READING TIME – 6 MINS

भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक उचलला तो १२ वर्षांपूर्वी… अंतिम सामन्यात लंकेकडून महेला जयवर्धने शतकवीर ठरला. भारताकडून मात्र एकही शतक झळकलं नाही. दोन मॅच विनिंग इनिंग मात्र पाहायला मिळाल्या. सचिन-सेहवाग लवकर बाद झाल्यावर गंभीरनं सावरलेला डाव आणि मग युवीच्या साथीनं माहीनं दिलेला फिनिशिंग टच; दोन्ही खेळींचं महत्त्व तेवढंच आहे.

माझं वैयक्तिक मत विचाराल, तर सामनावीर गंभीर असायला हवा होता. आपल्या फलंदाजीचा हिरो कोण होता असं विचारलंत, तर मात्र मी म्हणेन, एक नव्हे दोन हिरो होते. गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी! गंभीरच्या धैर्यशील खेळीमुळे धोनीच्या खेळीचं महत्त्व कमी होत नाही, की धोनीनं विजयी षट्कार हाणत सामनावीर पुरस्कार प्राप्त केला म्हणून गंभीरच्या खेळीचं महत्त्व कमी होत नाही.

त्या ९७ आणि नाबाद ९१ धावांना शतकाच्याही वर ठेवायला हवं. तीन आकडी धावसंख्या गाठायला गंभीरला तीन धावा कमी पडल्या. भारतानं दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकणं, कप्तान माहीच्या हाती दोन्ही फॉरमॅटमधला विश्वचषक असणं आणि सचिनचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर सत्यात उतरणं या तिहेरी आनंदासाठी त्या तीन धावांची गरज पडली नाही किंवा कमतरताही भासली नाही.

या दोन्ही खेळींचं महत्त्व एक क्रिकेटवेडा म्हणून माझ्या नजरेतून मला कसं दिसतं हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे, हे काही मी आता वेगळं सांगायला नको. दुसऱ्याच चेंडूवर वीरू आणि मग अवघ्या ३१ ह्या धावसंख्येवर सचिन सुद्धा बाद झाला. इथेच गरज होती एका गंभीर खेळीची… गौतमच्या साथीला कोहली आला होता आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात एका विराट भागीदारीची स्वप्नं पडायला सुरुवात झाली होती.

दिलशाननं ह्या स्वप्नांना सुरुंग लावला आणि गंभीरची जबाबदारी वाढली. ही जबाबदारी वाटून घ्यायला माही मैदानावर उतरला. माहीच्या साथीने गंभीरनं डाव पुढे नेणं सुरु ठेवलं. एक भागीदारी त्यानं रचून झाली होती अन् दुसऱ्या महत्त्वपूर्ण भागीदारीसाठी जणू कंबर कसली होती.

तसं पाहायला गेलं तर गंभीर, धोनी आणि भारताचा विश्वचषकातील अंतिम सामना यांचं एक निराळं नातं आहे. गंभीर दमदार फलंदाजी करणार आणि कप्तान धोनीचा भारतीय संघ विश्वचषक उचलणार ही घटना एकदा नव्हे तर दोनवेळा पाहायला मिळाली आहे.

२००७ च्या टी-२० विश्वचषकामधल्या अंतिम सामन्यात गंभीरनं फलंदाजीची सगळी जबाबदारी उचलली होती. २०११ च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सुद्धा त्याच्या खांद्यावर ओझं टाकून वीरू, सचिन हे अनुभवी आणि विराट हा नवखा खेळाडू तंबूत परतले होते.

३ बाद ११४ या धावसंख्येनंतर भारत सामना हरू शकत होता. गंभीर मात्र तसं होऊ देणार नव्हता. त्यानं त्यादिवशी फलंदाजी करताना घातलेली जर्सी आजही त्याच्या १०० टक्के प्रयत्नांची साक्षीदार आहे. त्याला १०० धावा करता आल्या नसतील, मात्र त्याचे १००% प्रयत्न भारताच्या विजयासाठी मोलाचे ठरलेत. विजयी षट्कार तर दूर, त्यानं अख्ख्या डावात एकही षट्कार मारला नाही.

अवघे ९ चौकार वसूल करणारा गंभीर १२२ चेंडू म्हणजेच २० षटकांहून अधिक काळ नांगरासारखे पाय रोवून उभा मात्र राहिला. विजयाचं बियाणं पेरण्यासाठी लंकेची जमीन भुसभुशीत करत राहिला.

गंभीरच्या ह्याच नांगरणीच्या जोरावर माहीनं विजयाच्या शेतात कुठलंही बियाणं आणि खत कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यानं हाणलेला विजयी षट्कार ही जणू भरघोस बहरून आलेल्या शेतातली शेवटची कापणी होती. त्या षट्काराचं पीक धोनीला घेता आलं, कारण जमीन नांगरून, तयार करून झाली होती; हे कुणीही नाकारू शकणार नाही.

४२ व्या षटकात २३३ धावांवर गौतम जेव्हा बाद झाला, तेव्हा सामना हातातून निसटून जाण्यासारखी स्थिती उरली नव्हती, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. सांभाळून खेळण्याची आणि शतक हुकलेल्या गंभीरची मेहनत वाया जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं होतं. कप्तान माहीनं ती घेतली. नवा फलंदाज मैदानावर उतरल्यामुळे सामना अडकणार नाही, हे मनात ठेऊन माही खेळात राहिला. युवीच्या मदतीनं विजयाकडे वाटचाल करत राहिला. गंभीर बॅड झाला म्हणून त्यानं कुठलाही दबाव घेतला नाही अन् लंकेला पुन्हा भारतीय संघावर चढून बसता येईल अशी कुठलीही संधी दिली नाही, त्यामुळं त्याच्या खेळीचं महत्त्व सुद्धा शतकाहून कमी नाही.

माही नाबाद राहिला आणि विजयी लक्ष्य गाठणाऱ्या धावा त्याच्या बॅटमधून पूर्ण झाल्या यापलीकडं गंभीर आणि माहीच्या खेळींमध्ये कुठलाही फरक नव्हता. असलाच तर सुरुवातीला गंभीरवर अधिक दबाव होता. दोघांची शतक पूर्ण करण्याची संधी हुकली. गंभीरनं ती स्वतः घालवली, तर माहीनं शतकाचा किनारा गाठावा इतका धावांचा समुद्र उरलाच नाही.

असं असलं, तरीही या दोन्ही खेळी लक्षात राहतात. “धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, अ मॅग्निफिसंट स्ट्राईक इंटू द क्राउड! इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप, आफ्टर ट्वेन्टीएठ इयर्स!” हा रवी शास्त्रीचा संवाद आठवला, की आजही ९७ आणि नाबाद ९१ या धावा डोळ्यांसमोर येतात. कारण, त्या अफलातून आहेत. शतकाच्या पलीकडच्या आहेत…

ईशान पांडुरंग घमंडे

या लेखमालिकेत पाच लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


1.नॉट शंभर, तरी एक नंबर – शतकाआधी अन् शतकानंतर!
2.नॉट शंभर, तरी एक नंबर – खेळी कल्पितापलीकडची!
3.नॉट शंभर, तरी एक नंबर – सुपर्ब नाईन्टीज!
4.नॉट शंभर, तरी एक नंबर – एक धाव कमी पडली आणि…
5.नॉट शंभर, तरी एक नंबर – ९८ > १००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *