READING TIME – 5 MINS
वन-डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच ४०० हून अधिक धावा होतात काय आणि एक इतिहास रचला गेलेला असताना, पुढच्या काही तासांत त्याहून १ चेंडू कमी खेळून ४ धावा अधिक करत दुसरा संघ सामना खिशात घालतो काय… एव्हाना तुम्हाला कळलंच असेल, मी कुठल्या सामन्याबद्दल बोलतोय. कारण, निस्सीम क्रिकेट भक्त किंवा क्रिकेटवेडे असणाऱ्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तो सामना माहित नसणं निव्वळ अशक्य!
टी-२० प्रकारचा नुकताच जन्म झालेला असताना, वनडे फॉरमॅटमध्ये हा असा भीमपराक्रम पाहायला मिळणं ही क्रिकेटवेड्यांसाठी पर्वणी होती. पॉन्टिंगच्या १६४ आणि गिब्सच्या १७५ धावांची खूप चर्चा झाली. खरा सामनावीर कोण हा जणू काही क्रिकेटविश्वाचा सगळ्यात मोठा प्रश्न होऊन गेला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने दिमाखदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला. धावांचा हा एवढा डोंगर सर करण्यात सिंहाचा वाटा उचलणारा गिब्सच सामनावीर म्हणून पॉन्टिंगपेक्षा अधिक पात्र होता, हे माझं प्रांजळ आणि स्पष्ट मत!
अर्थात, या दोघांच्या धडाकेबाज खेळींइतक्याच महत्त्वाच्या दोन आणखी खेळी होत्या. त्यांची शतकं झाली नाहीत, मात्र त्या दोघांना वगळलं, तर दक्षिण आफ्रिकेचा विजयसुद्धा शक्य होणार नाही. यातल्या एका खेळीची बरीच चर्चा होते, त्यामुळे तिथे थोडं नंतर वळूया.
‘कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट’ या उक्तीचा नेमका अर्थ काय असतो याचं उत्तम उदाहरण ग्रॅम स्मिथने पेश केलं. समोर ४३४ धावांचा मोठा डोंगर दिसत असताना गरज होती ती स्फोटक आणि आश्वासक सुरुवात मिळण्याची. ग्रॅम स्मिथला शतक ठोकत आलं नाही, पण त्यानं पायाभरणी करून दिली. डिपेनार स्वस्तात बाद झाला आणि गिब्स मैदानावर आला. स्मिथनं चंग बांधला होता, वादळी सुरुवातीचा! डिपेनार लवकर बाद होणं आफ्रिकेच्या पथ्यावर पडलं असं म्हणायला हवं.
स्मिथनं सारी सूत्र हाती घेतली. बघता बघता तो नव्वदीत पोचला होता. एकीकडे दोघांची भागीदारी १२६ चेंडूत १८७ धावांची झाली होती. जवळपास ७० चेंडूत पॉन्टिंगने शतक हाणलं होतं.
स्मिथचे इरादे काहीसे वेगळे अन् अधिक आक्रमक दिसत होते. मॅक्ग्रा खेळात नव्हता, पण ऑस्ट्रलियाची गोलंदाजी दुबळी नव्हती. स्मिथनं ती दुबळी भासवली. पहिली विकेट घेणाऱ्या नेथन ब्रॅकेनवर हल्ला चढवला. विकेटच्या जोरावर मिळालला आत्मविश्वास कायम सोबत राहणार नाही याची काळजी स्मिथनं घेतली.
दुसरीकडे गिब्सनं तर त्याचे इरादे अगदीच स्पष्ट केले होते. गरज होती ती तितक्याच सफल सोबतीची… १२ चेंडूंत २० धावांवर पोचणाऱ्या स्मिथनं हे शिवधनुष्य उचललं होतं. सामना जिंकण्यासाठी काय करायला हवं, हे त्यानं संघासहकाऱ्यांना कृतीतून दाखवून दिलं होतं. ब्रॅकेनच्या मागोमाग त्यानं ब्रेट लीला सुद्धा लक्ष्य केलं. गिब्सने हिरावून घेतलेला त्याचा आत्मविश्वास अधिक कमजोर होईल याची काळजी घेतली.
स्मिथच्या बॅटला चेंडू लागला म्हणजे तो सीमापार होणार असंच चित्र निर्माण झालं होतं. यातही गंमत म्हणजे त्यानं हवेतून फार फटके खेळले नाहीत. नजाकत दाखवत चौकार वसूल करत तो एकेक (म्हणजे खरं तर चार-चार) धावा जमा करत निघाला होता. चेंडू अडवण्यासाठी त्याच्या मागे धावण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं, असं ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षणाचं वर्णन करता येईल.
वेगवान गोलंदाजीचा खरपूस समाचार घेऊन झाल्यावर त्याच्या समोर सायमंड्सची फिरकी ठेवण्यात आली. त्यानंतर त्यानं फिरकीपटूंचं जे केलं, त्याचं वर्णन सुद्धा केवळ साडेतीन अक्षरांमध्ये करता येईल; ‘कत्तल’! त्याच्या डावातील दोन्ही षट्कार फिरकीपटूंच्या गोलंदाजीवरच पाहायला मिळाले.
मायकल क्लार्कनं २३ व्या षटकांत स्मिथला बाद केलं आणि एका झकास खेळीचा शेवट झाला. पुढे गिब्स संघाला ३०० च्या जवळ घेऊन गेला. १७५ धावा करून तो बाद झाल्यावर मात्र अचानक बरंच काही बदलून गेलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयाची स्वप्नं पाहायला सुरुवातसुद्धा केली असेल बहुदा… पण इथेच खरी मेख होती. नेहमीच शतकं महत्त्वाची नसतात; सामना जिंकवून देणाऱ्या खेळी नेहमीच तीन आकड्यांची जादू गाठू शकत नाहीत. मात्र त्यांची मोहिनी कमी नसते.
दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयासाठी प्रयत्न करत होता अन् दुसरीकडे गडी बादही होत होते. सामना आफ्रिकेच्या हातून निसटून जाईल अशी भीती नक्कीच निर्माण झाली होती. आफ्रिकेसाठी यष्टिरक्षण करणाऱ्या मार्क बाऊचरनं मात्र, या ऐतिहासिक दिवशी त्याच्या संघाच्या विजयाचं रक्षण होईल याची पुरेपूर काळजी घेतली.
एक बाजू लावून धरत त्यानं धावा जमत राहतील याची काळजी घेतली. ४३ चेंडू, ४ चौकार आणि ५० धावा ही खेळी एरवी अजिबातच प्रभावी किंवा छाप पाडणारी वगैरे वाटणार नाही. पण त्याच्या खेळीमधील १५-२० धावा जरी आफ्रिकेच्या धावसंख्येतून वजा केल्या तर? मिळालं ना उत्तर तुमचं तुम्हालाच… शतक तर दूर जेमतेम अर्धशतक झालं बाऊचरचं; मात्र विजयाचा एक मुख्य शिल्पकार तोदेखील ठरला.
त्यानं विजयी चौकार हाणला, त्याआधी सामन्याचं पारडं हलकंसं ऑस्ट्रेलियाकडे झुकलेलं वाटत होतं. बाऊचरनं मात्र चौकार ठोकला आणि सामना खिशात घातला. म्हणूनच ही खेळी अफलातून होती… शतकाच्या पलीकडची!
– ईशान पांडुरंग घमंडे