लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल, अशी आहे. तिच्या मराठी अनुवादातील काही अंश…


शेतजमिनींचे मालक वारंवार गावात आले किंवा त्यांच्याहीपेक्षा अधिक वारंवार मालकांचे प्रवक्ते गावात आले. ते बंद वाहनांतून आले, आणि जमिनीचा कस जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या हातांच्या बोटांनी कोरड्या जमिनीला स्पर्श करून पाहिला. आणि काही वेळा ते जमीन खोदण्यासाठी मोठी गिरमिटं घेऊन शेतांमध्ये पोहोचले – मातीची चाचणी करण्यासाठी. खंडाने वाहिती करणाऱ्या कुळांच्या घरांचे दरवाजे उन्हाने तडकून निघालेले होते. ती बंद वाहनं शेतांच्या बाजूच्या रस्त्याने येऊ लागली की, ती कुटुंबं अस्वस्थ होऊन दरवाज्यांशी उभी राहत होती आणि सुरू झालेल्या अशा सर्व गोष्टी पाहत होती. अखेरीस, ते मालक लोक आपल्या मोटारगाड्या घेऊन थेट त्यांच्या घरांच्या आवारात येऊन थडकले. गाडीतच बसून राहून, खिडक्यांच्या काचा खाली करून, ते थाटात त्या कुटुंबांना बोलणी करण्यास बोलावू लागले. कुटुंबातील पुरुषमंडळी काही वेळ मोटारगाड्यांच्या बाजूला उभी राहिली आणि नंतर खाली जमिनीवरच उकीडवी बसली.घरातील पुरुषमंडळी त्या मालकांशी काय बोलत आहेत त्याकडे बायका आणि मुलं लक्ष ठेवून होती. ते स्तब्ध होते. मालकांपैकी काहीजण असे होते की, त्यांना जे काही करायला लागत होतं, त्याचा तिटकारा वाटत असल्याने जरा दयाबुद्धीने वागत होते, आणि काहीजण रागात होते, कारण, त्यांना दुष्ट व्हावं लागण्याचा तिटकारा वाटत होता; आणि काही जण अत्यंत थंडपणे वागत होते, कारण, त्यांना पूर्वीच याची जाणीव झालेली होती की, भावनाशून्य झाल्याशिवाय कुणीही मालक बनू शकत नाही. आणि त्यांच्यातील सर्वच जण, त्यांच्या स्वत:च्याही आकलनापलीकडे ठरेल, अशा मोठ्या बिकट परिस्थितीत सापडले होते. त्यांतील काहींना गणिती आकडेमोड करण्याचा तिटकारा होता, आणि काही जण घाबरून गेलेले होते, आणि काही जणांनी मात्र गणितभक्तीचा मार्ग पत्करला होता; कारण मानवी विचार आणि भावभावना यांपासून दूर राहण्यासाठी गणितभक्तीच्या आसऱ्याला जाणं सोयीस्कर ठरत होतं. जमिनीची मालकी जर का एखाद्या बँकेकडे किंवा पतपुरवठा करणाऱ्या कंपनीकडे गेलेली असेल, तर मालक म्हणत होता, त्या बँकेला किंवा त्या कंपनीला त्या जमिनीची गरज आहे. त्यांना ती जमीन पाहिजे आहे, पाहिजेच आहे, आग्रहपूर्वक पाहिजे आहे. स्वत:कडे असायलाच हवी, असं वाटायला लावणारी आहे. जणू काही ती बँक किंवा कंपनी ही एक अक्राळविक्राळ दैत्य होती, जिला विचार व भावना होत्या, आणि जिने त्यांना जाळ्यात पकडलेलं होतं.

 The Grapes of Wrath
मिलिंद चंपानेकर यांनी कष्टपूर्वक केलेल्या कादंबरीचं मलपृष्ठ

अखेरीस, बँक वा कंपनीच्या कृतींसाठी ही मालक लोकं कोणतीच जबाबदारी स्वीकारणार नव्हते, कारण, ती माणसं होती व दास होती आणि बँक वा कंपनी या यंत्र होत्या, स्वामी होत्या–एकाच वेळी दोन्ही. काही मालक-माणसांना अशा भावनाशून्य, थंडगार आणि शक्तिमान अशा स्वामींचे आपण दास असल्याचा अभिमान वाटत होता. मालक-माणसं आपल्या गाडीत बसून राहिली आणि त्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगितल्या – तुम्हाला माहितीये जमीन निकृष्ट झालेली आहे. तुम्ही ती किती वर्षं खरवडत बसलात, ते ईश्वरालाच माहीत.

मालक लोक आपला मुद्दा पुढे रेटत राहिले – “तुमची जमीन कशी आहे, ते तुम्ही ओळखून आहात, दिवसेंदिवस निकृष्ट होत चाललेली आहे. कपाशी जमिनीचे काय हाल करते, ते तुम्हाला माहितीये; तिचं सर्वस्व लुटून घेते, तिचं सर्व रक्तच शोषून घेते.” बसकण मारून बसलेल्या माणसांनी मान डोलावली. त्यांना माहीत होतं, ईश्वर जाणून होता. त्यांनी आलटून-पालटून वेगळी पिकं घेतली, तर ती पिकं पुन्हा त्या जमिनीत जीव ओततील…“माफ करा,” मालकमंडळी म्हणाली, “बँक, पन्नास हजार एकरवाले मालक हे काही यासाठी जबाबदार ठरू शकत नाहीत. जी जमीन तुमची नाहीये, त्यावर तुम्ही वसलेले आहात. एकदा का तुम्ही सीमा पार करून गेलात की, तुम्हाला रस्त्यात कपाशी वेचण्याचं काम मिळू शकेल. असंही होऊ शकतं की, तुम्ही निराश्रितांच्या छावण्यांत आश्रय घ्याल. नाहीतर, तुम्ही पश्चिमेला कॅलिफोर्नियात का नाही जात? तिथे कामं मिळू शकतात, आणि तिथे कधीच थंडीही फार नसते. इतकंच काय, तिथे तुम्ही कुठेही पोहोचा आणि झाडावरील संत्री काढण्याचं काम करा. इतकंच काय, तिथे काही न काही पिकं घेतली जातात आणि अशा शेतांत तुम्हाला काम मिळू शकतं. तुम्ही तिथे का नाही जात?” आणि असं म्हणून मालकमंडळींनी आपल्या गाड्या सुरू केल्या आणि ते तिथून निघून गेले.
आता खंडकरी पुरुषमंडळी पुन्हा जमिनीवर उकिडवी बसली; काडीने धूळमातीत रेघोट्या मारण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि काय करावं त्याचा विचार करण्यासाठी. त्यांचे उन्हाने रापलेले चेहरे काळवंडले आणि त्यांचे उन्हाचा मारा झेललेले डोळे मलूल झाले. दरवाज्यात उभ्या असलेल्या बायका सावधपणे त्यांच्या पुरुषांपाशी गेल्या आणि मागोमाग मुलं त्या बायकांच्या मागे जाऊन उभी राहिली, तिथून कधीही पळ काढण्याच्या बेताने. मोठी मुलं आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसली, कारण या परिस्थितीने त्यांना प्रौढ पुरुष बनवलेलं होतं. काही वेळाने बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल. इथे आता एक ट्रॅक्टर आणि एक अधीक्षक – फॅक्टरीसारखंच.”
“आपण कुठे जाणार?” त्या बायकांनी विचारलं. “आम्हाला माहीत नाही. खरंच माहीत नाही.” आणि बायका पटकन, पण शांतपणे घरात परत गेल्या आणि त्यांच्या मागून आलेल्या मुलांना त्यांनी आपल्या जवळ घेतलं.

  • द ग्रेप्स ऑफ रॉथ
  • लेखक : जॉन स्टाइनबेक
  • अनुवाद : मिलिंद चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२०


ही महाकादंबरी खरेदी करण्यासाठी…

दे ग्रेप्स ऑफ रॉथ

लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे. सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्ट्यांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद. लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.

700.00Add to cart


 Neeteen-vaidya
विचक्षण वाचक नीतीन वैद्य ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’बद्दल लिहितात…

कालजयी, अभिजात साहित्यकृतींची हरेक काळात बदललेल्या संदर्भात नवी वाचनं संभवतात. अलिकडे पाहिलेल्या उलट्या, सुरक्षित उबदार घरट्यांकडे झालेल्या स्थलांतराचे पडसाद कायम असताना, त्रयस्थपणे सुरक्षित कुंपणाआडून का होईना अनुभवलेले (होय हे केवळ वाचणे नव्हे, मूर्त झालेला साक्षात अनुभव आहे) हे जगण्याच्या शोधातले पार जगातल्या दुसऱ्या टोकाकडे झालेले स्थलांतर अधिकच व्याकूळ करते. या अस्वस्थ वर्तमानात अगदी नेमक्या वेळी समेवर यावे तसा हा अनुवाद आला आहे…

लेख वाचा…


‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त
अनुवादक मिलिंद चंपानेकर यांची इतर पुस्तकं

द एलओसी

नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची कहाणी


हॅपीमॉन जेकब
अनुवाद:मिलिंद चंपानेरकर 


हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.

दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.

दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.325.00 Add to cart

भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा

इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता


प्रफुल्ल बिडवई
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर 


लोकशाही सुदृढ व्हायची तर जनसामान्यांना देशात प्रदीर्घ काळ टिकून असलेल्या लोकाभिमुख विचारप्रवाहांची, चळवळींची सर्वांगीण माहिती असणं आवश्यक असतं…
या पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक त्याविषयी केवळ समग्र माहिती देणारं नाही, तर त्याबद्दलचं वाचकांना सर्वांगीण आकलन साध्य व्हावं, या कळकळीने लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ, या पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी केवळ डाव्या संसदीय पक्षांच्या निवडणुकीतील (लोकसभा, विधानसभा) कामगिरीचा आढावा घेतलेला नाही; तर त्या त्या वेळी विविध पुरोगामी जनसंघटनांच्या चळवळींनी वेâलेली कामगिरी, अशा निवडणुकींमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाच होते, विविध राजकीय शक्तींचं आणि समाजातील घटकांचं संघटन कसं केलं गेलं (डावे, मध्यममार्गी आणि प्रस्थापित उजवे पक्ष, सर्वांद्वारे), तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, कोणत्या आंतरराष्ट्रीय, साम्राज्यवादी शक्ती सशक्त होत्या वा देशातील कोणते वर्ग जोरावर होते याचे तपशील दिलेले आहेत आणि त्यामुळेच देशातील वेळोवेळीच्या राजकारणाचं खरं स्वरूप समजून घेण्यास अंतर्दृष्टी लाभते. तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ स्पष्ट होऊन चळवळीच्या वाटचालीचं, चढ-उताराचं केवळ समग्र नाही, तर सर्वांगीण आकलन साध्य होतं.


800.00 Add to cart

लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र


सईद मिर्झा
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर 


‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’ म्हणजे अर्थातच या इंग्रजी साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्‍या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी ही एक आगळीच साहित्यकृती ठरते— ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’


Original price was: ₹320.00.Current price is: ₹270.00. Read more

हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत


नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्‍या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!


295.00 Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *