ही फलनिष्पत्तीही नसे थोडकी…

पस्तीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी नवी ‘बजाज-चेतक’ स्कूटर घेतली होती. नवी स्कूटर लवकर मिळावी यासाठी त्या काळात काय करायला लागायचं पहा… सहा हजार रुपयांच्या मूल्याइतकं फॉरेन एक्सचेंज भरून गाडीचं बुकिंग करायचं आणि गाडीची डिलिवरी प्रायॉरिटीमध्ये मिळवायची. मी हे फॉरेन एक्सचेंज मिळवण्याची सोय केली, तेव्हा कुठे ‘फक्त’ दीड-एक वर्षात चेतक स्कूटर माझ्या हाती लागली. कंपनीची प्री-सर्व्हिसिंग झाल्यावर पुढच्या सर्व्हिसिंगसाठी मी माझ्या नेहमीच्या मेकॅनिककडे गाडी दिली. नवी गाडी होती; म्हटलं, इंजिन ऑइल, ग्रिसिंग, वॉशिंग एवढंच करू. त्याने गाडी चालवून पाहिली. म्हणाला, ‘‘साब, ‘ब्रेक’ करना जरूरी है” पैशाच्या चणचणीच्या त्या दिवसांत मी म्हटलं, ‘‘ब्रेक का काम रहने दिजीए, आप सीर्फ इंजिन ऑइल, ग्रिसिंग, वॉशिंग करना” यावर तो म्हणाला, ‘‘साब, आप आपके लाइफ का सोचिए, ब्रेक नही तो लाइफ खतम” माझी आवाजी एकदम बंद. ‘ठीक है ठीक है’ म्हणत ओशाळल्यागत माझ्या जीवाची काळजी असणाऱ्या त्या मेकॅनिकवर मी गाडीचा ‘ब्रेक’सोपवून निघालो.
तो म्हणत होता, ते वेगळ्या संदर्भातही आपल्या दैनंदिन जीवनात लागू होतं… ‘‘लाइफमे ‘ब्रेक’ नही तो लाइफ खतम…” आजच्या जीवनाच्या व्याख्येत ‘ब्रेक’ घेणं आवश्यकच होऊन गेलं आहे, मग ते अगदी रोजचं रुटीन असो, नाहीतर वर्ष-दोन वर्षांचं लाँगटर्म रुटीन असो…! या ‘ब्रेक्स’ची रेंज उभी-आडवी कशीही पसरलेली असते. अगदी रोजच्या कामादरम्यानच्या ‘टी-ब्रेक’ किंवा ‘टी-ब्रेक्स’पासून ‘ब्रेक’ची गोष्ट सुरू होते, ती अगदी दोन-तीन वर्षांच्या अंतराने होत असलेल्या देश-विदेशातील पर्यटनाच्या रुपाने आपण घेत असलेल्या ‘ब्रेक’पर्यंत येऊन पोचते. ‘ब्रेक’च्या अशा या रेंजच्या दरम्यान दैनंदिन टीव्ही पाहणं, साप्ताहिक हॉटेलिंग, पाक्षिक सिनेमा किंवा तत्सम काही, चार-सहा महिन्यांनी केलेलं जवळपासचं आउटिंग अशा विशिष्ट काळानंतरचे विशिष्ट ‘ब्रेक्स’ अंगवळणी पडलेले असतात.

rohan ebook

सध्याच्या कोरोना-संसर्गाच्या निमित्ताने लागू झालेल्या ‘लॉकडाउन’कडे सुरुवातीला लोकांनी ‘ब्रेक’ म्हणूनही पाहिलं. हा ‘ब्रेक’ वेगळ्या प्रकारचा होता. लादला गेलेला ‘ब्रेक’ होता. मोठ्या काळासाठी सलग घरी आणि केवळ घरीच राहायचं होतं. या दरम्यान आप्तेष्टांच्या भेटी-गाठी नाहीत, इतर नेहमीचे ‘ब्रेक्स’ नाहीत, …बस, तुम्ही आणि तुमचं कुटुंब. यापूर्वी कितीही मोठी सुट्टी तुम्ही अनुभवली असली तरी, भौतिक सुखं-विरहित असलेली लॉकडाउनची ही सुट्टी तुम्ही प्रथमच अनुभवली असेल. या सुट्टीदरम्यान मन रमवण्याचे अनेक मार्ग अवलंबले असतील. मग त्यांत संगीत, वाचन, लेखन, चित्रपट, कलाकुसर, छंद इत्यादी. सांस्कृतिक किंवा तत्सम गोष्टींचा समावेश असणार किंवा कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, ल्यूडो अशा बैठ्या खेळांचा समावेश असणार. त्याचप्रमाणे त्यात पाककलेतील आपलं कौशल्य तपासणं किंवा त्यात प्रयोग करून आपली हौस फिटवून घेणंही आलं असेल. परंतु, मन रमवण्याची ही सर्व चांगली माध्यमं असली तरी, जगण्यातली त्यांची जागा ‘रुचीपालट’ म्हणूनच असते. मात्र त्याचंच जेव्हा रुटीन होतं, तेव्हा त्यातलं वेगळेपणही काही दिवसांत संपुष्टात येतं. जगण्यातले हे सर्व रुचीपालट जेव्हा नेहमीच्या कामांच्या रुटीनमध्ये गुंफले जातात, तेव्हाच त्यांपासून मिळणारा आनंद, समाधान उठून दिसतो. लादला गेलेला विरंगुळा, करमणूक किती काळ समाधान, आनंद देणार? हळूहळू त्यात साचलेपण जाणवणारच आणि त्यामुळे मन अस्थिर होणारच.

विरंगुळा हेच रुटीन… बातम्यांमध्येही तोचतोचपणा… म्हणजे, आज किती रुग्ण सापडले, एकूण रुग्ण किती, मृत्यू किती, मजूर-श्रमिक वर्गाचे गावाकडे जाण्यासाठी जमलेले तेच ते हतबल झालेले आशाळभूत तांडे, तीच ती त्यांची परवड, उन्हातान्हातील तीच ती शेकडो मैलांची पायपीट, तीच ती मुलांची-तान्ह्यांची फरफट, तडफड… सर्व विदारक चित्र… मन सुन्न करणारं! ज्येष्ठ व्यक्तींची होणारी कुचंबणा, अपंगांची, इतर आजाराने ग्रस्त रुग्णांची होत असलेली परवड अलाहिदा. एका बाजूला मानव समाजाची दिसत असलेली अशी भीषण अवस्था, तर दुसऱ्या बाजूला मानसिक, शारीरिक व मुख्यत: पराकोटीचा आर्थिक ताण! या पार्श्वभूमीवर कोरोनाकाळ आणि लॉकडाउनचं व्यवच्छेदक लक्षण कोणतं म्हटलं, तर हाच सर्व ताण आणि मन:स्वास्थ्य बिघडवणारा, नकोसा झालेला हा ‘ब्रेक’! “ब्रेक चालू, तो लाइफ खतम” असं नेमकं उलटं बोलण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशा सर्व वातावरणात आम्ही प्रकाशक-लेखक मंडळी वाचकांना सांगतो आहोत… वाचा, आपला वेळ सत्कारणी लावा, संधी आहे… काहींना ही हाक कदाचित समयोचित वाटणार नाही. बरोबर आहे त्यांचं, कारण सभोवताली वातावरणच तसं आहे, टिकवलेलं मनोबल घालवणारं, मनाला मरगळ आणणारं. एक प्रकारची सार्वत्रिक अस्वस्थता आलेली जाणवते आहे. परंतु, हे सर्व जरी खरं असलं, तरी प्राप्त परिस्थितीत निर्माण झालेलं हे साचलेपण घालवण्यासाठी, येऊ घातलेल्या अधिक मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी, अडचणींना यशस्वीरीत्या तोंड देण्यासाठी वाचनाची जोड असण्याची आज नितांत गरज आहे. विविध प्रकारच्या साहित्याशी परिचित राहिल्यास विचारांना बहुस्तरीय चालना मिळू शकेल. निदान ‘टीम-रोहनची तशी पक्की धारणा आहे. परंतु त्यासाठी योग्य, जरा ‘लाइव्हली’ वातावरणाचीही गरज आहे, हे जाणून आम्ही, म्हणजे खरं म्हटलं तर, आमच्यातील ‘यंग टीम-रोहन’ने काही उपक्रम राबवले. ‘सर्वत्र बंद’ अशा वातावरणात ‘समाजमाध्यमं’ (सोशलमिडिया) हे एकमात्र साधन आहे, वाचकांशी जोडून राहण्याचं हे खरं; परंतु त्याचाही आजकाल अतिरेकी वापर होत आहे, हे जाणून रोहन प्रकाशनाचा तरुण संचालक रोहन चंपानेरकर याने या माध्यमाद्वारे दोन कल्पक उपक्रम राबवले. एक म्हणजे ‘गपशप दिलसे…’ हा ‘फेसबुक लाइव्ह’ कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे समाजमाध्यमाद्वारे ‘पॉडकास्ट’ प्रसृत करणं. ‘गपशप दिलसे’या कार्यक्रमाची आखणी करताना त्या ‘शो’जमध्ये बहुविध साहित्यप्रकारांशी वाचक जोडला जावा हा उद्देश ठेवून त्याप्रमाणे त्यात सहभागी लेखकांना सामील करून घेतलं. मग त्यात डॉ. आशुतोष जावडेकर, अतुल कहाते, हृषीकेश गुप्ते, जयप्रकाश प्रधान, डॉ. मृदुला दाढे-जोशी, डॉ. लिली जोशी, मृणाल कुलकर्णी, श्रीकांत बोजेवार, वीरेंद्र ताटके, सुरेश हावरे, डॉ. तरू जिंदल, उमेश झिरपे, प्रणव सखदेव आणि सचिन कुंडलकर असे साहित्याचे विविध प्रकार हाताळलेले लेखक फेसबुक लाइव्हमध्ये मनापासून सहभागी झाले.

‘पॉडकास्ट’ म्हणजे आमच्या विविध पुस्तकांची वेगळ्याप्रकारे करून दिलेली ओळख. यात टीम रोहनच्या संपादक, लेखक आणि वाचकांनी विविध पुस्तकांची अनौपचारिकरीत्या ओळख करून दिली. या सर्व कार्यक्रमांना, उपक्रमांना वाचकांचा उस्त्फुर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे उद्भवलेल्या ‘डाऊन’ वातावरणात ‘चैतन्य’ आणणारे हे कार्यक्रम असतात अशा सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या उपक्रमांमुळे पुस्तकांची विक्री किती झाली किंवा किती होणार हे महत्त्वाचं नाही, पण या कार्यक्रमांमुळे वातावरणात थोडा जिवंतपणा आला, पुस्तकांची चर्चा सुरू राहिली एवढं मात्र निश्चित. तेव्हा हे आश्वासक चित्रही नसे थोडके…

पुस्तकांच्या विक्रीचा विषय निघाला यावरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. रोहन प्रकाशनाची पुस्तकं आता ‘ई-बुक’ स्वरूपात यायला सुरुवात झाली आहे. अनेक पुस्तकं आज ‘किंडल’वर उपलब्ध झाली आहेत, आणखी होत आहेत, पुढे होणार आहेत. सर्वत्र बंद, दुकानं बंद अशा काळात आम्ही पुस्तकांविषयीची वातावरणनिर्मिती तर करत होतो. तेव्हा ‘ई-बुक्स’ची विचारणा होणं साहजिक होतं. अनायासे आमच्या अनेक पुस्तकांचं ई-बुक संदर्भातलं काम पूर्णत्वाकडे आलंच होतं. परंतु, आताच्या निवांतपणाचा उपयोग करून आम्ही शेवटच्या काही तांत्रिक बाबी पूर्ण करून पुस्तकं लाँच केली. एवढंच नव्हे, तर काही पुस्तकं स्वतंत्रपणे केवळ ‘ई-बुक’मध्ये प्रकाशित केली आहेत. त्याचं इंप्रिंट आहे, ‘Rohan Ebook Original’ यांत सतीश तांबे, नितीन थोरात, श्रीकांत बोजेवार व प्रणव सखदेव यांच्या कथासंग्रहांचा सध्या समावेश आहे. आणखीही अशी ‘ओरिजिनल’ पुस्तकं होऊ घातली आहेत. तेव्हा ‘लॉकडाउन’मुळे साध्य झालेली ही ‘फलनिष्पत्ती’ही नसे थोडकी!

Pradeep Champanerkar photo

समाजमाध्यमं उपक्रम असोत वा ई-बुक्स… ‘डिजिटल फॉर्म’मध्ये काम करण्यात बाजी मारण्यास रोहन, प्रणव, नीता, अनुजा आणि प्राची या आमच्या ‘टीम रोहन’च्या यंग ब्रिगेडचं कल्पकतेने, नेटाने आणि चिकाटीने काम करणं कारणीभूत आहे. तेव्हा त्यांचा मनापासून आणि आवर्जून येथे उल्लेख करतो… आणि त्याचप्रमाणे आमची सोशल मिडियाची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या अभिजित ताम्हणे याचाही विशेष निर्देश!
मनोगताची सांगता मनाला चटका लावून जाणाऱ्या एका घटनेच्या उल्लेखाने करावी लागते आहे. ती घटना म्हणजे नुकतंच १८ मे रोजी झालेलं रत्नाकर मतकरी यांचं दुर्दैवी निधन. मराठी साहित्याला मतकरी यांचं निर्विवादपणे मोठं योगदान आहे. लेखक म्हणून त्यांची कारकीर्द थोडीथोडकी नव्हे, तर ६४ वर्षांची आहे. त्या दरम्यान त्यांच्या साहित्याची सव्वाशे एक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांच्या अनेक एकांकिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, साहित्यिक म्हणून झालेल्या कारकिर्दीचा प्रदीर्घ कालखंड आणि पुस्तकांची संख्या, अशा केवळ सांख्यिक निकषांवर त्यांच्या योगदानाचं मोल ठरवता येणार नाही. हे घटक तर वैशिष्ट्यपूर्ण आहेतच, पण त्याचबरोबर त्यांच्या साहित्यातले वैविध्य आणि गुणात्मक दर्जा या निकषांवरही त्यांचं योगदान अधोरेखित होतं. एक चतुरस्र नाटककार म्हणून त्यांची कारकीर्द गौरवास्पद आहेच, परंतु त्यांच्या गूढकथा आणि रहस्यकथांनीही मराठी वाचकांवर आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. बालरंगभूमीसाठीही त्यांनी आपली लेखणी खर्च केली आहे. त्याचप्रमाणे लेखनात अनेक प्रयोग करतानाही त्यांची लेखणी लीलया चालली आहे. अशा या रत्नाकर मतकरी यांचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं… जे तसं म्हटलं तर दुर्लभ आहे… ते वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निश्चित अशी असलेली राजकीय मतं. ती मतं आपल्या कथांतून मांडताना त्यांनी त्यांची लेखणी कधी आखडती घेतली नाही. गेली काही वर्षं ‘अनुभव’ मासिकाच्या दिवाळी अंकातून कल्पकतेने राजकीय भाष्य करणाऱ्या ‘सर्वेसर्वा’, ‘गॅस चेंबर’, ‘अलिकडे त्यांच्या हत्या नाही करत!’ अशा अनेक कथा स्मरणात राहतात. एक प्रतिभावान साहित्यिक आणि एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपल्यातून हरपलं आणि तेही कोरोना विषाणूच्या संसर्गाने- लॉकडाउनचे सर्व नियम पाळूनही… याच्यासारखी दुर्दैवी घटना ती कोणती असू शकते? रोहन परिवार, मतकरी परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जून २०२०


रोहन प्रकाशनची ईबुक्स वाचण्यासाठी ‘किंडल स्टोअर’ला भेट द्या


रोहन शिफारस

Mukkam-Post-Cover

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट

‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’

– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून

250.00Add to Cart

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *