जगातील एकमेव आर्थिक आणि राजकीय महासत्ता, सर्वाधिक बलाढ्य, संपन्न देश, जगाला लोकशाहीची व्याख्या देणाऱ्या अब्राहम लिंकनचा देश, जगाची प्रगती साधण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या वैज्ञानिकांचा देश, नशीब कमावणाऱ्यांसाठी स्वप्नभूमी… हे अमेरिकेचे वर्णन, पण या देशाने आपल्या आर्थिक आणि राजकीय ताकदीच्या जोरावर आणि वर्चस्ववादी वृत्तीमुळे जगातील अनेक देशांना युद्धाच्या खाईत लोटले. स्वहितासाठी आणि पाहिजे ते मिळवण्याच्या हिंसक वृत्तीमुळे हा देश जगावर राज्य करू पाहतोय. अमेरिकेची ही दुसरी बाजू मांडली आहे, अतुल कहाते यांनी ‘युद्धखोर अमेरिका’ या पुस्तकात. गेल्या दोन दशकांत अमेरिकेने अनेक देशांत घुसखोरी केली, सर्व नियमांना, नीतिमत्तेला तिलांजली देत अनेक देशांत आक्रमण केली हे या पुस्तकातून सांगण्यात आले आहे.
पुस्तकाची सुरुवात होते हवाई बेटांपासून! या बेटांचा शोध लागला १७७८ मध्ये. तत्पूर्वी बाह्य जगाशी संपर्क नसलेल्या या बेटांवर कॅ. जेम्स कुक उतरला आणि त्यानंतर या बेटाचे स्वरूप पालटून गेले. त्यानंतर आलेल्या अमेरिकी मंडळींनी ही बेटे आपल्याच मालकीची आहेत, असे समजून तिथे व्यापार सुरू केला. पुढे आपल्या देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी अमेरिकेने अक्षरश: ही बेटे उद्ध्वस्त केली.
नव्वदच्या दशकानंतर ‘इस्लामी दहशतवादा’च्या भयंकर कथा मनावर बिंबवल्या गेल्या. मात्र पडद्याआड राहून या अशा भयंकर दहशतवादास खतपाणी घालण्याचे काम केले ते (लोकशाहीवादी?) अमेरिकेने असे सांगण्याचा प्रयत्न लेखक या पुस्तकातून करतोय. जगाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या खनिज तेलाच्या अर्थकारणापायी अमेरिकेने आखातामधील अनेक देशांचे खच्चीकरण केले. या देशांतील दहशतवादी वृत्तीला पोसले.
ऐंशीच्या दशकात इराणमध्ये महंमद रझा शाहच्या सत्तेला घरघर लागल्यानंतर अयातुल्ला खोमेनी या कट्टरवाद्याचा उदय झाला या मागे अमेरिका होती. इराणला कुठल्याही देशाने अजिबात शस्त्रास्र विकू नये अशी भूमिका अमेरिकेने घेतली होती, पण याच अमेरिकेने इस्रायलच्या मध्यस्थीतून इराणला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पाठवली होती. अमेरिकेच्या या फसव्या आणि दुटप्पी व्यवहाराचा मागोवा लेखकाने घेतला आहे.
इराक बेचिराख करण्यास याच शक्तिशाली देशाचा हात आहे हे आता लपून राहिलेलं नाही. या तेलसंपन्न देशातील तेलावर हक्क सांगण्यासाठी अमेरिकेने त्यांच्यावर युद्ध लादले. इराण-इराक युद्धात अमेरिकेने एका बाजूला इराणला मदत केली, मात्र त्यांनी इराकला नमवू नये यासाठी धडपड केली. अमेरिकेला आव्हान देणाऱ्या इराकच्या सद्दाम हुसेनचा खातमा करण्यास अमेरिकेने कोणताही विचार केला नाही. चुकीची धोरणे राबवून अमेरिकी अध्यक्षांनी अफगाणिस्तानात दहशतवाद घुसवला आणि त्यानंतर ओसामा बिन लादेन आणि त्याच्या अल काइदाचा जन्म झाला याबाबतची माहिती देताना अमेरिकेच्या घोडचुकांवर लेखक प्रकाश टाकतो.
व्हिएतनाम, पनामा, क्युबा, चिली यांसह विविध १६ देशांतील अमेरिकापीडित राजकीय आणि सामारिक स्थितीचा आढावा लेखकाने घेतला आहे. विविध देशांवर वर्चस्व मिळवताना अमेरिकेने राबवलेली चुकीची धोरणे, त्यांचे दुटप्पी धोरण, अमानवी राजकारण यांचे विवेचन करून लेखकाने त्याची परखड चिकित्साही केली आहे.
अमेरिकेने व्हिएतनाममध्ये तर मोठ्या प्रमाणात नरसंहार केला आहे. १९७१मध्ये अमेरिकेने व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया या देशांवर तब्बल आठ लाख टन बॉम्ब टाकले. चिलीमध्ये तर लोकशाहीच्या नावाने अमेरिकेने अनेक कट घडवून आणले. अमेरिकेचा साम्राज्यवाद किती अहिंसक आणि अमानवी होता याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो.
आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला अमेरिकेने संपवले असले तरी काही जण अमेरिकेला पुरून उरले हे सांगताना क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोने अमेरिकेचे क्युबा गिळंकृत करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि अमेरिकी वर्चस्ववादाविरोधात लढा देणाऱ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरला, यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे.
जगाच्या लोकशाहीचा, सुरक्षिततेचा आणि शांततेचा मक्ता आपणच घेतला आहे, असे दाखवणाऱ्या आणि बरोबर त्याच्या उलट पावले टाकणाऱ्या अमेरिकेच्या अमानवी, दुटप्पी धोरणांचा पडदा या पुस्तकातून टराटर फाडला आहे. अमेरिकेने जगातील अनेक देशांत घडवून आणलेल्या अमानवी व अन्यायकारक कारवायांमधून अमेरिका हाच जगातील सर्वाधिक युद्धखोर देश आहे, ही नाण्याची दुसरी बाजू हे पुस्तक दाखवते.
- युद्धखोर अमेरिका
- लेखक : अतुल कहाते
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०१९
(सौजन्य : साप्ताहिक लोकप्रभा)
खरेदी करण्यासाठी…
युद्धखोर अमेरिका
देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं…
एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश…
मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान…
व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार… विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण… जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील — कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली,
कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला, तर कधी थेट आक्रमणंच केली…
सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा ‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’
अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून परखड चिकित्सा केली आहे.
‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’,
‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेची
आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज…
‘युद्धखोर अमेरिका’!
₹425.00Add to cart
रोहन शिफारस
विस्तारवादी चीन व भारत
चढती कमान व वाढते तणाव
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय? अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे….
₹325.00Add to cart