PenGoshti_LataMangeshkar

Reading Time: 11 Minutes (1,098 words)

फॉन्ट साइज वाढवा

लता मंगेशकर नावाचं सातअक्षरी स्वरपर्व आपल्या आयुष्यातून संपलं. असं कधी होईल याचा विचारही केला नव्हता. तसा विचार मनात आला तरी तो तातडीनं झटकून टाकला जायचा. लताच्या जाण्यानं आपलं नक्की काय नुकसान झालंय हे समजायला काही काळ जावा लागेल. सध्या तरी केवळ बधिरपणा आलाय. पंचेद्रियांना आत्ता काहीही ऐकायचं नाही, बघायचं नाही, पचवायचं नाही; कारण सोसवायचंच नाही. 
मन मोठं विचित्र असतं. ते बरोबर लताची गाणी आठवत बसतं. एकेका गाण्यानं आपल्याला काय दिलं, याचा विचार करू लागतं. पूर्वीही काही गाणी ऐकताना डोळ्यांत आपोआप पाणी यायचं… आताही येतंच, फक्त ते केवळ त्या गाण्यानं दिलेल्या अपरिमित आनंदामुळंच नसतं. या आवाजाची, या कंठाची सम्राज्ञी आता ऐहिक रूपानं आपल्यात नाही, ही दुखरी जाणीव सदैव मागं असते. 
स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.
पहिली आठवण आहे १९९३ ची. तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा शताब्दी महोत्सव सुरू झाला होता. त्यामुळं त्यांनी गणपती बसायच्या आधी जवळपास ५० की ५५ दिवस भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यासाठी सारसबागेजवळच्या सणस मैदानात मोठा मंडप टाकला होता आणि तिथं रोज अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. मी तेव्हा पुण्यात ‘गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक’मध्ये शिकत होतो. मी अनेक दिवस या मंडपात हजेरी लावली आणि तेव्हा सादर झालेले बरेच कार्यक्रम पाहिले. या सोहळ्याची सांगता नीटच लक्षात आहे. त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी मी साक्षात लतादीदींना प्रत्यक्ष गाताना ऐकलं. ‘अमृताचा घनु’ हा कार्यक्रम पं. हृदयनाथ मंगेशकर सादर करीत होते आणि राम शेवाळकर निरूपण करीत होते. हा कार्यक्रम मी प्रथमच पाहत होतो आणि माझे कान अगदी तृप्त झाले. ‘आइसिंग ऑन द केक’ म्हणावे तसं शेवटी ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ हा अभंग गायला शेवाळकरांनी आशा भोसलेंनाच बोलावलं. आशाताई आल्या. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार उभं राहून, हातात माइक धरून अत्यंत दणदणीत आवाजात ‘पांडुरंग कांती’ सादर केलं. श्रोत्यांना अतोनात आनंद झाला. पण गणपतीबाप्पा त्या दिवशी सगळ्या प्रेक्षकांवर जरा जास्तच प्रसन्न असावा. कारण कार्यक्रमाची सांगता करायला बाळासाहेबांनी समोर बसलेल्या दीदींनाच बोलावलं. ‘पसायदान’ दीदी म्हणणार हे जाहीर होताच त्या मंडपात अपरिमित आनंदाची झुळूक पसरली. मी तर वेडाच झालो. लता मंगेशकरांना लाइव्ह ऐकायला मिळेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तो योग आला… दीदी आल्या. त्यांच्या त्या अमृतासम आवाजात त्यांनी ‘आता विश्वात्मके देवें’ सुरू केलं आणि भान हरपलं. मी तेव्हा १७-१८ वर्षांचा होतो. असे कार्यक्रम फक्त कानांनी ऐकायचे ते दिवस होते. कानावर पडणारे सूर आत – हृदयात – पोचण्यासाठी वयाला एक मॅच्युरिटी यावी लागते, ती आली नव्हती. तरी दीदींच्या त्या स्वरांनी माझ्या मनावर फार मोठं गारूड केलं…


पुढं लता मंगेशकरांना समोरासमोर भेटण्याची व प्रश्न विचारायची संधी मिळाली ती स. प. महाविद्यालयाच्या मैदानात. दीनानाथ रुग्णालयाच्या मदतीसाठी दीदींनी पुण्यात ‘संगीत रजनी’ आयोजित केली होती. तेव्हा ‘सकाळ’तर्फे या सर्व कार्यक्रमाचं रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी माझ्यावर टाकली होती. स. प. महाविद्यालयात रजनीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी दीदी रंगीत तालीम करणार होत्या. तेव्हा आम्हा काही पत्रकारांना तिथं जाता आलं. दीदींची रंगीत तालीम पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. मला आठवतंय, दीदींनी ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्याचं बंगाली व्हर्जन ‘ना जेबो ना, रोजोनी ओ कोनोबाशी’ (की असंच काही तरी) गायलं होतं. त्या मस्त आनंद लुटत गात होत्या. सहगायकांची गंमत करत होत्या. हे एरवी पाहायला मिळालं नसतं. खुद्द पंडितजी मुख्य रंगमंचाच्या बरोबर समोर उभारलेल्या एका उंच व्यासपीठावर (जिथे कॅमेरे लागणार होते) बसून, सर्व व्यवस्था पाहत होते. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ गाण्याची रंगीत तालीम सुरू झाली. दीदींनी पहिला अंतरा, प्रतापराव गुजरांनी ज्या वेगात घोडा फेकला असेल, त्याच वेगात फेकला आणि अंगावर सरसरून काटा आला. एखादं कडवं झालं असेल-नसेल, बाळासाहेबांनी गाणं थांबवलं. ते समोर हेडफोन लावून ऐकत होते. काय झालं कुणालाच कळेना. त्यावर बाळासाहेब हातातल्या स्पीकरवरून ओरडले, की कोरसमध्ये कुणी अमराठी गायक आहे काय? त्यावर एक जण तसा असल्याचं निष्पन्न झालं. बाळासाहेबांनी त्याला या कोरसमध्ये गाऊ नकोस, असं सांगितलं. झालं होतं असं, की ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ ही ओळ म्हणताना तो हिंदी गायक ‘दोडले’ असं हिंदी टाइप उच्चारत होता. मराठीनुसार ‘द + उ + डले’ असं उच्चारायला हवं होतं. बाकी मराठी गायक बरोबर उच्चारत होते. फक्त तो हिंदी गायक तेवढा ‘द + ओ + डले’ असं उच्चारत होता. बाळासाहेबांच्या तीक्ष्ण कानांनी ती चूक बरोबर हेरली व त्याला बाहेर काढलं. तालीम पुढं सुरू झाली. हे पाहून मी थक्क झालो. बाळासाहेबांविषयी आदर होताच (कोतवाल चावडीसमोर दर रामनवमीला दगडूशेठ गणपतीसमोर होणाऱ्या मैफली आणि त्या मैफलीच्या अंताला होणारं ‘दयाघना’ आम्ही कधीच चुकवलं नव्हतं…); पण आता तो शतपटीनं द्विगुणित झाला.

तर ही रंगीत तालीम संपल्यावर दीदी खाली उतरल्या. आम्ही पत्रकारांनी त्यांना गाठलं. त्यांच्यासोबत मोहन वाघ होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, की दीदी आता फार थकल्या आहेत (तेव्हा त्या ७१ वर्षांच्या होत्या), तर तुमच्यापैकी कुणी तरी एकानेच एकच प्रश्न विचारा. असं म्हणून मी त्यांच्या शेजारीच उभा असल्यानं त्यांनी मला ‘हं, तुम्ही विचारा’ असं सांगितलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेच दीदींना प्रश्न विचारला, की आत्ता तुमच्या मनात काय भावना आहेत वगैरे. त्यावर दीदींनी यथोचित उत्तर दिलं. त्या माझ्यापासून दोन फूट अंतरावर उभ्या होत्या. डिसेंबरचे दिवस होते. थंडी होती. त्यांनी गळ्याभोवती शाल पांघरली होती. सत्तरी ओलांडलेल्या, पण अत्यंत प्रसन्न, सदासतेज अशा त्या स्वरसरस्वतीचं ते दर्शन कायमचं मनात रुतून बसलं आहे.
त्यानंतर दीदींशी मी फक्त एकदाच बोललो. निमित्त होतं सुधीर फडके यांच्या निधनाचं. तेव्हा मी आमच्या ऑफिसमध्ये आल्यावर बाबूजी गेल्याचं कळलं. तत्क्षणी माझ्या मनात विचार आला, की आपल्याला लतादीदींची प्रतिक्रिया घेता येईल. तेव्हा माझ्याकडं मोबाइल नव्हता. मी आमच्या ऑफिसच्या लँडलाइनवरून थेट डॉ. धनंजय केळकरांच्या मोबाइलवर फोन लावला आणि दीदींची प्रतिक्रिया कधी मिळू शकेल, कुठं फोन करू असं विचारलं. त्यावर ते म्हणाले, ‘दीदी माझ्या शेजारीच आहेत. बोल त्यांच्याशी…’ आणि असं म्हणून त्यांनी थेट दीदींकडंच फोन दिला. मला हे अनपेक्षित होतं. पण मी त्यातून सावरून पटकन कागद-पेन घेतले आणि दीदींशी बोलायला सुरुवात केली. म्हणजे पुढची दहा मिनिटं त्याच बोलत होत्या आणि मी ऐकत होतो. त्या संपूर्ण संभाषणात त्यांनी बाबूजींचा उल्लेख ‘फडकेसाहेब’ असाच केला. सावरकर हे आमचं समान दैवत होतं, अशा अर्थाचं काही तरी म्हणाल्या. मला अर्थातच सगळं आठवत नाही, पण एक गोष्ट लख्ख आठवते – ती म्हणजे त्या एकदम म्हणाल्या, ‘अहो, त्यांचं अन् माझं एक ड्युएट आलं होतं. १९४८ मध्ये… कोळ्याच्या राजा रं… (असे काही तरी बोल होते. मला नक्की आठवत नाही….)’ असं म्हणून त्यांनी ते गाणं दोन ओळी चक्क गाऊन दाखवलं. साक्षात लता मंगेशकर फोनवर मला गाणं ऐकवत होत्या. आजूबाजूचा सगळा कोलाहल, गर्दी, आवाज मी पार विसरून गेलो. माझे पंचप्राण माझ्या कानात येऊन थांबले… दीदी गात होत्या… गातच होत्या…
निरोपाचं काही तरी बोलून मी तो फोन ठेवला. सुमारे दहा मिनिटं त्या बोलत होत्या. त्यांची स्मरणशक्ती पाहून मी चाट पडलो होतो, तर त्यांचे स्वर कानात असल्यानं दुसरं काहीही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हतो. मी तो क्षण माझ्यापुरता धावत्या काळाला ‘पॉझ’ करून मनात कायमचा ‘फ्रीज’ करून ठेवला…
लतादीदी आता केवळ शरीरानं आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांचं स्वरमयी अस्तित्व कायम राहणार आहे. आपापले देव असे आपल्याजवळच असतात… ते मनात असे अखंड पूजायचे असतात… हेच देवाचे भेटणे… हेच आपले पसायदान…
आणखी काय लिहिणे?

– श्रीपाद ब्रह्मे


या सदरातील लेख…

बोल्ड अँड हँडसम

वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.

लेख वाचा…


लेख झाला का?

साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *