फॉन्ट साइज वाढवा

‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : ४

बदल घडत राहणं किंवा अगदी जाणीवपूर्वक घडवत राहणं ही एक स्वाभाविक क्रिया असते. त्याचप्रमाणे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अपरिहार्य ठरलेल्या बदलांचीही एक वेगळी जातकुळी असते. कोणत्याही कारणाने का असेना; वैयक्तिक आयुष्यात असोत वा व्यावसायिक आघाडीवर असोत, बदल घडतात आणि एका प्रक्रियेअंतर्गत ते घडत असतात. अस्तित्वाच्या लढाईसाठी अनेक वेळा बदल अंगीकारणं ही एक लादली गेलेली परिस्थिती असते. अशा परिस्थितीत तुम्ही जितक्या जलद गतीने निर्णयप्रक्रिया राबवाल तेवढं तुम्ही स्वत:ला लवकर सावरून घ्याल. परंतु सर्व काही सुरळीत चाललं आहे, तरीही तुम्ही त्यात समाधानी नसणं, ही गोष्ट वेगळी ठरते. ‘समाधानी नसणं’, हे तुमच्यातल्या आंतरिक ऊर्मी जागृत असल्याचं द्योतक असतं. पण, मनात उचंबळून येणाऱ्या कल्पना आणि त्या कार्यान्वित करणं, या दोन अगदी भिन्न प्रकृतीच्या गोष्टी असतात. ‘आज मनात आलं… करायला घेतलं’ हे धोरण अंगलट येऊ शकतं. एखादी मनात आलेली गोष्ट विचारपूर्वकरीत्या करणं, तिचं किमान ढोबळ नियोजन करून नंतर अमलात आणणं आणि, तीच गोष्ट तुमची सहजप्रवृत्ती आहे म्हणून क्षणैक निर्णयप्रक्रियेतून घडवून आणणं यांत मोठा फरक आहे.

‘रोहन प्रकाशना’ची सुरुवात १९८३ची. सुरुवातीच्या वर्षांत मोजकीच पुस्तकं निघूनही अगदी थोडक्या कालावधीत ‘एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था’ म्हणून प्रतिमा निर्माण झाली. पुस्तकांच्या विषयांत वैविध्य असलं, तरी प्रामुख्याने दैनंदिन जीवन सुकर करणारी उत्तम पुस्तकं प्रकाशित करणारी संस्था असाच नावलौकिक होता. १९९५च्या अखेरीस प्रसिद्ध झालेल्या; विषय व निर्मिती दोन्ही दृष्टींनी अभिरुचीसंपन्न असलेल्या ‘पाहुणचार’ या पुस्तकाने या नावलौकिकात आणखी भरच टाकली. सोबत माझ्या मनात प्रकाशनाला वेगळं वळण देण्याच्या मनसुब्याला ऊर्जाही दिली. हे वेगळं वळण म्हणजे विषयविस्तार करणं. त्यात संपूर्ण धोरणात्मक बदल अभिप्रेत नव्हता. तर, ज्या विषयांत ‘रोहन’ची खासियत होती, त्या विषयांतील पुस्तकं प्रकाशित करणं एका बाजूला चालू ठेवायचं आणि एवढंच नव्हे, तर त्या-त्या विषयांतील विविध अभिनव कंगोरे उलगडायचे, निर्मितिदर्जाबाबत आधीपेक्षा दोन पावलं पुढे टाकत जायचं, जेणेकरून या प्रांतातलं आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवायचं. आणि दुसऱ्या बाजूला साहित्यिक पुस्तकं म्हणावीत अशा विषयांवरील पुस्तकं अधिक प्रमाणात प्रसिद्ध करायची. थोडक्यात सांगायचं तर, ‘रोहन’चा अवकाश विस्तारायचा. परंतु हे विस्तार-धोरण अमलात आणताना, प्रकाशन आर्थिक आघाडीवर स्थिर राहील याचंही भान ठेवायचं, असं समतोल साधणारं सर्वसाधारण धोरण अभिप्रेत होतं. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मनातल्या ऊर्मींना किमान ढोबळ नियोजनाची जोड दिल्यास अभिप्रेत उद्दिष्ट गाठणं सुकर जातं. त्याच अनुषंगाने पुढचं मार्गक्रमण करायचं होतं.

