बहुश्रुत करणारं रंगतदार पुस्तक

दिल्ली या राजधानीच्या शहरात पत्रकारिता करणे हे एक मोठे आव्हान असते. कारण एकतर सध्या देशाचा कारभार तेथून चालतो. आणि त्यासाठी नानाविध राज्यांतील, प्रांतांतील, लोकप्रतिनिधी, राजकारणी, शासकीय अधिकारी यांचा तेथे वावर चालू राहतो. त्यांच्यात मिसळायचे, त्यांच्याकडून बातम्या मिळवायच्या हे काम तसे सोपे नाही. त्यासाठी इंग्रजी, हिंदी आदी भाषांवर चांगले प्रभुत्व असावयास हवे. अर्थात, दिल्लीत काम करत असलेले अनेक मराठी व अन्य भाषिक पत्रकार आपले कार्यक्षेत्र आपल्या राज्यापुरतेच मर्यादित ठेवतात. त्यांचे वावरणे हे त्यांच्या राज्यांतील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांपुरतेच राहते. राजधानीच्या या शहरात विविध देशांच्या वकिलातीही असतात. त्यांच्या राजदूतांशी किंवा अन्य परदेशी अधिकाऱ्यांशी संबंध ठेवून, वाढवून परदेशांतील विविध बातम्या मिळवणाऱ्या पत्रकारांची संख्या तर, फारच कमी. पण गेली बरीच वर्षं दिल्लीत स्थायिक असलेले एक ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे मात्र त्याला अपवाद म्हणावे लागतील. परराष्ट्र राजकारण हा त्यांचा एक आवडीचा विषय. त्यातूनच त्यांनी त्या विषयावर मराठीत काही पुस्तकेही लिहिली आहेत. ‘साऊथ ब्लॉक, दिल्ली’ हे त्यांचे पहिले पुस्तक मला आवडले होते. म्हणूनच त्यानंतर रोहन प्रकाशनातर्फे त्यांचे प्रसिद्ध झालेले ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ हे पुस्तक आवर्जून वाचले.

नाईक यांनी पुस्तकाच्या मनोगतात, ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ या पुस्तकाचे सारे सार अत्यंत योग्य शब्दात वर्णन केले आहे. राष्ट्रप्रमुख असो, राजदूत असो, की शिष्टाईच्या क्षेत्रात वावरणारा अन्य अधिकारी असो – अखेर सारी माणसेच. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. माणसांचे प्रकार मोजता येत नाहीत. तऱ्हाही अनेक. जगातील सुमारे शंभरपेक्षा अधिक नेत्यांच्या स्वभावातील लकबी, संभाषणचातुर्य, विद्वत्ता, धैर्य, विनोदप्रचुरता, चिकाटी, खंबीरपणा, मनमिळावू वृत्ती, भयचकितता, विक्षिप्तपणा, डँबिस वृत्ती, धसमुसळेपणा, रानटीपणा, क्रौर्य, बेफिकिरी, आदी स्वभाववैशिष्ट्यांचं मनोरम दर्शन या पुस्तकातून वाचकांना होतं.
राजनैतिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात जे निरनिराळ्या प्रकारचे चांगले, वाईट अनुभव, घटना, गोष्टी ऐकायला किंवा वाचायला मिळतात, त्यांवर खुलेपणाने लिहिण्याची पद्धत परदेशांत फार पूर्वीपासून प्रचलित आहे. वाचकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. अशाच विविध पुस्तकांतील घटना, अनुभव एकत्रित करून, त्यावर स्वत:ची टिप्पणी करून, नाईक यांनी आपल्या या पुस्तकात दिले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांनी पुस्तकाचा संदर्भही दिला आहे. अनपेक्षितपणे निर्माण होणारे अफलातून प्रसंग व या घटना वाचताना मजा तर वाटतेच, पण दैनंदिन जीवनातील ताणतणावांना क्षणिक का होईना, पण आरामही मिळतो. या पुस्तकातील प्रसंग अगदी छोटे छोटे, गमतीदार पण माहितीपूर्ण आहेत. त्यांतून आपल्याला खूप नवीन माहितीही मिळते. त्यांतील मला आवडलेले दोन प्रसंग या ठिकाणी नमूद करावेसे वाटतात.

  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्राध्यक्ष पदावर असताना चीनच्या दौऱ्यावर गेले होते. ते शाकाहारी आहेत, हे चीनच्या अधिकाऱ्यांना माहिती होतं. पण भोजनाच्यावेळी भला मोठा मेन्यू असायचा. त्यावर सारे ताव मारायचे. पहिल्याच औपचारिक शाही भोजनाच्यावेळी समोर ठेवलेल्या एका पदार्थाचं नाव होतं ‘द ड्रॅगन अँड द टायगर’. प्रत्यक्षात ती संथ आचेवर शिजवलेली मांजर व तुकडे केलेला साप अशी डिश होती. ती पाहून राजदूत नेहरू यांच्या पत्नी श्रीमती आर. के. नेहरू यांना धक्काच बसला. पण चीनच्या दृष्टीने उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेल्या मेजवानीतील अनेक खास पदार्थांपैकी ते दोन पदार्थ होते. सर्वसाधारणत: शाकाहारी भोजनातील पहिल्या शाकाहारी पदार्थांची चव घेतल्यानंतर डॉ. राधाकृष्णन थांबायचे. तसंच इथेही झालं. समोरच्या टेबलावरील तब्बल २३ पदार्थांकडे पाहताना ते अक्षरश: कंटाळून गेले.
  • पाँडेचरी हे राज्य २८० वर्षांच्या वसाहतवादी शासनानंतर १९५४मध्ये भारतात विलीन झालं. परराष्ट्र खात्यातील पी.जे.राव नावाच्या अधिकाऱ्याची पाँडेचरीच्या कौन्सुल जनरलच्या कार्यालयात बदली झाली, व केवलिंसग हे तिथे भारताचे कौन्सुल जनरल होते. १९५५च्या सुमारास परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग पाँडेचरीच्या दौऱ्यावर गेले. काँग्रेसला त्या वेळी मद्याचं वावडं होतं. आणि केंद्रात काँग्रेसचेच सरकार होतं. ते लक्षात घेऊन, ‘मंत्रिमहोदयांचं आगमन होण्यापूर्वी एकेक पेग लावून घ्या,’ असे राव व अन्य सहकाऱ्यांना खुद्द केवलसिंग यांनीच सुचवलं. त्याबरोबर सारेजण दालनातील बारकडे धावले व्हिस्कीचे ग्लास भरून हॉलमध्ये आले. त्या सर्वांच्या दुर्दैवाने स्वर्णसिंग ठरलेल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे आधीच आले. ते थेट हॉलमध्येच. राव त्या वेळी दरवाजापाशीच होते. बाकी साऱ्यांनी मंत्रिमहोदयांना पाहून आतल्या खोलीत पोबारा केला. मंत्र्यांचं स्वागत करायला राव पुढे गेले आणि स्वत:च्या हातातील ड्रिंककडे पाहत त्यांनी मंत्र्यांना विचारलं, ‘सर, मे आय गेट यू अ जिंजरेल?’ स्वर्णसिंग यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकलं. राव यांच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, ‘यस, माय यंग फ्रेंड, बट नॉट ‘युवर’ जिंजरेल. यू कॅन कॅरी ऑन युवर ड्रिंक.’ राव यांनी जिंजरेल व्हिस्कीसारख्या रंगाचा फायदा घेतला खरा, पण स्वर्णसिंग यांचं नाक इतकं तीक्ष्ण होतं की, राव प्रत्यक्ष काय पीत आहेत, हे त्यांना बरोबर समजलं होतं.
    अशा अनेक घटना, प्रसंग, कहाण्या विजय नाईक यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. तसेच लेखाच्या शेवटी पुस्तकाचा संदर्भ दिल्याने अधिक तपशील वाचण्याची इच्छा असल्यास त्याचा योग्य संदर्भ मिळू शकतो. मला याचा चांगला उपयोग झाला. रवीन्द्रनाथ टागोर हे भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणून त्या काळात ओळखले जायचे. विविध देशांना ते भेटी देत असत. जवळजवळ ३५ पेक्षाही अधिक देशांचे दौरे त्यांनी त्या वेळी केले होते. त्याबाबतचे त्यांचे काही लेखन वाचनात आले. मला व माझी पत्नी जयंती दोघांनाही विविध देश पाहण्याची आवड त्यामुळे रवीन्द्रनाथ त्या काळात परदेश दौरे कशा पद्धतीने करत असतील याबद्दल मोठी उत्सुकता होती. नाईक यांच्या या पुस्तकात ‘टागोर मुसोलिनी’ या प्रकरणात टागोर यांच्या इटलीच्या भेटीचा उल्लेख आहे. तो संदर्भ ‘मिटिंग विथ मुसोलिनी, टागोर्स टूर्स इन इटली, १९२५ अँड १९२६’ या कल्याण कुंटू यांच्या पुस्तकातून घेण्यात आला आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर ते पुस्तक मी मिळवले. ते पुस्तक वाचल्यानंतर, आमच्या प्रवासालाही एक निराळं परिमाण मिळालं.
    तर असं हे पुस्तक आपल्याला ‘डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग दाखवत मनोरंजन करतं आणि बहुश्रुतही करतं.

-जयप्रकाश प्रधान

शिष्टाईचे इंद्रधनू : डिप्लोमॅटिक विश्वातील रंगतरंग / लेखक- विजय नाईक / रोहन प्रकाशन.

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • असा घडला भारत / संपादन : मिलिंद चंपानेरकर, सुहास वुâलकर्णी / रोहन प्रकाशन
    • फैज अहमद फैज : एक प्यासा शायर / लेखक- प्रतिभा रानडे / राजहंस प्रकाशन.
    • नेहरू व बोस / लिखाक- रुद्रांग्शू मुखर्जी, अनुवाद : अवधूत डोंगरे / रोहन प्रकाशन.
    • दर कोस दर मुक्काम / लेखक- अशोक पवार / मनोविकास प्रकाशन.
    • साउथ ब्लॉक, दिल्ली / लेखक- विजय नाईक / रोहन प्रकाशन.
    • इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही / लेखक- पी.एन.धर, अनुवाद : अशोक जैन / रोहन प्रकाशन.
    • आधुनिक भारताचे विचारस्तंभ / लेखक- रामचंद्र गुहा, अनुवाद : शारदा साठे / रोहन प्रकाशन.
    • स्टीव्ह आणि मी / लेखक- टेरी इरविन, अनुवाद : सोनिया सदाकाळ-काळोखे / राजहंस प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल सप्टेंबर २०२०


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

शिष्टाईचे इंद्रधनू

या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी किंवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाऱ्यांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे. डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाऱ्या एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा कॅलिडोस्कोप म्हणजेच…शिष्टाईचे इंद्रधनू !

Shishtaiche-Indradhanu

225.00Add to Cart


तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *