READING TIME – 4 MINS

शांत झोप हवी असेल, तर आपला बेडसुद्धा तितकाच चांगला असावा लागतो. कधीतरी आपल्या झोपण्याच्या अंथरुणात बदल झाला किंवा काही गडबड झाली तर त्याचा परिणाम आपल्या झोपेवरसुद्धा लगेच होतो.

उत्तम आरोग्यासाठी आपली झोपसुद्धा चांगली असणं आवश्यक आहे. यासाठीच सध्या स्मार्ट बेडचा ट्रेंड मार्केटमध्ये रुजू होत आहे…. हो, तुम्ही बरोबर वाचलंत!

स्मार्टफोन आणि इतर स्मार्ट डिव्हायसेसच्या यादीमध्ये आता आपल्या बिछान्यानेसुद्धा स्थान पटकावलंय. बेडही झालाय स्मार्ट!

अनेकांना झोपेची समस्या असते, दिवसभराच्या कामानंतर रात्री चांगली झोप लागावी अशी सगळ्यांची इच्छा असते, झोपेच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्या सगळ्यांसाठी हा बेड नक्कीच एक चांगला पर्याय आहे.

स्लीपनंबरने हा आगळावेगळा बेड यावेळी प्रस्तुत केला आहे. याशिवाय सध्या मार्केटमध्ये शायोमी, स्लीप कंपनी यांसह अनेक कंपन्यांचे स्मार्ट बेड उपलब्ध आहेत.

smart bed

प्रत्येक माणसाच्या झोपेबद्दलची माहिती साठवून त्यानुसार त्याच्या प्रकृतीबद्दल आणि त्याच्या झोपेसंदर्भातील तक्रारीबद्दल माहिती देण्याचे युनिक फिचर या बेडमध्ये देण्यात आले आहे.

प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार बेडचे तापमान यामध्ये ठेवता येणार आहे आणि यासाठी कोणत्याही रिमोट किंवा कंट्रोलरची गरज भासणार नाही.

बाहेरचे तापमान आणि झोपणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता याचा योग्य अंदाज घेऊन त्यानुसार आपोआप हा बदल करण्याचे आगळेवेगळे फिचर यामध्ये देण्यात आले आहे.

या बेडला डिस्प्ले आणि स्पीकर्सची सुविधा देण्यात आलेली आहे. यानुसार, आपल्या उठण्याच्या वेळा सेट करण्याचा पर्याय व्यक्तीला उपलब्ध असणार आहे.

यामध्ये स्मार्ट अलार्म फिचर देण्यात आलेले आहे, ज्यामुळे ठराविक वेळ सेट केल्यावर त्यावेळी आपोआप लोकांना जाग येऊ शकते. मॅट्रेसवर झोपणारी व्यक्ती रात्रभर सेल्फ अॅडजस्टिंग कम्फर्ट फीचर्सचा वापर करू शकते.

झोपेत शेजारील व्यक्तीला मुळीच त्रास होऊ नये, अशी प्रणाली यात आहे. झोपेत कूस बदलली तरीही शेजारील व्यक्तीची झोपमोड होणार नाही.

या स्मार्ट बेडमध्ये नासाद्वारे (NASA) डेव्हलप केलेल्या ‘सायन्टिफिक स्लिपिंग पोजिशन’चा वापर केला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामुळे शरीर, मनावरील ताण कमी होत असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.

त्यामुळेच झिरो ग्रॅव्हेटी किंवा अगदी शून्य वजन असण्याचा अनुभव मिळतो. या स्मार्ट बेडमुळे घोरण्याचं प्रमाण कमी होत असल्याने शांत झोप मिळू शकते.

झोपेत घोरण्याची समस्या तुम्हाला असेल तर मोशन पिलोचा वापर आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. १० माइंडस कंपनीच्या या वेगळ्या संकल्पनेला सीईएस इनोव्हेशन पुरस्काराचा मान प्राप्त झाला आहे.

smart bed

या उशीमध्ये खास सेन्सर्स देण्यात आलेले आहेत. उशीवर डोकं ठेवल्यावर हे सेन्सर झोपणाऱ्या व्यक्तीची माहिती गोळा करतात.

एखादी व्यक्ती घोरायला लागल्यावर त्या व्यक्तीची झोपमोड न होता उशीतील एअरबँग हालचाल करते आणि त्यानुसार आपोआप व्यक्तीचं घोरणं कमी करायला मदत होते.

घोरण्याचा अचूक आवाज ओळखण्यासाठी यामध्ये खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एअर प्रेशर सेन्सर आणि एअर बॅगच्या मदतीने हे डिव्हाईस माणसाच्या घोरण्याची समस्या आटोक्यात आणू शकतं.

या बेडवर तुमच्या आवडीची पोजिशन सेट करुन झोपता येतं. या मोडमध्ये आरामदायी वाचन किंवा टीव्ही पाहता येऊ शकतो. यासाठी अधिकच्या उशीचीही गरज भासणार नाही. एका बटणावर रीडिंग मोड अॅक्टिवेट होतो.

इतकंच नाही, तर यात हेड आणि फूट मसाजसाठी ऑटोमेटिक मसाजर देण्यात आला आहे. मसाजरचं प्रमाण रिमोटद्वारे कंट्रोल करता येतं.

आपली उशी किंवा गादी किती मऊ किंवा कडक असावी याबद्दल प्रत्येकाची स्वतंत्र मत असतात. हाच विचार करून या बेडमध्ये युनिक फिचर देण्यात आलं आहे.

झोपेची जागा ठरवल्यानंतर तेवढाच भाग किती सॉफ्ट किंवा टणक असावा, याबद्दलपण तुम्हाला ठरवता येणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

थोडक्यात शांत झोप आणि निरोगी आरोग्य या दृष्टीने हा बेड एक उत्तम पर्याय आहे, सध्या ऑनलाईन वेबसाईट्सवर याची विक्री सुरु आहे.

  • आदित्य बिवलकर

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.गॅजेट्सच्या दुनियेत – चष्मा लावा, गाणी ऐका..
2.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बेड
3.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बर्ड फीडर
4. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बॅट
5. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ रोबो

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *