पृथ्वीच्या पाठीवर माणसाचं पहिलं अस्तित्व उमटलं तेव्हापासून आजपर्यंत भौतिक, सांस्कृतिक, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक अशा अनेक अंगांनी मानववंशाची प्रगती होत राहिली आहे. अर्थात ही प्रगती आपसूक झालेली नाही. प्रखर बुद्धिमत्ता, व्यासंग आणि ध्येयनिष्ठा आणि उत्कट सामाजिक भान असणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांच्या कर्तृत्वामुळे अचंबित व्हायला लावणारा हा प्रवास शक्य झाला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात इतिहास घडविणाऱ्या या व्यक्तींनी गतकाळाचं अवकाश तर उजळलंच, पण त्यांनी सुभग भविष्यासाठी अनेक प्रकाशमान वाटा खुल्या केल्या. विविध क्षेत्रातली अनेक असामान्य व्यक्तिमत्त्वं भारतीय मातीत जशी घडली, तशी ती जगभरातही ठिकठिकाणी होऊन गेली. अशा काही निवडक भारतीय आणि अभारतीय अलौकिक व्यक्तींचा परिचय ‘मानवी जीवन समृद्ध करणारे प्रज्ञावंत’ या दोन पुस्तकांच्या संचानं करून दिला आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असणारे अरिवद वैद्य यांनी कुमार वाचकांसाठी या संचाचं लेखन केलं आहे.
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत इतिहासाकडे पाठ फिरवायची, केवळ कुतूहल किंवा मनोरंजन म्हणून इतिहास वाचायचा, किंवा इतिहासाला त्याच्या चुकांसकट अंधळेपणानं स्वीकारून घट्ट उराशी धरायचं, यापैकी कुठलाच पर्याय समाजाच्या निरोगी वाढीसाठी उपयुक्त तर नसतोच; उलट घातक असतो. मागच्या चुका टाळून आणि कालातीत मूल्यं वेचून वर्तमान आणि भविष्य घडविण्यासाठी इतिहासाची पानं उलटायची असतात. याच दृष्टीनं भारतातल्या आणि विदेशातल्या विविध प्रज्ञावंतांची ओळख या संचानं कुमारांना करून दिली आहे.
या संचाचा लक्ष्यगट डोळ्यासमोर ठेवून प्रज्ञावंतांची निवड करणं हे खरं तर आव्हानात्मक काम होतं. ही निवड लेखकानं दोन निकषांवर केली आहे. सगळ्या जगभरात आणि भारतातही असामान्य व्यक्तिमत्त्वांची परंपरा फार मोठी आहे. पण एकोणिसाव्या शतकापासूनची प्रारंभरेषा या संचानं स्वीकारली आहे. शिवाय मोठी पण फार परिचित व्यक्तिमत्त्वं जाणीवपूर्वक या संचात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्याऐवजी ज्यांची इतिहासाच्या पुस्तकांमुळे नावापुरती ओळख असते, किंवा अनेकदा ज्यांचं कार्य नजरेआडच राहतं अशा व्यक्तिमत्त्वांचा समावेश यात आहे.
आधुनिक भारताचा पाया घडविणारे आणि संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देणारे जगन्नाथ शंकरशेठ, भारतीय स्वातंत्र्य चळवळीची बीजं रोवणारे पितामह दादाभाई नौरोजी, भारतीय समाजमनात स्वातंत्र्याचं स्फुलिंग चेतवणारे लाल-बाल-पाल, यांच्यापासून अभियांत्रिकी ज्ञानशाखेचं महत्त्व अधोरेखित करणारे विश्वेश्वरय्या, भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक परिमाण देणारे जे.आर.डी. टाटा, विसाव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेसाठी भरीव योगदान देणाऱ्या दुर्गाबाई देशमुख, जागतिक नकाशावर भारताचं नाव नेणाऱ्या पहिला महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी यांच्यापर्यंत बावीस व्यक्तिमत्त्वांचा परिचय भारतीय प्रज्ञावंत या पहिल्या पुस्तकात आहे.
परदेशी प्रज्ञावंत या दुसऱ्या पुस्तकात पृथ्वीवरचे अनोळखी प्रदेश उजेडात आणणारे धाडसी प्रवासी ख्रिस्तोफर कोलंबस, फíडनंड मॅगलेन, वास्को-द-गामा आणि कॅप्टन कुक पासून विज्ञानक्षेत्राची क्षितिजे विस्तारणारे गॅलिलीओ, न्यूटन, आइनस्टाइन यांसारखे प्रतिभावंत शास्त्रज्ञ, लेखक, उद्योजक, राजकारणी, प्रशासक, विचारवंत अशी बहुपदरी ओळख असणारे अमेरिकेचे राष्ट्रपुरुष बेन्जामिन फ्रँकलिन, अमेरिकेत लोकशाहीचा पाया रुजविणारे जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन, गुलामगिरीविरुद्ध लढणारे थॉमस जेफरसन, आधुनिक इंडोनेशियाचे शिल्पकार जनरल सुकार्नो, वंशवादाविरुद्धच्या संघर्षांत आयुष्य खर्च करणारे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला, जगाला समाजवादाची देणगी देणारे कार्ल मार्क्स, रशियन राज्यक्रांतीचे जनक व्लादिमीर लेनिन, चीन, क्युबा आणि व्हिएतनामचे क्रांतिकारी नेते माओ-त्से-तुंग, फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा आणि हो-चि-मिन्ह अशा एकोणीस व्यक्तिमत्त्वांचा परिचय आहे.
