रहस्यकथांचे दिवस आणि अगस्ती…

आपलं वय वाढतं, आपण शहाणे होतो, वयानुसारच्या भावनांसोबत हळूहळू कधी इतरांसारखे होतो, ते आपल्यालाच कळत नाही. आपण इतरांसारखे होतो म्हणजे नेमके काय होतो? आपल्यातलं काही तरी रहस्यमय रीतीनं नाहीसं होत जातं. आपणच आपल्यात स्पष्ट होत होत, आपल्यातलं काही गूढ विरत जातं. ज्या दिवशी अंधाराबद्दल आत्मीयता निर्माण होते, त्या दिवशी आपल्यातली भीती मरून जाते. एका अमूर्त मॅच्युरिटीच्या गारुडात नवनवीन काही शोधत राहतो. वेगळे लेखक, कवी, वेगळी पुस्तकं यांच्या मार्गावर चालत चालत पिकू लागतो आणि एक दिवस परिपक्वतेचा दर्प आपल्या सभोवती घमघमू लागतो. मॉडर्न, पोस्टमॉडर्न, लॅटिन अमेरिकन, ग्लोबल अशा संज्ञांतून साहित्यात स्वत:ला मुरवत राहतो; पण तसं मिरवताना या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली होती, हे एक कोडं होऊन बसतं. एक दिवस अचानक बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, गुरुनाथ नाईक, श्रीकांत सिनकर, रत्नाकर मतकरी या मराठी आणि वेद प्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन पाठक यांसारख्या हिंदी ‘पल्प फिक्शन’ लिहिणाऱ्या लेखकांपासून आपल्या वाचनाची सुरुवात झाली होती, हे रहस्य आपलंच आपल्याला उलगडतं. माणसामध्ये भय, गूढता, उत्सुकता या अतिशय प्राथमिक, स्वाभाविक भावना असतात. त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, घटना, वेळ यांच्यात आपण स्वत: ओढले जातो; कारण एखादं रहस्य जाणून घेण्याची आपल्याला तीव्र आसक्ती असते. वाचन गांभीर्यानं घेणाऱ्या बहुसंख्य वाचकांची सुरुवात अशीच झालेली असेल. ‘पल्प फिक्शन’ला कमी दर्जाचं ठरवून, त्या त्या काळच्या तथाकथित साहित्यिकांनी या प्रकारच्या लेखकांवर अन्याय केल्याने, तसं साहित्य नंतर नंतर येणंच बंद झालं; त्यामुळेच आजच्या पिढीत वाचनाबद्दल उदासीनता आली आहे की काय, असं म्हणायला जागा उरते. वाचनाला काही उद्दिष्ट हवं, सामाजिक जाणिवा वाढवण्यासाठी, काही तरी नवीन शिकण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी, समाजात वावरताना ‘वेल इन्फॉर्म्ड’ असावं म्हणून, अशा अनेक उद्दिष्टांनी प्रेरित वाचन व्हायला हवं. निव्वळ मनोरंजनासाठी काही वाचणं म्हणजे कमी दर्जाचं, हा समज पेरण्यात नंतर आलेले लोक यशस्वी झाले, म्हणूनही या सगळ्या प्रकारचं लिखाण नंतर नंतर बंद झाल्याचं दिसतं.

Agasti-Set-Cover

मला वाटतं, हाच दृष्टिकोन लक्षात घेऊन श्रीकांत बोजेवार यांनी रोहन प्रकाशनातर्फे ‘अगस्ती’ नावाचं एक भन्नाट कॅरेक्टर निर्माण करून, तीन छोटेखानी रहस्य कादंबऱ्या लोकांना भेट दिल्या आहेत. वर म्हटल्याप्रमाणे, वयाचा इतका रस्ता चालून आल्यावर आणि इतकं विविध प्रकारचं वाचन झाल्यावर, आता रहस्य कथा काय वाचायच्या, असं कदाचित मनात येईल; पण एकदा या कादंबऱ्या हातात घेतल्या की, त्यांचा रहस्यस्फोट होईतो आपण त्या खाली ठेवू शकत नाही. आजकालच्या फेसबुक-व्हॉट्सअॅप-ट्विटरच्या जमान्यात, वाचकांचा ‘अटेन्शन स्पॅन’ कमी झाला आहे, हा विचार करूनच बोजेवारांनी या छोटेखानी रहस्य कादंबऱ्या आणल्या असाव्यात.
‘हरवलेलं दीड वर्ष’, ‘न्यूड पेंटिंग@१९’ आणि ‘अंगठी १८२०’ या जेमतेम प्रत्येकी सव्वाशे पानांच्या कादंबऱ्या सतत उत्कटता वाढवणाऱ्या झाल्या आहेत. त्यात मांडलेल्या कोड्यांमध्ये वाचक अडकतच जातो.

‘हरवलेलं दीड वर्ष’मध्ये हंसा नावाच्या एका उद्योगपती स्त्रीच्या मुलीच्या आयुष्यातून हरवलेलं दीड वर्ष शोधून काढण्याचं काम अगस्तीकडे येतं. एखादी वस्तू, प्रेत, खजिना वगैरेंसारख्या गोष्टी सोडून, हरवलेली, ‘मेमरीतून डिलिट’ झालेली दीड वर्ष अगस्ती कसा शोधून काढतो, ते अतिशय औत्सुक्यपूर्ण आणि सनसनाटी आहे.

‘न्यूड पेंटिंग@१९’मध्ये निकिता शर्मा नामक मुलीच्या खुनापासून सुरू झालेली कथा, अगस्तीसोबत आपल्याला हिमाचल प्रदेशात नेते आणि अनवट अशा वळणांनी एका न्यूड पेंटिंगपाशी आणून सोडते. हेही कोडं उत्सुकता ताणून धरतं, वाचकाला भंजाळून सोडतं.
या त्रयीचा शेवटही तितक्याच उच्च दर्जाच्या रहस्यमय प्लॉटमध्ये होतो, ज्या कादंबरीचं नाव आहे ‘अंगठी १८२०’. कथा घडते आताच्या काळात आणि अगस्तीला शोध घ्यायचा असतो १८२०मधल्या अंगठीचा. मग त्यात बॉलिवूड, खान वगैरे सगळं येतं आणि आपलं बोट धरून अकल्पित वाटेनं गंतव्य स्थानी पोहोचवतं.

आपण आजच्या काळातला पूर्ण पुरुष असलेल्या या अगस्तीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. तो उंच, तगडा, रांगडा, टेक्नोसॅव्ही, चाणाक्ष बुद्धिमत्तेचा, शांत, सोशिक आणि मुख्य म्हणजे सडाफटिंग आहे. लग्नाच्या फंदात न पडलेला; पण वाटेत येईल ते सौंदर्यसुख पुरेपूर उपभोगून मोकळा राहणारा. मल्लिका नावाची त्याच्या स्वभावाशी पूरक असलेली मैत्रीण असलेला. वेळोवेळी विमानानं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून, निरनिराळ्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती असलेला. दादरसारख्या ठरलेल्या ठिकाणी फूटपाथवर, अब्दुलच्या टपरीवर त्याच्या हातचं चवीनं खाणारा असा अगस्ती, आपल्याला आपल्या जगण्याची जाणीव करून देतो.

आपण आजच्या काळातला पूर्ण पुरुष असलेल्या या अगस्तीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. तो उंच, तगडा, रांगडा, टेक्नोसॅव्ही, चाणाक्ष बुद्धिमत्तेचा, शांत, सोशिक आणि मुख्य म्हणजे सडाफटिंग आहे. लग्नाच्या फंदात न पडलेला; पण वाटेत येईल ते सौंदर्यसुख पुरेपूर उपभोगून मोकळा राहणारा. मल्लिका नावाची त्याच्या स्वभावाशी पूरक असलेली मैत्रीण असलेला. वेळोवेळी विमानानं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून, निरनिराळ्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती असलेला. दादरसारख्या ठरलेल्या ठिकाणी फूटपाथवर, अब्दुलच्या टपरीवर त्याच्या हातचं चवीनं खाणारा असा अगस्ती, आपल्याला आपल्या जगण्याची जाणीव करून देतो. असं जगावं, असं थ्रिल अनुभवावं आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडावं. घरच्या मांजरीच्या डोक्यावरल्या केसांत हात फिरवत, उंची दारूचे घोट घेत, जगाची पर्वा न करता हवं तेव्हा हमखास झोपेच्या मिठीत शिरावं.

Kishor Kadam

असला भन्नाट अगस्ती बोजेवारांनी उभा केलाय. त्यासोबतच एका विषयाला, काळाला, स्थळांना, पदार्थांना, पेयांना जे जे आवश्यक ते ते निरीक्षण, अभ्यास बोजेवारांनी अतिशय चोखंदळपणे केलेला दिसतो. या कादंबऱ्यांमध्ये येणाऱ्या मद्याची, पदार्थांची, लेखकांची, पुस्तकांची नावं, या कादंबऱ्या याच काळाशी जोडून ठेवतात. प्रत्येक कादंबरीची सुरुवात वाचकाच्या मानगुटीला धरून, कथेतल्या चक्रव्यूहात नकळत ओढून घेऊन जाते. त्यासाठी लेखकानं जाणीवपूर्वक केलेली वातावरणनिर्मिती कारणीभूत ठरते. कादंबरीतलं कथानक सुरू होण्याच्या वेळा, जागा आणि त्या कोड्यात प्रवेश करत असलेल्या अगस्तीसोबत आपण त्या रहस्याच्या मागे फरफटत जातो. अगस्ती आपल्याला रहस्यभेदापर्यंत अनपेक्षित अशा वळणांनी घेऊन जातो. कादंबरी संपल्यानंतर अगस्तीसोबत किती अकल्पित आणि अनपेक्षित रस्त्यांनी प्रवास केला, याची जाणीव होऊन आपण भयचकित होतो. एखादा रहस्य-कथाकार वा कादंबरीकार जेव्हा एखादं रहस्यमय कोडं आपल्यासमोर मांडतो, तेव्हा ती कथा वा कादंबरी लिहिण्याआधी किती किती प्रकारे ते कोडं मांडून, ते अगदी अकल्पित अशा मार्गानं शेवटाला न्यावं, याचा खूप डोकेफोड अभ्यास लेखक करत असावा, हा प्रश्न अगस्ती वाचताना माझ्या मनात येऊन गेला.
आयुष्यात कितीही गंभीर प्रश्न उभे राहिले, फ्रस्ट्रेशन आलं, नैराश्य आलं, तरी थ्रिल आयुष्यात उतरलं की, आपोआप मन गुंतून जातं. कोडी सोडवायला लागतं. उत्सुकतेच्या श्वासांचा वेग वाढतो. आपण आपल्या प्रश्नांपासून बाजूला पडतो. आपली वाचनाची सुरुवात होण्याला कारणीभूत रहस्य, गूढ आणि भय कथा होत्या. आताच्या काळात तसलं लेखनच नाही. या मराठी पिढीला वाचनाकडे आकर्षित करणारं लेखन कुठलं, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न श्रीकांत बोजेवार यांच्या या तीन छोटेखानी कादंबऱ्या यशस्वीपणे करतात.

– किशोर कदम

  • अगस्ती इन अॅक्शन संच – तीन रहस्यकथांचा संच :
    1. हरवलेलं दीड वर्षं
    2. अंगठी १८२०
    3. न्यूड पेंटिंग @19
  • लेखक : श्रीकांत बोजेवार

(सौजन्य : दै. महाराष्ट्र टाइम्स)

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०२१


अगस्ती इन अॅक्शन संच

Agasti-Set-Cover

डिटेक्टिव्ह अगस्तीच्या PAGE-TURNER कथा…

३ थ्रिलर्स

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’

360.00Add to Cart


kumar-ketkar
ज्येष्ठ पत्रकार, संपादक कुमार केतकर डिटेक्टिव्ह अगस्तीबद्दल म्हणतात….

बेमालूमपणे विणलेली त्रिसूत्री… सेक्स-व्हायलन्स-कॉन्स्पिरसी

बोजेवारांची विलक्षण विनोदशैली आणि पात्रांच्या (व वाचकांच्या) फिरक्या घेण्याची त्यांची अफलातून धाटणी अशा रीतीने येते की, गुन्हेगारीच्या काळ्या गुहेत शिरूनही आपल्याला हलके हसण्याचा मोह आवरत नाही.

वाचा

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *