चौदावं रत्न पुरस्कार

आम्हा चौघांपुढे एकच यक्षप्रश्न होता, आपण फेमस कसं व्हायचं? फेमस होण्याचे शंभर मार्ग आम्ही शोधत होतो. यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तकं आम्ही चाळली. आम्ही म्हणजे आम्ही चौघांनी. पण त्यात आम्हाला फार रस नव्हता. कारण यशस्वी काय कोणीही होतो. ज्याच्या घरी गाडी आहे, जो शनिवारी आणि रविवारी बायकोला घरी स्वयंपाक करू देत नाही, मॉलमध्ये खरेदीला गेल्यावर जो हाताची घडी बांधून एका बाजूला उभा राहतो आणि बायकोला खरेदीसाठी मोकळे रान देतो तो यशस्वी. असे यशस्वी पायलीला पासलीभर मिळतात. बघावे तिकडे असे यशस्वी लोक घोळक्या-घोळक्याने इन्व्हेस्टमेंटच्याच गप्पा करत असतात. आमच्या देशी टूर झाल्या, मग विदेशी टूर झाल्या. बायका बाहेर देशात गेल्यावर शॉर्ट्स घालून फोटो काढू लागल्या आणि वडापाव, कांदाभजी या पदार्थांना त्याज्य मानून सँडविचला जवळ करू लागल्या. सँडविचमधला उरलेला अखेरचा तुकडा अलवारपणे दोन बोटात धरून शेवटी कुरतडू लागल्या आणि पेपर नॅपकिन सतत जवळ बाळगू लागल्या. हे सगळं व्यवस्थित सुरू होतं. या यशाचा आम्हाला कंटाळा आला होता. त्यामुळे आता आपण फेमस झालं पाहिजे असं आम्हाला वाटू लागलं. आम्ही म्हणजे फाट्या उर्फ कानफाट्या, सुपारी उर्फ सोपारकर, सखी म्हणजे ठरवून आम्ही चौघांनी मिळून कुंतल माळगावकरच्या गळ्यात बांधलेली आमची ‘परफेक्ट साइज’ मैत्रीण आणि मी म्हणजे मी. आता मीच गोष्ट सांगतो म्हटल्यावर माझ्या नावाची गरज काय. तर, मी म्हणजे मीच.

KshKhsullak

या चौघांपैकी तुम्हाला सर्वाधिक उत्सुकता सखीबद्दल असेल हे अर्थातच स्पष्ट आहे. आम्ही तिघंही एकाच दिवशी आणि एकाच क्षणी सखीच्या प्रेमात पडलो. तिघंही टाइमपास करत कॉलेजच्या गेटवर उभे होतो तेव्हा सखी एका रिक्षातून कॉलेजच्या गेटसमोर उतरली. तो तिचा पहिला दिवस आणि आमचा तिघांचाही तिच्या प्रेमात पडण्याचा क्षण. आम्ही तिघंही तिच्या प्रेमात पडल्याचं आम्हा तिघांनाही कळलं.
मी सुपारीला म्हणालो, “मला जर हिच्याशी लग्न करायचं असेल तर तुम्हा दोघांना ठार मारल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण तुम्हा दोघांनाही ती आवडली आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जिवंत असताना मला तिच्याशी लग्न करणं फार जड जाईल. आणि केलंच तर आमच्या लग्नानंतर तुम्हा दोघांनीही माझ्या घरची दारं बंद होतील.”
सुपारी मला म्हणाला, “तुम्हा दोघांनाही नीट पोहता येत नाही हे एका परीनं बरंच आहे. आपण कुठेतरी समुद्रावर किंवा धरणावर पिकनिकला जाऊ. तिथे मला तुम्हा दोघांचा निकाल लावणं सोपं जाईल. त्यातून तुम्हाला कोणी वाचवलं नाही, तर बरं होईल, कारण मी सखीशी लग्न केलं तर तुमच्याशी संबंध ठेवणं मला धोक्याचंच असेल.”
फाट्या म्हणाला, “लग्न वगैरे प्रकारावर माझा काही फार विश्वास नाही. पण तुम्हा दोघांपैकी कुणीही ह्या भुईमुगाच्या शेंगेशी लग्न केलं तर गंभीर प्रसंग येईल. कारण मी काही महान नाही, त्यामुळे माझ्या तोंडून, ‘मी शेंगा खाल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही’ असं बाणेदार वाक्य येणं शक्य नाही. मी काही फक्त शेंगाच खाणार नाही, मी टरफलंही खाणार. तुम्हा दोघांपैकी कुणाच्याही बायकोचे माझ्याशी अनैतिक संबंध असलेले मला काही खपणार नाही. आणि एव्हढ्या क्षुल्लक कारणासाठी मी तुमच्यावर विषप्रयोग वगैरे करावा हे काही मला पटत नाही.”
अशा प्रकारे आमचे तिघांचेही एकमत झाल्यावर आम्ही आता हिचं काय करावं यावर चिंतन बैठक घेतली. एकमत होण्याची चिन्हं काही दिसत नव्हती. तेव्हा फाट्या वैतागून म्हणाला, “कशाला आपण डोकं खपवतो यार. ती उद्या एखाद्या आयटीवाल्याचा हात धरून स्टेट्सला उडून जाईल, आपला प्रश्न सुटला. आणि राहिलीच भारतात, तर पहिल्या बाळंतपणानंतर तिच्या कमरेचा घेर वाढणार आहे, घे लिहून.”

त्याचं म्हणणं त्याला स्वत:लासुद्धा पटलेलं नाही हे आम्हाला कळत होते. मग सुपारी साला अडकित्त्यागत धारदार स्वरात म्हणाला, “मला त्या कुंतल माळगावकरबद्दल शंका वाटते.” त्याच्या डोक्यातली शंका आणि कल्पना दोन्ही आमच्या लगेच लक्षात आली. फाट्या म्हणाला, “हे अगदी बेस्टच होईल. तिला जर माळगावकरच्या गळ्यात बांधली तर आपली जन्माची ददात मिटेल आणि एकमेकांचा जीव घेण्याची वेळ किमान हिच्यासाठी तरी येणार नाही.” तेव्हा त्या दिशेनं प्रयत्न करण्याचं ठरलं.
दुसऱ्या दिवशी ती रिक्षातून उतरली तेव्हा आम्ही तिघे तिच्या स्वागताला गेलो.
“मी फाट्या”
“मी सुपारी”
“मी मी…”
तिने आम्हा तिघांकडे दयाळू नजरेने पाहिलं आणि म्हणाली, “उजव्या हातात पुस्तकं आहेत. डावा हात सकाळचाच आहे, धुवायला वेळच नाही मिळाला. चालणार असेल तर शेकहँड करते. नाही तर आत्ताचा शेकहँड राहू दे पेंडिंग…”

आम्ही फेमस नाही, कारण आम्हाला पुरस्कार मिळालेला नाही, आणि आम्हाला पुरस्कार मिळत नाही. कारण आम्ही फेमस नाही, हे आम्हाला कळलं. पण पुरस्कार मिळवायचे कसे आणि ते मिळतात कुठे? या प्रश्नाचं उत्तर आम्हा कोणाकडेच नव्हतं.

आम्ही तिघंही एकाच सुरात ओरडलो, “चालेल, चालेल, आम्हाला तर महिना महिना वेळ मिळत नाही.” हे ऐकून सखीने तडकाफडकी हातातली पुस्तकं खाली टाकून दिली आणि आम्हा तिघांनाही ओळीने हग केलं. त्या दिवसापासून सखी आमच्यातली एक झाली. तिच्यात बायको मटेरियल नाही, असं आम्ही तिला तिच्या तोंडावर सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, “तुमच्यात मात्र टिपिकल नवरा मटेरियल आहे, तुम्ही यशस्वी भारतीय कुटुंबपद्धतीला चार-पाच चांद लावणार आहात.” पुढे आम्हा चौघांची घट्ट मैत्री झाली. चार वर्षांत तिने आपण मुलगी आहोत असं आम्हाला कधी वाटूही दिलं नाही. आणि एक दिवस म्हणाली, “तर लोकहो, तुम्ही ठरवल्याप्रमाणे मी कुंतलशी लग्न करतीये…” आमचा प्लॅन अर्धवटच यशस्वी झाला होता.
तर, ती आमची मैत्रीण म्हणून कायम राहिली. तिचा कुंतल आमच्यात कधीच आला नाही आणि त्याने तिला आमच्यात येण्यावाचून कधीच रोखलं नाही. आम्ही तिला कुंतलचा नवराच म्हणतो.
आम्हा चौघांना आता फेमस व्हायचं होतं. यशस्वी आयुष्याचा जाम कंटाळा आला होता.
फाट्या म्हणाला, “आपली मुलं जर ‘सारेगामा’ वगैरेमध्ये चमकली तर आपण फेमस होऊ.”
सखीने त्याला धरून बुकलला. “अरे लेका, तिथं ती मुलं फक्त आपल्या आईबापांनी कसा त्याग केला आणि सपोर्ट वगैरे केला एव्हढंच सांगतात. तेव्हढ्या प्रसिद्धीसाठी उगा मुलांना गाणं वगैरे गायला लावणं बरं नाही. शिवाय माझ्या मुलाला मी गायला बसवला तर तो, ‘माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका’ अशी एका ओळीची चिठ्ठी लिहून पळून जाण्याची शक्यता अधिक आहे.”
सुपारी म्हणाला, “तुमच्या एक लक्षात आलं का, आपल्याकडे सगळं काही आहे, परंतु आजपर्यंत आपल्याला कधीच कुठलाच पुरस्कार मिळालेला नाही.”
मलाही आश्चर्यच वाटलं. “हो रे. आजपर्यंत आपल्याला कधी कुठलाच पुरस्कार मिळालेला नाही.”
फाट्या आणि सखीलाही आश्चर्य वाटलं. “च्यायला आपलं अर्ध आयुष्य सरलं तरी आपल्याला कोणी पुरस्कार देऊ नये याला काय अर्थ?”
आम्ही फेमस नाही, कारण आम्हाला पुरस्कार मिळालेला नाही, आणि आम्हाला पुरस्कार मिळत नाही. कारण आम्ही फेमस नाही, हे आम्हाला कळलं. पण पुरस्कार मिळवायचे कसे आणि ते मिळतात कुठे? या प्रश्नाचं उत्तर आम्हा कोणाकडेच नव्हतं.
सुपारी म्हणाला, “मला एक दुकान माहीत आहे, तिथं खूप सॉलिड सॉलिड पुरस्कार विकायला ठेवलेले असतात.”
फाट्या म्हणाला, “मग काय सोपं आहे, आपण चार घेऊन येऊ आणि एकमेकांना देऊन टाकू. त्याचे फोटे काढू आणि छापून आणू. झालो फेमस.”
“गप रे बावट्यांनो, त्या दुकानात जाऊन सांगावं लागतं की, आमच्या संस्थेचं अमुकतमुक नाव आहे, मग तिथं पुरस्कार विजेत्यांची नावं द्यावी लागतात आणि आपण सांगितलेल्या डिझाइनचे पुरस्कार ते तयार करून देतात. आणि ते आपण करून चालणार नाही, आपल्यासाठी इतरांनी कुणीतरी केले पाहिजे.”
सगळेच दोन मिनिटं सायलेंट झाले.
मग फाट्या म्हणाला, “माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतो एक जण. त्याला च्यायला सतत पुरस्कार मिळत असतात, तो फेमस आहे. त्याला आपण विचारू या का पुरस्कार मिळण्यासाठी काय करतात ते”
“चालेल…” आम्ही तिघांनीही प्लॅन ओके केला. कारण कोणीतरी पुरस्कारविजेता गाठल्याशिवाय आम्हाला ब्रेक-थ्रू मिळणं शक्यच नव्हतं. फाट्याने त्याच्या शेजाऱ्याची रीतसर अपॉइंटमेंट वगैरे घेतली आणि एका रविवारी सकाळी आमच्या आलिशान गाड्या फाट्याच्या घराच्या गल्लीच्या शेजारी उभ्या राहिल्या. त्या गृहस्थाच्या घरात बघावं तिकडे पुरस्कारच ठेवलेले दिसत होते. गृहस्थ भला होता. त्याने स्वागत केलं. फाट्याने आमच्या सर्वांच्या वतीने प्रास्ताविक केलं. ‘आमच्या एक लक्षात आलं आहे की, हल्ली गाडी, एलसीडी, एसी, फॉरिन टूर, ९९टक्के मार्क्स मिळवणारी हुशार मुलं घरोघरी आहेत. जो उठतो तो साला यशस्वी होतो. आम्हीही झालो. दर दोन वर्षाला गाडी बदलून झाली, दर तीन वर्षाला नवं इंटिरिअर करून झालं आणि दोन दोन एक्स्ट्रा फ्लॅट घेऊन भाड्याने देऊन झाले. पण आम्ही फेमस मात्र झालो नाही. तर आम्हाला पुरस्कार वगैरे मिळवून फेमस व्हायचं आहे. याबाबत तुम्ही काय मदत करू शकाल?’
सुपारीलाही राहवलं नाही. ‘तुमच्याकडे आता पुरस्कार ठेवायला जागा राहिलेली नाही. तर आता यापुढे जर तुमच्याकडे पुरस्कारांची प्रपोजल्स आली तर ती तुम्ही आमच्याकडे डायव्हर्ट करा, त्याचं देणंघेणं काय असेल ते आपण बोलून घेऊ, त्याचं काय सेटिंग असेल तर ते सांगा आम्हाला.’
गृहस्थ शांत होता. त्याने घरात जाऊन चहा वगैरे सांगितला. आम्हा चौघांचं तो अगदी बारकाईने निरीक्षण करत होता हे माझ्या लक्षात आलं. चहाचं नाव निघाल्यावर सखीमधलं नको ते बाईपण नेमकं जागं झालं. ती म्हणाली, “मी आत जाते जरा मदत करायला.” गृहस्थ निग्रहाने म्हणाला, “नको. बसा तुम्ही.”
थोडा वेळ विचार करून आणि आमच्या प्रपोजलवर पुरेसे चिंतन झाल्यावर गृहस्थ म्हणाला, “तुम्ही राज्य पुरस्काराचं नाव ऐकलं आहे का?” आम्ही ‘हो’ म्हणालो.
“तुम्ही नॅशनल अ‍ॅवार्ड्स नाव ऐकलं आहे का?” आम्ही “हो” म्हणालो.
“तुम्ही फिल्म फेअरचं नाव ऐकलं आहे का?” आम्ही “हो” म्हणालो
“तुम्ही स्क्रीन पुरस्काराचं नाव ऐकलं आहे का?” आम्ही “हो” म्हणालो.
“तुम्ही चतुरंग पुरस्कारांचं नाव ऐकलं आहे का?” परत परत ‘हो’ म्हणण्याचा खरं तर आता कंटाळा आला होता. तरीही आम्ही “हो” म्हणालो.
त्यानंतर त्या गृहस्थाने, शाळेत सिलॅबस पूर्ण करावेत तशी मॅगसेसे, ग्रॅमी, ऑस्कर, बूकर, गोल्डन ग्लोब अशा सर्व पुरस्कारांची नावं घेतली. त्या सर्व पुरस्कारांच्या वेळी आम्ही ‘हो हो’ म्हणालो आणि एकदाची ती नामावळी संपली. चहा आला. तो घेता घेता गृहस्थ म्हणाला, “आता या सर्व पुरस्कारांचा प्रत्येकी एक एक विजेता मला आठवून सांगा. काही घाई नाही, सावकाश सांगा. वाटल्यास आज माझ्या घरीच जागरणाचा कार्यक्रम ठेवूया.”
कोणतीही तयारी नसताना अचानक परीक्षेची तारीख जाहीर व्हावी तसं आमचं झालं. आम्ही एकमेकांची तोंडं कधी नव्हे ते निरखून पाहू लागलो. त्यामुळे सखी अजूनही किती मादक आहे याचा माझ्याप्रमाणेच बहुधा उर्वरित दोघांनाही पुन्हा साक्षात्कार झाला असावा. कारण आम्ही सर्वांनीच आवंढे गिळले. बराच प्रयत्न केला तरी कुणालाही एकही कन्फर्म असं नाव आठवेना. पुन्हा पुरेसा वेळ गेल्यावर ते गृहस्थ म्हणाले, “दरवर्षी पाचपन्नास लोकांना पद्मश्री आणि पद्मभूषण मिळतात, त्यातला एक जण तरी तुम्हाला आठवतो का? परंतु पुरस्काराचं नाव मात्र चांगलच आठवतं. तुम्हाला सगळ्याच पुरस्कारांची नावं आठवतात. याचा अर्थ असा की पुरस्कार दिल्यामुळे, पुरस्कार देणारे फेमस होतात, घेणारे मात्र फेमस होत नाहीत. पेपरमध्ये बातमी येते, चार ओळखीचे लोक फोन करतात आणि दुसऱ्या दिवशीचा पेपर येतो तेव्हा आणखी कोणालातरी दुसरा कुठलातरी पुरस्कार मिळालेला असतो. मग लोक त्याला फोन करतात. पहिल्याला विसरून जातात. तेव्हा तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल तर पुरस्कार देणारे व्हा, घेणारे होऊ नका…”

  • क्ष-क्षुल्लक आणि इतर ५ कथा
  • लेखक : श्रीकांत बोजेवार

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जुलै २०२०


हे ईबुक खरेदी करण्यासाठी


Shrikant-Bojewar
पत्रकार व चतुरस्र लेखक श्रीकात बोजेवार यांच्याबद्दल इथे अधिक जाणून घ्या…

तिरकस राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लिखाणासाठी तसेच चित्रपटविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध. सकाळ, लोकसत्ता आणि आता महाराष्ट्र टाइम्स असा पत्रकारितेचा २८ वर्षांचा प्रवास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *