फॉन्ट साइज वाढवा

लालबहादुर शास्त्री या पुस्तकातील अनुवादकाच्या मनोगतातील निवडक भाग

देशातील राजकारण सध्या रसातळाला पोचले असून जणू अंधारयुगच सुरू आहे. “अलीकडे राज्य-राजकारण-राज्य शासन-राजकीय-पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे.” हे पु.ल. देशपांडे यांनी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार स्वीकारताना काढलेले उद्गार सद्य:स्थितीचे अचूक वर्णन करणारे आहेत. त्यागाची जागा भोगाने व ध्येयाची जागा धनाने घेतली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी अनेक नेत्यांनी कारावास पत्करला तेव्हा त्यांच्या भाळी तेजस्वी त्यागाचा तिलक होता. आता मात्र भावी भ्रष्टाचाराचा कलंकटिळा मिरवीत नेते समाजाच्या सर्व थरांत शहाजोगपणे वावरत आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच एक माजी पंतप्रधान आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत व एका माजी मुख्य मंत्र्यांची रवानगी तुरुंगात झाली आहे! अशा परिस्थितीत भारताच्या याच धरतीवर महात्मा गांधी नावाचा एक युगात्मा तेजाची पाऊलवाट चालत होता आणि लालबहादुर शास्त्री नावाचा एक सत्यान्वेषी पंतप्रधान काही काळ देशाचे नेतृत्व करत होता, यावर विश्वासच बसत नाही. महात्मा गांधी हे जागतिक नेते होते व त्यांचा अहिंवसेचा मंत्र अजूनही स्फूर्तिदायी आहे. लालबहादुर शास्त्री यांची कारकीर्द दुर्दैवाने अल्पजीवीच ठरली.भारताच्या पंतप्रधानांची नावं घेताना पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशी नावं घेतली जातात. ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा देणारे व भारत-पाक युद्धाच्या वेळी खंबीर नेतृत्व करणारे शास्त्री यांचा काही काळ विसर पडला, हे एकूणच आपल्या राजकीय व सांस्कृतिक ऱ्हासाचे चिन्ह वाटते. अलीकडे मात्र अण्णा हजारे यांना पाहून लालबहादुर शास्त्री यांची आठवण होते, असे म्हटले जात आहे हे विशेषच.

काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे; त्यांच्या चारित्र्याची, जीवनकार्याची ओळख करून देणे अत्यावश्यक वाटते. सोज्वळ, विनयशील व्यक्तिमत्त्वाच्या या वामनमूर्तीने देशाच्या कठीण काळात समर्थ व खंबीर नेतृत्व दिले. सत्तेच्या मोहमयी विश्वातही ते ‘उपभोगशून्य स्वामी’ होते. सर्वार्थाने ते राजकीय क्षेत्रातील ‘मर्यादापुरुषोत्तम’ होते. ना पैशाचा लोभ, ना सत्तेची हाव. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा महागड्या भाज्या त्यांनी तत्काळ वर्ज्य केल्या. अन्नटंचाईच्या काळात दर सोमवारी केवळ एकच वेळ भोजन घेण्याचा निर्धार त्यांनी पाळला. मुलाच्या शिकवणीला पैसे हवेत म्हणून स्वत:चे कपडे ते स्वत:च धुऊ लागले. आजच्या जमान्यात या साऱ्या गोष्टी खुळेपणाच्या वाटतात! सी.पी. श्रीवास्तव यांनी लिहिलेले हे चरित्र वाचताना शास्त्रींच्या जीवनाचे असे अनेक पैलू उमगतात. सत्तेचे परमोच्चपद मिळाले तरी सत्याकडून सत्याकडे चाललेला त्यांचा प्रवास कसा थांबला नाही हे समजतं.

Lal-Bahadur-Shastri_Back

श्रीवास्तव यांनी बरीच वर्षं संशोधन करून अत्यंत परिश्रमपूर्वक हे चरित्र लिहिलं. दंतकथा, भाकडकथा, कौतुककथा, सांगोवांगी ऐकलेल्या कथा यांचा आधार न घेता सर्व घटनांचा शहानिशा त्यांनी केला, असंख्य पुरावे गोळा केले. शास्त्रींचे कुटुंबीय, स्नेही, सहकारी यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी तपशीलवार चर्चा केल्या. बनारसला जाऊन शास्त्रींचे मित्र पं. राजाराम शास्त्री यांची तर त्यांनी भेट घेतलीच, पण थेट मॉस्कोला जाऊन तत्कालीन ताश्कंद शिखर परिषदेचे प्रवक्ते झामियातिन यांच्याशीही चर्चा केली. शास्त्रींच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता काय अशी शंका व्यक्त केली गेली होती. रशियन डॉक्टरांच्या पथकानं हा तर्क फेटाळून लावला होता. श्रीवास्तव यांनी केवळ त्यांच्या अहवालावर विसंबून न राहता लंडन येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञ डॉक्टरांचेही मत घेऊन या शंकेत काही तथ्य नाही, असं साधार विवेचन केलं आहे.

ताश्कंद येथील शिखर परिषदेचं अत्यंत साद्यंत, तपशीलवार, नाट्यपूर्ण, रोचक वर्णन श्रीवास्तव यांनी केलं आहे. परिषदेत क्षणोक्षणी सतत उंच-सखल होत जाणारं ताण-तणावाचं वातावरण त्यांनी मूर्तिमंत उभं केलं आहे. शास्त्रींच्या अंतिम यात्रेचं वर्णन तर हेलावून टाकणारं आहे.
लेखकानं कोठेही आत्मस्तुतीची तुतारी फुंकलेली नाही, की शास्त्रींच्या कर्तृत्वाचा अकारण ढोल बडवलेला नाही. शास्त्रींच्या कारकीर्दीतील अनेक ऐतिहासिक क्षणांचे श्रीवास्तव स्वत: साक्षीदार होते. तेव्हा प्रत्यक्ष अनुभव व पुरावे यांच्या साह्याने त्यांनी एक अभ्यासपूर्ण, पारदर्शी चरित्र लिहिलं. शास्त्रींवर फारशी पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृष्टीनं त्यांच्या समग्र, साक्षेपी व समतोल चरित्राची आवश्यकता होती. ती पुरी करण्याचं मौलिक कार्य श्रीवास्तव यांनी केलं आहे.

श्रीवास्तव यांनी लिहिलेलं इंग्रजी चरित्र वाचून मी झपाटून गेलो. प्रकांड पांडित्य, वैचारिक वलय, मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्त्व नसूनही नैतिक बळ, शुद्ध चारित्र्य व स्फटिकवत प्रामाणिकपणा या जोरावर एखादा नेता कशी उत्तुंग कामगिरी करू शकतो याचं दर्शन भारावूनच टाकणारं होतं. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये या ग्रंथाचं मी केलेलं परीक्षण वाचून ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर प्रभावित झाले. शास्त्रींच्या जीवनाचं त्यांनाही जबर आकर्षण, त्यामुळे मराठीत हे चरित्र आणण्याचा ध्यासच त्यांनी घेतला. मी अनुवाद करावा अशी कल्पना त्यांनी मांडली व जिद्दीनं पाठपुरावा केला. तेव्हा या अनुवादाचं मुख्य श्रेय चंपानेरकरांचं आहे. या ग्रंथातील उर्दू शेराचा अनुवाद करताना कै. विद्याधर गोखले यांनी तत्परतेने मदत केली. संत कबीर यांचा एक दोहा या पुस्तकात आहे. प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर यांनी कबीरांच्या रचनांचा समर्थ अनुवाद केला आहे. त्यांतील एक अनुवादित दोहा या चरित्रात समाविष्ट केला आहे. त्यांचे मन:पूर्वक आभार.
भारत-पाक युद्धाचं पुस्तकात वर्णन असून त्यातील इंग्रजी शब्दांचा अचूक अनुवाद करण्यासाठी कर्नल श्याम चव्हाण, ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील माझे सहकारी दिवाकर देशपांडे यांनी साहाय्य केलं. तसंच वैद्यकीय शब्दांवर डॉ. रवी बापट यांनी ‘शब्दशल्यक्रिया’ केली. या सर्वांचा मी ऋणी आहे. अनुवादाचं संपूर्ण हस्तलिखित वाचून मौलिक सूचना व संपादन-संस्कार केल्याबद्दल पुरुषोत्तम धाक्रस यांचाही मी आभारी आहे.

मूळ इंग्रजी ग्रंथातील चार प्रकरणं मराठी अनुवादात समाविष्ट केलेली नाहीत. अर्थात, तसं करताना एकूण चरित्राचा ओघ कुठे खंडित होणार नाही वा अपुरेपणा येणार नाही याचं भान बाळगण्यात आलं आहे. मूळ ग्रंथ केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी वाचक डोळ्यांसमोर ठेवून लिहिला आहे. त्यामुळे काही बाबींचा सविस्तर तपशील दिलेला आहे. मराठी अनुवाद करताना त्याची गरज वाटली नाही, म्हणून ही प्रकरणं अंतर्भूत न करण्यास श्रीवास्तव यांनी संमती दिली आहे. तसंच वेळोवेळी शंकांचं निराकरण करणं व आवश्यक तेथे माहिती तत्परतेने उपलब्ध करून देणं आदी सहकार्यही सर्वतोपरी त्यांनी दिलं. त्यांचा मी फार आभारी आहे.

भारताच्या आधुनिक इतिहासातील ‘शास्त्रीपर्व’ हा एक तेजस्वी टप्पा आहे. सध्याच्या वातावरणात प्रकाशाचे एकेक दिवे मालवत असताना हे सात्त्विक निरांजन दिपवून टाकणारे आहे. या अंधारयुगातला हा कवडसा दिलासादायक वाटला तर हा अनुवाद सत्कारणी ठरेल.

– अशोक जैन

१ जानेवारी १९९७

  • लालबहादुर शास्त्री : राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम
  • लेखक : सी.पी. श्रीवास्तव
  • अनुवाद : अशोक जैन

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२१



हे पुस्तक विकत घेण्यासाठी…

Lal-Bahadur-Shastri cover

लालबहादुर शास्त्री

राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम

काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना प. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने प. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर,१९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले !

…तीच ही कहाणी तीस वर्षांनंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!

320.00Add to cart


Pradeep Champanerkar photo
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

विचार ‘प्रतिमा-बदल’ व ‘अवकाश-विस्तारा’चा…

पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *