फॉन्ट साइज वाढवा
२३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने तरुण ग्रंथप्रेमी, विचक्षण वाचक अभिषेक धनगर यांनी ‘माझी निवड’ स्तंभासाठी लिहिलेला हा मर्मग्राही लेख…
वरील अवतरण हे मनोहर श्याम जोशी यांच्या ‘क्याप’ या कादंबरीची सुरुवात आहे. या अवतरणातून ध्वनित होतं तसा हा प्रस्तावनेचा भाग नाही, तर तो कादंबरीच्या संहितेचाच भाग आहे. ‘क्याप’ कादंबरीची अशी सुरुवात कादंबरीचा रूपबंध समजण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहे.
दोन हजार वर्षांपूर्वी गुणाढ्याने ‘बृहत्कथे’ची रचना केली; पण काळाच्या ओघात अनेक उत्तम ग्रंथांप्रमाणे बृहत्कथा लुप्त झाली. आज बृहत्कथेचे अवशेष सोमदेवाने रचलेल्या ‘कथासरित्सागर’ आणि क्षेमेन्द्राच्या ‘बृहत्कथा-मंजिरी’ या दोन ग्रंथांतून आपल्याला वाचायला मिळतात. ‘कथासरित्सागर’ हे मूळ पैशाची भाषेतील बृहत्कथेचे उत्कृष्ट असे संस्कृत रूपांतर समजलं जातं. त्यामुळे ते बृहत्कथेचं संस्कृत रूपांतर असल्याने आद्य लेखकाचा मान साहजिकपणे गुणाढ्याकडे जातो. कैलासस्थित श्रीशंकर पार्वतीचं मन रिझवण्यासाठी तिला गोष्ट सांगू लागतो. त्या कथेतील एक पात्र दुसरी एक उपकथा सांगू लागतं. पुन्हा त्या उपकथेतून अजून एका कथेची उत्पत्ती होते आणि कथा-उपकथांची ही मालिका अशाच तऱ्हेने पुढे जात जात पुन्हा मुख्य कथानकाच्या धाग्यावर अलगद येऊन मुख्य कथेला गती येते. अशी चक्राकार रचना असणाऱ्या शेकडो कथा गुणाढ्याने रचल्या. उपरोक्त अवतरणात म्हटल्याप्रमाणे कथेच्या मूलभूत तत्त्वांत काहीतरी मौलिक करून दाखवण्यासाठी गुणाढ्याने कसलाही अवकाश रिता ठेवलेला नाही. मनोहर श्याम जोशी कथेच्या सुरुवातीलाच वाचकाला याचं स्मरण करून देतात की, गुणाढ्याने आम्हा सर्वच आधुनिक कथालेखकांसमोर हा पेच उभा केला आहे. तरीही मी ही कथा सांगणार आहे, असं सांगून गुणाढ्याचं आव्हान स्वीकारल्याचं सूचित करतात.
‘क्याप’च्या कथानकाची सुरुवात ही दुहेरी खुनाच्या तपासापासून होते. वाल्मीकीनगर इथे भैरव मंदिराजवळ पोलीस डी.आय.जी. मेधातीथी जोशी आणि माफिया सरगना हरध्यानु हे एकमेकांच्या जीवावर उठलेले दोन शत्रू मृतावस्थेत आढळतात. दोन्ही मृतांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यात दोघांचा खून झाला असल्याची कुठलीच चिन्हं आढळत नाहीत. दोघंही एकमेकांचे शत्रू असले तरी दोघांनीही एकाच वेळी एकमेकांना कसं मारलं असावं? आणि मारलं असेल तर कशा प्रकारे? की त्या दोघांचाही खून कुणी तिसऱ्याच व्यक्तीने केला असावा? हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिल्याने वृत्तपत्रांतूनही या प्रकरणाला ‘भैरव-कांड’ या नावाने मोठी प्रसिद्धी मिळते. इथं निवेदक वाचकाला सांगतो की, दुहेरी खुनाचं हे रहस्य समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात मागे डोकावून हे भैरव-कांड जिथे घडलं त्या शहराच्या वसण्याची कथा समजून घ्यायला हवी. कारण, भैरव-कांड कथेचा उगमच मुळी तिथून होतो. निवेदक आता चौदाव्या शतकातील शहराच्या वसण्याची कथा सांगू लागतो. पण हे रहस्य पूर्णांशाने उलगडायचं असेल, तर केवळ शहराची कथा पुरेशी नसून ज्या भैरव मंदिराजवळ हे खुनाचं नाट्य घडलं आणि ज्याच्या नावाने हे प्रकरण ओळखलं जाऊ लागलं त्या मंदिराच्या स्थापनेची कथा समजावून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मंदिराच्या स्थापनेनंतर कथा पुन्हा मूळपदावर येत आहे असं वाटत असतानाच निवेदक स्वत:च्या जीवनाबद्दल सांगू लागतो.
‘क्याप’च्या कथेचा मोठा अवकाश निवेदकाच्या जीवनाने व्यापला आहे. मागास जातीत जन्माला आलेला नायक, त्याचं काकांकडून आलेल्या वैचारिक वारशाच्या रूपात कम्युनिस्ट असणं, नायकाचं ब्राम्हण मुलीच्या प्रेमात पडणं आणि नायिकेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नायकाचं आपल्या मूळ गावी येऊन स्थानिक राजकारणात सक्रिय होणं, कम्युनिझमच्या प्रसारासोबत कार्ल मार्क्सच्या नावाने मठाची स्थापना करणं, अशा प्रकारे ही कथा पुढे जात राहते. या स्थानिक राजकारणामुळेच भैरव-कांड घडल्याचं निवेदक सांगतो. पण हे कांड कुणी घडवलं या रहस्याचं काय करायचं? दोन शत्रू मृतावस्थेत सापडतात. दोघांचेही खून झाल्याची कसलीच चिन्हं शवविच्छेदनात आढळत नाहीत. मग भैरव-कांड घडलं कशामुळे? याचा उलगडा यथावकाश होतो. या कथेच्या सुरुवातीलाच लेखक सूचित करतो तशी ही कथा प्राचीन आख्यानांचा रूपबंध घेऊनच पुढे पुढे जात राहते. तरी लेखक पुन्हा स्वत:ला गुणाढ्याने आखलेल्या रेषेच्या आतच उभं असल्याचं पाहतो. परंतु या कादंबरीतून लेखकाने गुणाढ्याने आखलेल्या रेषेबाहेर झेपावण्याची क्षमता असणारी लांब उडी घेतली आहे हेही निश्चितपणे सांगता येते. ती कशी ते पाहू –
- प्राचीन आख्यायिकांमध्ये अद्भुत कथा सांगत असल्याची वाचकाला सतत जाणीव करून दिलेली असते. मनोहर श्याम जोशींची कथा वास्तवाच्या पक्क्या पायावर उभी आहे.
- प्राचीन आख्यायिकांत अभावानेच आढळणारा विनोद आणि मानवी जीवनातल्या शोकांतिकेकडेही विनोदी दृष्टीने पाहत तिची तीव्रता सौम्य करण्याचं कसब मनोहर श्याम जोशींच्या कथेत आहे.
- प्राचीन आख्यायिकांच्या स्वत:च्या अशाही काही मर्यादा आहेत. कथेला औत्सुक्याच्या शिखरावर असताना शापवाणी/ आकाशवाणी / पूर्वजन्माचं स्मरण अशा दुर्बल युक्तीने अकस्मात कथेचा अंत होऊन रसभंग होतो. असे कच्चे दुवे मनोहर श्याम जोशींच्या कथेत आढळत नाहीत.
- निखळ कथा सांगणं आणि कथा सांगण्याचा मनमुराद आनंद घेणं या दोन्ही गोष्टी साध्य करतानाच मनोहर श्याम जोशी समकालीन जीवनावर महत्त्वपूर्ण भाष्य करतात. जाती-व्यवस्था आणि सामाजिक रचना, क्रांतीचं स्वप्न पाहणाऱ्या बौद्धिक जीवांची कृतिहीन माथेफोड, जीवनाच्या मूलभूत प्रेरणांकडे दुर्लक्ष करत पूर्वग्रहांच्या गर्तेत अडकत चाललेल्या तरुणांची शोकांतिका हे गंभीर प्रश्नही जोशीजी या कथेतून उभे करतात.
-अभिषेक धनगर
क्याप / मनोहर श्याम जोशी / साहित्य अकादमी प्रकाशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- पासोडी / लेखक- नीतीन रिंढे / पपायरस प्रकाशन
- ग्रेप्स ऑफ रॉथ / लेखक- जॉन स्टाइनबेक / अनुवाद : मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन
- आडवाटेची पुस्तकं / लेखक- निखिलेश चित्रे / लोकवाङ्मय गृह प्रकाशन
- झेन अॅण्ड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स/ लेखक- रॉबर्ट पिरसिग / अनुवाद :सरोज देशपांडे / रोहन प्रकाशन
- लोकसाहित्याची रूपरेखा / लेखिका- दुर्गा भागवत / वरदा प्रकाशन
- अक्षरनिष्ठांची मांदियाळी / लेखक- अरुण टिकेकर / रोहन प्रकाशन
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२१