READING TIME – 6 MINS

दिल्लीतला सत्तासंघर्ष, पूर्वीप्रमाणे बादशाहाचे होणारे खून वगैरे काही नवे नव्हते, पण आता चित्र पालटलं होतं ते मराठ्यांमुळे. इमाद काय किंवा सफदरजंग काय, कोणीही कोणाचेही खून पाडले असते तरी ते इस्लामचे बंदे होते.

या साऱ्यात मराठे बलवान होत आहेत आणि हे असंच सुरु राहिलं तर मात्र दिल्लीची बादशाहीचा मराठ्यांच्या हाती जाईल अशी भीती काही जणांना वाटू लागली होती.

यात एक प्रमुख व्यक्ती आघाडीवर होती ती म्हणजे दिल्लीचा शाहवलीउल्लाह देहलवी. बादशाहीत काही धमक नाही हे आता उघड होतं. नजीबखानाही शाहवलीउल्लाहशी ओळख असली तरी नाजिबात एकट्यात एवढं सामर्थ्य नाही हे शाहवली जाणून होता. यासाठी अब्दालीसारख्यांचीच आवश्यकता आहे हे त्याला आणि नजीबला, दोघांनाही मनोमन पटलं होतं.

शाहवलीने नजीबाकरवी अब्दालीला पत्रं पाठवून इथे इस्लामची कशी वाताहात झाली आहे आणि मराठे कसे वरचढ होत आहेत हे पटवून दिलं.

दुसरीकडे वजीर इमादशी असलेल्या वैमनस्यातून पंजाबच्या पूर्वीच्या सुभेदाराची विधवा आणि वजीर कमरुद्दीनची सून मुघलानी बेगम हिनेही अब्दालीला आमंत्रण दिलं.

जानेवारी १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीत आला आणि दिल्लीचा न भूतो न भविष्यती विनाश सुरु झाला. नादिरशाह परवडला, पण अब्दाली नको अशी गत झाली.

अब्दालीच्या अव्वाच्या सव्वा मागण्या मान्य करण्याची ताकद इमाद-उल-मुलकात नव्हती. अब्दालीला दिल्लीत दोन कोटींहून अधिक लूट मिळाली. शाही जनानखान्यातील अनेक स्त्रिया अब्दालीने नेल्या.

दिल्लीच्या रक्षणार्थ नानासाहेबांनी ठेवलेल्या अंताजी माणकेश्वरांनी दोनदा अब्दालीला यशस्वी तोंड दिलं, पण त्यांनाही एका पराभवानंतर माघार घ्यावी लागली. अटक उतरल्यानंतर अब्दालीला विरोध कोणीही केला नव्हता तो विरोध पहिल्यांदाच मराठ्यांकडून झाला.

फेब्रुवारीमध्ये अब्दालीने गोकुळ आणि वृन्दावनावर स्वारी केली. इथे हिंदूंची इतकी कत्तल करण्यात आली, की जवळपास आठवडाभर यमुनेचं पाणी लाल दिसत होतं.

गोकुळावर खुद्द अब्दालीने स्वारी केली. इथल्या नागा साधूंनी अब्दालीचा प्रतिकार केला. दोन हजार नागा साधू मारले गेले, अन अखेरीस गोकुळात काहीच हाती लागत नाही म्हणून अब्दाली माघारी फिरला.

अब्दालीने खुश होऊन नजीबला मनाची वस्त्र आणि मीरबक्षीगिरी बहाल केली. महम्मदशाह बादशहाच्या मुलीशी निकाह लावून आणि अंदाजे बारा कोटी रुपये संपत्ती घेऊन अब्दाली मायदेशी चालता झाला.

स्त्रियांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. आपल्याकडच्या एका पत्रात म्हटलंय, “जितक्या बादशाहाजाद्या होत्या तितक्यांस आपल्या लोकांस विवाह करून दिल्या. जिथवर चांगली बाई हिंदूची होती तेथवर लोकांनी बाटविल्या व आपल्या घरात घातल्या.”

अब्दालीची स्वारी होत असताना रघुनाथराव आणि मल्हारराव इंदूरला होते, पण पुरेश्या सैन्याच्या अभावी त्यांनी अब्दालीवर थेट हल्ला करण्याचं धोरण स्वीकारलं नाही.

हे दोघेही राजपुतान्यातून खंडणी वसूल करण्यासाठी तिकडे गेले ही गोष्ट काहीशी नामुष्कीची झाली. अंताजी माणकेश्वराकडून जीव तोडून पात्र येत असतानाही रघुनाथरावांनी अब्दालीकडे न पाहणं ही मोठी घोडचूक ठरली.

अब्दाली दिल्लीतून गेल्यावर एक महिन्यांनी हे दोघेही आग्र्याला येऊन पोहोचले. ऑगस्ट १७५७ मध्ये दिल्लीवर हल्ले करण्यात आले. अखेरीस नजीब मल्हाररावांसमोर शरण आला आणि त्याने “मी तुमचा फर्जंद आहे” म्हणून गळ घातली.

चार कलमी मुद्दे नजीबाने मांडले आणि रघुनाथरावांच्या विरोधाला न जुमानता मल्हाररावांनी नजिबाला मोकळं सोडलं. नजीब मोकळा सुटला तरी त्याची मस्ती जिरली नाही. त्याने छावणीत गाईंची कत्तल आरंभली, इतकी की रस्त्यावर माणसाचा चिखल झाला.

रघुनाथराव तलवार उपसून चालून जात असता मल्हाररावांनी “नजीबला मारायचं असल्यास मला मारूनच पुढे जा” म्हटल्याने अखेरीस रघुनाथरावांचा नाईलाज झाला. नजीब पुन्हा सुटला. मराठ्यांनी अगदी सहारनपूरपासून ते सरहिंदपर्यंत गेलेला सगळा प्रदेश पुन्हा जिंकला.

इथे मराठे पुन्हा वरचढ होत आहेत हे पाहून आदिनाबेगने मराठ्यांना पंजाबवर स्वारी करण्यास आमंत्रण दिलं. मराठ्यांनी अल्पावधीतच पंजाबचा सारा प्रदेश जिंकून घेतला. मराठे त्याही पुढे गेले.

१९ एप्रिल १७५८ला मानाजी पायगुडेंनी लाहोर जिंकलं. मराठे अटकपर्यंत पोहोचले, आणि त्याही पुढे जाऊन साबाजी शिंदे-तुकोजी होळकरांच्या फौजा पेशावरपर्यंत पोहोचल्या.

मराठ्यांची ही विजयी मोहीम पाहून इराणच्या विद्यमान शहाने अब्दालीविरुद्ध रघुनाथरावांकडे तहाचा प्रस्ताव ठेवला आणि अटक हद्द असावी असं सुचवलं, पण काबुल-कंदाहार हे मूळचे आपले सुभे, ते मिळणार नसतील तर तह करून उपयोग नाही म्हणून रघुनाथरावांनी हा तह नाकारला.

खुद्द अब्दालीचा एक पुतण्या अब्दुर्रहीमान हा पुण्याला नानासाहेबांना येऊन भेटला. नानासाहेबांनी त्याला रघुनाथरावांकडे पाठवलं. राघोबाने त्याला पेशावरचा सुभा परस्पर देऊन टाकला.

पुढे पाऊस आणि इतर परिस्थिती पाहता साबाजी शिंदे वगैरेंना पंजाबात ठेऊन रघुनाथराव परत फिरले. त्यांच्या जागी नानासाहेबांनी उत्तरेतले आपले सरदार दत्ताजी शिंदे यांना नियुक्त केलं. राघोबादादा उत्तरेतून मिळकत सोडाच, पण नवं ऐंशी लाखांचं कर्ज घेऊन आले होते ही आणखी एक चिंतेची बाब बनली.

या कर्जाची वसुली करण्याचं महत्वाचं काम शिंद्यांकडे आलं होतं, त्यानुसार दत्ताजी आणि जनकोजी मन लावून काम करत होते. दत्ताजी १७५९च्या एप्रिलयात सतलजपर्यंत जाऊन पोहोचले.

यावेळेस अटकेवर तुकोजी होळकर, पेशावरला साबाजी शिंदे, मुलतानला बापूजी त्रिंबक आणि लाहोरला नारो शंकर दाणी यांची नेमणूक झाली होती. दत्ताजींनी नजीबखानाची मदत घेण्याविषयी नानासाहेबांना विचारलं, पण नानासाहेबांनी स्पष्ट विरोध केला.

“नजीब पुरता बाट, हरामखोर आहे. तो दुसरा अब्दाली आहे” असं नानासाहेबांनी दत्ताजींना लिहून कळवलं. दोन वर्षांपूर्वीच अंताजी माणकेश्वरांनीही “नजीब आणि अब्दाली दोन नाहीत” असं कळवलं होतं.

तरीही दत्ताजी दुर्दैवाने नजीबाकडून आपल्याला मदत मिळेल या अपेक्षेने शुक्रतालवर उतरले आणि नजीबाने विश्वासघात केला. अखेरीस दत्ताजींना नजिबाचे खरे दात दिसले.

१७५९च्या सप्टेंबरमध्ये अब्दाली कंदाहारहून निघाला. त्याने एकेक करून मराठ्यांनी जिंकलेली आपली एकेक ठाणी पुन्हा जिंकून घेतली. बाबाजींनी पेशावरहून माघार घेतली, अटक थोडंफार झुंजलं, पण शेवटी तेही अब्दालीने जिंकलं.

पंजाबमधल्या जनतेने या वेळेस मराठ्यांविरुद्ध बंड पुकारल्याने अखेरीस मराठी फौजा माघार घेत घेत दत्ताजी शिंद्यांकडे आले. आधीच्या लेखांत जी राजपुतांची मनस्थिती सांगितली ती आठवत्ये का? तेच राजपूत- माधोसिंह आणि बिजेसिंह हे आता मराठ्यांविरुद्ध अब्दालीला जाऊन मिळाले होते. वारा आता उलटा वाहू लागला होता.

  • कौस्तुभ कस्तुरे

 या लेखमालिकेत एकूण सहा लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *