smartsunglasses

गॅजेट्सच्या दुनियेत! – चष्मा लावा गाणी ऐका..

READING TIME – 4 MINS

रस्त्यावर चालताना, बाईकवर अथवा गाडी चालवताना मंद आवाजात गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. मोठ्या आवाजात गाणी लावली तर बऱ्याच वेळा इतर लोकांना त्याचा त्रास होतो. यावर हेडफोनचा पर्याय असतो, मात्र त्याने काहीवेळा कानाला त्रास होऊ शकतो.

आपण डोळ्यांवर लावणाऱ्या चष्म्यातून किंवा गॉगल्समधूनच जर आपल्याला ऐकू यायला लागलं तर? अशाच काही स्मार्ट सनग्लासेसचा सध्या ट्रेंड सुरु आहे.

केवळ गाणीच नाही तर या चष्म्यांच्या मदतीने तुम्ही फोनवर बोलू शकता, आलेला एखादा फोन उचलू शकता किंवा कट करू शकता, त्याचबरोबर गुगल सर्चला कमांडसुद्धा देऊ शकता. अशा भन्नाट फिचर्समुळे बरेच लोक या ग्लासेसकडे आकर्षित होत आहेत.

फास्ट ट्रॅक, अंब्रेन, टायटन आय अशा अनेक आघाडीच्या कंपन्यांकडून यापद्धतीचे स्मार्ट सनग्लासेस मार्केटमध्ये आले आहेत. या स्मार्ट ग्लासेसमध्ये एक अनोखे हॉल स्विच तंत्रज्ञान असते. आपण आपला चष्मा उघडला, की जवळच्या डिव्हाइसशी जोडण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध असतो.

पेअरिंग केल्यानंतर आपल्या मोबाईलशी त्वरित चष्मा जोडला जातो . त्याच्यासोबत १० मीटरच्या रेंजमध्ये कोणतेही डिव्हाईस जोडले जाण्याचा पर्याय उपलब्ध यात उपलब्ध आहे.

एकदा डिव्हाईस कनेक्ट केल्यावर फोन उचलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी किंवा कोणत्याही व्हॉईस फिचरसाठी चष्म्याचा वापर करता येतो. यूजर्सना यासोबत व्हॉईस असिस्टंटचा सपोर्टही देण्यात आला आहे, म्हणजेच ते व्हॉईस कमांडही देऊ शकतात.

smart sunglass

स्मार्ट ग्लासेस चौरस आणि गोल फ्रेममध्ये उपलब्ध आहेत. अँब्रेन ग्लेअर स्मार्ट ग्लासेसमध्ये बिल्ट-इन स्पीकर आहेत आणि ते मल्टी-फंक्शनल टच कंट्रोल्ससह नियंत्रित केले जाऊ शकतात.

MEMS मायक्रोफोन असलेले हे उपकरण HD सराउंड साउंड अनुभव देते आणि IPX4 वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह ते लाँच करण्यात आले आहे. ग्लेअर स्मार्ट ग्लासेस ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटीसह स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांशी कनेक्ट करता येतात.

इतर चष्म्यांप्रमाणे डोळ्यांना UV किरणांपासून ९९ .९९ टक्के संरक्षण देखील या ग्लासेसमुळे मिळतं. अशाप्रकारे ऑडिओ कनेक्टिव्हिटीसह डोळ्यांवरील थकवा आणि ताण कमी होऊ शकतो.

सराउंड साऊंड तंत्रज्ञान असल्याने या आवाजाचा कानांना त्रास होत नाही. ५.१ तंत्रज्ञानामुळे थिएटर साऊंडचा अनुभव ऐकणाऱ्या व्यक्तीला मिळतो. केवळ एका बटनावर आवाज कमी जास्त करण्याचे फिचर असल्यामुळे आपल्या सोयीने आवाज ठरवता येतो.

या चष्म्यांचे डिझाईन आकर्षक आणि ट्रेंडी असल्याने त्याला ग्राहकांची पसंती मिळताना दिसत आहे. कोणत्याही ‘टेक सॅव्ही’ व्यक्तीसाठी हे युनिक आणि खिशाला परवडणारे गिफ्ट ठरू शकते.

हल्ली मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन मोबाईल्समध्ये हेडफोनसाठी स्वतंत्र जॅक नसतो, त्यामुळे ब्लू टूथ हेडफोनचा वापर वाढतो आहे. हेडफोन्स ऐवजी हे सनग्लासेस एक स्मार्ट पर्याय ठरू शकतो.

या स्मार्ट चष्म्याचे लेन्स मॅग्नेटिक क्लिप-ऑनने बदलता येतात. यामध्ये पॉवर लेन्सेसचा पर्यायसुद्धा देण्यात आलेला आहे, त्यामुळे रोजच्या वापरासाठीसुद्धा याचा वापर करता येतो. युजर्सना चष्म्यांमध्ये असलेल्या स्पीकर्ससह एचडी सराउंड साउंड अनुभव मिळेल आणि ते आपोआप मोठा आवाज कमी करतील.

smart glasses

एका चार्जवर ७ तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअपचा या चष्म्यांना आहे. कोणत्याही मोबाईलच्या चार्जरने हे चष्मे चार्ज करता येतात, दोन तासांत हे चष्मे अगदी सहज चार्ज होतात.

बोस, रेझर, फास्ट ट्रॅक अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी हे चष्मे मार्केटमध्ये आणलेले आहेत. अगदी २५०० रुपयांपासून हे चष्मे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

मेटा आणि रे बॅन अशाच पद्धतीच्या स्मार्ट लेन्सेसवर सध्या काम करत असून लवकरच अधिक अत्याधुनिक लेन्सेस आपल्या भेटीला येणार आहेत. यामध्ये मोबाईल कनेक्ट केल्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम चष्म्यातून बघण्याचा पर्याय देण्यात येत आहे.

सध्या यावर संशोधन सुरु आहे. याचबरोबर या चष्म्यामध्ये कॅमेराचा पर्यायसुद्धा देण्यात येत आहे. त्याच्या मदतीने युजरला फोटो काढता येणार आहेत.

भारतात हे चष्मे उपलब्ध होणार असले, तरीही अमेरिकेत याची विक्री सुरु झाली असून तेथे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या ग्लासेसना मिळत आहे. भारतातही लवकरच हे चष्मे दाखल होण्याची शक्यता आहे. याचबरोबर व्हीआर तंत्रज्ञानावर आधारित सनग्लासेसवरसुद्धा मेटाद्वारे संशोधन सुरु आहे.

एकंदरच बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात हे सनग्लासेस स्मार्ट मित्र म्हणून आपल्या भेटीला येत आहेत, त्यामुळे एकदा तरी त्याचा वापर प्रत्येकाने करून बघायलाच हवा.

  • आदित्य बिवलकर

या लेखमालिकेत ५ लेख आहेत –
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
1.गॅजेट्सच्या दुनियेत – चष्मा लावा, गाणी ऐका..
2.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बेड
3.गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बर्ड फीडर
4. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ बॅट
5. गॅजेट्सच्या दुनियेत – ‘स्मार्ट’ रोबो

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *