ऋषी मनोहर हे नाव आज बऱ्याच लोकांना माहीत आहे, पण मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं बारावीत. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमधून कॉमर्स ग्रॅज्युएट असलो, तरी आमचा अकाउंट्सचा क्लास एकच होता. तिथं असताना त्याच्या उंचीमुळं मी त्याला ओळखत होतो. आता शारीरिक उंचीपेक्षाही कैकपटीनं त्यानं कामाची उंची गाठली आहे आणि अजूनही गाठायची आहे असं तो म्हणतो.
त्याला जेव्हा मी विचारलं, की बाबा या क्षेत्रात यायचा निर्णय तू का आणि कसा घेतलास, तेव्हा त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं, की त्याच्या आईमुळे. त्याची आई म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा मनोहर. त्यांचं काम बघतच लहानाचा मोठा झाल्याचं ऋषीनं सांगितलं.
त्या जेव्हा ग्रिप्स थिएटरमध्ये नाटकं बसवायच्या तेव्हा लहान असताना शाळा संपल्यावर किंवा मे महिन्याच्या सुट्टीत ऋषी तिथं जायचा. तिथं काम करणारे कलाकार बघून नाटकाची तालीम म्हणजे काय असतं, हे त्याला समजलं होतं.
‘या सगळ्या गोष्टी खोट्या असतात. त्या बसवल्या जातात, हे त्या वेळी समजलं होतं. पण मी पुढं याच क्षेत्रात काही तरी करीन असं वाटलं नव्हतं,’ असं ऋषीनं कबूल केलं.
नाटकाची सुरुवात झाली आणि खरी आवड लागली ती अकरावीत बीएमसीसीला अॅडमिशन घेतल्यावर, असं ऋषीनं सांगितलं. कॉलेजमधला पित्ती हॉल हा नाटकाचा ग्रुप किती स्ट्राँग आहे, हे त्याला तिथं गेल्यावरच समजलं.
ग्रुपमध्ये गेल्यावर पुरुषोत्तम, फिरोदिया या करंडकांच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्या काळात खूप नाटकं बघायला सुरुवात केली असं तो म्हणाला.
या ग्रुपचं चळवळेपण अधोरेखित करण्यासाठी ऋषीनं एक आठवण सांगितली. तो म्हणाला, पित्ती हॉलला असताना ‘इंटर पित्ती लीग’ अशी ‘आयपीएल’ नावाची कन्सेप्ट होती.
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून तो गालात हसला आणि म्हणाला, जेव्हा पुरुषोत्तम संपलेलं असतं, फिरोदियाला वेळ असतो, तेव्हा मध्ये तीन महिने असतात. त्या काळात आम्ही आमच्या आमच्यातच चार टीम पाडतो आणि चार नवीन नाटकं करायचं ठरवतो. ती आम्ही आमच्या हॉलमध्ये परफॉर्म करतो. त्यात अनेकांना नवीन लाटक लिहिण्याची, बसवण्याची आणि अभिनय करण्याची संधी मिळते. आता माझ्या चेहऱ्यावर जरा समाधान आलं होतं.
तो पुढं म्हणाला, त्यात मला ११वीत संधी मिळाली. तेव्हा शिक्कामोर्तब झालं, की मला नाटकच करायचं आहे. माझं पहिलं नाटक मी अकरावीत केलं होतं, त्याचं नाव बर्फ पिघलाए.
ऋषीनं बीकॉम केलं आहे; पण ते झालं आहे असं तो म्हणतो. कारण पेपर सोडून तो कधी कॉलेजला गेलाच नाही. पूर्ण वेळ पित्ती हॉलला असायचा. त्यानं खूप स्पर्धांमध्ये भाग घेतला.
त्यातलं एक आवर्जून घेण्यासारखं नाव त्यानं सांगितलं, ते म्हणजे सॉरी परांजपे. चार महिन्यात या नाटकाचे २५ प्रयोग झाले. पुणे, मुंबई, बीड, नगर, कणकवली, सोलापूर, कोल्हापूर, कराड, अलीबाग अशा ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाला या नाटकाला.
त्याला बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना पुरुषोत्तम आणि फिरोदिया बसवायची संधी मिळाली. हे ऐकून मला फार भारी वाटलं. एकाच वर्षी दोन मोठ्या स्पर्धांची नाटकं बसवायला मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यातली आणखी वरची गोष्ट म्हणजे त्याला त्या वर्षी या दोन्ही मोठ्या स्पर्धांध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनाचं बक्षीसही मिळालं.
लोकांकिका स्पर्धेतही त्याला दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस मिळालं. यातून आत्मविश्वास वाढत गेला आणि मग नाटकात आणखी काय काय करता येईल, याचा विचार करायला लागल्याचं ऋषी म्हणाला.
एवढी बक्षिसं मिळवून, लोकांचं खूप प्रेम मिळवून आता काही तरी हाताला लागलंय ना असं मी त्याला विचारलं, पण त्यानं मला गप्प बसवणारं उत्तर दिलं.
तो म्हणाला, की जे त्याचं ध्येय आहे, त्याच्या अजून तो जवळही पोहोचलेला नाही. आतापर्यंत जी बक्षिसं आणि यश मिळालं त्याचं समाधान ऋषीला आहेच. त्यातून त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. पण ज्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळालं नाही, त्यातून त्याला आपण कुठं कमी पडतोय याची जाणीव झाली आणि त्यातूनच तो स्वत:मध्ये बदल घडवत गेला.
कॉलेजच्या नाटकांतून व्यावसायिक नाटकांमध्ये कसा गेला यावर आमचं बोलणं सुरू होतं. त्यावर तो म्हणाला, बीकॉमच्या लास्ट इयरला केलेल्या फिरोदियामध्ये डिरेक्शनबरोबर बेस्ट ॲक्टरही मिळालं होतं.
त्या स्पर्धेचे परीक्षक होते अद्वैत दादरकर. त्यांचा मला दोन महिन्यांनी फोन आला, की मी दादा एक गुड न्यूज आहे नावाचं नाटक करतोय. त्यातल्या रोलसाठी तू हवा आहेस. ऑडिशन वगैरे काही नाही. त्यांच्या डोक्यात फिट होतं माझं नाव. मला तारीख दे म्हणाले, पण त्या वेळी अमेरिका किंवा लंडनला या क्षेत्रातल्या पुढच्या शिक्षणासाठी जायचा माझा प्लॅन होता. शेवटी मी निर्णय घेतला आणि नाटकात काम करायचं ठरवलं.
त्याचं बोलणं मी ऐकतच बसलो होतो. अवघड निर्णय होता हा खरं तर, पण त्यानं तो घेतला. त्याला त्या वेळी प्रायोगिक आणि व्यावसायिकमध्ये असणारा फरक समजला. या नाटकाचे त्यानं १८८ प्रयोग केले. त्यानंतर तो शिक्षणासाठी लंडनला गेला.
या नाटकाने त्याला ओळख मिळवून दिली. नाटकानंतर लोक भेटायला यायचे आणि विचारायचे की तू सॉरी परांजपे, इतिहास गवाह है, गंगाधर ही शक्तिमान है या नाटकांमध्ये आहेस ना…. तेव्हा त्याला खूप छान वाटायचं. म्हणून तो म्हणतो, की ‘दादा एक गुड न्यूज आहे’ने ओळख मिळवून दिली. पण त्याचा पाया कॉलेजमध्ये केलेली नाटकं आहेत. त्यांनी त्याला खरी ओळख दिली.
१८८ प्रयोग झाल्यावर मग त्यानं लंडनमध्ये फिल्ममेकिंग अँड डिरेक्शनमध्ये मास्टर्स केलं.
आता एवढे प्रयोग केलेत म्हटल्यावर एखादा कायम आठवणीत राहील असा किस्सा त्याला सांग म्हणालो. त्यावर त्यानं जराही वेळ न लावता सांगितलं….
‘दादा एक गुड न्यूजचा प्रयोग संपल्यावर एक ४०-४५शीतल्या काकू आणि त्यांचा मुलगा आले. त्याची उंची माझ्यापेक्षा एखादा इंच जास्त असेल. माझी उंची ६ फूट दोन किंवा अडीच इंच आहे. तो आला, माझ्याबरोबर फोटो काढू का विचारलं. फोटो काढल्यावर त्याची आई म्हणाली तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे. बोलू का? जरा बाजूला येता का? मला जरा अवघडल्यासारखं झालं.
मग आम्ही जिथं गर्दी नव्हती त्या ग्रीन रूममध्ये गेलो. त्या म्हणाल्या माझा मुलगा रोज रात्री रडतो. तो शेजारीच होता, त्याचा चेहरा पडलेला होता. पण त्यांनी हे सांगितल्यावर मी काय बोलणार. त्या काकू पुढं बोलत होत्या. त्या म्हणाल्या, याची उंची ६-३ आहे आणि आत्ता तो फक्त ११वीत आहे. त्याला त्याच्या उंचीवरून खूप चिडवतात. त्याला असं वाटतं, की त्याची उंची खूप जास्त आहे. तुझी उंचीही तेवढीच आहे. पण तू ती छान कॅरी करतोस. ते तू कसं करतोस? हे त्यांचं बोलणं मी ऐकत होतो.
तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, तू या नाटकात काम करतोस माहीत नव्हतं. पण आता तुझ्याकडं बघून मला कॉन्फिडन्स आला,’ एवढं सांगून ऋषी थांबला. आपण विशेष असं काहीही न करतासुद्धा लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो याचंच त्याला विशेष वाटत होतं.
त्यामुळं मला असं वाटतं, की कोणाचीही ‘कन्नी’ न कापल्यामुळं, कोणतीही ‘अफरातफरी’ न केल्यामुळे कोणालाही ‘सॉरी’ न म्हणता तो सतत ‘गुड न्यूज’ घेऊन येईल. ‘एका काळेचे मणी’ आणि ‘पेट पुराण’ केलेल्या ऋषीच्या यशोगाथा सांगताना लोक म्हणतील की ‘इतिहास गवाह है’….