लैंगिकतेचा वेध घेणाऱ्या दीर्घकथा
नुकतीच रोहन प्रकाशनाने हृषीकेश गुप्तेंची तीन पुस्तकं प्रसिद्ध केली. या पुस्तकांचा आकार आणि निर्मिती खूपच देखणी आहे. गुप्तेचं ‘परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष’ हे पुस्तक त्याच्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा जरा हटके आहे.
एक स्त्री विधवा होते आणि नंतर तिला भेटलेले पुरुष, एक स्त्री म्हणून त्या त्या पुरुषांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तीदेखील त्यांच्याकडे कशा प्रकारे बघते आणि त्यांचा उपयोग किंवा वापर कशा पद्धतीने करते, हे खूप वेगळ्याच तऱ्हेनं गुप्तेंनी मांडलेलं आहे. तिच्यावर लट्टू झालेले वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या स्वभावधर्माचे पुरुष आणि त्यांना नीट हाताळत शेवटी आयुष्यात स्थैर्य किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेऊन तिने केलेली त्यातल्या एका पुरुषाची निवड आणि त्याच वेळी त्याने आपल्याला पूर्ण समाधानी न केल्यास तिने ‘हातचा राखून ठेवलेला’ असतोच, हे सगळं वाचताना खूपच मजा येते. खरंतर असं वास्तव आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा बघितलेलं असतं, पण ते ज्या पद्धतीने गुप्तेंनी मांडलंय ते वाचताना खूप वेगळा अनुभव(एव्हरिथिंग इज फेअर इन लव्हं अँड वॉर प्रमाणे) येतो. तसंच उत्कंठाही वाढत जाते. हे कथानक उभं करताना गुप्तेंनी विक्रम-वेताळ ही पात्रं घेवून कथेची सुरुवात आणि शेवट केलेला आहे.
दुसरी कथा आहे ‘तिळा दार उघड…’ वयात येणाऱ्या मुलाला लैंगिकतेची जाणीव जेव्हा होते, किंवा करून दिली जाते त्यावर ही कथा बोलत जाते. जन्मत:च या मुलाच्या लिंगावर तीळ दिसतो आणि त्यावर पुढे तो स्त्रियांना वश करण्यात तरबेज कसा होणार वगैरे चर्चा झडायला लागतात. त्याच्या वयाच्या त्या त्या टप्प्यात त्याच्यातले होणारे बदल, त्याला मिळत जाणारं लैंगिक ज्ञान, हस्तमैथुनाचा अनुभव, मित्रांच्या गप्पा आणि शेअिंरग, प्रत्यक्ष स्त्रीचा अनुभव न घेताही मारलेल्या बढाया असं सगळं काही आपण त्याच्या प्रवासात बघत राहतो. या कथेचीही मांडणी देखील गुप्तेंनी निराळ्या तऱ्हेनं केलेली आहे.
दोन्ही दीर्घकथा लैंगिकतेभोवती फिरत असल्या तरी त्या कुठेही अश्लील वाटत नाहीत किंवा आपला ताळतंत्र सोडत नाहीत. एकच सांगेन, कुठलेही नीतिमत्तेचे निकष वगैरे न लावता स्वच्छ मनाने या दोन्ही कथा वाचायला हव्यात, तरच त्यांच्यातली वैशिष्ट्यं आणि मौज अनुभवता येईल.
- दीपा देशमुख, पुणे (फेसबुक वॉलवरून साभार)
करोनाकाळातल्या नकारात्मकतेत ‘प्रेमाचा कोअर’ जपणारा कथासंग्रह
आठ मान्यवर, जाणत्या लेखकांच्या एकाहून एक सरस कथा असलेलं ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हे पुस्तक म्हणजे करोनाच्या काळातल्या आपल्या बदललेल्या; आधी होती त्यापेक्षा अधिक स्वार्थी आणि संकुचित झालेल्या मानसिकतेचा आरसाच म्हणावं लागेल. यात बाहेरच्या जगासारखीच लॉकडाऊन झालेली नाती आहेत; त्यातली अगतिकता आहे; ‘बहती गंगा मे हाथ धोने वाले’ आहेत तसेच नि:स्वार्थपणे जनसेवा करणारे सरकारी कर्मचारीही आहेत. आलेल्या प्रत्येक फॉरवर्ड व्हॉट्सअॅप मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवणारी अंधश्रद्धा आहे; हजारो किलोमीटर रिकाम्या पोटी पायी चालत जाणाऱ्या मजुरांची व्यथा आहे. आणि या सगळ्याची सांगता झाली आहे सृष्टीला शरण गेलेल्या क्षुद्र मानवाच्या हतबलतेने.या करोनाच्या इतक्या ताणतणावात, निगेटिव्हिटीमध्ये लिखाणात ‘प्रेम’ हा कोअर जपणं मला कठीण वाटतं. पण यातली कुठलीच कथा त्याबाबतीत निराश करत नाही. नीरजांची ‘एक तुकडा’ असू दे किंवा मनस्विनींची ‘जादूची बोट’. त्यात कोरोनाचं संकट गेल्यानंतरच्या उजळ भविष्याचं स्वप्नरंजन आहे. मतकरींची ‘नाऊ यू सी मी’ आणि बोजेवारांची ‘निके निके..’ दोन्हींत एकीकडे नात्यातला दुरावा तर दुसरीकडे ओलावा आहे. आणि ‘बी निगेटिव्ह’ची मिताली तर कमालीची धीराची आणि आश्वासक आहे. प्रणवचं एका मुख्य विषयासोबत इतरही कन्सर्न्स हाताळण्याचं कौशल्य; हषीकेशच्या मिथकाच्या अंगाने जाणाऱ्या कथेत वाक्यावाक्यात भरलेला सिम्बॉलिझम; ‘मायं गाव’च्या नायिकेची आपल्या मातीची ओढ हे सगळं मिळून तयार झालेलं ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ नावाचं रसायन मनात घर करतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ, कथांचा क्रम फार सूचक आहेत. त्यासाठी अनुजा आणि रोहन टीमचं विशेष कौतुक.
या करोनाच्या मुकुटाचे काटे अंगावर झेलत आपण जगतो आहोतच. त्या जखमा कधी बऱ्या होतील की नाही, हे सांगणं कठीण आहे. पण त्यांच्यामुळे झालेल्या दु:खाला वाट करून देण्याचं काम या पुस्तकाने केलंय, हे निश्चित.
- सृजना प्रज्ञा, पुणे (फेसबुक वॉलवरून साभार)
गोष्टीवेल्हाळ पण अंतर्मुख करणाऱ्या दीर्घकथा
तुम्ही अरेबियन नाईट्स वाचलं आहे? एक गोष्ट, त्या गोष्टीत गोष्ट, त्या गोष्टीतल्या गोष्टीत एक गोष्ट, आणि त्या गोष्टीत अजून एक गोष्ट. मूळ मुद्दा हरवून टाकणं आणि गोष्ट ऐकणाऱ्याला उभ्या दुनियेची सैर घडवून आणणं. सतीश तांबे लिखित, रोहन ओरिजिनल ईबुक्स अंतर्गत प्रकाशित झालेल्या ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’चा मात्र उद्देश तसा नाही. गोष्टीचा बाज असला, तरी निव्वळ एकाला एक जोडून गोष्ट वाढवत नेऊन रंजन करणं हा इथे अजिबातच उद्देश नाही. मार्तंड भणंगे नामक ज्येष्ठ वयाचा लेखक आणि तरुण होतकरू लेखक भुवन वेंदळे यांच्यातील मैत्रीवजा संवाद या रूपाने खरंतर आधुनिक काळातील समग्र मराठी साहित्यातील प्रवाहांचा वेध घेणारा हा इतिहासच सांगितलेला आहे. साठोत्तरी मराठी साहित्याचा इतिहास म्हणता येईल, पण सांगितला आहे कथेच्या अंगाने. एक लेखक स्वत:ची ओळख शोधत असतो, आणि त्याला ती स्वत:पुरती आणि विशिष्ट अशी हवी असते. इतर कोणाही लेखकापेक्षा वेगळी. तशी त्याला ती सापडतेही. आणि पुढे काय काय होतं? हे स्वप्नवत वाटणारं कथानक काहीसं एखाद्या महानगरातील गूढ गल्ल्यांमधून भरकटत शोधत प्रत्यक्षच वाचण्यासारखं आहे. गंमत म्हणजे, गोष्टीत गोष्ट उलगडत जात असताना मध्येच गोष्टीत कविता येते. हे कथेचा फॉर्म म्हणून एक निराळेच वैशिष्ट्यं आहे असं वाटतं.
याच पुस्तकातील दुसरा भाग म्हणजे ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही गूढकथा म्हणता येईल अशी कथा! नावापासूनच उत्कंठा लावणारी आणि वरवर निव्वळ पुराणातल्या चमत्कारिक दंतकथा असतात तशी भासणारी, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा फार सखोल अर्थ असलेली कथा आहे ही. मानवी आयुष्य, नातेसंबंध, इच्छा, आकांक्षा इत्यादींचा न संपणारा पट त्यातून उलगडत जातो. पुस्तकाचे दोन भाग कथा म्हणून तसे स्वतंत्र असले तरीही पहिल्या भागात आधुनिक काळातील साहित्याच्या पार्श्वभूमीवर उलगडणारा पट आणि दुसऱ्या भागात अतिशय पुरातन काळापासून चालत आलेला मानवी जीवनाचा पट हे दोन्ही एकमेकांशी संलग्न आणि म्हणूनच एकसंध आहेत, हे लक्षात येते. हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे.
- विनील भुर्के, (किंडलवरील रिव्ह्यूजमधून साभार)
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०
हेही वाचून पहा…
हृषीकेश गुप्ते संग्रहिका
₹470.00शिन्झेन किस
₹195.00आवर्जून वाचावे असे…
‘अंगठी १८२०’ या कादंबरिकेतील निवडक भाग
अझमतने रियाला घातलेल्या त्या एंगेजमेंट रिंगमध्ये टॅफिएट या नावाने ओळखला जाणारा महागडा हिरा होता. दुर्मीळ निळसर, गुलाबी झाक असलेला हिरा…