जॉन स्टाइनबेक यांची विस्थापनाच्या समस्येवरील मूळ इंग्रजीतील ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही दीर्घ कादंबरी आता अनुवादित स्वरूपात ‘रोहन प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाली असून मिलिंद चंपानेरकर यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. त्या अनुवादकाच्या मनोगतातील काही निवडक अंश देत आहोत…
‘भुकेल्या लोकांच्या नजरेतला रोष वाढत चाललेला आहे. लोकांच्या आत्म्यांमध्ये रोषाची द्राक्षं भरली जात आहेत आणि ती संपृक्त होऊन जड होत आहेत. लोकांच्या बाजूने न्याय होण्याची वेळ यावी, यासाठीच ती भारित होत आहेत.’
‘रोष (रॉथ) हे विचार, मूल्यमापन आणि प्रतिक्रिया यांचं प्रतीक असतं; त्याशिवाय आणखी आपल्याकडे असतंच काय?… मला वाटतं रोष ही जगातील सर्वाधिक निकोप गोष्ट आहे.’ – जॉन स्टाइनबेक (संदर्भ : ब्रिटीश मुलाखतकाराला दिलेल्या एका मुलाखतीत मांडलेलं मत)
जॉन स्टाइनबेक यांची ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही कादंबरी १९३९मध्ये प्रकाशित झाली. विस्थापनाच्या व्यापक समस्येचं राजकीय-सामाजिक संदर्भासह आणि मानवी दृष्टिकोनातून आकलन साध्य व्हावं यासाठी स्टाइनबेक यांनी अत्यंत सर्जनशीलतेने या दीर्घ कादंबरीची रचना केली. त्याचप्रमाणे, अमेरिकेतील विस्थापित स्थलांतरित छोट्या शेतकऱ्यांच्या समस्येला परिणामकारकतेने वाचा फोडण्यासाठी स्टाइनबेक यांनी या कादंबरीत विशेष अशा ‘वर्गबोली’ची अर्थात ‘आर्गो’ची(arुदू) योजना करून आगळी संवादशैली साध्य केली. जवळपास आठ दशकांपूर्वी त्यांनी ही बहुपेडी आशय व्यक्त करणारी कादंबरी लिहिली आणि पूर्ण अमेरिकन समाज ढवळून निघाला. तेथील प्रस्थापित सरकारला विस्थापितांसाठी कल्याणकारी कायदे करावे लागले. या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ अमेरिकन नव-साहित्यामध्ये नवे मानदंड निर्माण करणारी ठरली आणि तिला ‘पुलित्झर पुरस्कार’ (१९३९) प्राप्त झाला. पुढे १९६२मध्ये स्टाइनबेक यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ‘नोबेल पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आलं.
ही कादंबरी मराठीत अनुवादित स्वरूपात यायला हवीच, असं अनेक वर्षं मला वाटत राहिलं. विशेषकरून, विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर विस्थापन होत असूनही त्याबद्दल आपल्याकडील मध्यम वर्ग ज्या उदासीनतेने प्रकल्पग्रस्त विस्थापित, स्थलांतरितांच्या समस्यांकडे पाहतो, ते लक्षात घेता ही कादंबरी महत्त्वाची ठरते, असं मला राहून राहून वाटत होतं. आणि आता तर केवळ मोठ्या प्रकल्पांच्या वा ‘विकासा’च्या नावाखालीच नाही, तर ‘सांप्रदायिक’ हेतू व राजकीय प्रणालीचा भाग म्हणूनही मोठ्या प्रमाणावर विस्थापन घडवून आणणारे ‘डेमोग्राफिक प्रकल्प’ मोठ्या मगरुरीने हाती घेतले जात आहेत (उदाहरणार्थ, ‘सीएए’, ‘एनआरसी’ इ.), ते पाहता आज तर ही खूपच महत्त्वाची ठरते, असं तीव्रतेने वाटलं.
मनाचा ठाव घेणारा आशय आणि व्यक्तिरेखा –
या कादंबरीत घडणाऱ्या विस्थापनाच्या घटनांना अमेरिकेतील १९३०च्या दशकातील घडामोडींची पार्श्वभूमी आहे. तेव्हा तिथे सामान्यजनांना तीन अरिष्टांना सामोरं जावं लागलं होतं. एक म्हणजे, आर्थिक महामंदी; दुसरं म्हणजे, दक्षिण व मध्य अमेरिकेत आलेलं धुळीचं वादळ (डस्ट बोल–Dust Bowl), ज्यामुळे शेतजमिनींची नासाडी झाली; आणि तिसरं म्हणजे, मोठ्या प्रमाणावरील भांडवल-केंद्री शेतीचा व शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पुरस्कार, ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांवर विस्थापनाची कुऱ्हाड पडली. त्या काळात पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियात नव्याने द्राक्षं-संत्र्यांची बागायती, कापसाची लागवड सुरू झाली होती. तिथे तुम्हाला काम मिळेल, आपली ‘प्रॉमिस्ड लँड’ मिळेल, नवजीवन लाभेल, असं स्वप्न प्रस्थापितांनी त्यांना दाखवलं होतं. मध्य-दक्षिण अमेरिकेतील लाखो विस्थापितांनी त्यावर विश्वास ठेवून कॅलिफोर्नियाला स्थलांतर करण्यासाठी ‘रूट सिक्स्टी सिक्स’ या जुन्या व्यापारी महामार्गाने (जो आता अधिकृतरीत्या बाद केलेला आहे) चिवटपणे केलेला दोन हजार मैलांचा खडतर प्रवास, प्रत्यक्षात वाट्याला आलेली उद्ध्वस्तता आणि त्या प्रक्रियेत त्यांच्या जाणिवेत झालेला सूक्ष्म बदल असा सर्व विशाल पट उलगडला जातो.
कादंबरी वाचताना मला हे सर्व अगदी जवळून अनुभवल्यासारखं वाटलं होतं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं. कादंबरीच्या केंद्रवर्ती असलेल्या विस्थापित ‘जोड’ परिवारातील; आठ ते अगदी ऐंशीच्या वयोगटातील सर्व हाडामांसाच्या व्यक्तिरेखा मला खूप जवळच्या वाटल्या, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जुळल्यासारखं वाटलं. अगदी तेथील मातीचा गंधही आपल्याला परिचयाचा झाला आहे, असं वाटण्याइतकी तीव्र अनुभूती मिळाली होती!
वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि जिवंत चित्रण –
व्यापक आशय बहुअंगाने चितारण्यासाठी लेखकाने केलेली रचना तर विलक्षणच वाटली. म्हणजे, प्रातिनिधिक जोड परिवाराची कहाणी कथन करणारी दीर्घ प्रकरणं आणि अधूनमधून लघु-प्रकरणं ज्यांत व्यक्तिरेखा नाहीतच; नुसतेच भोवतालचे आवाज व हुंकार, ज्यायोगे सामाजिक-आर्थिक परिस्थितीचं भान येतं आणि समूहजाणीव व्यक्त होते. वर्गबोलीने साधलेला ध्वनी-परिणाम तर कादंबरी वाचल्यावर कित्येक महिने कानात गुंजत राहिला होता. परंतु असं वाटत होतं की, लेखकाने अमेरिकेतील लोकांचं, त्यांच्या जीवनशैलीचं आणि तिथल्या भवतालचं इतकं सूक्ष्म व जिवंत चित्रण केलं आहे, की ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय अनुवाद अस्सल उतरणं कठीणच आहे.
पुढे २०१५मध्ये ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’चं कथानक ज्या भागात (मध्य व पश्चिम अमेरिका) घडतं, तिथे भ्रमंती करण्याची संधी मला लाभली. मी मध्य कॅलिफोर्नियातील ‘स्टाइनबेक कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील निवडक खेडेभागात जाण्याची आणि तिथे अल्पकाळ तरी वास्तव्य करण्याची योजना आखली. ज्या महामार्गाने (‘रूट ६६’ने) या कादंबरीतील विस्थापित कॅलिफोर्नियाकडे गेले, त्या ‘रूट ६६’चा जवळपास सहाशे-सातशे किलोमीटरचा फेरा शक्य झाला आणि त्यातून बरीच अंतर्दृष्टी लाभली. तेथील माती, तेथील माणसं सर्वच प्रत्यक्षात पाहिल्यावर, आता आपला अनुवाद जिवंत उतरू शकतो, असा विश्वास वाटला. आता प्रश्न उरला होता तो केवळ भाषेबाबतचा.
प्रमाण भाषा व वऱ्हाडी बोलीचं मिश्रण –
मूळ कादंबरीत निवेदनाचा, कथनाचा भाग जरी संपूर्णत: अमेरिकन इंग्रजीत अर्थात तेथील प्रमाणभाषेत असला, तरी या कादंबरीतील बहुतांश व्यक्तिरेखांच्या परस्पर-संवादाचा भाग पूर्णत: ‘स्लँग’ (अशिष्ट, अशुद्ध) अमेरिकन भाषेत आहे. विचारांती, अनुवाद करतानाही तीच पद्धत अवलंबली. कथन प्रमाणभाषेत आणि व्यक्तिरेखांचे ‘स्लँग’मधील संवाद बोलीभाषेत, अशीच पद्धत अंगीकारणं सयुक्तिक राहील, याबाबत मनात काही शंका उरली नाही. ‘स्लँग’मधील संवादांचा अनुवाद प्रमाणभाषेत केल्यास कादंबरीत अंतर्भूत असलेला नाद, लय, ध्वनी-परिणाम वाचकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार नाही, असं स्पष्टच दिसून येत होतं. मूळ कादंबरीतील ‘आर्गो’ची वैशिष्ट्य लक्षात घेता अमरावती, यवतमाळच्या विशेष करून, शहरी भागात बोलली जाणारी मिश्र-वऱ्हाडी भाषा अनुरूप ठरेल, अशा निष्कर्षाशी मी पोहोचलो. त्याचप्रमाणे यांतील दोन व्यक्तिरेखांचे वेगळे प्रदेशविशेष लक्षात घेता त्यांच्यासाठी चंद्रपूरकडील मिश्र झाडीबोलीची योजना केली.
लोकशाहीतील ‘लोक’ म्हणजे काय?
स्टाइनबेक हे विचाराने पुरोगामी, डावीकडे कल असलेले होते. या कादंबरीद्वारे स्टाइनबेक यांना विस्थापितांवरील अन्यायाबद्दल लोकांमध्ये जागृती करायची होती, त्यांना विचारप्रवृत्त करायचं होतं. ते त्यांनी परिणामकारकतेने साध्य केलं आणि ‘पीपल्स रायटर’ म्हणून ते नावाजले. या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेली ‘मा जोड’ एका कळीच्या प्रसंगात आपला तरुण मुलगा टॉम याच्याशी बोलताना ‘लोक’ म्हणजे काय, त्याची व्याख्या करते ती अशी –
‘शांत राह्य, टॉम… जवा बाकी सारे जातीन, तवा आपल्यावाले लोकच जगत राहतीन. नाईऽ? – आपन जनताच अशी हाये नऽ, जी जिती राह्यते. त्याईले जमनार नाई हाये आपल्याले संपून टाकनं. कारन टॉम, आपन जनता हाये – आपन समोर जात राह्यते… शिरमंत लोकाईचं काय, ते येते अन् मंग, मरून जाते… पन, आपल्यावाले लोक येतच राह्यतात. तू कोनाचं बी भेव ठेवू नोको मनामंधी, टॉम. अल्लग नवा जमाना येऊन राह्यला आताऽ.’
अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी पूर्ण पाठबळ देणारे मराठी प्रकाशक विरळच. ‘रोहन प्रकाशना’चे प्रदीप चंपानेरकर आणि रोहन चंपानेरकर यांनी या कादंबरीचं मोल समजून मला गेली दीड वर्ष पूर्ण मोकळीक दिली, त्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला. या कादंबरीचा अनुवाद करण्याची प्रक्रिया पूर्ण एक वर्षभर चालू राहिली आणि विशेषत: वर्गबोलीमध्ये अचूकता आणण्याच्या दृष्टीने या दीर्घ प्रक्रियेत श्रीकांत बोजेवार, नीलिमा रवि, रवी वरखेडकर, प्रवीण देशमुख, शैलेश थावरे, शीतल राऊत, सुनील यंदे यांच्यासह अनेकांनी अनेक प्रकारे मोलाचं साहाय्य केलं.
इतक्या सायासाने आणि अनेकांच्या मन:पूर्वक सहकार्याने सिद्ध झालेली ही अनुवादित कादंबरी मराठी वाचकांच्या मनालाही माझ्याप्रमाणेच भिडावी, अशी अपेक्षा. विस्थापितांच्या समस्या बहुअंगाने आणि मानवी स्तरावर समजून घेण्यास ती मोठी उपयुक्त ठरावी, अशी तीव्र इच्छा आहेच.
- मिलिंद चंपानेरकर (‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ पुस्तकातील अनुवादकाचे मनोगत यातून
- द ग्रेप्स ऑफ रॉथ विस्थापित स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कांदबरी
- लेखक : जॉन स्टाइनबेक
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२०
ही महाकादंबरी खरेदी करण्यासाठी…
दे ग्रेप्स ऑफ रॉथ
लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे. सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्ट्यांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद. लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.
₹700.00Add to Cart
द ग्रेप्स ऑफ रॉथ कादंबरीतली निवडक भाग...
बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल…”