‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकाची प्रस्तावना

‘शेर्पा’ फारसं नाव आणि प्रसिद्धी नसणारी एक जमात! तिबेटच्या पूर्व भागातून ही नेपाळमधल्या पर्वतमय प्रदेशात- सोलो खुम्बू भागात येते आणि नेपाळचीच बनून राहते व आज नेपाळच्या अर्थकारणामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या गिर्यारोहणाचा ‘कणा’ बनते, ही गोष्ट अतर्क्य वाटणारी, पण ‘वास्तव’ आहे.

कोणतीही ओळख नसलेल्या त्या वेळच्या या ‘शेर्पा’ जमातीचा आज वैशिष्ट्यपूर्ण ‘ओळख’ असलेला, स्वत:चा खास चेहरा असलेला आजच्या ‘शेर्पा’पर्यंतचा हा प्रवास बाहेरच्या जगाला माहीतच नाही. वारंवार मोहिमांसाठी येणाऱ्या विदेशी गिर्यारोहकांच्या हिमालयातल्या मोहिमांच्या अनुभव-लिखाणात ‘शेर्पांचे’ उल्लेख असतात, हे खरं; पण त्यांच्याविषयी गिर्यारोहण क्षेत्राच्या बाहेर माहिती फार कमी आहे. इंग्रजी भाषेतून गिर्यारोहण चढाई मोहिमेवर अनेक पुस्तकं लिहिली जातात. मराठीतून मात्र अजूनही अशी पुस्तकं हाताच्या बोटांवर मोजावीत इतकी कमी आहेत. त्यामुळे उमेश झिरपे या ताकदीच्या गिर्यारोहकाने ‘शेर्पां’वर, ‘शेर्पा’ हे नाव कष्टाने कमावल्याच्या त्यांच्या प्रवासावर ‘मराठी’तून पुस्तक लिहावं, हा योग अत्यंत सुखद आहे.
संख्येने लहान असलेल्या या ‘शेर्पा जमाती’ने आपलं मूळ दुर्गम ठिकाण सोडून नेपाळ आणि भारतातल्या दार्जिलिंगच्या आसपास स्थिरस्थावर व्हावं, एवढंच नव्हे, तर आता बरेच शेर्पा युरोप-अमेरिकेत जाऊन स्थिर व्हावेत व त्यांनी सुकीर्ती मिळवावी; आपली ओळख, आपली संस्कृती, आपला धर्म राखावा, हा खरंतर समाजशास्त्राने दखल घ्यावी असा विषय आहे. आशियातल्या तिबेटसारख्या मूळच्या दुर्गम भागातल्या लोकांच्या समाजात स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने वागवलं जातं, यांच्यामध्ये स्त्रीला मान आहे व पुरुषांच्या बरोबरीने स्थान आहे. संख्या कमी असली तरी शेर्पा स्त्रिया गिर्यारोहणातही तेवढ्याच कुशल आहेत.

कोणतीही ओळख नसलेल्या त्या वेळच्या या ‘शेर्पा’ जमातीचा आज वैशिष्ट्यपूर्ण ‘ओळख’ असलेला, स्वत:चा खास चेहरा असलेला आजच्या ‘शेर्पा’पर्यंतचा हा प्रवास बाहेरच्या जगाला माहीतच नाही. वारंवार मोहिमांसाठी येणाऱ्या विदेशी गिर्यारोहकांच्या हिमालयातल्या मोहिमांच्या अनुभव-लिखाणात ‘शेर्पांचे’ उल्लेख असतात, हे खरं; पण त्यांच्याविषयी गिर्यारोहण क्षेत्राच्या बाहेर माहिती फार कमी आहे. इंग्रजी भाषेतून गिर्यारोहण चढाई मोहिमेवर अनेक पुस्तकं लिहिली जातात. मराठीतून मात्र अजूनही अशी पुस्तकं हाताच्या बोटांवर मोजावीत इतकी कमी आहेत. त्यामुळे उमेश झिरपे या ताकदीच्या गिर्यारोहकाने ‘शेर्पां’वर, ‘शेर्पा’ हे नाव कष्टाने कमावल्याच्या त्यांच्या प्रवासावर ‘मराठी’तून पुस्तक लिहावं, हा योग अत्यंत सुखद आहे

शेर्पा स्त्री-पुरुषांनी गिर्यारोहणांत कीर्ती, नाव कमावलं, एवढंच नव्हे, तर विविध क्षेत्रांमध्ये ते मोलाची कामगिरी बजावत आहेत. गिर्यारोहण क्षेत्रात नेपाळमध्ये आजच्या घडीला जेवढ्या एजन्सीज् आहेत, त्या बहुतेक शेर्पांच्याच आहेत. गिर्यारोहण-साहित्य तयार करून विदेशांतही त्याला ग्राहक मिळवून देण्याइतकं कर्तृत्व शेर्पांनी दाखवलं आहे. हिमालयात गिर्यारोहकांसाठी क्लिनिक स्थापन करून वैद्यकीय सेवा देण्यात, रेस्क्यू असोसिएशनच्या स्थापनेत, संचलनात त्यांचा पुढाकार आहे. शेर्पा उत्तम स्वयंपाकी आहेत. बेस कॅम्प व्यवस्थापनदेखील शेर्पा सांभाळत आहेत. गिर्यारोहणात भारवाहक, स्वयंपाकी, व्यवस्थापक, वाटाडे-मार्गदर्शक अशी विविध नाती निभावत मोहिमा यशस्वी करण्यात शेर्पांचा मोठा वाटा आहे. शेर्पांमध्ये लेखक निर्माण होऊ लागले आहेत. त्यांत पहिलं नाव एका स्त्रीचं आहे, हे विशेष. एका शेर्पा महिलेने नेपाळमधल्या विद्यापीठात ‘बॅचलर ऑफ माउंटेनिअिंरग’ हा गिर्यारोहणातला पदवी अभ्यासक्रम सुरू करायला लावला व हा जगातला पहिला पदवी कोर्स ठरावा, हे विलक्षण आहे. यातून गिर्यारोहणासोबतच विविध क्षेत्रांमध्ये ‘एव्हरेस्ट’ एवढी उत्तुंग कामगिरी करणाऱ्या शेर्पांमधल्या ‘रियल हिरोज’चं कर्तृत्व जगापुढे आणण्याचा उमेशने केलेला प्रयत्न अभिनंदनास पात्र आहे.

‘हत्ती व सहा आंधळे’ यांच्या गोष्टीप्रमाणे शेर्पांची आंशिक व एकांगी ओळख बऱ्याच जणांना असते. पण हा ‘निसर्गपुत्र’ आहे, ‘एक उदात्त नायक’देखील आहे. सेवेला सतत तत्पर आहे, पर्वतांवर तुमचा ‘गृहिणी, सखा, मित्र, सहोदर’ आहे. उमेश झिरपे हे गिर्यारोहणात गेली ४० वर्षं सक्रिय आहेत. गेली २० वर्षं ते सातत्याने नेपाळमध्ये गिर्यारोहण मोहिमा व तत्संबंधी कामांसाठी जात आहेत. ते शेर्पा लोकांच्या सहवासात ओघानेच आले. शेर्पांच्या सहज, स्वाभाविक, प्रामाणिक, दिलदार, जीवाला जीव देणाऱ्या त्यांच्या स्वभावाची, त्यांच्या आनंदी वृत्तीची उमेशला भुरळ पडली. मग तो शेर्पांना भेटतच राहिला. त्यांची माहिती काढत राहिला. त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेत राहिला व त्यांतून शेर्पांची सर्वांगीण ओळख करून देणारं हे लेखन उभं राहिलं. ते आता पुस्तकरूपाने आपल्या हातात पडत आहे. शेर्पांचा धर्म, संस्कृती, इतिहास, आचार-विचार, विहार कर्तृत्व या सर्वाचा हा दस्तावेज ठरावा, अशी मनोकामना आहे.

‘पर्वतपुत्र शेर्पा’ ही एका विशिष्ट जमातीची लखलखीत मुद्रा वाचकांच्या हातात येते आहे. गिर्यारोहणाच्या बाहेरील वाचकांनाही शेर्पांच्या कर्तृत्वाची, कामगिरीची ओळख यामुळे होईल व भविष्यात शेर्पांच्या सहकार्याने गिर्यारोहण क्षेत्रात अधिक मोलाची कामगिरी होईल, साहसाचं क्षेत्र विस्तारत जाईल या अपेक्षेने व आशेने माझी प्रस्तावना संपवते.

– उष:प्रभा पागे

ज्येष्ठ गिर्यारोहक, संस्थापिका – अध्यक्षा, ‘गिरिप्रेमी’

  • पर्वतपुत्र शेर्पा
  • लेखक : उमेश झिरपे

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०२०


रोहन शिफारस

पर्वतपुत्र शेर्पा

बर्फातल्या वाटा मोकळ्या करणारे, घळींवर शिड्या टाकणारे, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या ‘रेस्क्यू’ला धावणारे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून स्वत: रांधून खाऊ घालणारे, मणामणांचं ओझं उचलून नेणारे शेर्पा ! हिमालय त्यांना जसा कळतो, तसा इतर कुणालाही कळत नाही आणि म्हणूनच ते गिर्यारोहकांचे खरे पार्थ ठरतात. हिमालयाचे हे खरेखुरे साहसवीर गिर्यारोहकांच्या यशस्वी मोहिमांमध्येही आनंद घेतात. मुख्य म्हणजे आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे. सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत. शेर्पा म्हणजे केवळ ‘सामान उचलणारे’ नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खऱ्या खुऱ्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारं पुस्तक…

 Sherpa cover

225.00Add to Cart


पर्वतपुत्र शेर्पा पुस्तकातील निवडक भाग…

सोनम शेर्पा

सोनमला पर्वतांचं वेड लहानपणापासूनच होतं. हा हिमालय आपला ‘पोशिंदा’ आहे, त्याचं आपण देणं लागतो, अशी सोनमची ठाम भावना होती.

वाचा…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *