READING TIME – 4 MINS

हल्ली बऱ्याच लोकांना आपल्या खिडकीमध्ये पक्ष्यांना काहीतरी खाऊ घालायला आवडतं. घराच्या बाहेर येणारे पक्षी बघून सगळ्यांनाच आनंद होतो. पोपट, खार, चिमण्या यांचा किलबिलाट ऐकला, की वेळसुद्धा छान जातो.

समजा घराजवळ येणारे हे पक्षी काही न करता टिपण्याची आपल्याला संधी जर मिळाली तर? ‘बर्ड बडी स्मार्ट फिडर’मुळे ही संधी आता सहज उपलब्ध होत आहे.

घराच्या खिडकीत आपल्याला पक्षी दिसले, की आपण मोबाईल किंवा अन्य माध्यमांच्या मदतीने हे पक्षी टिपण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा आपण या पक्ष्यांना टिपायला जातो आणि पक्षी उडून जातात.

काही वेळा भीतीने पक्षी परत खिडकीकडे येत नाहीत. त्यामुळे आपली निराशासुद्धा होते. अशांसाठी बर्ड बडी स्मार्ट फिडर हे एक वेगळे गॅजेट ठरू शकेल.

अनेकदा साधे फिडर लाऊनसुद्धा फिडरच्या रचनेमुळे पक्षी फिडरकडे आकर्षित होत नाहीत. फिडरचे रंग, त्याची रचना यासारख्या घटकांमुळे पक्षी काहीवेळा घाबरतात. या सर्व गोष्टींचा विचार या स्मार्ट फिडरमध्ये केलेला दिसतो.

निसर्गाच्या जवळ जाईल अशी रंगसंगती, कॅमेरा, योग्य जागेचा वापर करून तयार केलेले डिझाईन यामुळे हे फीडर्स आकर्षक वाटतात .

या स्मार्ट फिडरमध्ये पक्ष्यांना खाऊ देण्याची व्यवस्था तर आहेच, मात्र येणाऱ्या प्रत्येक पक्ष्याची माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवर या फिडरच्या माध्यमातून मिळणार आहे.

इतकंच नाही तर येणाऱ्या पक्ष्यांचे एचडी फोटोज आणि व्हिडिओज टिपण्याची क्षमता यात आहे. यासाठी यामध्ये अत्याधुनिक सेन्सर्स देण्यात आलेले आहेत.

यातील मॉडेल्सनुसार ४के पर्यंत रेकॉर्डिंग करण्याची क्षमता या फिडरच्या कॅमेरामध्ये देण्यात आलेली आहे.

येणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचे व्हिडीओ आणि फोटोज टिपून मोबाईल अॅपवर ते स्ट्रीम करता येतात. त्यामुळे कुठेही बसून आपण आपल्या घराजवळ येणाऱ्या पक्ष्यांची माहिती आणि त्यांचा अभ्यास करू शकता.

बाहेरील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा बर्ड फीडर्सना मागणी असतानाच आता भारतातसुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्ट फीडर्स उपलब्ध होताना दिसत आहेत.

कमी उजेडात तसेच नाईट मोडमध्येसुद्धा व्हिडीओ आणि फोटो काढण्याची क्षमता या फिडरमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या फिडरला चार्जिंगचा पर्याय असून एका चार्जिंगनंतर साधारणपणे २०-२५ दिवस चालण्याची क्षमता या फिडरमध्ये आहे.

काही मॉडेल्समध्ये सोलार चार्जिंगचासुद्धा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अडचण न येत तुम्ही सहज फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.

बऱ्याचवेळा आपल्या घराच्या खिडकीमध्ये अशा प्रकारचे फिडर लावल्यानंतर कबुतरे किंवा अन्य उपद्रवी पक्ष्यांचा त्रास सुरु होतो, त्यासाठीसुद्धा यामध्ये पर्याय देण्यात आलेला आहे.

कबुतरांना हटविण्यासाठी बझर अलार्म, सायरन तसेच आपला स्वतःचा आवाज आपण रेकॉर्ड करून ठेऊ शकतो त्यामुळे कबुतरांची समस्यासुद्धा निर्माण होणार नाही.

कोणत्याही हवामानात आणि वातावरणात चांगल्या पद्धतीने टिकेल अशी या प्रोडक्टची रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये ‘डस्ट प्रुफ आणि वॉटर रेसिस्टंट’ सेन्सर्सचा वापर करण्यात आलेला आहे. कोणत्याही अडचणीशिवाय आपल्याला पक्षांचे उत्तम फोटोज सहज उपलब्ध होऊ शकतात.

smart bird feeder

या फिडरच्या मॉडेल्समध्ये एआयची मदत घेण्यात आली आहे. एआयच्या मदतीने कोणत्याही पक्ष्याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते, पक्षी ओळखण्यासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी याचा चांगला वापर होऊ शकतो.

बर्ड लव्हर या अॅपच्या मदतीने जवळपास १०,००० पक्ष्यांची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. अलीकडेच अमेरिकेत या फिडरच्या मदतीने पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे संकलनसुद्धा करण्यात आले होते.

भारतीयांना अलीकडेच हे तंत्रज्ञान समजले असून बाहेरच्या देशांमधून येणाऱ्या पक्ष्यांचे संकलन करण्यासाठी याचा चांगला वापर भविष्यात केला जाऊ शकतो.

याचबरोबर यामध्ये ३२ जीबी मेमरी कार्ड दिले असून त्याच्या मदतीने पक्ष्यांचे रेकॉर्डिंग सेव्हसुद्धा करता येऊ शकते. मोबाईल अॅपच्या मदतीने कोणालाही हे फोटोज आणि व्हिडीओज एका क्लिकवर बघता येऊ शकतात.

मित्रपरिवार, कुटुंबासोबत सोशल मिडीयावर हे फोटोज शेअर करण्याचा पर्यायसुद्धा यामध्ये उपलब्ध आहे. सध्या ऑनलाईन हे बर्ड फीडर्स उपलब्ध आहेत.

आपल्या बजेटप्रमाणे, गरजेप्रमाणे, आवडीनुसार कोणीही योग्य त्या फिडरची निवड करू शकतो. पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या लोकांसाठी हे फिडर एक उत्तम भेट ठरू शकते.

विशेष म्हणजे वेगवेगळी मॉडेल्स यामध्ये उपलब्ध असल्यामुळे तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही योग्य फिडर निवडू शकता. अगदी २५०० रुपयांपासून ते ४०,००० रुपयांपर्यंत वेगवेगळी फीडर्स ऑनलाईन उपलब्ध आहेत.

  • आदित्य बिवलकर

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.गॅजेट्सच्या दुनियेत – चष्मा लावा, गाणी ऐका..
2.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बेड
3.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बर्ड फीडर
4. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बॅट
5. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ रोबो

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *