READING TIME – 5 MINS

ज्याचं तेज, ज्याचं चमकणं अनेकवेळा इतर कुठल्याशा अधिक प्रभावी चकाकीमुळे दुर्लक्षित राहिलं असा भारतीय क्रिकेटमधला हिरा म्हणजे राहुल द्रविड!

लॉर्ड्सवर पदार्पणात त्यानं केलेल्या ९५ धावा असोत, किंवा २००१ साली इडन गार्डन्सवर ऐतिहासिक सामन्यात केलेली १८० धावांची खेळी; एकीकडे पदार्पण करणाऱ्या गांगुलीनं शतक ठोकलं होतं, तर दुसरीकडे लक्ष्मणनं २८१ धावांचा डोंगर रचत कसोटी डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय होण्याचा मान मिळवला होता.

द्रविडच्या खेळीचं महत्त्व ह्यामुळे कमी होत नाही, मात्र ह्यामुळेच त्याच्या त्या खेळींची व्हायला हवी तेवढी चर्चासुद्धा होत नाही. अशीच त्याची आणखी एक खेळी आहे, जिथं त्याला अवघी एक धाव कमी पडली. एका धावेनं शतक हुकलं, तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी कर्णधारानं शतक ठोकलं. सामना भारतानं जिंकला, पण ती राहिलेली एक धाव गुलाबाच्या काट्यासारखी बोचत राहिली.

सामना भारतानं जिंकूनही सामनावीराचा पुरस्कार इंझमाम-उल-हकला दिला गेला. शोएब अख्तरकडून त्रिफळाचित झालेल्या द्रविडनं ९९ ऐवजी १०० धाव केल्या असत्या, तर आज त्या खेळीची किंमत निराळी केली गेली असती. शतकापासून दूर राहिलेली मात्र शतकाच्या पलीकडची असणारी ही राहुलची एक अविस्मरणीय खेळी.. त्यादिवशी नेमकं काय झालं होतं आणि द्रविडनं नेमकं काय काय केलं होतं? चला सांगतो…

अख्तर, सामी, नावेद-उल-हसन, अब्दुल रझाक, शोएब मलिक अशा पाकिस्तानी गोलंदाजीसमोर भारतानं ३४९ धावांचा डोंगर रचला होता. लक्षात घ्या, ते साल होतं २००४ चं, ज्यावेळी ३०० धावांच्या पार धावसंख्या असणं म्हणजे चंगळ असायची. भारताला सुरुवात भक्कम मिळाली होती. द्वारकानाथ संझगिरी ज्यांना आक्रमकतेचं बिंब-प्रतिबिंब म्हणतात, त्या सचिन-सेहवाग यांनी अवघ्या ९ षटकांत ६९ धावा हाणल्या होत्या. सचिन बाद झाला, पण वीरूनं हाणामारी सुरूच ठेवली. १५ व्या षटकांत भारताची धावसंख्या १४० पार होती. इथं वीरूसुद्धा परतला.

कर्णधार सौरवची साथ द्यायला मग राहुल मैदानात उतरला आणि धावफलक हालत राहील याची त्यानेही काळजी घेतली. द्रविडनं प्रहार केलेल्या चेंडूचा सीमारेषेशी संबंध तसा कमीच येतो. तशीच काहीशी ही खेळी होती. चौकार-षटकारांची आतषबाजी सुरु नव्हती, मात्र धावा वसुल केल्या जात होत्या.

द्रविडची बॅट चौकार-षटकारांचा गाजावाजा करत नाही, ती १-२ धावांची संपत्ती गोळा करत राहते. द्रविड पन्नाशीत पोचला, की त्यानं धावा जमवल्या असल्याची जाणीव होते, आणि मन स्वतःशीच म्हणून जातं “अरेच्च्या, याचं अर्धशतक झालं सुद्धा…”

त्यादिवशीही त्यानं तशीच खेळी सुरु ठेवली. एकीकडे गांगुलीने पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढणं सुरु ठेवलंच होतं. २५ षटकांतच भारतानं दोनशेही गाठले. गांगुली मात्र काही वेळातच बाद झाला. त्याच्यामागोमाग ‘अकेले अकेले कहा जा रहें हो…’ म्हणत युवीसुद्धा आल्या पावली परतला.

२ बाद २१४ असा दिसत असलेला धावफलक, काहीवेळातच अचानक ४ बाद २२० दिसू लागला. तरीदेखील भारतीय डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार नाही याची चाहत्यांना खात्री होती. कारण, पाकिस्तानी आक्रमण झेलायला भारताची ‘भिंत’ उभी होती.

‘द ग्रेट इंडियन वॉल’ द्रविडनं कैफच्या साथीने अधिक जास्त पडझड होणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या धावसंख्येचं जे स्वप्न पाहिलं गेलं, त्याला तडा जाणार नाही याची काळजी द्रविडनं घेतली. धावांच्या डोंगराकडे धावणाऱ्या रथाचा तो सारथी झाला. श्रीकृष्णाप्रमाणे केवळ युक्तीच्या चार गोष्टी न सांगता, त्यानं स्वतःदेखील शस्त्र हाती घेतलं.

द्रविडनं हाती घेतलेलं शस्त्र होतं चौकारांचं. आधी एकेरी-दुहेरी धावांवर भर देणाऱ्या द्रविडनं चौकारांची संख्या वाढवली. कैफच्या साथीनं त्यानं ११८ धावांची भागीदारी रचली. द्रविडच्या या जिद्दी खेळीच्या जोरावर भारतीय संघाची नौका जवळपास ३५० च्या किनाऱ्याला लागली. ३४९ करणारा भारत एका धावेमुळे ३५० पासून तर द्रविड एका धावेमुळे शतकापासून दूर राहिला.

भारताच्या ३३८ धावा झालेल्या असताना खराब फटका खेळून द्रविड बाद झाला. एरवी जंटलमन आणि थंड डोक्याचा असणारा द्रविड या फटक्यानंतर चिडलेला पाहायला मिळाला होता. त्याच्या झकास फलंदाजीमुळे आणि संयमामुळे भारतानं ३५० धावांचं आव्हान पाकिस्तानसमोर ठेवलं, पण ती एक धाव शेवटीपर्यंत नडली.

इंझमाम-उल-हकनं शतक ठोकलं. पाकिस्तान ५ धावांनी पराभूत झाला, तरीही सामनावीर मात्र इंझमाम ठरला. ज्या खेळीनं भारताला काहीशा कठीण स्थितीमधून मोठ्या धावसंख्येकडे नेलं, ती दोन आकडी राहिली आणि तिचं महत्त्व कमी ठरवण्यात आलं. तरीही ती होती जबरदस्त, शतकाच्याही पलीकडची…

–  ईशान पांडुरंग घमंडे

या लेखमालिकेत पाच लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


1.नॉट शंभर, तरी एक नंबर – शतकाआधी अन् शतकानंतर!
2.नॉट शंभर, तरी एक नंबर – खेळी कल्पितापलीकडची!
3.नॉट शंभर, तरी एक नंबर – सुपर्ब नाईन्टीज!
4.नॉट शंभर, तरी एक नंबर – एक धाव कमी पडली आणि…
5.नॉट शंभर, तरी एक नंबर – ९८ > १००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *