संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेली आणि पुढे केंद्रात संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ अशी सर्व महत्त्वाची खाती कार्यक्षमतेने सांभाळणारी एकमेव व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाण हे जसे मुरब्बी राजकारणी होते व संवेदनशील आणि जाणकार समाजकारणी होते, तसेच ते साहित्य, कला यांत रमणारे, त्याची जाण असणारे आणि साहित्यिक व कलावंतांविषयी मनात आदर बाळगून असलेले नेते होते.
साल २०१२… यशवंतरावांचं जन्मशताब्दीचं वर्ष. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई’चे कार्यवाह शरद काळे यांच्याकडून मला भेटण्यासाठी बोलावणं आलं. शरद काळे यांच्याशी माझा काही कारणांनिमित्ताने चांगला परिचय झाला होता. मात्र, कोणत्या कामाच्या संदर्भात पहिलीच भेट होणार होती. मी अर्थातच ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी माझ्यापुढे ‘कृष्णाकांठ’या यशवंतरावांच्या आत्मचरित्राच्या जन्मशताब्दी विशेष मर्यादित आवृत्तीचा आणि इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. यशवंतरावांप्रती असलेला आदर आणि शरद काळे यांच्या कार्यपद्धतीवर असलेल्या विश्वासामुळे मी तो प्रस्ताव लगेच स्वीकारला. पुढे या कामाच्या निमित्ताने आमच्या भेटी-गाठी होत राहिल्या. एका भेटीत मी काळेंना म्हटलं की, ‘कृष्णाकांठ’ची मराठी आवृत्ती सहजगत्या उपलब्ध नाही आणि तिला मागणी मात्र आहे. मी रोहन प्रकाशनातर्फे यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने या आत्मचरित्राची कमी किमतीत जन-आवृत्ती प्रसिद्ध करतो. कमी किंमत आणि पुस्तक सर्वदूर पोचवण्याची ‘रोहन’ची कार्यक्षम यंत्रणा यांमुळे यशवंतरावांची घडण, त्यांचं जीवन, त्यांचे विचार यांचा व्यापक प्रसार जनसामान्यांत होऊ शकेल. काळेंना ही कल्पना पसंत पडली. त्यांनी मला तसा लेखी प्रस्ताव देण्यास सांगितलं. पुढे मी तसा प्रस्ताव पाठवला. काळेंनी तो प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीपुढे ठेवला आणि माझ्या प्रस्तावास मान्यता मिळाली. इंग्रजी ‘कृष्णाकांठ’ आणि त्याची मराठी विशेष-आवृत्ती दोन्ही यशवंतराव जन्मशताब्दी दिनी म्हणजे १२ मार्च २०१२ रोजी, यशवंतरावांचा वारसा पुढे चालवणारे महाराष्ट्राचे देशपातळीवरचे नेते, मा. शरदराव पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाल्या. पाठोपाठ २२ एप्रिल रोजी जन-आवृत्ती प्रसिद्ध केली. आम्ही या जन-आवृत्तीचा जोरदार प्रसार केला. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पुस्तकं उपलब्ध झाली. वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला. आणि हजारोंच्या संख्येने पुस्तकं खपली. मुख्य म्हणजे अजूनही, म्हणजे आज आठ वर्षं झाली, तरी पुस्तकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की, ‘जन-आवृत्ती’चा उद्देश सफल झाला. यशवंतरावांचं आयुष्य, त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत आहेत.
‘कृष्णाकांठ’ हे यशवंतरावांचं आत्मचरित्र असलं, तरी त्यात त्यांच्या वयाच्या अडतीस वर्षांपर्यंतचंच आयुष्य आहे. त्यांच्या आत्मचरित्राचा पुढील भाग दोन खंडांत लिहायचं यशवंतरावांच्या मनात होतं. परंतु ते काम अपुरं राहिलं. असं जरी असलं, तरी यशवंतरावांनी इतरही लेखन केलं आहे. अनेक व्यासपीठांवरून भाषणं केली आहेत. व्याख्यानं दिली आहेत. या सर्वांचेही संग्रह पूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. परंतु त्यांची उपलब्धता नव्हती. मी हळूहळू या पुस्तकांसाठीचे प्रतिष्ठानपुढे प्रस्ताव देत गेलो. ‘कृष्णाकांठ’ला मिळवून दिलेल्या यशामुळे, रोहन प्रकाशनाच्या पारदर्शी व्यवहारामुळे आणि निर्मितीचा दर्जा या सर्वांचा एकत्रित परिणाम असेल… माझे प्रस्ताव मान्य होत गेले. यशवंतरावांची ‘भूमिका’, ‘ऋणानुबंध’, ‘सह्याद्रिचे वारे’ एक-एक पुस्तकाच्या जन-आवृत्ती निघत गेल्या. त्याला वाचकांचा प्रतिसादही मिळत गेला. त्यातून आम्ही या पुस्तकांचे आकर्षक वेष्टनातले संचही उपलब्ध केले. या प्रयोगाचाही यशवंतरावांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने उपयोग झाला.
पुढे ‘माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’ हे त्यांनी देशभरांतील विद्यापीठांत दीक्षान्त समारंभात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांत केलेल्या भाषणांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि नुकताच म्हणजे, १२ मार्च २०२० रोजी ‘भारत : समाज आणि राजकारण’ हा सव्वापाचशे पानी ग्रंथ प्रकाशित झाला. डॉ. जयंत लेले यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतींचा हा ग्रंथ. या मुलाखतींचं संपादन केलं आहे डॉ. प्रकाश पवार यांनी. पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे गोविंद तळवलकर यांनी.
यशवंतराव आपल्या आत्मचरित्राचे उर्वरित दोन भाग लिहू शकले नसले, तरी या सर्व सहा पुस्तकांतून त्यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक पट बऱ्यापैकी उलगडतो एवढं मात्र निश्चित…!
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल २०२१ जानेवारी
यशवंतराव चव्हाण यांच्या पुस्तकांचा संच
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!
₹800.00Add to cart