२०१८ सालचा ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ हृषीकेश गुप्ते यांच्या ‘घनगर्द’ या कथासंग्रहाला मिळाला. त्या वेळी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, लेखक गणेश मतकरी यांनी घनगर्दबद्दल लिहिलेलं हे टिपण…
मराठी साहित्याचा अवकाश हा प्रामुख्याने दोन प्रकारच्या आशयाला वाहिलेला आपल्याला दिसतो, कौटुंबिक आणि सामाजिक. त्यामुळे या दोन आशयसूत्रांमधेच आपल्या साहित्याने लक्षवेधी कामगिरी बजावली असली, तरीही या विषयांच्या परिघात राहणं, हीच आपल्या साहित्याची मर्यादाही म्हणता येईल. भय, विज्ञान आणि फॅन्टसी असे साहित्यप्रकार वाचकप्रिय असले, तरीही मुख्य धारेतल्या साहित्यिकांनी क्वचितच या वेगळ्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. हृषीकेश गुप्तेचं लेखन महत्त्वाचं ठरतं ते त्यामुळेच.
आपल्याकडे वाचकप्रिय लिखाणाला दुय्यम स्थान देण्याची परंपरा आहे. प्रत्यक्षात वाचकप्रियता आणि आशयघनता, साहित्यमूल्य यांना वेगळ्या कप्प्यात मांडण्याची आवश्यकता नाही. हे सारं चांगल्या साहित्यकृतीत एकत्र येऊ शकतंच. गुप्तेंच्या लिखाणाकडे पहिलं लक्ष वेधलं गेलं, ते त्यांच्या ‘अंधारवारी’या कथासंग्रहापासून. या कथा जरी उघडपणे भयकथांच्या परंपरेतल्या असल्या, तरी गुप्तेंनी त्यांमधून आपली स्वत:ची शैली शोधली होती. भयनिर्मितीमधे त्यांना यश मिळालं, तरी त्यांच्या लिहिण्याचा तो एकमेव हेतू नव्हता. यानंतरच्या काळात त्यांनी आशयात, मांडणीत वेगळे प्रयोग केले. त्यांच्या लिखाणाची बीजं विशिष्ट साहित्यप्रकारात असली, तरी त्यांचा आशय सर्वव्यापी व्हायला लागला. त्यांच्या दीर्घकथांचा संग्रह ‘दैत्यालय’, आणि कादंबरी ‘दंशकाल’ हे या दृष्टीने पाहता येतील.
‘अंधारवारी’ ते ‘घनगर्द’ या प्रवासात त्यांचं लिखाण अधिक प्रगल्भ होत गेलेलं दिसतं. भयकथा या फॉर्मची बलस्थानं, त्याची रचना, त्यातले बारकावे व त्याला येऊ शकणाऱ्या मर्यादा या सगळ्याची जाणीव त्यांना आहे. घनगर्दमधे असलेल्या पाच कथांमधून गुप्ते या साहित्यप्रकाराची बाह्य लक्षणं वापरतात. आपल्या रचनाकौशल्यामधून ते साहित्यप्रकाराचा ढाचा शाबूत ठेवतात. एका प्रतलावर वाचकाच्या भयकथांकडून असलेल्या अपेक्षादेखील पुऱ्या करत असतानाच हे लिखाण केवळ कथेच्या निकषांवरही श्रेष्ठ ठरतं. नेणिवेचं आपल्या आयुष्यातलं स्थान, अपराधाची भावना व मानवी स्वभाव, लैंगिकता व तिच्यामधून उद्भवणारे गंड, मनोव्यापारांची व्यामिश्रता, अंतिम न्यायाचं विविध स्वरूपातलं प्रकटीकरण, अशा विविध विषयांकडे या कथा तत्त्वनिष्ठ आणि मनोविश्लेषणात्मक स्वरूपातून पाहत असतात.
‘घनगर्द’मधल्या सर्व कथांमधलं निवेदन हे काळाशी विविध प्रकारे खेळतं. ‘चालू वर्तमान आणि त्याचा अर्थ लावत उलगडणारा भूतकाळ’ असं त्याचं प्रातिनिधिक स्वरूप असलं, तरी कथेनुसार या रचनेतली गुंतागुंत बदलत जाते. त्याबरोबरच बदलते ती शैली. इंग्रजीचा मुक्त वापर असलेल्या ‘घनगर्द’पासून ते जवळपास अभिजात वळणाची भाषा वापरणाऱ्या ‘मुआवजा’पर्यंत भाषेवरले विविध संस्कार इथे दिसतात. यातल्या दोन कथा ‘पावसात आला कोणी’ आणि ‘रमलवाटा’ विशेष वाटतात त्या, त्यांमधून येणाऱ्या सर्जनशील साहित्यनिर्मितीबद्दलच्या विचारांमुळे. कल्पना कशा सुचतात, लेखनप्रक्रियेचं महत्त्व, निर्मितीमागचं श्रेय, लेखक आणि त्याची कलाकृती यांचं नातं, कलाकृतीची स्वायत्तता असे अनेक मुद्दे या कथा हाताळतात. घनगर्दमधल्या पाचही कथांमधून लेखक हृषीकेश गुप्ते याचं लिखाण एका महत्त्वाच्या टप्प्याला येऊन पोचल्याचं दिसतं आणि त्यांच्या आगामी लेखनाच्या स्वागतासाठी आपण उत्सुक होतो.
– गणेश मतकरी
पूर्वप्रसिद्धी : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०१९