चैतन्यनं नाट्यक्षेत्रात लहान असतानाच पाऊल टाकलं. दोन-तीन वर्षांचा असताना तो नाटकांच्या तालमींना जात होता. त्यानं नाटकात पहिल्यांदा काम केलं ते पाच-साडेपाच वर्षांचा असताना. तेव्हा त्यातलं काही कळतच नव्हतं, हेही तो प्रामाणिकपणे कबूल करतो, पण त्याला नाटकाची आवड निर्माण व्हायचं कारण म्हणजे त्याचे बाबा, धनंजय सरदेशपांडे.

तो म्हणतो, की त्याच्या बाबांमुळेच त्याला नाटकांची आवड निर्माण झाली. ते खूप आधीपासून बालनाट्य लिहीत होते, बसवत होते. त्यामुळं चैतन्यही लहान असल्यापासून त्याच्या तालमींना जात होता आणि तशीच ती आवड त्याच्यातही आली. घरातूनच ही परंपरा असल्यामुळं नाटक सतत त्याच्या कानावर पडत होतं.

माझ्यासाठी म्हणून बाबा बालनाट्य लिहायचे बहुतेक, असं चैतन्य म्हणतो. त्यानं लहान असताना त्याच्या बाबांनी लिहिलेल्या असेल किंवा दुसऱ्या कोणी लिहिलेल्या नाटकांत असेल, सतत कामं करायला सुरुवात केली.

तो म्हणतो, की दहावीपर्यंत त्यानं इतक्या बालनाट्यांत काम केलं आहे, की त्याचं गुणोत्तर वर्षाला दोन नाटकं असं येईल. दहावीनंतर तो पुण्यात आला, तोच मुळी कुठं तरी नाटक करता येईल असा विचार घेऊन.

पुण्यात आल्यावर मग त्याला ‘पुरुषोत्तम’बद्दल समजलं. अर्थात, नाटकांत काम करणारी एखादी व्यक्ती पुण्यात आली आणि तिला ‘पुरुषोत्तम’, ‘फिरोदिया’ आणि इतरही अशा मोठ्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धांबद्दल समजलं नाही, तर ते नवलच म्हणावं लागेल.

चैतन्य पुण्यात आल्यावर नाटकांत भाग घेत होताच. ग्रॅज्युएशनपर्यंत तो असा नाटकांत काम करतच होता. त्यामुळं नाटकांची आवड कधी आणि कशी निर्माण झाली, असं विचारल्यावर तो म्हणाला, की “निश्चित सांगता येणार नाही. कारण मी कळायला लागल्यापासून नाटकांत काम करतोय.”

त्याचं तर असं म्हणणं आहे, की नाटक सोडून दुसरं काही तरी करू असा त्याच्याकडं चॉइसच नव्हता. त्याचं शिक्षण ‘एमएमसीसी’मधून बॅचलर इन कम्पुटर अॅप्लिकेशन (बीसीए) झालं आहे. तिथंही त्यानं पुरुषोत्तम करता येईल, या आशेनंच ॲडमिशन घेतली होती. त्या कॉलेजनं आधी अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन नाव गाजवलं होतं, हे समजल्यामुळं तिथं ॲडमिशन घेतल्याचं तो म्हणाला.

नाटक सोडून दुसरं काही जमेल की नाही याचा विचार चैतन्यनं मुंबईत जाईपर्यंत केला नव्हता. पण आता पूर्ण वेळ नाट्यक्षेत्रात काम करायचं ठरवल्यावर त्यानं ठरवलं की यातलंच थोडं शिक्षण तरी घेऊ. आणि मग त्यानं मुंबई युनिव्हर्सिटीत नाटकाचं शिक्षण घेतलं.

chaitanya sardeshpande

त्यानं अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स इन थिएटर आर्ट्स हा कोर्स केला. तिथल्या दोन वर्षांत वामन केंद्रे आणि शफाद खान या शिक्षकांनी शिकवलं आणि मग त्या दोन वर्षांत आतापर्यंत नाटकाकडं वेगळ्याच दृष्टिकोनातून बघायला लागल्याचं चैतन्य म्हणाला.

अॅकॅडमीमध्ये खूप मोठी लायब्ररी होती. त्या काळात त्यानं खूप नाटकं वाचून काढली आणि खूप नाटकं लिहायला लागलो. म्हणजे तो आधी एकांकिका लिहीत होता. पण नेमकं काय आणि कसं लिहायचं आहे, हे त्या दोन वर्षांत कळाल्याचं चैतन्य म्हणाला. त्यानं दोन वर्षांच्या काळात जवळजवळ २०-२५ एकांकिका आणि चार मोठी नाटकं एवढ्या गोष्टी केल्या.

पण पासआउट झाल्यानंतरच्या प्रश्नाबद्दल चैतन्य म्हणाला, ‘प्रश्न पडला होता, की आता पुढं काय? कारण सगळंच ब्लर दिसायला लागलं होतं. आम्ही म्हणजे सतत दोन वर्षं दिवसरात्र नाटकात असणारे आणि पासआउट झाल्यानंतर काहीच काम नव्हतं. ही परिस्थिती माझ्या एकट्याची नाही, माझ्याबरोबरच्या सगळ्यांचीच. त्यानंतर मग हळूहळू ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मग आपणच लिहिलेली नाटकं, एकांकिका, त्यात आपणच काम करू, असं एक सुरू झालं. त्यातच काम करायला लागलो.’

कामं मिळत नसतात, ती तयार करावी लागतात असं चैतन्य म्हणतो. तो म्हणाला, की यासाठी त्याला त्याच्या लिखाणाच्या सरावाचा खूप फायदा झाला.

सुरुवातीला कामं मिळवताना ॲक्टर्सना टेन्शन येतं, ते आलं नसल्याचं त्यानं सांगितलं. काहीही काम आलं नाही, तर पेन आणि पेपर घेऊन लिहीत बसायचं आहे, हे त्याच्या डोक्यात फिट बसलेलं होतं.

चैतन्यला त्याच्या आवडीनिवडीबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, की त्याला लहानपणापासून कार्टून बघण्याची, ॲनिमेटेड फिल्म्स बघायची प्रचंड आवड. ती आवड अजूनही असल्याचं त्यानं सांगितलं.

हॅरी पॉटर बघत लहानाचा मोठा झाल्याचं तो म्हणाला. त्या प्रकारचं एक वेगळं जग, मॅजिकल दुनिया, हे सगळं त्याला फार आवडतं. ‘पण मधल्या काही काळात पुण्यात असताना मी खूप प्रायोगिक नाटकं बघितली.

लोकांना कळू नये, याकडे त्यातल्या बहुतांश नाटकांचा ओढा असायचा. मला असं झालं, की हे खूप ॲब्सर्ड आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळं हे नाटक आणि आपल्याला आवडणारा फॉर्म, याचं मिक्स्चर करून काय करता येईल, असा विचार करून माझ्या नाटकांच्या लिखाणाची सुरुवात झाली,’ असा चैतन्यनं त्याच्या नाट्यलिखाणांचा प्रवास सांगितला.

ॲनिमेटेड फिल्म्समध्ये सर्रास असलेला अतिशयोक्तियुक्त ह्युमर त्यानं नाटकांत वापरायला सुरुवात केली. थोड्याशा फँटसीकडे जाणाऱ्या, थोड्याशा फिक्शनल होणाऱ्या…. अशा एकांकिका तो पुढं लिहायला लागला. त्यातून त्याला त्याची लिहिण्याची आणि अभिनयाची स्वत:ची स्टाइल सापडायला लागली, असं सांगून चैतन्य पुढं म्हणाला, की ‘त्यातून मला असं कळालं, की आपल्याकडं हे आहे, जे लोकांना आवडू शकतं आणि आपलं म्हणणं आपण लोकांपुढे यातून मांडू शकतो. त्यातूनच मला माझा असा एक फॉर्म सापडत गेला.’

सध्या चैतन्य ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आणि ‘चाणक्य’ नावाच्या व्यावसायिक नाटकात काम करतोय.

chaitanya sardeshpande

मुंबईत लोकांना खूप स्ट्रगल असतो, असं ऐकलंय. त्याबाबत तुझं मत काय, अनुभव काय, असं मी त्याला विचारलं. हे ऐकून त्यानं त्याचं मन मोकळं केलं.

तो म्हणाला, ‘गेली आठ ते दहा वर्षं मी मुंबईत आहे. पहिली दोन वर्षं मी शिकत होतो आणि नंतर काम. आतापर्यंत मी एक सिच्युएशन खूपदा अनुभवली आहे. ज्यातून पैसे मिळतील असं काही काम नसेल किंवा अभिनयाचं काही काम नसेल, तर त्याच्यासाठी म्हणून पैशांसाठी काही काम केलं. पण तुमच्यात खरेपणा असेल, तुम्ही मनापासून कम करत असाल, तर मला नाही वाटत, की मुंबई तुम्हाला उपाशी मरू देते. काही ना काही तरी मिळतंच.

आता तर खूप पर्याय आहेत. या क्षेत्राबद्दल असं म्हटलं जातं, की फिक्स्ड इन्कम नाही. ते काही अंशी खरं जरी असलं, तरी तुम्हाला पैसे मिळणारच नाहीत, असं होणार नाही. तुम्ही काम करा, तुम्हाला पैसे मिळतील. पण हे फिल्डच असं आहे, की एखाद्या महिन्यात तुम्हाला खूपच पैसे मिळतील; पण पुढच्या महिन्यात किती पैसे मिळतील ते सांगता येत नाही.

कदाचित पुढचे दोन महिनेही आधीच्याच पैशांवर काढावे लागतील. पुन्हा तेच, की सगळ्यांवर अशी वेळ येईल असं नाही. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतातच. तसंही आज कोणत्या क्षेत्रात कामाची, नोकरीची शाश्वती आहे? कोणत्याही क्षेत्राचं मी नाव घेत नाही. पण आपल्याला समजत असतंच की.

‘एआय’ येताना दिसतंय. ते खरंच पूर्ण क्षमतेनं काम करायला लागलं, तर किती नोकऱ्यांवर गदा येईल… उद्या कसं आणि काय होईल याची कोणालाच खात्री नाही. कोव्हिडनं आपल्याला हे दाखवलं.’

नाटक जिवंत रहावं आणि अनेकानेक लोकांनी ते बघायला यावं असं चैतन्यचं मत आहे. नाटकाच्या मध्यंतरात जर एखादा कलाकार स्टेजवरून डोकावला किंवा तू जरी नाटकाला गेल्यावर नीट बघितलंस तर एक गोष्ट जाणवेल, असं तो म्हणाल्यावर मी काय असं प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्याच्याकडं बघितलं. तो म्हणाला, ‘अरे, प्रेक्षागृहात बघितल्यावर सगळी पन्नाशी आणि साठीची माणसं आलेली दिसतात. आता प्रश्न असा येतो, की आणखी २० वर्षांनी मी तर नाटकात काम करणार आहेच. पण तेव्हा हे लोक असतील का, असले तर नाटक बघायला आतासारखे येतील का?’

मी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला, तेच तर.’ मी त्याला काही उपाय आहे का याच्यावर असं विचारलं. तो म्हणाला, एकांकिका स्पर्धा बघायला जशी तरुण मुलं मोठ्या संख्येनं जमतात, त्या स्पर्धांसाठी अख्खी कॉलेजं लोटतात, तशी त्यांची गर्दी व्यावसायिक नाटकांना झाली पाहिजे.’

यावर मी थोडा वेळ घेतला आणि त्याला नाटकांच्या तिकिट दरांचा मुद्दा सांगितला. त्याचाही त्यानं विचार केलेला होता. तो म्हणाला, ‘ते कॉलेजच्या मुलांना परवडत नाहीत, हे नाकारत नाहीच; पण त्यातून काही तरी मार्ग काढला पाहिजे, जेणेकरून लोकांना व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांची गोडी लागेल. पुस्तक वाचनाचं कसं असतं ना, हेही अगदी तसंच आहे असं मला वाटतं. कारण आपल्याकडं आत्ता डायव्हर्ट करणारी एवढी साधनं आहेत. पण ज्यांना वाचनाची गोडी आहे, ते वाचतातच. मग तिथं काही वयाचं बंधन येत नाही. वाचनाचे जॉनर, भाषा बदलत जाते वयानुसार; पण ते अगदीच साहजिक आहे. तसंच काहीसं नाटकाच्या बाबतीत आहे.’

आतापर्यंत झालेल्या नाटकांनंतरचा एखादा कायम लक्षात राहील असा अनुभव आहे का असं त्याला विचारलं. त्यावर त्यानं थोडा विचार केला आणि त्याचा चेहरा एकदम खुलला.

तो म्हणाला, ‘आम्ही आत्ता एक रविवार डायरीज नावाचं नाटक करत होतो. त्यात मी काम करत होतो, ते लिहिलं होतं आणि बसवलंही होतं. मध्यमवर्गीयांना टार्गेट करायचं होतं मला त्या नाटकातून. पण एका प्रयोगानंतर एक चौथीतली मुलगी आली. ती म्हणाली, ‘मी पैशाच्या मागे धावणार नाही. मला जे करायचं आहे पुढं जाऊन तेच मी करणार. केवळ पैशासाठी नोकरी न करता मला छान वाटेल म्हणून ती करणार.’

मी अवाक् झालो. चौथीच्या मुलांना कोण एवढं शिकवतं, असा प्रश्न माझ्या डोक्यात आला. आता नाटक हे एक प्रबोधनाचं माध्यम जरी मानलं, तरी उद्या भ्रष्टाचाराविरोधी नाटक केलं, तर पुढच्या दुवशी जगातला सगळा भ्रष्टाचार संपणार आहे का? नाही ना…. पण कुठं तरी त्याची बी पडते, ज्याचं पुढं जाऊन झाड होऊ शकतं.

नाटकामुळं हळूहळू बदलणार आहेत गोष्टी. एखाद्या नाटकानं हा छोटासा जरी प्रभाव पाडला, तर मी म्हणेन की ते यशस्वी झालं. ती चौथीतली मुलगी मला जे म्हणाली होती ना, ती मला वाटतं सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती आत्तापर्यंत माझ्यासाठी.’

  • गौरांग कुलकर्णी

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
रंगमंचावरील तारे


 

advt_article-1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *