READING TIME – 4 MINS
घराच्या साफसफाईसाठी नेहमी आपण कामवाल्या मावशी शोधत असतो. सणासुदीच्या दिवसात तर घराची साफसफाई करण्यासाठी तासनतास स्वच्छता करावी लागते.
घराची साफसफाई आपोआपच झाली तर? कल्पना शक्य वाटत नाही ना? मात्र हे शक्य आहे नव्याने मार्केटमध्ये आलेल्या रोबो क्लिनर्समुळे. स्वयंचलित तंत्रज्ञानाने संपूर्ण घराची साफसफाई अगदी काही मिनिटांत करणे यामुळे शक्य होणार आहे.
घराची स्वच्छता करण्यासाठी आपण बऱ्याचदा व्हॅक्युम क्लीनर वापरतो. मात्र व्हॅक्युम क्लीनरचा वापर करताना अनेकदा आपलंच काम वाढतं. वेगवेगळे सुटे भाग जोडून संपूर्ण घराची स्वच्छता करणे कधीकधी कठीण असते, मात्र या नव्या रोबो व्हॅक्युम क्लीनरने सफाईचे काम काहीसे सोपे होताना दिसणार आहे.
सेल्फ क्लिनिंगच्या फिचरमुळे हा रोबो स्वतःच मिळालेल्या कमांडच्या मदतीने संपूर्ण घराची सफाई करणार आहे. केवळ साफसफाईच नाही तर लाद्या, मॅटस, घरातील भिंती यांचीसुद्धा व्यवस्थित सफाई या आधुनिक क्लीनरने करता येणार आहे.
घरातील फरशीचे प्रकार ओळखून त्यानुसार योग्य तो मोड निवडून सफाई यामध्ये करता येते. वायफाय, व्हॉइस असिस्टट आणि ब्ल्यू टूथच्या मदतीने या रोबोला योग्य त्या कमांड देता येतात.

इको क्लीन, शायोमी, फोर्ब्स अशा विविध कंपन्यांचे रोबो सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असून यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. या रोबोद्वारे सर्वात आधी संपूर्ण घराचे स्कॅनिंग केले जाते.
त्या स्कॅननुसार घरातील सर्व खोल्यांची स्वच्छता टप्प्याटप्प्याने या रोबोद्वारे केली जाते. यासाठी लेजर मॅपिंगचा वापर यामध्ये केला जातो.
यातील अत्याधुनिक सेन्सर्सच्या मदतीने घरातील भिंती किंवा इतर कोणत्याही वस्तूंना न आदळता संपूर्ण घराची सफाई योग्य पद्धतीने केली जाते.
खास गोष्ट म्हणजे साफसफाई करताना कोणताही आवाज न करता पूर्ण घराची सफाई हा रोबो पार पाडतो. एखादी व्यक्ती घरात झोपली असेल किंवा विश्रांती घेत असेल तर त्यांना कोणताही व्यत्यय न येता संपूर्ण सफाई करण्याचे फिचर यामध्ये देण्यात आले आहे.
स्वच्छता करताना सलग दोन तास सुरु राहण्याची या रोबोची क्षमता आहे. त्याचबरोबर कोणत्याही वेळी बॅटरी जर लो झाली तर आपोआप चार्जिंगसाठी विश्रांती घेऊन स्वतःच हा रोबो स्वच्छता पुन्हा एकदा सुरु करतो.
घरांत जास्त धूळ असेल तर स्वच्छतेसाठी या रोबोमध्ये टर्बो मोड देण्यात आलेला आहे. गुगल व्हॉइस कमांडच्या माध्यमातून या रोबोला सूचना देता येतात.
त्याचबरोबर यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप फोर्ब्सकडून तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला हवी तशी स्वच्छता रोबोकडून करून घेता येते.
जर घरातील एखाद्या भागाची स्वच्छता करायची नसेल किंवा ठराविक भागाचीच साफसफाई करायची असेल, तर तशा सूचना देण्याची व्यव्यस्था या रोबोमध्ये करण्यात आली आहे.
घरातील लाद्या, लाकडी सामान, कापड सर्व प्रकारच्या गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळी सेटिंग यामध्ये देण्यात आलेली आहे.
यामध्ये असलेल्या स्मार्ट सेन्सर्समुळे रोबो स्वतःच वस्तू योग्य पद्धतीने ओळखून स्वच्छता करतो त्यामुळे कोणत्याही त्रासाशिवाय अगदी सहज घराची स्वच्छता करता येणार आहे.
रोजच्या सफाईची वेळ, साफसफाईचे वेळापत्रक सेव्ह करण्याची व्यवस्था यामुळे घरातील साफसफाईसाठी हा रोबो एक उत्तम पर्याय ठरताना दिसत आहे.
- आदित्य बिवलकर
या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.गॅजेट्सच्या दुनियेत – चष्मा लावा, गाणी ऐका..
2.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बेड
3.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बर्ड फीडर
4. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बॅट
5. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ रोबो