डॉ. कमला सोहोनी : एक विदुषी योगिनी

सामान्यत: प्रकाशकाने लेखकाचा किंवा लेखिकेचा परिचय करून देण्याचा प्रघात मराठीत नाही. पण मला या पुस्तकाच्या संदर्भात लेखिका डॉ. कमलाबाई सोहोनी यांचा परिचय मुद्दाम करून द्यावासा वाटतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कमलाबाईंचे जीवन, त्यांचा अभ्यास व त्यांचे संशोधन यांचा या पुस्तकाशी फार निकटचा संबंध आहे. कमलाबार्इंच्या कर्तुत्वाची ओळख झाल्याने वाचकांना या पुस्तकाचे मर्म अधिक जाणवेल एवढाच या परिचय देण्याचा हेतू आहे.

डॉ. कमलाबाई सोहोनी या विज्ञानशिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम अशा मुंबईच्या ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेच्या प्रमुखपदावरून निवृत्त झालेल्या एक संशोधक-शास्त्रज्ञ म्हणून अनेकांना ज्ञात आहेतच.  त्या भारताच्या ‘पहिल्या महिला शास्त्रज्ञ’ होत. पण त्यांची ओळख केवळ तेवढीच नाही. या क्षेत्रात एक स्त्री आणि तीही ब्रिटिशांच्या गुलाम राष्ट्रातील एक भारतीय तरुण मुलगी म्हणून सुमारे साठ वर्षांपूर्वी झगडून, आपली योग्यता पाश्चात्त्य राष्ट्रांतील मान्यवरांना पटवून देणाऱ्या एका अभ्यासू, ज्ञानपिपासू, देशभक्त, ज्ञानाखेरीज इतर ऐहिक सुखसंपत्ती तुच्छ मानणाऱ्या अशा एका विदुषी योगिनीची ही ओळख आहे. कमलाबाईंना त्या काळात आलेला अनुभव पहा ना! १९३३मध्ये केमिस्ट्री हा विषय घेऊन बी.एस्सी. परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत अर्ज केला. टाटांनी १९११मध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही संस्था स्थापन केल्यापासून या संस्थेत प्रवेश मिळवणे प्रतिष्ठेचे मानले गेले होते. कमलाबाईंच्या वडिलांना याच संस्थेने ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयातील संशोधनासाठी पहिल्याच तुकडीत निवडले होते.  कमलाबाई या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी पूर्णपणे पात्र होत्या; परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक-विजेते, सर सी. व्ही. रामन यांनी ‘मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही’ असे कमलाबाईंना कळवले; पण कमलाबाई सर रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व ‘मुलगी असले तरी विद्यार्थी म्हणून कोठेही कमी नसताना आपण माझ्यावर प्रवेश न देऊन अन्याय करत आहात. मी येथे आले ती परत जाण्यासाठी नव्हे. इथे राहूनच मी संशोधन करून एम. एस्सी. पदवी मिळवणार आहे’ असे त्यांना ठासून सांगितले.  त्यावर थोड्याफार नाखुषीनेच डॉ. रामन यांनी वर्षभराच्या अटीवर त्यांना प्रवेश दिला. मग वर्षभर ‘बायोकेमिस्ट्री’ या विभागात खास परवानगी काढून कमलाबाईंनी पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत लॅबोरेटेरीत प्रा. श्रीनिवास अच्चा यांच्या हाताखाली झपाटून काम केले. वर्षअखेर पुन: डॉ. रामन यांना भेटून ‘‘मी राहायचे की जायचे:’’ असे कमलाबाईंनी विचारताच, त्यांच्या पाठीवर शाबासकी देऊन डॉ. रामन म्हणाले की, ‘‘तुझी निष्ठा आणि चिकाटी पाहून वाटते की, या संस्थेमध्ये फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.’’ डॉ. रामन यांचा हा शेराच बोलका आहे, तेव्हा यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.  कमलाबाई या संस्थेतून एम.एस्सी. उत्तीर्ण झाल्या.

(कमला सोहोनी : १८.६.१९११ – २८.६.१९९८)

१९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च’ आणि ‘सर मंगलदास नथूभाई’ अशा दोन, उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्त्या मिळवून कमलाबाई इंग्लंडला गेल्या. तेथे केंब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लॅबोरोटरीचे डायरेक्टर, नोबेल पारितोषिक-विजेते सर फ्रेड्रिक गॉलंड हॉपकिन्स यांना भेटून, संस्थेत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी ‘‘माझ्या लॅबमधील सर्व जागा भरल्या आहेत. तुलाच जागा मोकळी दिसेल तर सांग” असे सांगितले. कुणाचीच ओळख नसल्याने बाई हताश झाल्या. तोच तेथील एक शास्त्रज्ञ डॉ. रिक्टर यांनी स्वत:हून भेटून आपली जागा त्यांना देऊ केली व ‘‘दिवसा आठ ते पाच तू काम कर, रात्री याच जागी मी काम करीन” असे सांगून बाईंना मदतीचा हात दिला. टर्म संपायला केळ दोन-तीन दिवस राहिले असताना बाईंनी युनिव्हर्सिटीत आपले नाव नोंदवले. एऱ्हवी याच लॅबमध्ये प्रवेश मिळण्यासाठी जगभरच्या शास्त्रज्ञांच्या रांगा लागत असत. या संस्थेत काम करताना ‘प्राणिमात्रांप्रमाणेच वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने संबंधित निरनिराळ्या एन्झाइम्सच्या यंत्रणेमुळे होतात,’ हे मूलभूत स्वरूपाचे महत्त्वाचे संशोधन त्यांनी केले व त्यावर आधारित पीएच.डी.चा प्रबंध १९३९च्या मार्च महिन्यात सादर केला. या विषयावर केंब्रिजमध्ये त्यांना एक व्याख्यान देण्यास सांगितले, तेव्हा मोठमोठे शास्त्रज्ञ हजर होते. त्या भाषणाने, जमलेल्या सर्व व्यक्तींवर त्यांची विलक्षण छाप पडली व त्यांच्या मौलिक संशोधनाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले गेले. हिंदुस्थानसारख्या (ब्रिटिशांच्या मते मागासलेल्या) देशातून येऊन अस्खलित इंग्रजीत ही मुलगी आपले संशोधन भल्याभल्यांना पटवून देऊ शकते याचेच सर्वांना फार आश्चर्य वाटले होते. पीएच.डी.साठी त्यांनी सादर केलेला प्रबंधही अवघ्या चाळीस पानांचा होता, तर इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे होते. कमलाबाईंना पदवी मिळालीच. त्यासाठी त्यांची तोंडी परीक्षाही दोन तासांच्यावर चालली होती. यावरून कमलाबार्इंचा कामातील नेमकेपणा व प्रखर आत्मविश्वास प्रकट होतो.

यानंतर सर सी. व्ही. रामन यांचे पुतणे व नोबेल पारितोषिक-विजेते डॉ. चंद्रशेखर सुब्रह्मण्यम त्यांना भेटले. त्यांनी नंतर अमेरिकेत अगर इंग्लंडमध्येच स्थायिक होऊन पुढे संशोधन करण्यास बाईंना सुचवले; पण त्यांचे न ऐकता त्या मायदेशी आल्या. त्यांची राष्ट्रनिष्ठा जागृत होती. भारतात परतून भारतीयांसाठीच काम करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज कॉलेज’मध्ये व पुढे मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये त्यांनी कामही केले. मुंबईच्या संस्थेतील त्यांची लॅब ही भारतातील अद्ययावत प्रयोगशाळा मानली जाऊन, तिथे त्यांनी केलेल्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. याच ‘संस्थेच्या डायरेक्ट’ म्हणून कमलाबाई निवृत्त झाल्या.

कमलाबाईंना केंब्रिजची डॉक्टरेट मिळाल्याची कथाही मनोरंजक आणि अंतर्मुख करणारी आहे. त्यांना डॉक्टरेट मिळाली, पण तिच्या सर्टिफिकेटमध्ये मात्र ‘The Title of the degree of doctor of Philosophy has been conferred on Kamala Bhagwat’ असे म्हटले होते. म्हणजे डिग्रीची फक्त टायटल त्यांना मिळाली का? तर स्त्रियांना अशीच सर्टिफिकेट्स देण्याचा प्रघात होता म्हणे.  पण कमलाबाईंनी संस्थेच्या डायरेक्टरांकडे याबद्दल नाखुषी व्यक्त केली. अखेर १९४८ साली केंब्रिज युनिव्हर्सिटीने नवा कायदा करून स्त्रियांवरील सर्व निर्बंध उठवले. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वुईमेन्स, वॉशिंग्टन’ या संस्थेने बाईंच्या कामाबद्दल डॉ. हॉपकिन्स यांच्याकडे विचारणा केली होती. उत्तरादाखलच्या पत्रात बाईंच्या कामाची व कार्यपद्धतीची डॉ. हॉपकिन्स यांनी खूपच प्रशंसा केली. त्यामुळे प्रभावित होऊन या संस्थेने कमलाबाईंना ‘सीनिअर ट्रॅव्हलिंग फेलोशिप’ दिली व अमेरिका पहायला येण्याचे आमंत्रण दिले. १९३८ मध्ये लक्झेम्बर्ग येथे लीग ऑफ नेशन्सतर्फे विद्यार्थी परिषदेत इंग्लंड व भारताची प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड केली.

कमलाबाईंची पहिली नेमणूक दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज’मध्ये झाली. येथील स्टाफच्या नेमणुका त्या काळी लंडनमधील एका संस्थेतर्फे होत. १९३८च्या नोव्हेंबरमध्येच दिल्लीला बायोकेमिस्ट्रीच्या जागेसाठी डॉ. हॉपकिन्स यांना संस्थेने एखाद्या कार्यक्षम व हुशार स्त्रीचे नाव सुचवण्यास सांगितले. त्या वेळी डॉ. हॉपकिन्स यांनी ‘कमलाबाई जून-जुलै, १९३९च्या सुमारास डॉक्टरेट पूर्ण करून भारतात परततील, तोवर ही जागा भरू नये’ असे कळवले… हेही त्यांच्या बुद्धिमत्तेविषयीच्या त्यांच्या वरिष्ठांच्या खात्रीचेच निदर्शक आहे. त्या वेळी इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धाचे वारे जोरात वाहत होते, कमलाबाई इटॅलिअन बोटीने लंडनहून भारतात यायला निघाल्या; पण महायुद्ध सुरू झाल्यामुळे बोट मुंबईला न येता सिंगापूरला नेऊन ठेवली गेली. अखेर पंधरा दिवसांनी त्यांना भारतात पोहोचवले गेले, व सप्टेंबर १९३९च्या दुसऱ्या आठवड्यात त्या आपल्या नोकरीवर रुजू झाल्या. तोवर त्यांची नोकरी त्यांच्यासाठीच राखून ठेवण्यात आली होती.

वरील ओळख म्हणजे कमलाबाईंच्या ज्ञानसाधनेची, बुद्धिमत्तेची आणि त्यांना जाणकारांनी दिलेल्या पावतीची केवळ एक झलक होय.

-प्रदीप चंपानेरकर

आहार-गाथा

लेखक : डॉ. कमला सोहोनी


रोहन शिफारस

आहार-गाथा

आहार व आरोग्य विचार

डॉ. कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक व शास्त्रज्ञ आहेत. अन्य अनेक विषयांबरोबरच त्यांनी आहार या विषयावरही शास्त्रशुध्द, प्रयोगनिष्ठ संशोधन केले आहे. आपले हे ज्ञान इंग्रजीतील निबंधातून, शोधपत्रिकांतून बंदिस्त राहू नये, ते सर्वसामान्य लोकांच्या उपयोगास यावे असे कमलाताईंच्या मनात आले आणि त्यांनी मराठी नियतकालिकांतून लेख लिहिण्यास सुरुवात केली. हे सर्व लेख, त्यांनी स्वत: केलेल्या आहार-प्रयोगांवर आधारित आहेत. वेगळया शब्दात सांगायचे म्हटले तर आपले स्वयंपाकघर हीच आपली ‘र-रस’ प्रयोगशाळा मानणार्‍या कमलाबाईंचे हे सगळे लेखन ‘आधी केलं, मग सांगितलं’ या स्वरूपाचं आहे. आपला आहार हा केवळ आपल्या शरीरप्रकृतीशीच संबंधित नसतो, तर तो आपल्या एकूण जीवनाशी, आपल्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत असतो; त्यामुळेच प्रत्येकाने स्वत:च्या गरजेपुरती का होईना आपल्या आहाराची नीट माहिती करून घेणे आवश्यक ठरते. या पुस्तकातून अशी माहिती सोप्या, साध्या शब्दात, सहजशैलीत दिली आहे. मुख्य म्हणजे शास्त्रीय लेखात दिलेल्या माहितीचा पाठपुरावा करणार्‍या काही पाककृतीही त्यांनी या पुस्तकात सुचविल्या आहेत. म्हणूनच हे पुस्तक वाचून सामान्य माणूस निश्चितच तृप्त होईल.

Aahar-Gatha

100.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *