READING TIME – 6 MINS
दिल्लीच्या दरबारात वजीर विरुद्ध पठाण असा झगडा लागला होता, ज्यात वजिराची हळूहळू पीछेहाट होत होती. आपली मराठी कागदपत्र ज्याला लंगडा पठाण म्हणत त्या अहमदखान बंगशाने बंड करून वजिराची महत्वाची सगळी ठाणी जिंकून घेतली.
वजिराच्या बायकोने आणि सुरजमल जाटाने त्याला सल्ला दिला,की मराठेच या साऱ्यातून आता आपल्याला वाचवू शकतात, त्यांची मदत घ्यावी. वजीर मराठ्यांची मदत घेणार हे पठाणांना समजलं, आणि त्यांनी पुन्हा बादशहाचे कान फुंकले.
बादशहा उघडपणे अजूनही वजिराच्या विरोधात जाऊ शकत नसला तरी त्याने वजिराच्या नकळत आतून पंजाबातून मीर मन्नू आणि दक्षिणेतून नासिरजंगाला मदतीला यायला फर्मानं पाठवली, पण नेमकं इथे नासिरजंगाचा खून पडला आणि अब्दालीच्या स्वारीमुळे मीर मन्नू येऊ शकला नाही. परिणामी पठाणांना कुमक झाली नाही आणि वजीर पुन्हा एकदा सर्वांवर भारी पडला.
इकडे दक्षिणेत साताऱ्याची राजकारणं आता उरकली होती, त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी आपल्या दोन्ही सरदारांना, शिंदे-होळकरांना उत्तरेत रवाना केलं.
याच वेळेस वजिराकडून रामनारायण आणि जुगलकिशोर हे दोघे वकील सरदारांना मदतीसाठी येऊन भेटले.
शिंदे-होळकरांनी बादशाही पठाणांपासून वाचवण्यासाठी वजिराचं साहाय्य करण्याचं वाचन दिलं. एप्रिल १७५१ मध्ये मराठी फौजा पठाणांवर तुटून पडल्या, इतक्या,की पूर्वी मराठे केवळ अंतर्वेदीत उतरले होते, पण आता तर ते गंगा पार करून हिमालयाच्या पायथ्याला चक्क रोहिल्यांच्या प्रदेशात शिरले.
आपल्या या दोन पराक्रमी सरदारांची कर्तबगारी पाहून नानासाहेब बेहद्द खुश झाले, सरदारांना म्हणाले, “शाबास तुमच्या हिमतीची व दिलेरी रुस्तुमीची. दक्षिणच्या फौजांनी गंगायमुना पार होऊन पठाणांशी युद्ध करून फत्ते पावावे हे कर्म लहान सामान्य नव्हे”.
गोविंदपंत बुंदेल्यांच्या एका पत्रात बादशाहाचं मराठ्यांबद्दलचं मत दिसून येतं- “पठाण व रोहिले, दोनही मातबर फौजा बुडवितात पातशाहास मोठा वसवास जाला जे, श्रीमंत नानांची फौज इकडे आली त्यामुळे हे (पठाण) पातशाही बुडवितात, मोदितात तेव्हा आता मराठ्यांहून आणिक कोणी मातबर नाही.”
या सगळ्या घडामोडींत पठाण आणि रोहिल्यांना मात्र एक नवा म्होरक्या मिळाला, तो म्हणजे नजीबखान. वजीर आणि मराठ्यांच्या या चढाईने नजीबखान चवताळला आणि त्याने १७५१च्या अखेरीस अब्दालीला पुन्हा एकदा दिल्लीवर स्वारी करण्यास आमंत्रण दिलं.
अब्दालीला कारणच हवं होतं. तो आपली फौज घेऊन इ.स. १७५२च्या जानेवारीत पुन्हा पंजाबच्या वेशीवर दाखल झाला. हे पाहून बादशाह-वजिरासह सगळ्यांचं धाबं दणाणलं.
शिंदे-होळकरांनी मात्र चतुराईने अब्दालीशी लढण्यासाठी बादशाही फौजांत एकी हवी असं सांगून वजीर आणि पठाण-रोहिल्यांमध्ये बाह्यात्कारी का होईना पण सख्य घडवून आणलं.
नजीबखान वरकरणी सख्य झालं असं दाखवत असला तरी त्याला अब्दाली इथे आलेला हवाच होता. बादशहाने निरोपांवर निरोप पाठवून वजिराला दिल्लीत बोलावणं पाठवलं.
दि. २३ एप्रिल १७५२ हा दिवस हिंदुस्थानच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. अब्दालीच्या वारंवार होणाऱ्या स्वाऱ्यांना त्रासून मीर मन्नूने मुलतान आणि पंजाब हे दोन सुभे अब्दालीला देऊन आपल्यावरील अरिष्ट टाळण्याचा करार केला.
यापूर्वीच अब्दालीने दिल्लीच्या बादशाहाकडेही कलंदरखान नावाचा आपला वकील पाठवला होता. या वकिलाला काय उत्तर द्यायचं हे ठरत नसल्याने बादशाह वजिराची वाट पाहत होता, आणि वजीर मात्र अजूनही अब्दालीकडून परस्पर मीर मन्नू आणि पठाणांची वाताहात होईल म्हणून यात जातीने लक्ष घालत नव्हता.
वजिराने बादशहाला कळवलं होतं, की काही झालं तरी मराठेच आपलं रक्षण करू शकतात. मी त्यांना घेऊन येतो. पण वजीर काही बोलावणी पाठवूनही दिल्लीत येत नाही हे पाहून बादशहाने २३ एप्रिललाच अब्दालीच्या वकीलाशी बोलणी केली आणि खंडणीची मागणी मान्य केली.
नेमकं याच दिवशी कनोज इथे वजीर सफदरजंगाने शिंदे-होळकरांशी बादशाही वाचवण्यासाठी पन्नास लक्ष रुपये आणि अजमेर-आग्रा हे दोन्ही सभे देण्याचं मान्य केलं.
सोबतच पंजाब-सिंध आणि अंतर्वेदीत अधिकृतरीत्या चौथाई मराठ्यांना मिळणार होती. या बदल्यात मराठे पन्नास हजार फौजेसह बादशाहाचं रक्षण करणार होते.
मराठ्यांच्या या फौज दिल्लीत पोहोचल्या तेव्हा वजिराला बादशहाचे प्रताप समजले. तो आणखी भडकला. मराठ्यांशी केलेला करार पूर्ण होणे गरजेचे होते, नाहीतर मराठी फौजांनी दिल्लीत गोंधळ घातला असता.
अखेरीस बादशहाने मराठ्यांशी झालेल्या कराराला मान्यता दिली. यात ठरलेली सगळी रक्कम मिळाली नाही तरी बरीच रक्कम वसूल करण्यात आली.
वर उल्लेखलेल्या साऱ्यांचं पर्यवसान पुढे बादशाह-वजीर झगड्यात झालं, आणि दोनेक वर्षात सफदरजंग राजकारणातून बाजूला होऊन त्याच्या जागी काही काळ एक नवा वजीर आला.
हा नवा वजीरही दोन वर्षातच बदलून धाकटा गाजीउद्दीन इमाद-उल-मुल्क हा आता वजीर झाला. हा होता बाजीरावांचा कट्टर शत्रू निजाम-उल-मुलखाचा नातू, पण तरीही हा मराठ्यांना अनुकूल होता हे विशेष.
अजमेर आणि आग्रा हे दोन सुभे मराठ्यांना मिळाल्याने जाट आणि राजपुतांशी मात्र मराठ्यांचा बेबनाव झाला. आग्र्यावर जाट हक्क सांगत होते, तर अजमेरवर राजपूत. पण आता आग्रा होळकर आणि अजमेर शिंद्यांनी घ्यायचं ठरवलं आहे हे पाहून राजपूत-जाट भडकले.
इ.स. १७५४-५५ या वर्षात जाटांचा होळकरांशी आणि राजपुतांचा शिंद्यांशी बेबनाव झाला. इतका, की साऱ्या राजकारणाचा रंग बिघडला. कुंभेरीच्या वेढ्यात जाटांच्या तोफेचा गोळा लागून मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव मारला गेला.
कुंभेरीची गढी खणून तिची माती यमुनेत टाकीन असा मल्हाररावांनी पण केला. दुसरीकडे पूर्वीच्या जयपूरच्या वारसाहक्काचं निमित्त काढून, आणि सध्याच्या मारवाडच्या गादीचा तंटा बघून राजपुतांनी नागोरात जयाप्पा शिंद्यांचा दग्यानें खून करवला.
दत्ताजी आणि जनकोजी शिंद्यांनी हिम्मत बांधून अंताजी माणकेश्वरांना मदतीला बोलावल्याने पुढे राजपूत सेनापती अनिरुद्धसिंगाचा पराभव करण्यात आला. या साऱ्याची परिणीती पुढे पानिपतावर घडणार होती….
- कौस्तुभ कस्तुरे