फॉन्ट साइज वाढवा

डोक्यावरून पदर घेऊन नेसलेलं जरी काठाचं पायघोळ लुगडं. कपाळावर एक रुपया एवढं ठसठशीत लालभडक कुंकू आणि नाकामध्ये पांढरा खडा असलेली मोरणी… या पेहरावात बाई पुण्याच्या रस्त्यावरून चालायला लागल्या की एकदा त्यांना बघणारा माणूस पुन्हा पुन्हा मागे वळून त्यांना बघायचा, एवढं बाईंचं रूप राजबिंडं आणि राजवर्खी. चालण्यात ऐट आणि डौल, राजघराण्यातल्या स्त्रीसारखा. साऱ्यांच्या नजरेत आपसूक आदरभाव निर्माण करणारा…

…पण बाई एकदा तबलजी, सारंगीवाला आणि पेटीवाला यांच्याबरोबर दिवाणखान्यात बसल्या, की भल्याभल्यांची पंचाईत व्हायची. बाई शृंगाराचा असा भडिमार करायच्या, की जमलेलं पब्लिक पुरतं घायाळ व्हायचं. मग बाईंच्या पोतडीतून लावणीच्या अस्सल चिजा बाहेर पडत राहायच्या. बाई म्हणताना थकायच्या नाहीत अन् पब्लिक ऐकताना. कलावंत आणि रसिकांचा हा समसमा संयोग भाव सुरू असतानाच, अचानक पहाट व्हायची. मग सारंगीवाला सारंगीवर धनुकली अलवार फिरवून समारोपाची धुन आळवायचा. तबलजी डग्ग्यावर शेवटची थाप मारायचा… अन् बाईंचा डोईवरून खांद्यावर आलेला पदर अलगद पुन्हा डोक्यावर विराजमान व्हायचा. बाई आपल्या मूळ भूमिकेत परत आलेल्या असायच्या, पण रसिक मात्र घायाळ असायचे. ते नाईलाजास्तव दिवाणखान्याच्या पायऱ्या उतरायचे… पण पुन्हा दुसऱ्या दिवशी चढण्यासाठीच.

जवळजवळ पंचवीस-तीस वर्षं बाई आणि रसिकांचा हा खेळ सुरू होता. या खेळाच्या बाई अनभिषिक्त सम्राज्ञी होत्या.

या सम्राज्ञीचा नाव होतं – सत्यभामा ऊर्फ भामाबाई पंढरपूरकर! भामाबाई म्हणजे बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान. बैठकीची लावणी कशी म्हणावी अन् त्यावर अदा कशी करावी, हे कुणीही त्यांच्याकडून शिकून घ्यावं. एखाद्या नखरेल ठुमरीवर नाजूक अदा कशा कराव्यात, तशा भामाबाई ठाय लयीतील बैठकीच्या लावणीवर सुरेख अदा आणि भावकाम करायच्या. भामाबाईंचा आवाज खूप गोड नव्हता, उलट काहीसा जाड होता. पण त्यांचा आवाज विलंबित लयीतल्या लावणीला खुलून दिसायचा. महत्त्वाचं म्हणजे भामाबाईंची लावणी म्हणजे केवळ सुरांची आताषबाजी नसायची, तर सूर आणि अभिनयाची जुगलबंदी असायची. त्यामुळेच,

‘का रे सजणा तू माझ्यावरची सोडलीस प्रीत

तुझ्या जीवासाठी सख्या रे सोडले गणगोत

जन्मा येऊनी काय मिळवले, पुरला नाही हेत

दोन दिवसांची ज्वानी-जवानी जाईल मातीत…’ यासारख्या पेशवाईच्या काळातील शाहिरांनी रचलेल्या लावण्या त्या अभिनयासह म्हणायच्या, तेव्हा रसिक सैरभैर व्हायचे. त्यांच्या गळ्यातून निघालेला सूर कानात साठवू की त्यांच्या चेहर्‍यावरचं भावकाम डोळ्यांत साठवून ठेवू, असं त्यांना होत असे.

१८१८मध्ये पेशवाई संपली, तरी दुसऱ्या बाजीरावच्या काळात पुण्यात नावारूपाला आलेल्या लावणी-तमाशाचा अस्सल बाज विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत शाबूत होता. भामाबाईंचा झळाळता काळ विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतचाच. त्या वेळी पुण्याच्या दाणे आळी भागात अनेक नामवंत लावणी गायिकांचे दिवाणखाने होते. एकाच वेळी गोदावरीबाई पुणेकर, राधाबाई बुधगावकर, कौसल्याबाई कोपरगावकर… अशा एकाहून एक सरस लावणी गायिका प्रसिद्ध होत्या. त्यांच्या लावण्या ऐकण्यासाठी-पाहण्यासाठी रसिक जिवाचं रान करीत. या रसिकांमध्ये डॉक्टर-बॅरिस्टर अशा समाजातील अतिशय प्रतिष्ठित मंडळींचाही समावेश असायचा. कारण दिवाणखान्यात ठुमरी-कजरीसारख्याच उपशास्त्रीय गायन प्रकारात मोडणार्‍या ठाय लयीतल्या बैठकीच्या लावण्यांचा आस्वाद घेता यायचा. इथे तमाशातील एरव्हीचा थिल्लरपणा नावलाही नसायचा. येणारे सगळे संगीताचे दर्दी असायचे… भामाबाईंनी स्वतःचा दिवाणखाना सुरू केल्यावर रसिकांचा हा ओघ आपसूक त्यांच्याकडे सुरू झाला. कारण भाईबाईंच्या आवाजाची आणि अभिनयाची जादूच तशी होती.

आजही भामाबाईंचं नाव उच्चारल्यावर तमाशाक्षेत्रातील नामवंत मंडळी कानाच्या पाळीला हात लावतात, एवढा मान आणि आब भामाबाईंनी आपल्या कलेत मिळवला होता. असं असलं तरी भामाबाई मूळ तमाशापरंपरेतील नव्हत्या. त्या काळात तमाशा-लावणी कलावंत म्हटले, की ते कोल्हाटी किंवा महार-मांग समाजातलेच असायचे. भामाबाई मात्र सुतार समाजातल्या होत्या. त्यांचं मूळ आडनाव पांचाळ आणि गाव सांगली जिल्ह्यातील आटपाटी जवळचं बनपुरी. आधीच हा भाग दुष्काळी, त्यात भामाबाईंचा जन्म झाल्यावर, अवघ्या सहा महिन्यातच त्यांचे वडील वारले. सासर-माहेरचा कोणताही आधार नसल्यामुळे भामाबाईंच्या आईने कंटाळून बनपूर सोडलं आणि त्या पंढरपूरला गेल्या. तिथे त्या विड्याची पानांचा व्यवसाय करू लागल्या. मात्र ऐन तारुण्यात आलेलं वैधव्य आणि छोटी मुलगी पदरात, त्यामुळे त्या भामाबाईंचा राग-राग करू लागल्या. विड्याची पानं विकायला जाताना छोट्या भामाला कोंडून ठेवू लागल्या. भामाबाई अवघ्या 3 वर्षांच्या असताना त्या १५-१६ तास घरात एकट्याच बंदिस्त असायच्या. या बंदिवान अवस्थेतच एके दिवशी छोट्या भामाच्या कानावर ढोलकीची थाप आणि तुणतुण्याचे बोल पडले. त्यांच्या घराशेजारी जयसिंगपूरकर नावाच्या कुठल्या तरी तमाशा कलावतीने मुक्काम ठोकला होता. लहानपणी कानावर पडलेल्या या ढोलकीच्या सुरांनी, मग आयुष्यभर भामाबाईंची साथ केली.

रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to cart

मग भामाबाईंचा तो रोजचाच उद्योग झाला. आई खोलीत बंद करून निघून गेली, की भामाबाई तमासगीरांची तालीम कधी सुरू होते, याची वाट बघत बसायचा. तिकडे ढोलकी कडकडू लागली, की बाईंचे पाय जमिनीवर ताल धरायचे. बाई तालासुरात उड्या मारायच्या, गिरक्या घ्यायच्या आणि जमेल तसं गाणंही ऐकायच्या. वर्ष-दीड वर्षं हे गाणं-बजावणं ऐकून बाईंचा गळा आणि कान चांगलाच तयार झाला. त्यांची सुरांची बैठक पक्की झाली. भामाबाई पाच-सहा वर्षांच्या झाल्यावर त्यांची आई त्यांना मोकळं सोडू लागली. तेव्हा तमासगिरांच्या मुक्कामी जाऊन केवळ बघून-बघून लावणी नृत्य आणि गायन शिकल्या.

भामाबाईंच्या आईला लेकीचं नाचगाणं बिलकूल आवडायचं नाही म्हणून त्यांनी भामाबाईंना त्यापासून दूर ठेवण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना घरापासून दूर बत्तीस शिराळं, मुंबई अशा अनेक ठिकाणी ठेवलं, पण भामाबाईंच्या रक्तात भिनलेल्या लावणीकलेने त्यांची पाठ सोडली नाही आणि आपल्या पाठीमागे मुलीवर कुणाची वाईट नजर पडू नये म्हणून भामाबाईंच्या आईने त्यांना पुन्हा पंढरपूरला आणलं. त्यानंतरची दोनेक वर्षं भामाबाई पंढरपूरलाच होत्या.

त्याच वेळी काही कामानिमित्त पंढरपुरात आलेल्या प्रसिद्ध लावणीगायिका गोदावरी पुणेकर यांना भामा नावाची सुंदर मुलगी पंढरपुरात असल्याची खबर लागली आणि त्या माग काढत भामाबाईंच्या घरी येऊन पोचल्या. भामाबाईंच्या आईशी बोलून त्या भामेला आपल्यासोबत घेऊन गेल्या. त्यावेळी गोदावरीबाईंचा दिवाणखाना मुंबईजवळ ठाण्याला होता. तिथे साधारणपणे वर्षभर भामाबाई होत्या.  त्यानंतर ठाण्याच्या वर्षभराचा मुक्काम संपवून गोदावरीबाईंनी पंढरपुरातच आपली बारी लावली. तेव्हा पंढरपुरात एकच तमाशा थिएटर होतं, त्या थिएटरमध्ये दोन-तीन महिने भामाबाई गोदावरीबाईंबरोबर होत्या. मात्र एकदा मुलीला भेटायला म्हणून भामाबाईंच्या आई थिएटरात गेल्या आणि तिथे त्यांचं गोदावरीबाईंशी भांडण झालं. परिणामी त्यांनी भामेला सोबत घेतलं आणि तिरीमिरीत घर गाठलं.

एव्हाना भामाबाईंच्या गाण्याची-अभिनयाची कीर्ती पंढरपूर-सोलापुरात पसरली होती. अंधारात मार्ग दाखवण्यासाठी उजेडाची एखादी तिरीपही पुरेशी असते, तसंच भामाबाईंच्या अंगचे उपजत गुण विकसित होण्यासाठी गोदावरीबाईंसोबतचा ठाण्यातला एक वर्षाचा कालावधी पुरेसा ठरला. एक वर्षात भामाबाई गायला व अदा करायला शिकल्या होत्या. या भांडवलावरच सोलापुरात बारी लावलेल्या बकुळाबाई इस्लामपूरकर यांनी भामाला आपल्या फडात बोलावून घेतलं. बकुळाबाईंच्या फडात भामाबाईंना खरीखुरी संधी मिळाली. या संधीचं भामाबाईंनी सोनं केलं. गोदावरी बाईंकडे शिकलेल्या जुन्या बैठकीच्या लावण्या म्हणून त्यांनी सोलापुरातील पब्लिकला चौदा-पंधराच्या वयातच पागल केलं. भामाबाई तेव्हा दिसायला लहान होत्या, पण गायला-नाचायला उभ्या राहिल्या की त्यांच्या गाण्याने नि अभिनयाने संपूर्ण सभागृह झाकोळून जायचं. पब्लिकला डोळ्यांसमोर फक्त भामाबाईच हव्या असायच्या. त्या काळात, म्हणजे साधारणपणे १९३५-४०च्या सुमारास त्यांच्या गळ्यात रसिक दहाच्या नोटांचे हार घालायचे. एक दिवस तर कहरच झाला, बकुळाबाई प्रथम रंगमंचावर नाचायला उभ्या राहिल्या, पण जमलेल्या पब्लिकने ‘भामा-भामा’ असा भामाबाईंच्या नावाचा घोष लावला. त्यामुळे वैतागलेल्या आणि भामाबाईंची लोकप्रियता खुपू लागलेल्या बकुळाबाईंनी अखेर भामाबाईंना आपल्या फडातून काढून टाकलं.

तसंही भामाबाईंवर त्यांच्या आईचा जीव नव्हताच. ती आपल्यापासून दूर असली तर बरी, असंच त्यांना वाटायचं. मात्र बकुळाबाईंनी काढून टाकल्यावर भामाबाई घरी पतरल्या. मात्र ते त्यांच्या आईला आवडलं नाही. त्या पुन्हा भामाचा राग-राग करू लागल्या. त्याला कंटाळून अखेर भामाबाई पुण्याला गोदावरीबाईंकडे पळून गेल्या.

गोदावरीबाईंचा दिवाणखाना तेव्हा शुक्रवार पेठेत होता. भामाला अचानक दारात आलेलं पाहून गोदावरीबाईंना आश्चर्यच वाटलं, पण त्यांना रागही आला. कारण भामाबाईंच्या आईने भांडून त्यांना गोदावरीबाईंच्या फडातून काढून नेलं होतं. पण भामाबाईंनी, घर सोडून आल्याचं सांगितल्यावर गोदावरीबाई राजी झाल्या. त्या वेळी गोदावरीबाईंकडे इंदू, जयश्री, अनसूया, अशा चार-पाच जणी शिकायला होत्या. त्यात आता भामाची भर पडली. त्यानंतर सुमारे नऊ-दहा वर्षं भामाबाई गोदावरीबाईंकडे राहिल्या. या काळात गोदावरीबाईंकडून जे जे म्हणून घेणं शक्य होतं ते भामाबाईंनी घेतलं- त्यांचं गाणं, त्यांची अदा, त्यांचं भावकाम आणि त्यांचा दराराही. गोदावरीबाईंनी भामाला थोडंफार छळलंही, पण आपली कला हातचं राखून न ठेवता दिली. एखादा राग घोटवून घ्यावा, तशा त्या लावण्या भामाबाईंकडून घोटवून घेत. कारण या लावण्या म्हणजे पेशवाईतल्या अस्सल लावण्या होत्या. ठुमरी-दादऱ्याच्या ढंगात, तेव्हाच्या शाहिरांनी बांधलेल्या. त्यामुळे पंधरा-पंधरा दिवस एकाच लावण्याची तालीम सुरू असायची. एवढं करूनही एखादी लावणी नीट जमली नाही की गोदावरीबाईंच्या हातचा मार ठरलेला. भामाबाई सांगत- ‘सिनेमाची गाणी नुसती ऐकून एका दिवसात जशीच्या तशी म्हणता यायची, पण गोदावरीबाईंनी शिकवलेला लावण्या जशाच्या तशा आत्मसात करणं कठीण असायचं. कारण त्या लावणी म्हणण्याबरोबरच, गाण्यातील शब्दांना अनुकूल अशी जी अदाकारी करायच्या ती लाजवाब असायची आणि त्यांना ती तशीच आमच्या कडून हवी असायची.’

अशा पद्धतीने दहा वर्षं गोदावरीबाईंकडे शिकल्यावर भामाबाई वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वतःच एक लावणीचं चालतं-बोलतं घराणं बनल्या. मात्र हे घराणं परंपरेनं दिलं तेवढंच जसंच्या तसं स्वीकारणारं नव्हतं. आपल्या निरीक्षण शक्तीने भामाबाईंनी त्यात स्वतःची अधिकची कलात्मक भर घातली.

भामाबाई गोदावरीबाईंकडे शिकत असतानाच, तिथे येणाऱ्या गुलाबराव शिंदे नावाच्या तरुणाचं बाईंवर मन जडलं. भामाबाईंनाही तो तरुण आवडायचा. शेवटी परस्पर संमतीने त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. खरंतर गुलाबरावांचं पहिलं लग्न झालेलं होतं. पण त्यांच्या पहिल्या बायकोने व मुलांनी भामाबाईंनाही स्वीकारलं. या लग्नामुळे भामाबाईंचा दिवाणखाना सुटला. गुलाबरावांनी त्यांना वेगळं बिऱ्हाड करून दिलं. गुलाबराव यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यामुळे, भामाबाईंना खरंतर कसलीच कमतरता नव्हती. पण गाणं आणि भावकाम हा भामाबाईंचा ध्यास होता आणि या ध्यासापोटीच त्या पंढरपूरहून पळून पुण्याला आल्या होत्या, या साऱ्याची कल्पना असल्यामुळेच गुलाबरावानी भामाबाईंना घरात कोंडून ठेवलं नाही. उलट स्वतः शुक्रवार पेठेत दाणे आळीत त्यांना दिवाणखाना सुरू करून दिला. गुलाबरावांना भामाबाईंच्या कलेचं आणि सत्त्वशीलतेचंही मूळ उमगलेलं होतं.

भामाबाई केवळ गोदावरीबाईंनी जे दिलं, त्यावर समाधानी राहिल्या नाहीत. उलट महाराष्ट्रात जिथे जिथे उत्तम गवसलं, ते त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना पंढरपूरच्या उत्पात मंडळींची खूप मदत झाली. पंढरपूरच्या उत्पात मंडळींनी जुन्या लावण्यांचा संग्रह केला असल्यामुळे त्यांच्या बाडातून भामाबाईंना अनेक लावण्या मिळाल्या. त्यामुळेच भामाबाई उत्पात मंडळीना गुरुस्थानी मानत. तर भामाबाईंच्या लावणीचा आस्वाद घेतलेले दिवंगत ज्ञानोबा उत्पात सांगत- ‘भामाबाईंनी रंगवलेली लावणीची मैफल ऐकणं-पाहणं, म्हणजे सुखाची परमावधी असे. त्यांची बैठक पाहणं-ऐकणं म्हणजे एक अत्यंत रोमांचकारी अनुभव असायचा. शब्दातील भाव त्या एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने पेश करायच्या, की त्यांचा तो अभिनय म्हणजे आजच्या कलावंतांसाठी अभिनयाचा वस्तुपाठ ठरावा. भामाबाईंची निरीक्षण शक्ती एवढी जबरदस्त असायची की त्यातूनच त्यांना अभिनयासाठी रोज नवे दाखले मिळत आणि ते पाहून प्रेक्षक चकित होत असे.’

ज्ञानोबा उत्पातांचं बोलणं अगदीच खरं होतं. बाई कधी काय करतील, याचा काहीच नेम नसायचा. त्यामुळेच एका लावणीतील ‘रस्त्यात मैतर उभा उभा’ या ओळीवर त्या जेव्हा साक्षात् रोड रोमिओ उभा करायच्या, तेव्हा साऱ्यांची मतीच गुंग व्हायची. कारण त्यांचा हा रोड रोमिओ कधी बोटात किल्ली फिरवत, कधी सिगरेट ओढत, कधी गळ्यात रुमाल बांधून, तर कधी एखाद्या खांबाला टेकून दीडक्या पायावर वाट बघत असायचा… हे सारं त्यांनी कधी तरी कुठे तरी पाहिलेलं असायचं आणि एखादी लावणी सादर करताना त्यांना ते नेमकं उपयोगी पडायचं.

काही गोष्टी भामाबाई सरावाने शिकल्या होत्या, मग हवा तसा परिणाम साधण्यासाठी त्या आधीच उपाय योजना करुन ठेवत. उदाहरणार्थ, एका जुन्या लावणीतील ‘सुटून गेला बुचडा’ या ओळीतील बुचडा या शब्दातील ‘डा’ लांबवत आणि तबलजीची समेवर थाप पडताना, त्या मानेला असा काही झटका देत की त्यांच्या केसांचा बुचडा नेमका ‘डा’ला थाप पडताना सुटे. तसा त्यांनी बुचडा आधी जरा सैलसर बांधलेला असायचा. तरीही या सार्‍यात प्रचंड उत्स्फूर्तता असायची. त्यामुळे बघणाऱ्याला नेमकं मोक्याच्या क्षणी बाईने बुचडा कसा सोडला याचं आश्चर्य वाटायचं.

अगदी तरुणपणी भामाबाई बकुळाबाईंच्या फडात असताना थिअटरमध्ये नाचल्या किंवा गोदावरीबाईंकडे असताना थोडा काळ थिएटरात होत्या, पण स्वतःचा दिवाणखाना सुरू झाल्यावर मात्र त्या कधीच थिटरात उभ्या राहिल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे बाईंनी पायात कधीच घुंगरू बांधले नाहीत. त्यांचा आपल्या गाण्यावर आणि अभिनयावर पुरेपूर विश्वास होता. मी अभिनयाच्या माध्यमातून सादर करू शकणार नाही, अशी जगात कुठलीच गोष्ट नाही… असं त्या अभिमानाने  म्हणायच्या. बाई नाचायच्याही क्वचितच. शक्यतो गाण्यातला भाव बसूनच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा बाईंचा प्रयत्न असायचा. आवश्यक असेल तिथेच उभं राहून अभिनय करायचा.


Rahe-Na-Rahe-Hum-Cover
मृदुला दाढे-जोशी लिखित रसिकप्रिय पुस्तक… रहें ना रहें हम…

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं विशद करणारं गाजलेलं पुस्तक….

खरेदी करा


भामाबाईंची खासियत म्हणजे, एकाच ओळीतला भाव वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट किंवा अभिनित करण्याची त्यांना खूप हौस होती. जवळ जवळ दहा बारा पद्धतीने एकच भाव त्या व्यक्त करायचा. या संदर्भात पंढरपूरला उत्पातांच्या वाड्यात रंगलेल्या त्यांच्या एका मैफलीतली आठवण सांगण्यासारखी आहे. या बैठकीत त्यांनी, नुकतंच लग्न झालेल्या नववधूची मनोवस्था साकारणारी लावणी सादर केली होती. त्या लावणीचे बोल होते –

‘सासूबाईंनी रात्री जवळ बोलावले

हाती पानदान देऊनी खोलीमध्ये पाठवले

ठुमकत गेले बाई बिचव्याचे पाऊल ओळखले

आत पती जागे होते मिष झोपेचे केले

अवचित घातली झडप… मी घाबरले ग बाई’

ही लावणी सादर करताना, ‘ठुमकत गेले बाई’ या ओळीवर ठुमकण्याच्या नाना तऱ्हा त्यांनी सादर केल्या. त्यांच्या त्या अदा पाहून सगळेच अचंबित झाले. पण त्यांना खरा धक्का पुढेच बसणार होता. शेवटच्या ‘घाबरले ग बाई’ या ओळीवर त्यांनी घाबरल्याचा तब्बल दहा-बारा प्रकारचा अभिनय केला. त्यावेळी त्यांच्या अभिनयातून कधी सशाचं, कधी हरणाचं, कधी गायीचं, तर कधी एखाद्या बालकाचं घाबरलेपण साक्षात उभं राहिलं होतं. पहिल्या रात्री नववधूची कशी घाबरगुंडी उडत असेल हे त्यांनी अप्रतिम सादर केलं होतं, अन् तरीही काहीतरी कमी आहे, काहीतरी राहून जातंय, असं त्यांचं त्यांनाच वाटत होतं. नववधूची पहिल्या रात्रीची भीती तीव्रतेने व्यक्त होत नाहीय, असं त्यांना पुन्हा एकदा वाटलं आणि त्यांनी तबलजी व पेटीवाल्याला पुन्हा एकदा इशारा केला. एकीकडे त्यांच्या मनाची घालमेल सुरू होती, तो अनुभव कसा व्यक्त करावा हे त्यांना कळत नव्हतं. अखेर तबलजीने व पेटीवर पुन्हा ‘घाबरले ग बाई’ ही ओळ आळवली आणि अचानक बाईंना काहीतरी सुचलं, त्यांनी तडक दावच जाऊन वाडयातील सुरुदार खांबाला कडकडून मिठी मारली नि आपले दोन्ही पाय हवेत असे काही उचलले की पाहणार्‍याला वाटावं- ही कुणी पहिल्या रात्रीच्या अनुभवाला घाबरलेली नववधूच असावी जणू! भामाबाईंनी अचानक केलेल्या या कृतीने सारेच अवाक झाले. कारण बाईंनी तेव्हा साठी ओलांडलेली होती. १९६५ सालातली ही गोष्ट.

गायक कोणीही असो, त्याला अधेमधे थोडी उसंत लागतेच. पण भामाबाईंची गाण्याची क्षमता अफाट होती. त्या एकट्या संपूर्ण बैठक पार पाडायच्या. रात्री अकरा वाजता सुरू झालेली बैठक पहाटे पाचपर्यंत सहज चालायची. या बैठकीची सारी सूत्र भामाबाईंच्या हाती असायची. त्यांच्या भात्यात विविध प्रकारच्या लावण्यांची असंख्य शस्त्रं असायची. श्रोता कोणत्या श्रेणीतला आहे हे लक्षात आलं, की मग त्याच्या पुढे त्याला पसंत पडतील अशा एकापेक्षा एक सरस लावण्यांचा खजिना त्या रिता करायच्या. अशा वेळी त्यांना त्यांचा प्रदीर्घ अनुभव उपयोगी पडायचा. भामाबाई अदा करण्याबरोबरच स्वतःच गात असल्यामुळे लावणीचा संपूर्ण तोल त्यांच्या हातात असे. तो त्यांनी कधीच तबलजी किंवा पेटीवर अवलंबून ठेवला नाही. त्यामुळे त्यांना लावणी हवी तशी खुलवता यायची.

गुलाबरावांनी हौसेने स्वतः सुरू करून दिलेला भामाबाईंचा हा दिवाणखाना १९९६२ पर्यंत सुरू होता. १९६२ ला दिवाणखाना बंद झाला, पण म्हणून भामाबाईंची लावणी संपली नाही. त्यांचे चाहते मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नगर… असे सर्वत्र विखुरलेले होते. हे चाहते मग त्या-त्या शहरात बाईंच्या लावणीच्या बैठकीचे आयोजन करत. मुंबईतील दादरच्या प्रीतम हॉटेलात त्यांच्या लावणीच्या बैठकीचे असे अनेक जलसे झालेले आहेत. अशाच एका कार्यक्रमात त्यांची मुंबईतील हनुमान तमाशा थिएटरचे मालक मधुकरशेठ नेराळे यांच्याशी भेट झाली. तेव्हा बाईंकडे असलेलं लावण्यांचं भांडार पाहून नेराळेही चकित झाले. तमाशा क्षेत्रात अनेक वर्षं वावरूनही त्यांना बाईंकडे असलेल्या या पारंपरिक खजिन्याचा पत्ताच नव्हता.


रोहन शिफारस

हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद

295.00Read more


एवढी वर्षं दिवाणखान्यात बैठकीची घरंदाज लावणी सादर करणाऱ्या भामाबाईंचा तथाकथित व्यावसायिक पद्धतीच्या तमाशाची फार संबंध आला नव्हता. बुजुर्गांकडून मिळालेल्या पारंपरिक लावण्यांची देन त्यांनी त्यांच्या दृष्टीने जपली. त्यामुळे संगीत जाणकारांमध्ये त्यांना मान-प्रतिष्ठा असली तरी, सर्वसामान्य पब्लिकसाठी त्या अनोळखी होत्या. मात्र मधुकर नेराळेंशी ओळख झाल्यावर, नेराळेनी बाईंना आम लोकांसमोर आणलं. तसंच त्यांची कला पुढच्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनेक तमाशा शिबिरांतही सहभागी करून घेतलं. याचा योग्य तो परिणाम झाला आणि १९८६ मध्ये भामाबाईंना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला. त्या वेळी बाईंचं वय ७५-८०च्या घरात होतं.

या पुरस्कारामुळे भामाबाई कृतकृत्य झाल्या. कारण एवढ्या वर्षांच्या लावणीकलेच्या सेवेत त्यांना मिळालेला हा पहिलाच मानाचा पुरस्कार होता… आणि कदाचित शेवटचाही. मात्र कोणत्याही पुरस्काराने गौरव करावा, एवढी भामाबाईंची कला छोटी नव्हती. किंबहुना कोणत्याही पुरस्काराच्या दशांगुळं वरच होती. कलेला जात-धर्म नसतो, असता कामा नये. भामाबाईंची कला या साऱ्याच्या पल्याडच होती. आपल्याकडे पारंपरिक कला आणि कलावंतांच्या सादरीकरणाच्या जतन-संवर्धनाची कोणतीच यंत्रणा नाही. साहजिकच भामाबाईंच्या कलेचंही कोणत्याच प्रकारचं दस्तावेजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना, कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण!

  • मुकुंद कुळे

Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…
देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *