धर मला, धर मला, धर धर धर…
मयंकला त्याच्यासमोर मोठ्ठा, आडवातिडवा सिमेंट क्रॉन्क्रीटचा रस्ता निपचित पडलेला दिसला. त्याच्याभोवती ना अंधार होता, ना उजेड. तर त्या दोघांचं मिश्रण असलेलं वेगळंच वातावरण होतं – करडं-पिवळं. त्यामध्ये काचेवरून परावर्तित झालेला निळसर-पांढरा रंग मिसळलेला होता. तो काही पावलं चालत पुढे गेला. त्याने डावीकडे पाहिलं, तर नजर जाईल तिथपर्यंत मोठमोठाल्या काचेच्या इमारती होत्या. त्यावरून परार्वितत झालेल्या प्रकाशाने करडा-पांढरा रस्ता झळाळला होता. मग त्याने उजवीकडे पाहिलं, तर तिथेही नजर जाईल तोवर अशाच मोठ्ठाल्या इमारती होत्या. त्याने मागे वळून पाहिलं, तर त्याला रस्ता अथांग पसरल्यागत दिसत होता आणि कुठेतरी क्षितिजापाशी एका बिंदूवर धूसर होत एकमेकांत मिसळून गेला होता. त्याने वर पाहिलं, आकाशात पांढरे ढग इमोटिकॉन्ससारखे हसत होते. त्याने डाव्या हाताला असलेल्या इमारतीचं निरीक्षण करायला सुरुवात केली. निळ्याभोर काचांचा अंगरखा घातल्यागत ती दिसत होती. त्या इमारतीवर त्याला एक निऑनसाइन दिसली. तिच्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचं समोरच्या काचांवरून परावर्तन होत होतं. त्यावरची अक्षरं होती – ‘वेलकम टू 96, मेट्रोमॉल!’
मयंक थोडा वेळ त्या उजळत्या पाटीकडे पाहत राहिला. त्याला समजलं की, त्यातला ‘वेलकम’ हा शब्द एकदा लाल रंगाने उजळून निघत होता, तेव्हा इतर शब्द साधेच पांढऱ्या रंगात झळाळत होते. मग ‘टू’ शब्द हिरवा उजळायचा, तेव्हा इतर पांढरे आणि असंच ‘९६, मेट्रोमॉल’ या शब्दाच्या बाबतीतही घडत होतं. त्या इमारतींवरून परार्वितत होणारा निळसर-लाल-पांढरा प्रकाश मयंकच्या अंगावर पडत होता. ही पाटी आपल्या तीनेक पट तरी मोठी असेल आणि या इमारती वीस-पंचवीस पट किंवा त्याहीपेक्षा जास्त, असा अंदाज मयंकने बांधला. या बिल्डिंगमध्ये असेल तरी काय, रेसिडेन्शियल असेल की ऑफिसेस् असतील की शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, त्याला प्रश्न पडला. जाऊनच पाहू या तिथे, असा विचार करून मयंक रस्त्याकडेचा फुटपाथ ओलांडून इमारतीच्या दिशेने चालू लागला. त्याला इमारतीचं प्रवेशद्वार दिसलं. ते प्रचंड मोठ्ठं, अंगावर येणारं असं होतं. त्याच्या कमानीवर सगळ्या रंगांचे चमकणारे, लुकलुकणारे दिवे मढवलेले होते आणि त्याचा आकार अर्धगोलाकार होता. त्या प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी एक लहानसा रस्ता आखलेला होता. त्याच्या दुतर्फा रांगेत छोटी छोटी प्लास्टिकची झुडपं होती. त्याच्या पाना-फुलांवरही एलईडी दिवे लावलेले होते.
‘‘वॉव, ऑसम,’’ मयंकच्या तोंडून उद्गार निघाला. ‘असं वाटतंय की, अख्खं झाड डायमंड किंवा प्रेश्यस स्टोन्सनी बदाबद भरलंय.’ त्याने त्या दिव्यांच्या पाना-फुलांना हात लावला. मग एक फूल देठातून तोडलं. देठ रबरट प्लास्टिकी असल्याने खुडताना त्याला जरा वेळ लागला. त्याने ते फूल आपल्या ओंजळीत घेतलं. पिवळसर पांढऱ्या एलईडींच्या प्रकाशाने त्याच्या आजूबाजूच्या करड्या हवेला थोडं दूर सारलं. जणूकाही त्याच्या हातात शेवंतीच्या पाकळ्यांचा छोटासा ढीग असावा असं वाटत होतं. त्याने आणखी दिवे गोळा करायला घेतले. त्याला वाटलं, गणपती डेकोरेशनच्या वेळेला किंवा दिवाळीत लावता येतील हे. मॉमला तर हे इतके आवडतील की, ती आपल्या साडीवर किंवा ड्रेसवर स्टिक करून घेईल सगळे. नाहीतर त्यांची एम्ब्रॉयडरी करेल. असंही तिला त्या चमचमत्या डिझायनर साड्या आवडतातच. हे तर त्यापेक्षाही भारी! कायम चमचमत राहणारी साडी!
‘‘इव्हन आपल्यालाही एखाददुसरं फूल घ्यायला काही हरकत नाही. फ्रेंड्समध्ये जाऊन जरा शायनिंग मारू या,’’ असं स्वत:शीच म्हणत तो पटापटा दिवे खुडू लागला. त्याला हाव सुटल्यागत झालं होतं. तोच त्याला मागून कोणीतरी धक्का देऊन सुसाट पुढे गेलं. मयंकने पाहिलं, तर त्याला एक काळी पाठ दिसली. मग ती पाठ मागे वळून बोलू लागली, तेव्हा त्याला एक स्क्रीन दिसला. तो एक मोबाइल फोन होता. तो कार्टूनमधल्यासारखा दिसत होता आणि ‘‘मला धर, ए, मला धर…’’ असं मयंकला चिडवत होता, डिवचत होता. त्याचे हात बारकुडे होते आणि चार्जिंग करायच्या भोकातून फुटलेले पाय वाळक्या काठीगत होते. त्याच्या स्क्रीनवर दोन लकाकणारे लालसर डोळे होते आणि तिथेच थोडं खाली इमोटिकॉनी तोंड होतं. स्पीकर फोनमधून केस म्हणून काही तारा उभ्याच्या उभ्या वर आलेल्या होत्या. स्पाइक कटसारख्या. त्याचे हात-पाय आणि अंग पांढरट चंदेरी रंगाचं असलं, तरी त्याने गडद काळ्या रंगाचं मोबाइल कव्हर कोटासारखं घातलं होतं.
तोवर मयंकने पाच-सहा इंचांचे फॅब्लेट किंवा दहा इंची टॅब्लेट पाहिले होते. पण हा मात्र चांगला मोठा – वीस इंची स्क्रीन असलेला मोबाइल होता. मयंक थोडासा आश्चर्यचकित झाला खरा, पण त्याला भारीही वाटलं. एखाद्या फ्युचरिस्टिक सायन्स फिक्शन सिनेमात आपण हिरो म्हणून काम करत आहोत असं. मोबाइलचा स्क्रीन उजळला आणि लुकलुकत्या डोळ्यांनी मयंककडे पाहत, त्याला चिडवत तो पुन्हा म्हणाला, ‘‘मला धर, धर मला, धर धर धर…’’ आणि मग मोठ्याने हसत, जिभल्या दाखवल्याचं इमोटिकॉनी तोंड करत तो पळतच सुटला. थेट त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे.
आपण हिरो आहोत असं वाटल्याने असेल किंवा नैर्सिगक उत्सुकतेपोटी असेल, मयंकला त्याच्या मागे जावंसं वाटू लागलं. तो कोण आहे, आपल्याला का चिडवतो आहे हे विचारावंसं वाटू लागलं. तो स्वत:शीच म्हणाला, ‘‘आजवर आपण कितीतरी मोबाइल फोन्स वापरले आहेत. म्हणजे साधारण पाच-सहा महिन्याला एक या रेटने. पण असा चालता-बोलता मोबाइल मात्र कधीही पाहिला नाही. तो त्या बिल्डिंगमध्ये घुसला. म्हणजे नक्कीच तिथे त्याच्यासारख्याच मोबाइल्सची कॉलनी असणार. भारी! तसं असेल, तर त्यातला एखादा आपण पकडून नेऊ या. कसली हवा होईल आपली फेसबुकवर आणि कॉलेजातही. मोबाइल होणारा मोबाइल!’’ मयंकला ही कल्पना फार आवडली. ‘‘हे एकदमच वंटास होईल. आणि असंही तोच तर आपल्याला ‘धर मला’ म्हणत आत गेला. म्हणजे त्याचीही तशीच इच्छा दिसतेय. भारीच दिसताहेत इकडचे हे मोबाइल – एकदम बिंधास्त!’’ मग तो विचार करू लागला की, आपण त्याला पकडल्यावर त्याचं नाव काय ठेवायचं? हां – मोबाइलड्यूड! हे मस्तय. आता मात्र मयंकची उत्सुकता आणि मोबाइल मिळवण्याची इच्छा एवढी जबर झाली की, तो ‘मोबाइलड्यूड’च्या मागे पळू लागला. त्याने ती एलईडीची खुडलेली फुलं तिथेच टाकली.
झाडांचा रस्ता जिथे संपला, तिथेच ती भव्य कमान होती. त्यानंतर कमानीत काळ्या रंगाची चौकट लावलेली होती. त्यातून गेल्यावर ‘पी’ असा दीर्घ आवाज झाला आणि ‘यू कॅन गो नाउ सर, यू आर सेफ. भरपूर, दणादण खरेदी करा, मजा करा’ असं यांत्रिकी आवाजात कोणीतरी बोललं. समोर एक भिंत होती आणि त्यावर जांभळ्या रंगाचा मोठ्ठा गोलाकार होता…
- 96 मेट्रोमॉल
- लेखक : प्रणव सखदेव
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०२०
ही कादंबरी खरेदी करण्यासाठी…
96 मेट्रोमॉल
96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात ! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !
₹170.00Add to Cart