या फौजेची मराठ्यांनी अक्षरशः बिकट अवस्था केली.

अखेरीस वजीर कमरुद्दीनखान मोठ्या फौजेसह दिल्लीच्या रक्षणार्थ येत आहे हे पाहून बाजीरावांनी दिल्लीतून आपला मुक्काम हलवला.

या वरच्या घटनेच्या केवळ दोन वर्षातच दिल्लीच्या बादशहाचा मराठ्यांबद्दल असलेला दृष्टिकोन बदलला. कारणही तसंच घडलं होतं. इराणचा बादशाह नादिरशाह या दिल्लीवर चालून येत होता.

बादशाही फौजांचा नादिरशाह समोर पराभव झाला, आणि नादिरशाह दिल्लीत शिरला. त्याने दिल्लीत कत्लेआम केली, म्हणजे दिसेल त्याला मारून टाकण्याचा हुकूम सोडला.

आता मात्र वजीर कमरुद्दीनखान, सादतखान, महम्मदखान बंगश आदी जे जे बाजीरावांचे आधी शत्रू होते त्यांना बाजीरावांची मदत घेणं अत्यंत गरजेचं वाटू लागलं.

बाजीरावांनीही हीच संधी योग्य आहे असं पाहून बादशहाच्या मदतीला जायचं ठरवलं. दुर्दैवाने ही मदत वेळेवर पोहोचू शकली नाही, कारण मराठ्यांचं मोठं सैन्य इकडे वसईच्या मोहिमेत गुंतलं होतं.

बाजीराव मोठ्या फौजेची जमवाजमव करून दिल्ली गाठणार आहेत हे नादीरशहाला समजलं, आणि त्याने दिल्लीतून काढता पाय घेतला. नादीर गेला, पण दिल्लीची अवस्था बिकट करून गेला. आधीच खंगलेली बादशाही आणखी कोसळली.

मी वर जे पानिपतच्या प्रकरणाचं बीज ३२ वर्षे आधीच्या घटनांमध्ये आहे म्हटलं होतं ना, ते इथपासून सुरु होतं. नादीरशहाचं आक्रमण हे अठराव्या शतकातील एकंदरीतच मानसिकतेनुसार परकीय आक्रमण होतं, इथल्या मुघलांवर झालेलं.

बाजीरावांचं चिमाजीअप्पांना लिहिलेलं एक पत्रं आहे, ज्यात ते स्पष्टपणे म्हणतात, “अप्पा, परचक्र आले तरी ते सर्वांवर आहे”, म्हणजेच, नादीरशहाची स्वारी आली आहेच, पण तो इथे कायम राहिला तर दिल्लीपर्यंतच सीमित राहणार नाही. तो दख्खनेतही स्वाऱ्या करणार. त्यामुळे त्याची पाळंमुळं इथे रुजण्यापूर्वीच ती उखडून टाकली पाहिजेत.

इथे बाजीरावांना बादशाहाबद्दल काडीचंही प्रेम नव्हतं, पण एका मुघलांना उखडून टाकताना आणखी नवं परचक्र येत आहे ही गोष्ट कोणालाही सहन होण्याजोगी नव्हती.

पूर्वी, १६७७ सालच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचा जो अर्थ होता तोच अर्थ बाजीरावांच्या या वाक्यात आहे. महाराजांच्या काळात मुघल हे परकीय असून दख्खनेत आदिलशाही-कुत्बशाही आणि मराठे वगैरेंच्यात कितीही शत्रुत्व असलं तरी आमचं आम्ही पाहून घेऊ.

मुघल दख्खनेत उतरले तर आम्ही आमच्यातलं वैर विसरून एकत्रित येऊन त्यांचा प्रतिकार करू हे ते सूत्र होतं. इथे केवळ प्रदेश विस्तारला होता. आता मराठ्यांचं राजकारण माळव्याच्याही पलीकडे गेलेलं असल्याने नादिरशाह हिंदुस्थानवर म्हणजेच आमच्यावरच चालून आला हे उघड होतं. या वेळेस मात्र हा लढाईचा प्रसंग टळला.

नादीर परत गेला आणि दैवदुर्विलासाने पुढच्या सहा महिन्यात मराठ्यांचा हा ईश्वरदत्त सेनानी ठरलेला पेशवाही रंगमंचावरून निघून गेला. राम गेला, आणि पुढच्या आठ महिन्यात लक्ष्मणाची त्याच्या पावलांवर पावलं टाकत स्वर्गाकडे मार्गस्थ झाला.

मराठमंडळात आता पुढचा पेशवा कोण होणार आणि त्याची रणनीती काय असणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

  • कौस्तुभ कस्तुरे

या लेखमालिकेत एकूण सहा लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *