बाजीरावांना पेशवाई मिळाली तेव्हा दरबारातील विरोधकांनी विरोध केला होता हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच. नेमका तसाच विरोध आताही झाला.
बाजीरावाचा मुलगा त्याच्यासारखाच निपजेल कशावरून? त्यापेक्षा अनुभवी व्यक्तीला पेशवाई द्यावी अशी शाहू महाराजांकडे मागणी करण्यात आली, पण महाराजांनी मात्र पूर्वी बाळाजी विश्वनाथ गेल्यावर बाजीरावांनी विश्वास सार्थ करून दाखवला, तसंच आताही होईल असा विश्वास दाखवून बाजीरावांच्या मुलाला पेशवेपद दिलं.
हा नवा पेशवा होता बाळाजी बाजीराव उपाख्य नानासाहेब! बाजीरावांनी नानासाहेबांना वयाच्या अकराव्या वर्षीच सातारा दरबारात राजकारणं शिकण्यासाठी पाठवलं होतं. सोबतीला महादोबा पुरंदरे होतेच.
यामुळे, दरबारातील राजकारणं अगदी लहान वयापासूनच नानासाहेबांनी अनुभवली, त्यात महाराजांना नानासाहेबांचा लळा लागल्याने ते महाराजांच्या विश्वासासही पात्र झाले.
इ.स. १७४७ मध्ये विरोधकांनी उचल खाल्ल्याने महाराजांनी काही काळापुरतं नानासाहेबांना पेशवाईवरून दूर केलं होतं, पण या पदाची जबाबदारी घ्यायला दुसरं कोणीच पुढे येत नाही हे पाहून त्यांनी नानासाहेबांनाच पुन्हा पेशवाई दिली. इतकंच नव्हे तर मृत्यूसमयी ही पेशवाई परंपरागत कायम ठेवली.
नानासाहेब आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या एक पाऊल पुढे होते. बाळाजी विश्वनाथांची राजकारणी हुशारी आणि वडिलांची रणांगणावरील तीक्ष्ण बुद्धी या दोहोंचा संगम नानासाहेबांच्यात झाला होता.
आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत या माणसाने दहा मोठ्या मोहिमा काढल्या, अन त्यातल्या काही तर दोन-दोन वर्ष चालतील इतक्या मोठ्या होत्या.
नानासाहेबांची उत्तरेतली सगळ्यात गाजलेली मोहीम म्हणजे त्रिस्थळी यात्रा आणि बंगालची स्वारी. बाजीरावांच्या काळात वेगवान घोडदळ मुघलांनी अनुभवलं होतं, पण आता शक्तिप्रदर्शन करत ऐंशी हजारांहून अधिक चतुरंग सेना माळवा-बुंदेलखंडातून पार होऊन प्रयाग-काशी-गया वगैरे यात्रा करू लागली होती.
या सगळ्या प्रकरणात नानासाहेबांनी बादशहाकडून पूर्वी बाजीरावांनी मिळवलेल्या वचनांची पूर्तता करवून घेतली आणि माळवा बादशाही सनदांनुसार अधिकृतरीत्या मराठ्यांचा झाला. धारला पूर्वीच पवारांचं ठाणं बसलं होतं. आता इंदूरला होळकर आणि उज्जैनला शिंदे यांची कायमस्वरूपी ठाणी बसली.
नादीरशहाच्या स्वारीच्या वेळेस मुघलांना मराठ्यांची मदत हवीहवीशी वाटू लागली होती हे मागच्या लेखात सांगितलं आहेच. बादशाह महम्मदशाह हा तसा शौकीन होता, कायम नाचगाण्यात दंग असे. त्याला ‘रंगीला’च म्हणत असत. पण तरीही, राजकारणी बाबतीत काही वेळा तो शहाणपणाचे निर्णय घेई.
बाजीरावाचा हा मुलगा तसाच शूर आहे आणि सैन्य त्याच्या इशाऱ्यावर काहीही करू शकतं हे बघून बादशहाने मित्रत्वाचा हात तसाच पुढे ठेवला. इतक्यात एकामागून एक विचित्र घटनांची मालिकाच सुरु झाली.
इ.स. १७४७-४९ ही तीन वर्ष इराण ते दख्खन या संपूर्ण प्रदेशासाठी त्यांच्यात्यांच्या सत्ताधीशांच्या मृत्यूने सुतकाची ठरली. १७४७ मध्ये इराणचा नादिरशहा मृत्यू पावला, १७४८ मध्ये दिल्लीचा बादशाह महम्मदशाह रंगीला मृत्यू पावला, आणि १७४९ मध्ये इथे साताऱ्यात छत्रपती शाहू महाराजांचा वार्धक्याने मृत्यू झाला.
शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर अंतर्गत राजकारणांनी जोर धरला, आणि या साऱ्यात नानासाहेबांना दोन वर्षे इतर राजकारण करायला उसंतच मिळाली नाही.
अखेरीस रामराजांना छत्रपती म्हणून घोषित करून, सांगोला इथे साऱ्या सरदारांची व्यवस्था पूर्वीप्रमाणे लावून नव्याने राज्यकारभार सुरु झाला. रामराजे नवे असल्याने, त्यातही त्यांच्या आजूबाजूला मुत्सद्दी राजकारणी कोणी नसल्याने साताऱ्याहून मराठ्यांचं सत्ताकेंद्र पुण्याला आलं. शनिवारवाडा हा आता हिंदुस्थानच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र झाला.
दिल्लीच्या बादशहाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अहमदशाह गादीवर आला. त्याने आपला मित्र आणि अयोध्येचा नवाब सफदरजंग याला दिल्लीची वजिरी बहाल केली.
या सफदरजंगाबद्दल आपण पुढे पाहूतच, पण तिथे इराणमध्ये मात्र अशीच एक महत्वाची घडामोड घडत होती जिचा परिणाम पुढे भयंकर होणार होता. नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या खास विश्वासातल्या अहमदशाह अब्दालीने त्याचं पद धारण केलं.
अब्दाली वयाच्या तेराव्या वर्षी नादीरशहाच्या पदरी आला. जेव्हा नादीरशहाने हिंदुस्थानवर स्वारी केली तेव्हा अब्दाली त्याच्यासोबत होता.
अब्दालीच्या बाबतीत एक गमतीशीर प्रसंग असा घडला होता, की नादीरशहाच्या स्वारीत हैद्राबादच्या निजामाने अब्दालीचं भविष्य वर्तवलं आणि तुझी गादी हाच पुढे चालवेल असं सांगितलं.
नादीरशहाच्या खुनानंतर नादिरचा उत्तराधिकारी म्हणून अब्दालीने स्वतःच्या नावाची घोषणा केली आणि काबुलला स्वतंत्र राज्याची घोषणा केली. पुढच्या सहा महिन्यांच्या आत त्याने अंतर्गत बंड अंडी विरोधकांचं उच्चाटन करून आपलं राज्य निर्धोक बनवलं.
१७४८च्या सुरुवातीलाच मुघलांच्या अंतर्गत राजकारणामुळे अब्दालीला भारतावर स्वारी करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं. ही अब्दालीची पहिली स्वारी होती.
पंजाब ओलांडून अब्दाली दिल्लीकडे येताना दि. २१ मार्च रोजी सरहिंदजवळ मनुपुरला मुघल आणि अब्दालीची गाठ पडली. या युद्धात अब्दालीचा पराभव झाला, अन लढाईपूर्वीच मुघलांचा वजीर कमरुद्दीनखान मारला गेला.
अब्दाली परत फिरला. तिथे दिल्लीत बादशाह आजारी होता त्याचाही पुढच्या महिन्याभरात मृत्यू झाला, अन अहमदशाह गादीवर आला. थोडक्यात, अब्दालीच्या पहिल्या स्वारीनंतर लगेच दिल्लीचा बादशाह आणि वजिरही बदलला.
बादशाह-वजीर हे पूर्वीपासूनचे मित्र खरे, पण सत्ताब हाती येताच दोघांना एकमेकांपासून धोका जाणवू लागला. १७५० बादशाह आपल्याविरुद्ध कारस्थान करत आहे असं वाटून वजिराने बादशहाच्या मुख्य सरदारांच्या प्रदेशावर हल्ले करायला सुरुवात केली. परिणामी हे सारे सरदार वजिरविरुद्ध उठले ज्याची परिणीती पुढे आणखी विचित्र होणार होती.
दरम्यानच्या काळात अब्दालीने पंजाबवर दुसरी स्वारी करून मीर मन्नू नामक मुघल सरदाराचा पराभव केला होता, पण याही वेळेस अब्दाली पंजाबातून परत फिरला.
आता १७५१च्या सुमारास मात्र अब्दाली थेट दिल्लीवर चालून येणार अशी चिन्ह होती. अब्दालीचा प्रतिकार करणं हे गरजेचं होतं. वजिराने अहमदखान बंगशासह इतर पठाणांचा रोष ओढवून घेतल्याने बादशाहीत सारं आलबेल नाही हे उघड दिसत होतं. अशात अब्दाली आला तर काय करायचं हा प्रश्न साऱ्यांपुढे पडला.
….राजकारणाला आता पूर्णपणे वेगळं वळण लागणार होतं.
- कौस्तुभ कस्तुरे