भारतीय भूमीवर किंवा विदेशी मातीत आपल्या ठळक पाऊलखुणा उमटविणाऱ्या या सगळ्या व्यक्तींचं कार्य खरोखर आभाळाएवढं मोठं आहे. पण कुमारवर्ग नजरेसमोर ठेवून थोडक्यात चरित्रात्मक तपशील आणि ठळक, संक्षिप्त कार्यजीवन अशा पद्धतीनं प्रत्येकाची मांडणी केली आहे. अनेकांनी तर अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. अशा वेळी त्यांच्या कमी परिचित कामाची, दृष्टीची ओळख या पुस्तकात जाणीवपूर्वक अधोरेखित केली आहे. कवी म्हणून नावाजल्या गेलेल्या रवीन्द्रनाथांचं शिक्षण आणि शेतीसारख्या क्षेत्राला मिळालेलं योगदान या संचात विशेषत्वानं उल्लेखलेलं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तिमत्त्वाविषयी सविस्तर वाचण्याची ऊर्मी या संचामुळे निर्माण व्हावी, अशी अपेक्षा आहे. शिवाय या सगळ्याच प्रज्ञावंतांचा प्रवास सुकर नव्हता. अनेकांना त्या त्या काळात मोठ्या टीकेला तोंड द्यावं लागलं, त्यांच्या भूमिकांवर, कार्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. अनेकांच्या कामाकडे आजही विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलं जातं. अशा आक्षेपांची सत्यासत्यता स्पष्ट करण्याचा, कोणत्या सामाजिक परिस्थितीत त्या त्या व्यक्तींनी विशिष्ट भूमिका मांडली, हे सांगण्याचा चांगला प्रयत्न वैद्य यांनी केला आहे. प्रज्ञावंतांना संकुचितपणे विशिष्ट कप्प्यात न बसवता एकीकडे त्यांच्या कामाची व्यापकता लक्षात यावी आणि दुसरीकडे आपापल्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या मूलगामी कामाचं महत्त्व लक्षात यावं, अशी या संचामागची दृष्टी आहे.
चारेक दशकांपूर्वी शं. रा. देवळे यांनी ‘थोरांच्या कथा’ या नावाने लिहिलेल्या पुस्तकमालेची आठवण या संचानं जागवली आहे. प्रतिभा आणि प्रज्ञेच्या अफाट आणि बहुरंगी विश्वाची झलक दाखवून माझ्या मागच्या पुढच्या दोन-तीन पिढय़ांच्या जाणिवा विस्तारण्याचा प्रयत्न करणारी ती माला होती. आज एकविसाव्या शतकातल्या, बुद्धीची धार अधिक तीव्र असलेल्या कुमारांच्या पंखांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या जाणिवांची व्याप्ती आणि खोली वाढविण्यासाठी या नव्या संचाचा निश्चित उपयोग होईल. पालकांनी आवर्जून आपल्या मुलांच्या हातात द्यावा, असा हा संच आहे. मात्र कलाक्षेत्रातल्या व्यक्तींची उणीव हा संच वाचताना भासते, हेही सांगावंसं वाटतं. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके वगळता कलेच्या प्रांतातल्या देशी किंवा परदेशी व्यक्तींचा समावेश या संचात नाही. कला केवळ कलाकाराच्या स्वानुभूतिपुरत्या मर्यादित नसतात. समाजजीवनावर कलांचा थेट जाणवण्याजोगा (tangible) परिणाम कदाचित होत नसेल, पण सर्जनशीलतेचं पोषण करून व्यक्तिगत आणि सामाजिक अभिरुची समृद्ध करण्याचं आणि परिवर्तनाला गती देण्याचं काम कलाच करत असतात. जगभरातल्या अनेक कलावंतांनी आयुष्यभर जपलेला अफाट ध्यास, निष्ठा आणि कलेसाठी कष्ट उपसायची तयारी ही मूल्यं आजच्या केवळ पशाभोवती फिरणाऱ्या जगात मुलांसमोर ठेवणं फार गरजेचं आहे. या दृष्टीनं या संचात कलावंतांचा समावेश आवर्जून केला असता, तर तो अधिक परिपूर्ण झाला असता, असं वाटतं.
– वर्षां गजेंद्रगडकर
(सौजन्य : दै. लोकसत्ता, लोकरंग)
हा संच विकत घेण्यासाठी…
प्रज्ञावंत संच
गेल्या काही शतकांत असे अनेक `प्रज्ञावंत’ होऊन गेले
ज्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळे विविध क्षेत्रांचा विविधांगी विकास होऊन
मानवी जीवन अनेक अंगाने समृद्ध होत गेलं.
अशा काही भारतीय आणि परदेशी महान व्यक्तिमत्त्वांचं योगदान सांगणारी,
त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी ही व्यक्तिचित्रणं…अर्थात `प्रज्ञावंत १ व २!’
₹450.00Add to Cart