मराठीत चांगल्या बालसाहित्यिकांची वानवा असण्याच्या काळात माधुरी पुरंदरे सातत्याने मुलांसाठी नवं लिहीत आहेत. मी त्यांच्या, २०१४ साली प्रकाशित झालेल्या ‘शेजार’ या दोन पुस्तकांच्या मालिकेविषयी लिहिणार आहे. या मालिकेत ‘सख्खे शेजारी’ आणि ‘पाचवी गल्ली’ अशी दोन पुस्तकं आहेत. मुलांसाठी लिहिताना सहसा एक ठोस सुरुवात आणि शेवट असलेल्या आणि बरेचदा काहीतरी ‘बोध’ किंवा ‘शिकवण’ देणाऱ्या बालकथा लिहिल्या जातात. पण या पुस्तकांत रूढार्थाने ‘गोष्ट’ नाहीये, तर हे ललित स्वरूपाचं लेखन आहे.
चंद्रसदन नावाच्या इमारतीत आपली आई आणि मावशीआजी यांच्याबरोबर राहणाऱ्या केतकीची तिच्या इमारतीतल्या सख्ख्या शेजाऱ्यांशी आणि त्यांच्या पाचव्या गल्लीतल्या इतरही ‘शेजाऱ्यां’शी कशी गट्टी जमते हे या पुस्तकाचं आशयसूत्र म्हणता येईल. पण यात केवळ केतकीची गोष्ट नाहीये, तर प्रत्येक प्रसंगातून, पात्रांमधून लेखिका माधुरी पुरंदरे आपल्याला सूचकपणे अनेक गोष्टी सांगत असतात. उदाहरणार्थ, यात विभक्त झालेले केतकीचे आई-वडील आहेत, जे फोनवर एकमेकांशी गप्पा मारतात. आपली बायको सारखी स्वयंपाक करत बसते म्हणून रागावणारे आणि सुंदर बासरी वाजवणारे, झाडांशी बोलणारे, पक्षी दाखवणारे दाजीकाका यात आहेत. कामावर जाणारी, ऐकू न शकणारी जियाकाकू आहे आणि त्यांच्या बाळाला संभाळून घरून काम करणारा तिचा चित्रकार नवरा कान्होबा आहे. नोकरी करून एकटी राहणारी, सगळं एकटीने मॅनेज करणारी परप्रांतीय सावित्री ऊर्फ बागुलीताई आहे. पिशव्या आणि दुपटी शिवून मिळणारे पैसे लोकांना वाटून टाकणारी रद्दीच्या दुकानातली ताई आहे… अशा प्रत्येक पात्राच्या लहान लहान कृतीतून, कधी एखाद्या संवादातून लेखिकेने मुलांपर्यंत अनेक चांगल्या गोष्टी आपोआप पोचवल्या आहेत.
केतकीची मावशीआजी सारखी म्हणते की, पूर्वी छोटी छोटी घरं होती. त्या घरांतली माणसं श्रीमंत नव्हती, पण प्रेमळ होती. आता जिकडे-तिकडे इमारती झाल्या. किती झाडं गेली, छोटी घरं गेली. या इमारतीच्या गर्दीत कुठं हरवून गेली, कळलंच नाही… पण या ‘बंद दारांच्या संस्कृती’च्या काळातही, या नव्या इमारतीतल्या शेजाऱ्यांशी गट्टी करता येते आणि छोट्या केतकीला ते जमतंही! कारण लेखिकेच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘आपण छान केलं की सगळंच छान होतं; जुनंही आणि नवंही…’ जुनं ते सगळं चांगलं होतं आणि आता काहीच तसं राहिलं नाही असं रडगाणं यात लावलेलं नाही. उलट या पुस्तकांत जुन्या आणि नव्या काळातल्या चांगल्या गोष्टींचा मिलाफ केलेला आहे. मुलांसाठी लिहिणं हे मोठ्यांसाठी लिहिण्यापेक्षा खूप जास्त अवघड असतं. मुलांचा रस टिकवून ठेवून, त्यांना वाचताना मजा येईल आणि त्याचबरोबर जे सांगायचं आहे तेही नकळत पोचेल असं लिहिणं माधुरी पुरंदरे नेहमीच साध्य करतात, आणि ही दोन पुस्तकंही त्याला अपवाद नाहीत. रोआल्ड डाल म्हणतात की, ‘You can rite about anything for children as long as you have got humour!’ या पुस्तकातही गालातल्या गालात हसवतील अशी अनेक वाक्यं आहेत. उदाहरणार्थ, ‘दाजीकाकांच्या घरात उमाकाकूसुद्धा राहतात. त्या मावशीआजीची मैत्रीण आहेतच, पण दाजीकाकांची बायकोसुद्धा आहेत.’ किंवा ‘मावशीआजी केतकीवर कानांनी, डोळ्यांनी आणि नाकानंसुद्धा बारीक लक्ष ठेवते. खरंच!’ मुलांना गंमत वाटेल अशी केवळ वाक्यंच नाहीत, तर लेआउटचे प्रयोग, वेगवेगळी मजा आणि बारकावे असलेली चित्रं अशा सगळ्याच गोष्टी मुलांना आकर्षित करतात आणि खुदकन हसवतात. विनोदाबरोबरच दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखनाची शैली. मुलांसाठी आहेत म्हणून ही पुस्तकं बालिश आणि बाळबोध नाहीत किंवा आजच्या काळाची भाषा म्हणून उगीचच इंग्रजी शब्दही यात वापरलेले नाहीत. पण पुस्तकांतल्या पात्रानुसार वेगवेगळी भाषा वापरली आहे. उदाहरणार्थ, सावित्री इंग्रजी आणि मोडकी-तोडकी मराठी बोलते. किंवा पुस्तकात ‘इमारत, परडी, प्रसन्न, हुंगणं, दोस्त, गपगार’ असे हल्ली सहसा न वापरले जाणारे मराठी शब्द लेखिका मुद्दामहून वापरते.
मुलांच्या पुस्तकातली त्यांना आवडेल अशी अजून एक गोष्ट म्हणजे अद्भुताचा घटक. याही पुस्तकात लहानसे अद्भुत घटक आहेत. कधी ते शब्दांतून येतात, तर कधी चित्रांतून. जसं की, ढगात राहणाऱ्या जादूगाराच्या महालाकडे जाणारा जिना. शेवटी, या पुस्तकांतल्या अतिशय महत्त्वाच्या बाबी म्हणजे चित्रं. मुलांच्या लकबी, त्यांची बसण्याची, इकडे-तिकडे बघण्याची पद्धत यांचं अतिशय उत्तम आणि बारकाईने निरीक्षण करून केलेली केतकीची चित्रं, आजच्या काळातल्या तरुण सावित्रीचे कपडे आणि एकूणच फॅशन, तिच्या खोलीतला पसारा, मावशीआजी आणि तिच्या मैत्रिणींचं चित्र ही तर खास जमलेली चित्रं आहेत. माधुरी पुरंदरेंच्या पुस्तकांत मजकूर आणि चित्रं दोन्ही तितकीच महत्त्वाची असतात आणि मजकुरातून ते ज्या सांगत नाहीत ते चित्रांतून टिपलेलं असतं. ही चित्रं केवळ मजकुराचं चित्ररूप नसतात, तर ती लेखनाला आणखी पुढे नेणारी असतात, हे विशेष.
अशी ही शेजार मालिका लहान मुलांना तर आवडेलच, पण मोठेही ही पुस्तकं हातात घेतल्यावर खाली ठेवणार नाहीत!
– रमा हर्डीकर-सखदेव
‘सख्खे शेजारी’ आणि ‘पाचवी गल्ली’ / लेखिका : माधुरी पुरंदरे / ज्योत्स्ना प्रकाशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- कॉल ऑफ द सीज / लेखक- चंद्रमोहन कुलकर्णी / मनोविकास प्रकाशन.
- खिडक्या अर्ध्या उघड्या / लेखक- गणेश मतकरी / मॅजेस्टिक प्रकाशन.
- मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट / लेखक- सतीश तांबे / रोहन प्रकाशन.
- रावण आणि एडी / लेखक- किरण नगरकर / पॉप्युलर प्रकाशन.
- नाइन्टीन नाइन्टी / लेखक- सचिन कुंडलकर / रोहन प्रकाशन.
- भिंतीत एक खिडकी असायची / लेखक- विनोदकुमार शुक्ल / अनुवाद : निशिकांत ठकार / साहित्य अकादमी प्रकाशन.
- शोध (पूर्णपणे सचित्र व रंगीत) / लेखक- स्वाती राजे / कलानिर्देशन : चंद्रमोहन कुलकर्णी / रोहन प्रकाशन.
पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल मार्च २०२१
लक्षणीय पुस्तकं
वाचा जाणा करा
९ पुस्तकांचा संच
कविता महाजन
सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी
नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट
यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी
आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती
इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत.
मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून
प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे.
मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या
आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!
शोध
[taxonomy_list name=”product_author” include=”528″]
चिमुकल्या धुळीच्या कणाला येत होता
आकाशातल्या सूर्याचा भारी राग!
या सूर्याची खोड मोडण्यासाठी
त्याने सुरू केला एक गमतीदार शोध!
तर ही गोष्ट,
‘धुळकोबा’ने सुरू केलेल्या
शोधाशोधीची आणि शेवटी त्याला
लागलेल्या एका वेगळ्याच शोधाची!
चला शोधू या; धुळकोबाला कसला शोध लागतो ते!
तू माझी चुटकी आहेस
फारुक. एस. काझी
या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !
आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.
गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…
पूल
स्वाती राजे
अरुणाचल प्रदेशमध्ये घडणारी हृदयस्पर्शी गोष्ट.
छोट्या मिरीची. तिचा रागराग करणाऱ्या तिच्या आजीची
आणि हो ! दूरदूरची दोन टोकं जोडणाऱ्या एका ‘पुला’चीही