‘काय तो जमाना होता…’ ‘आमच्या वेळी असं नव्हतं हं…’ वगैरे वगैरे म्हणत आजच्या काळाला दुगाण्या देण्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. पण खरं सांगायचं तर, त्या-त्या काळातलं एक प्रकारचं जगणं असतं. त्या जगण्यात काही अधिक, तर काही उणे असतंच. आता मुलांना पडलेल्या सुट्टीचाच विषय घ्या….
वार्षिक परीक्षेतून मुलं मोकळी झाली की, पूर्वी बैठे खेळ, मैदानी खेळ, कुटुंब पातळीवरच्या छोट्या सहली, गावाला मामा, काका, मावशी, आत्या यांच्याकडे तळ ठोकणं, म्युझियमसारख्या ज्ञानात भर घालणाऱ्या तसंच कुतूहल चाळवणाऱ्या ठिकाणांना आवर्जून भेटी देणं इ.इ. गोष्टींचे आराखडे, नियोजन करणं सुरू व्हायचं. आजच्या काळात या गोष्टींमध्ये थोडा फरक पडला आहे. बैठे आणि मैदानी खेळांमध्ये भर पडली ती टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपची… त्यावरील व्हर्चुअल खेळांची. म्युझियम, प्रदर्शनं किंवा तत्सम ठिकाणांना भेटी देणं, प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणं, ते वातावरण अनुभवणं हे दिवसेंदिवस कमी कमी होत चाललं आहे. पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे ‘करेक्शन’, ‘कॉम्पेन्सेशन’ करणाऱ्या गोष्टीही घडत असतात. त्यानुसार विविध वयोगटांतील मुलांसाठी विविध शिबिरं, ट्रेक्स, समर कॅम्प्स भरवणाऱ्या संस्थाही निर्माण होतात, व त्यांना प्रतिसाद देणारी पालकांची मानसिकताही तयार होते. कुठूनही मुलांना ‘व्हर्चुअल’ जगतातून ‘अॅक्चुअल’ जगताचा अनुभव देणं याकडे पालकांचा कल असतो.
वाचनाबाबतच्या सवयीबद्दलही असंच म्हणता येईल. पूर्वी सुट्टीच्या दिवसाच्या वेळापत्रकात वाचनाला प्रचंड जागा असायची किंवा त्या काळी पुस्तकांना प्रचंड मागणी होती, असं कुठे चित्र होतं? पण असं निश्चितपणे म्हणता येईल की, त्या काळी जी काही वाचनाला जागा होती, तीही आज आक्रसली आहे. नव्या माध्यमांचा भडिमार विलक्षण वेगाने आणि प्रचंड संख्येने होत आहे. या माध्यमांचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. पण वाजवीपेक्षा जास्त वेळ आणि जास्त महत्त्व या माध्यमांना दिलं जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. जिथे जाणकार जागरूक मंडळी, घरातली ज्येष्ठ मंडळी, पालक मंडळी सर्वचजण या ‘स्क्रीन’ भडिमाराचे बळी ठरत आहेत, तिथे मुलांची काय गोष्ट करावी? प्रचंड आकलनक्षमता असलेल्या या वयात मुलं या माध्यमांना पूर्णपणे ‘एक्सप्लोअर’ही करू शकतात. आणि या त्यांच्या ‘कौशल्याचा’ उपयोग ज्येष्ठ मंडळीही करून घ्यायला उत्सुक असतात !
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की, दुसऱ्या बाजूला सजगतेचेही वारे वाहत असतात. पुस्तकवाचनाची गोडी मुलांमधून हद्दपार होत असताना दुसऱ्या बाजूला ती गोडी लागावी यासाठी प्रयत्न होतानाही दिसत आहेत. अगदी अलीकडेच वर्तमानपत्रातून कळलं की, कोथरुड येथील ‘वुडलॅन्ड सोसायटी’मध्ये पुस्तकवाचनाचं शिबीर घेण्यात आलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच दरम्यान सुप्रसिद्ध लेखक सुमेध रिसबूड (‘रोहन साहित्य मैफल’चे ते चाहते आहेत) सांगतात की, काही शाळांतून पुस्तक वाचनाचा मुलांमध्ये प्रसार करण्याच्या उद्देशाने काही पद्धतशीर प्रयोग केले जात आहेत. ठिकठिकाणी असे अनेक उपक्रम चालू असतीलच. तर, सांगायचा मुद्दा असा की, त्या त्या काळातल्या गोष्टींचे मानवी जीवनावर परिणाम होत राहणारच. परंतु, त्याचा सतत कढ काढत राहण्यापेक्षा त्यावर असे काही उपाय शोधणं; त्या वाटेने मार्गक्रमण करत राहणं, हे जास्त श्रेयस्कर ठरतं.
मुलांना वाचनाची गोडी लागावी असं म्हणताना ‘चांगल्या पुस्तकांची उपलब्धता’ हा विषयही खुल्या मनाने संबंधितांमध्ये र्चिचला जावा. मराठी पुस्तक-जगताचा विचार करता; ‘बाल साहित्य व किशोर’ साहित्य प्रकाशित करण्याचा किती प्रकाशकांनी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक प्रयत्न केल्याचं दिसतं? ज्योत्स्ना प्रकाशन, ऊर्जा प्रकाशन अशा काही प्रकाशकांनी उत्तम काम केल्याचं दिसून येतं. अलीकडच्या काळात राजहंस आणि रोहन प्रकाशनानेही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येतं. रोहन प्रकाशनाने किशोर वाचनासाठी पुस्तकांची असलेली पोकळी लक्षात घेउन ‘किशोर वाचन’ हा विभागच सुरू करून त्यात काही चांगले प्रकल्प विचारपूर्वकपणे राबवले. आजच्या किशोरांना वाचनाची सवय लागली तरच भविष्यात काही वाचेल, हा त्यामागचा विचार आहे. त्या दृष्टीने आम्ही ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’, ‘व्योमकेश बक्षी’, ‘रस्किन बाँड’ असे किशोर वाचनाचे मोठे प्रकल्प उत्तम प्रकारे आणि आर्थिक गणितांचा फारसा विचार न करता राबवले. त्यांना प्रतिसादही उत्तम लाभला आहे. परंतु, मराठी भाषकांची प्रचंड संख्या लक्षात घेता या ‘उत्तम प्रतिसादा’ची घोडदौड तोकडीच म्हटली पाहिजे.
बालवाङ्मयातही ‘रोहन’ने मुशाफिरी केली आहे. अलीकडचं उदाहरण द्यायचं तर ‘प्रेमळ भूत’ या मालिकेचं देता येईल. परंतु, या प्रांतात आम्ही चंचुप्रवेश केला तो पुरुषोत्तम धाक्रस या जुन्या जाणत्या संपादक-लेखकाने लिहिलेल्या पुस्तकांनी. पठडीच्या पलीकडे जाऊन लिहिण्याचा ध्यास घेऊन त्यांनी चटपटीत तरीही आशयसंपन्न बालसाहित्य निर्माण केलं. ‘इसापने न सांगितलेल्या गोष्टी’ व ‘पुरून उरणाऱ्या गोष्टी’ या रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या पुस्तकांच्या मालिका म्हणजे बालसाहित्याची उत्तम उदाहरणं होय. या पुस्तकांना चांगला प्रतिसाद लाभला. पण आमच्याकडून तरी कुठे असं साहित्य निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न झाले? त्याच्या कारणमीमांसेत नंतर कधी जाऊ. परंतु, या निमित्ताने पुरुषोत्तम धाक्रस या थोड्या कलंदर वृत्तीच्या व कामाप्रती बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तिमत्त्वा-विषयी थोडं सांगतो…
मराठी भाषेविषयी प्रेम, जिव्हाळा, आस्था असलेल्या धाक्रसांना मराठी भाषेची, साहित्याची उत्तम जाण आहे, हे महत्त्वाचं. ‘मौज समूहातील’ ‘प्रभात’ दैनिक, ‘मौज’ साप्ताहिक, ‘सत्यकथा’ मासिक अशा दैनिक/नियतकालिकांच्या संपादन विभागात धाक्रसांनी दीर्घकाळ काम केलं आहे. त्यामुळे त्यांची एकंदर झालेली साहित्यिक घडण लक्षात यावी. मूळ मुंबईचे धाक्रस पुण्यात आल्यानंतर माझ्या संपर्कात आले १९९६च्या दरम्यान. त्यांनी रोहन प्रकाशनाच्या अनेक पुस्तकांच्या संपादनाची जबाबदारी उत्तम प्रकारे निभावली आहे. रोहन प्रकाशनाचं विषयवैविध्य त्यांनी उत्तम प्रकारे पेललं आहे. एका बाजूला लालबहादुर शास्त्री यांचं चरित्र, (‘बहादुर’ मधला ‘दु’ऱ्हस्व ठेवण्याचा कारणमीमांसेसह त्यांचाच आग्रह आणि त्याच पुस्तकाचं ‘राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम’ हे समर्पक उपशीर्षकही त्यांचंच) तर दुसऱ्या बाजूला योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांची ‘आरोग्य योग’, ‘योग सर्वांसाठी’ अशी पुस्तकं… सर्वांनाच भाषेच्या दृष्टीने अचूक केलं ते धाक्रसांनी, त्यांच्या ‘परफेक्शन’च्या आग्रहाने.
वयवर्षं ९३ असलेल्या धाक्रसांची अलीकडेच मी मुंबईला जाऊन आवर्जून भेट घेतली. त्या भेटीने त्यांना आणि मला दोघांनाही अतिशय आनंद झाला. चांगल्या कामाविषयी समान आस्था बाळगणाऱ्या दोन व्यक्तींची बऱ्याच काळानंतरची ती भेट हृद्य होती…
…बाल-कुमार साहित्य जास्त प्रमाणात निर्माण होत नाही… प्रकाशकांचंही या विभागात सातत्य कमी पडतं. मागणीही खुंटते आहे. मग अर्थकारणाचा प्रश्न निर्माण होतो. साहजिकच किमती वाढत जातात आणि मागणी आणखी घटत जाते. या दुष्टचक्रात बाल-कुमार साहित्य अडकतं आणि मग मुलांच्या हाती लागतात ती अर्थहीन पुस्तकं… अ-सर्जनशील साहित्य ! हे चक्र कुठे थांबेल?
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०१९
‘रोहन’च्या किशोरवाचन मुद्रेतील साहित्य
कलाम संच
किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच
ए.पी.जे. अब्दुल कलाम
अनुवाद : प्रणव सखदेव
डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…
रस्किन बाँड संच
भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता
रस्किन बाँड
अनुवाद : नीलिमा भावे , रमा हर्डीकर सखदेव
सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.
त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,
त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या
कथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !
तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल…
तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच
४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद :अशोक जैन
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
वाचा जाणा करा
९ पुस्तकांचा संच
कविता महाजन
सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी
नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट
यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी
आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती
इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत.
मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून
प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे.
मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या
आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!