P.C. Alexander
या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी पी.सी. अलेक्झांडर भाषण करताना… राजभवनाचा दरबार हॉल श्रोत्यांनी पूर्ण भरलेला…

‘पाहुणचार’ची निर्मिती अखेरच्या टप्प्यात असताना, अशोक जैनने ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘लालबहादुर शास्त्री’ यांच्या डॉ. सी.पी. श्रीवास्तव लिखित इंग्रजी चरित्राचं केलेलं परीक्षण वाचनात आलं. तोपर्यंत माझे अशोक जैनशी छान सूर जमले होते. ‘कानोकानी’ या ‘म.टा.’मधील ‘कलंदर’ या टोपण नावाने लिहीत असलेल्या त्याच्या सदरातील निवडक लेखांचं पुस्तक करण्याचा प्रस्तावही मी त्याच्यापुढे ठेवला होता. मुख्य म्हणजे या माझ्या आवडीच्या सदराचा लेखक ‘कलंदर’ म्हणजे अशोक जैनच हे मला त्याच्याशी उत्तम परिचय असतानाही ठाऊक नव्हतं. या सदराचं पुस्तक करण्याच्या दृष्टीने मी त्याच्याकडे या ‘कलंदर’विषयी चौकशी केली असता, तो म्हटला, ‘‘अरे, असं काय करतोस, दस्तुरखुद्द ‘कलंदर’ला हे तू विचारतो आहेस.’’ मी चक्रावून गेलो. अशोक मात्र, दोन गोष्टींनी सुखावला असावा. एक तर त्याचं हे टोपणनाव तो काही प्रमाणात तरी गुलदस्त्यात ठेवू शकला याचं समाधान; आणि दुसरं म्हणजे, ‘कानोकानी’ पुस्तकरूपात आणण्याचा माझा प्रस्ताव याचं समाधान. त्याने त्या प्रस्तावाला थोडा अवधी घेऊन नंतर मान्यता दिली होती. ‘पाहुणचार’ या पुस्तकावर मी ज्या झपाटलेपणाने काम करत होतो, त्याचा तो साक्षीदार होता. ‘कानोकानी’च्या प्रस्तावाला मान्यता देण्यात त्याचं हे ‘साक्षीदार असणं’ कारणीभूत ठरलं असावं. तर, अशा पार्श्वभूमीवर शास्त्रीजींच्या चरित्राच्या त्याच्या परीक्षणाचा मी विषय काढला. त्याच्याकडून पुस्तक मागवून वाचून घेतलं. पुस्तकाची अतिविस्तृतता सोडली, तर पुस्तक अप्रतिम होतं. शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्य-कर्तृत्वाचे अनेक कंगोरे पुस्तकात उलगडले होते. त्यांच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं. मुख्य म्हणजे पुस्तकाची विश्वासार्हता निर्विवाद होती. याच निकषांवर आणि शास्त्रीजींप्रती मला असलेल्या आदरापोटी या पुस्तकाचा अनुवाद प्रसिद्ध करण्याचा मी ध्यासच घेतला.

आता समोर दोन प्रश्नचिन्हं होती. एक तर पुस्तकाचे मराठी आवृत्तीसाठीचे हक्क मिळवणं; आणि दुसरं म्हणजे, मराठी वाचकांचा विचार करता पुस्तक संक्षिप्त (abridge) करण्यासाठी मान्यता मिळवणं. दोन्ही कारणांसाठी मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (OUP) यांनी लेखकाशी संपर्क साधण्यास सांगितलं. मात्र लेखक इटलीला स्थायिक असल्याचंही सांगितलं. तेव्हा email वगैरे जास्त प्रचलित नव्हतं. दोन-तीन महिने गेल्यानंतर मात्र OUPच्या मुंबई वितरण शाखेतून; लेखक मुंबईला आल्याचं कळलं. मी संपर्क साधून श्रीवास्तव यांची भेट मिळवली. शास्त्रीजींविषयींच्या माझ्या भावना व्यक्त केल्या. मूळ पुस्तक मी वाचलं असल्याने, त्यांच्याशी पुस्तकाविषयी तपशिलात बोलू शकलो. अशोक जैनसारखी मातब्बर व्यक्ती अनुवाद करेल वगैरे सांगितलं. माझ्या बोलण्याने ते प्रभावित वाटले, परंतु OUPला शिफारस करण्याइतपत नव्हे, असं मला जेव्हा जाणवलं, तेव्हा मी सोबत नेलेलं ‘पाहुणचार’ हे ‘अस्त्र’ काढलं. पुस्तकाचा विषय काही त्यांच्या आस्थेचा असण्याची शक्यता नव्हती. परंतु रस घेऊन ते जवळजवळ दहा मिनिटं बारकाईने पुस्तक पाहत राहिले. नंतर पुस्तक माझ्या हाती देत म्हणाले, “If you produce this quality and looking at your passion to publish a book on Shastrijee, I will have no hesitation on recommending OUP for granting you rights.”

नंतर मात्र चक्रं वेगाने फिरली. OUPकडून हक्क मिळाले. दरम्यान, श्रीवास्तव, अशोक जैन व मी अशी भेट झाली. अशोकने पुस्तकाच्या संक्षिप्तीकरणाचा मुद्दा श्रीवास्तव यांना पटवून दिला. तेव्हा तीही आडकाठी दूर झाली. अशोकने अनुवादाला उत्साहाने सुरुवात केली. टप्प्याटप्प्याला मी व अशोक भेटून झालेल्या भागाचं मोठ्याने वाचन करत असू… वेळ, काळ, स्थळ यांपैकी कशाचं भान नसे तेव्हा. ‘मंतरलेले दिवस’ म्हटलं तरी चालेल असे दिवस.

दरम्यान, मी ‘कानोकानी’ पूर्ण केलं. त्याच्या प्रकाशन कार्यक्रमाची काही वैशिष्ट्यं आहेत. ग्रंथालीच्या सहयोगाने ११ एप्रिल १९९६ रोजी (म्हणजे अशोकच्या वाढदिवशी) झालेल्या कार्यक्रमात ‘म.टा.’चे मुख्य संपादक गोविंद तळवलकर यांच्या हस्ते ‘कानोकानी’ प्रकाशित झालं. या कार्यक्रमाला जोडूनच, शंकर वैद्य व अशोक जैन यांनी गोविंद तळवलकर यांची मुलाखत घेतली. तळवलकरांची ही पहिली जाहीर मुलाखत होय. आणि त्याचप्रमाणे तळवलकरांच्या ‘म.टा.’मधील कारकीर्दीचा तो शेवटचा दिवस…

Pradeep Champanerkar photo

‘शास्त्री’ पुस्तकाचे लेखक चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव यांच्या पत्नी म्हणजे निर्मलादेवी – अध्यात्म जगतातील सुप्रसिद्ध वलयांकित हस्ती. त्या मूळच्या साळवे कुटुंबातल्या म्हणजे मराठी भाषिक. अनुवादाला सुरुवात केल्यावर एक प्रकरण त्यांनी मागवून घेतलं. ते वाचून त्यांनी काही सूचना केल्या. अशोकला हे सर्व म्हणजे त्याच्या कामात ढवळाढवळ वाटली. आणि तसं वाटणं साहजिकही होतं. तसं श्रीवास्तव यांना मी पटवून दिलं. हे पटवून देताना, मी निर्मलादेवींच्या सूचनांपैकी एका सूचनेचं मात्र जोरदार स्वागत केलं. शास्त्रीजींसाठी त्यांनी ‘वामनमूर्ती’ हा शब्दप्रयोग सुचवला होता. तो खरोखरीच उचित होता. अशोकलाही तो मनापासून आवडला होता. अशोकच्या अनुवादाचचं संपादकीय संस्करण; पुरुषोत्तम धाक्रस या जाणकार संपादकाने केलं. पुस्तकाचं शीर्षक आम्ही ठरवलं होतं ‘लाल बहादुर शास्त्री’. धाक्रसांनी त्याला उपशीर्षक सुचवलं ‘राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम’. अशोकलाही ते आवडलं. तेव्हा मूळ लेखक-अनुवादक, अनुवादक-संपादक यांच्यामध्ये उद्भवू शकणारे ताणतणाव टळले गेले आणि सर्वांचे अहंकारही सुखावले गेले. कमल शेडगे यांनी माझ्या सूचनांवर सकारात्मक विचार करून पुस्तकाचं उत्तम मुखपृष्ठ साकारलं. त्यामुळे प्रकाशक-कलाकार यांच्यामधले संभाव्य मतभेदही उद्भवले नाहीत. एकंदर सर्व काही सुरळीत पार पडलं आणि पुस्तक उत्तम निर्मितीत तयार झालं.

श्रीवास्तव यांनी प्रकाशन समारंभाची जबाबदारी घेतली. पुस्तकाचं प्रकाशन त्या वेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते होणार होतं आणि कार्यक्रम मुंबईच्या राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये संपन्न होणार होता. दिवस होता ६ फेब्रुवारी १९९७. व्यासपीठावर जयंतराव टिळक, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी प्रभृती वक्ते म्हणून होते. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रांतील जान्यामान्या प्रतिष्ठितांनी त्याचप्रमाणे साहित्य व पत्रकारिता वर्तुळातील व्यक्तींनी आवर्जून हजेरी लावली होती. दरबार हॉल पूर्णपणे व्यापला गेला होता. या कार्यक्रमाला आणि एकंदर पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हे पुस्तक प्रसिद्ध करू नये आणि केल्यास फार काही अपेक्षा करू नये असे सल्ले माझ्या सर्व हितचिंतकांनी दिले होते. त्यात आप्तेष्ट, मित्र, समव्यवसायी सर्व जण आले… आणि गंमत म्हणजे काही प्रमाणात अशोक जैनही मी हे पुस्तक करू नये अशाच मताचा होता…!
पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळणार याची मला खात्री होती. पण पुस्तक हिरीरीने आणि मोठ्या ‘कॅनव्हास’वर प्रकाशित करण्यामागे ‘विक्रीचे आकडे’ हा विचार नव्हताच… शास्त्रीजींविषयीचा आदर ही पुस्तक-प्रकाशनामागची प्रेरणा होती आणि प्रकाशनाची ‘प्रतिमा-बदल’ तसेच ‘अवकाश-विस्तार’ हे विचार होते…

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२१


रोहन शिफारस

लालबहादुर शास्त्री

राजकारणातील मर्यादापुरुषाोत्तम

काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले ! …तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!

Lal-Bahadur-Shastri cover

320.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *