वसंत उलटून गेला की, कडुनिंबाच्या झाडांच्या लिंबोळ्या झडायला लागायच्या. आम्ही मुलं पिशव्या, चिरगुटं घेऊन त्या गोळा करायला धावायचो. ह्या लिंबोळ्या म्हणजे छोटे आंबेच असायचे. लिंबोळ्या पिळून त्यांतली इवलीशी कोय सटकत बाहेर काढण्याचा खेळ आम्ही खेळत असू. दिवसभर लिंबोळ्या गोळा करत फिरत जायचं दूर दूर. त्या गोळा केलेल्या लिंबोळ्या विकून चार पैसे सहज मिळत.
नळाच्या कडेला ठिकठिकाणी रुईची किंवा रुईटाची खुरटी झाडं आलेली असायची. मोठमोठ्या पानाची झाडं औषधी म्हणून उपयोगात यायची. पान तोडलं की, देठाजवळ दुधासारखा पांढरा द्रव पाझरत असे. पायात काटा मोडला व तो निघत नसला की, आम्ही रात्री झोपताना पायाला रुईटाचा चीक लावून वर चिरगूट बांधत असू. आणि खरोखर सकाळी तो काटा सळकन बाहेर आलेला असे. रुईटीच्या पानांची माळ शेंदूर फासलेल्या मारुतीलाही दर शनिवारी चढवलेली दिसायची. काही ठिकाणी कोरफड दिसे. धोतरा सापडे. कन्हेरीची झाडं नळाच्या कडेला ठिकठिकाणी असत. दगडी पाला तर पावलापावलावर आढळे. कुठे खरचटलं, जखम झाली की, आम्ही हमखास तो दगडी पाला चेचून त्याचा रस जखमेवर लावत असू. दोन एक दिवसांत जखम ठणठणीत बरी व्हायची. अगदी दुर्मीळ, पण एकदोन ठिकाणी गुंजाची झाडं होती. आम्ही मुलं त्या झाडाखाली पडलेल्या गुंजा गोळा करत असू. लालभडक गुंजा. त्यावर हळुवार दिलेला काळा ठिपका. एखाद्या चित्रकाराने रंगकाम करावं तसं असे हे. किती तरी गुंजा आम्ही गोळा करून जमवत असू. सोन्याचं वजन जोखणाऱ्या या गुंजा आम्हांला कौतुकाच्या वाटत. कन्हेरीच्या झाडाची मुळं विषारी असत. जाचाने त्रस्त झालेली सासुरवाशीण या कन्हेरीच्या मुळ्या गुपचूप खाई व मग घरात गहजब होई.
सोलापूर गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होतं. पहाटेच गिरण्यांचे भोंगे सुरू होत. एकापाठोपाठ एक भोंगे ओरडू लागत आणि सोलापूर जागं होई. कामगारांचं गाव सकाळच्या पाळीसाठी जागं होई. एकच घाई सुरू होई. प्रत्येक घरी कुणी ना कुणी गिरणीत कामाला असे. सोलापुरात या काळात जवळजवळ सात गिरण्या होत्या. गिरणी कामगारांच्या अनेक चाळीही त्यामुळे बांधल्या गेल्या होत्या. कामगारांची इथे राहण्याची सोय होई. अत्यंत अल्प दरात घरं भाड्याने मिळत. काडादी चाळ, साठे चाळ, जुनी मिल चाळ, लक्ष्मी-विष्णू चाळ, मुरारजी चाळ अशा अनेक नावांच्या चाळी होत्या. या गिरण्यांच्या व्यवसायामुळे सोलापूर तेजीत होतं. लोक खाऊन-पिऊन सुखी होते.
मातंग वस्तीतही बरेच गिरणी कामगार राहत होते. आम्ही राहत होतो त्या घराशेजारी तशा अनेक झोपड्याच होत्या. काही मातीची व पत्र्याची घरं होती. आमचंही घर मातीपत्र्याचंच होतं. माझ्या घरी वडील, आई, मी, माझी दोन भावंडं आणि एक बहीण एवढेजण राहत होतो. वडील नगरपालिकेत शिपाई म्हणून काम करत होते. तरी वडिलांना सिद्राम जाधव मास्तर म्हणून ओळखायचे. पूर्वी काही दिवस ते एका शाळेत शिक्षकही होते. आईचं नाव समाबाई. अत्यंत गरीब आणि कष्टाळू, काटक. एकटी सगळ्या घराचं ओझं वाहणारी, सतत कामात मग्न. मी नगरपालिकेच्या अकरा नंबर प्राथमिक शाळेत शिकायला होतो. त्रेपन्न चोपन्न साल. या सालातच माझा धाकटा भाऊ भागवत जन्मला. पाठीवरची बहीण गोदा मात्र शाळेत जात नसे. मोठ्या दोन बहिणी सासरी नांदत होत्या. एक जवळच वडाळ्यास शकुंतला व दुसरी याच मातंग वस्तीत वरच्या आळीत राहायला होती. तिचं नाव विठाबाई. घराच्या पाठीमागे माझ्या आईची आई केराआजी राहत होती. तीही गिरणीत कामाला होती. दोन मामा, एक बाबूमामा व दुसरे गोविंदमामा. तर असा हा गोतावळा.
माझ्या घराच्या बरोबर समोर माझे चुलते राहत होते. त्यांपैकी एक केरू रामचंद्र जाधव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते व अनुयायी होते. बाबासाहेबांशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. बाबासाहेबांच्यावर त्यांची नितान्त श्रद्धा होती. त्यामुळे आम्हांला त्यांचा खूप आदर वाटे. बाकी वस्तीत या ना त्या नात्याने अनेक नातेवाईक मंडळीच राहत होती. माझ्या बालपणातील मित्रांत एन.टी. रास्ते, शाम जाधव, सिद्राम वायदंडे, सुभाष लोंढे, मल्हारी पाटोळे, वसंत, रेवण, अजित अशी मंडळी होती. वसंत, रेवण, अजित यांना आम्ही सगळेजण वश्या, रेवण्या, आज्या असेच संबोधत असू.
माझी आजी केराआई जुनी मिलमध्ये झाडुवाली म्हणून काम करत होती. १९५३-५४चा तो काळ होता. मिलच्या मॅनेजर मालकांचे बंगले व परिसर ती झाडत असे. त्यानंतर कामगारांच्या जेवणाचे हॉल झाडत असे. तसं तिला खूप काम असे. मी आजीकडे कधी कधी भाकर बांधून घेऊन जात असे. एका फडक्यात बांधलेलं जेवण. तिचे कष्ट बघून कसंसंच होई. दुपारी चार वाजल्यावर ती कामावरून घरी परत येई. येताना ती गाठोड्यात काहीबाही खाण्याचे पदार्थ आणत असे. आम्ही आजीकडे आवर्जून जात होतो. मग आजी आम्हांला खायला भाजी-भाकरी, लोणचं देई. रोज नवे नवे व निरनिराळे पदार्थ ती कुठून आणत असे हे कळत नसे. माझे वडील मला आजीकडे खाण्यासाठी जाण्यास मना करत. वडील सांगत की, ‘अरे, आजी आणते ते खायचे पदार्थ इतर कामगारांनी दिलेलं उष्टं अन्न असतं. ते कशाला खाता?’ मग आम्हांला हिरमुसल्यासारखं होई. पण तरीही त्या अन्नाचा आदर वाटत असे. कितीतरी वेळा त्या दशमीने आमच्या पोटाची आग शमवली होती.
आजीचा तो लाचार चेहरा आठवला की, आजही मन अस्वस्थ होतं. मी अजून शाळेतही जात नव्हतो तेव्हा मला एका दिवाळीला आजीने पोस्त मागायला गिरणीतल्या मॅनेजरच्या घरी नेलं होतं. बंगला प्रशस्त होता, जुना. इंग्रज काळातला. खोल्याभोवती छानसा जाळीदार व्हरांडा होता. मला व्हरांड्यात बसवलं. आजीने बंगल्याचा परिसर झाडला व वाट पाहत आम्ही व्हरांड्यात बसलो. खूप वेळाने कुणी हॅटवाला माणूस बाहेर आला. त्याने आत काही कळवलं. मग एका मॅडम-बाईने आजीच्या झोळीत दिवाळीचे काही पदार्थ आणून वरूनच ओतले. आजीने दिवाळीचा पोस्त मागितला. मग बाईने आजीस एक व मलाही एक रुपया हातावर टाकला. आजीने हॅटवाल्या सायबास व मॅडमना हा माझा नातू– मुलीचा मुलगा म्हणून मला दाखवलं. पण साहेबांनी माझ्याकडे फारसं लक्षही दिलं नाही. मग आम्ही निघालो. आजीने मला त्या झोळीतली एक करंजी खायला दिली. अतिशय कुरकुरीत व गोड करंजी, मला खूप खूप आवडली. आणखी एकाची अपेक्षा करत मी आजीकडे पाहिलं. पण आजीने दरडावून नकार दाखवला.
- होरपळ
- लेखक : ल.सि. जाधव
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०१९
हे आत्मकथन खरेदी करण्यासाठी…
होरपळ
सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामथ्र्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…
₹250.00Add to Cart
होरपळचा पुढील भाग…
सूळकाटा
प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात. हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं. सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा .