मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेलं सोपं मार्गदर्शन
डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे.
त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपण अनेक बाबतीत सावध होतो. जसं की शारीरिक आरोग्य, आर्थिक प्रश्न…पण एका गोष्टीकडे हमखास दुर्लक्ष होतं, ते म्हणजे मानसिक आरोग्य…
परिस्थितीचे कळत-नकळतपणे मनावर परिणाम होत असतात. करोनाच्या आपत्तीमुळे नोकरी-व्यवसायावर गंडांतर, शाळा-कॉलेज बंद, भेटी-गाठी बंद अशा वातावरणात मनावर नकारात्मक परिणाम होणारच…पण ते थेटपणे कळतातच असं नव्हे…मग चिडचिड, राग, नैराश्य, वैफल्य असं सर्व होणं स्वाभाविक…त्या अनुषंगानेच अनेक मुद्द्यांचा यात ऊहापोह केला आहे. जसे की…
+ कोणते मानसिक प्रश्न उद्भवू शकतात?
+ त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?
+ या बदलांना सामोरं कसं जावं?
+ मानसिकता कशी बदलावी?
+ सकारात्मकता कशी बाणवावी?
+ या सर्वांवरचे उदाहरणांसह उपाय
+ नेहमी पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरं (FAQs).
सध्य: परिस्थितीचा स्वीकार करून, उत्साह व उमेद निर्माण करणारं मार्गदर्शक पुस्तक… ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य !