…काही लोक माझ्याकडे संशयाने बघू लागले. एका झाडुवालीशी असं विनंती आर्जव करून काय बोलतोय हा टापटीप गृहस्थ, असं वाटून काहीजण माझ्या रोखाने बघू लागले. सुधाला मी म्हटलं, ‘‘सुधा, लोक बघताहेत. चल आत. तिथं बसू. खूप बोलायचंय. तुझ्या भेटीसाठी मी मुद्दाम आलोय. प्लीज चल.”
कशीबशी ती तयार झाली. हॉटेलचा एक कोपरा बघून आम्ही बसलो. मी पुन्हा अदबीने बोलू लागलो, ‘‘सुधा, कशी आहेस?’’
ती तिरकसपणे बोलू लागली, ‘‘पर माजी येवडी इचारपूस कशापायी वो? आम्ही मेलो का जित्तं हाव ते बघाय आलावा का? हेची चवकशी कराया आलावा का? कशापायी आता खपली काडाया लागलाव….’’

सुधाचे डोळे टचकन् भरूनच आले. मीही भावुक झालो. काय बोलू, कसं सांत्वन करावं? खूप अवघड होतं. आभाळ तर काळंकुट्टं भरून दाटून आलंय, पण एक थेंबही पडत नव्हता. नुसती घालमेल, घुसमट चाललेली. सुधा खाली पायाकडे बघत होती. गळ्यात मंगळसूत्र होतं. काळ्या मण्यात दोन मणी व डोरलं. कपाळावर तेच भरगच्च गोल गरगरीत कुंकू. मी बघतोय टक लावून ते सुधाच्या ध्यानात आलं. पुन्हा सुधाच बोलू लागली, ‘‘सांगा लवकर काय काम ते, मला झाडायला जायाचं हाय. मुकादम वरडत्याती.’’

“सुधा, तुला भेटायला आलोय. कशी आहेस विचारायला. आता काम काय आहे म्हणून सांगू?’’
ती गप्प… पुन्हा मीच– “कशी आहेस?’’
“बरी हाय. बगताव की कशी हाय ती.”
समोरून मी उठून तिच्या शेजारी बसायला गेलो तशी झिडकारत म्हणाली. ‘‘हितं जवळ नाय, समूरच बसा, लांबनंच बोला. दासरापना करायचं काम न्हाय.’’
ती आक्रमक होऊन बोलू लागली. पुन्हा वेटर आला, “साब, बोलो ना, क्या चाहिए?’’ मी “अरे बाबा थोडं थांब ना. मी बोलावतो,’’ म्हणून त्याला दटावलंच. तो सुधाकडे संशयाने बघत गेला. मी सुधाजवळच बसलो. तिची अवस्था दयनीय होती. मळकट साडी, पायांत जुनी तुटत आलेली आणि टाचा झिजलेली चप्पल. ती खाली जमिनीकडे बघत नखाने फरशीवर उगाचच टोकरत होती. पायाच्या बोटात खूप झिजलेली, रुळलेली जोडवी होती. जुनी असावीत. आमच्या लग्नातली. काय बोलावं, काय विचारावं सुचत नव्हतं. बोलायचं खूप होतं, परंतु शब्दांचे बांध फुटत नव्हते… शब्द अडून होते व्यक्त व्हायला, सुधासारखेच.
“जावू का, कामं तटलीत,” ती.
“कुठं ऱ्हातेस? कोण कोण आहे घरी?’’
ती शांत होत आली होती.
“समूर घंटाचाळीत. सवतीसंगट.”
“सवत? म्हणजे?”
“तुमच्यासारकं म्या थाटात लगीन न्हायी केलं. भैन रुकमिनीच्या नवऱ्यानं आसरा दिला. ऱ्हातेय त्याची रांड म्हणून….’’
“आसं काय बोलतेस?”
“का झोंबलं काय माझं बोलनं. तुमी सुखात ऱ्हावं आन म्या?” तिचा आवाज थरथरत होता.
“तुला मुलं?’’
नाकावर टिच्चून सांगावं तसं ती ठसक्यात ठणकावून सांगू लागली, ‘‘दोन झाली, सांगा तुमच्या आईला. म्हातारी मला उठल्याबसल्या वांझुटी म्हनायची, सासूने तर माझी जिंदगानी बरबाद केली आन तुमी नंदीबैला सारखं….’’ ती बोलायचं थांबली. तिचा राग, आवेश योग्यच होता. मी समजावू लागलो, ‘‘सुधा, सगळे नशिबाचे खेळ असतात बघ. जे झालं ते झालं. पण मी तुला अजून विसरलो नाही. खूप चौकशी करायचो. तरी तुला हुडकून काढलंच की न्हाय.”

L.S. Jadhav
लेखक ल.सि. जाधव

“म्या बी न्हाय इसरले तुमच्या आईने माझा केलेला छळ. मी किती येळा तुम्हाला रडून रडून सांगायचे. आन् तुम्ही सासूसुनाच्या मदी म्या पडत न्हाय म्हनून उठून भाईर जायचा. हे बरुबर होतं का? म्या आडानी. तुमी तर शिकल्यासवरल्यालं व्हतात की वो.”
तिचा सूर रडवेला होता. ‘‘माझं लय वाटुळं झालं वो. दादा, माय, भाव सगळं धास्तीनं एक एक मरून गेलं. दारांवर नांगुर फिरला आमच्या.”
मी हलकेच तिचा हात हातात घेतला. तसा तिने पुन्हा झिडकारला. ‘‘हात लावायचं काम न्हाय.’’
बोलण्यातील तेगार तोच. मी पुन्हा तसाच बळंबळं घेतला. हात राकट, घट्टे पडलेले सहज जाणवत होते. ती काहीशी भावुक झाली. मीही. तब्बल ४८ वर्षांनंतर, सगळं तारुण्य गळून गेल्यावर आम्ही दोघंही म्हातारे इतक्या हळुवार प्रेमाने भारावलो होतो. कुणी बघेल याचं भय मनात यत्किंचितही नव्हतं. ती बरीच ओशाळली. रडू लागली. डोळ्याला पदर लावला. एकच म्हणाली, ‘‘असं का हो झालं? माझा तुमच्यावर लय जीव होता. मीबी न्हायी विसरले आजुक तुम्हास्नी.’’
मीही भावुक झालो. ‘‘हे बघ सुधा, जे झालं ते झालं. नशिबाचे खेळ हे. मला अलीकडे बी.पी.चा, शुगरचा त्रास आहे. खूप थकल्यासारखं वाटतंय. माझी सत्तरी आता ओलांडलीय. आयुष्याचा काय भरवसा? तुला भेटायचं हे अलीकडे खूप वाटत होतं. भेट झाली नाही अखेरपर्यंत ही सल मनात राहू नये म्हणून मी आलो. आता मन मोकळं वाटतंय.’’
मी वेटरला हाक मारली. ‘‘सुधा, आपण मिळून जेवू. राइसप्लेट मागवितो.’’
ती काही बोलली नाही. वेटरला दोन राइसप्लेटची ऑर्डर दिली. सुधा म्हणाली, ‘‘मी आले. तितं फडक्यात भाकर हाय. घेऊन येते.” तिने लगेच गडबडीने जाऊन आणलीही.
राइसप्लेट आली. तिने फडक्यातली दशमी सोडली. दोन जाड भाकऱ्या, दाळगा, शेंगाची चटणी होती. माझ्या ताटात तिने भाकर, दाळ, थोडी चटणी ठेवली. तिनेही घेतली. जेवू लागलो. मी भाकरीचा तुकडा हातात घेतला आणि तिला भरवू लागलो. तिने “आवं, हे काय? हे हॉटेलवाले बगत्यात, मला वळकत्यात. नका करू तसं”, असं म्हटलं. पण मी ‘‘एकतरी घास घे,’’ म्हणून आग्रह केला. मी भाबडा, वेडाच.
आम्ही भुकलेले होतो, आमची भूक भेटीचीही होती. कसा योग असतो, आश्चर्यच!
मी माझ्या मुलांबद्दल, बायकोबद्दल जेवता जेवता माहिती दिली. आई गेल्याचं बोललो. एक भाऊ, भागवत तोही हार्टफेलने अचानक गेल्याचं सांगितलं. ‘रावसाब व्हय, आरं देवा,’ असं मात्र हळहळत म्हणाली.
जेवण झालं.

मी माझ्याजवळची काखेत अडकवलेली शबनम बॅग टेबलावर ठेवली. त्यातली प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केलेली साडी बाहेर काढली. आणि दहा हजाराचं शंभर रुपयाच्या नोटांचं पाकीट काढलं. तिच्या हातात देऊ लागलो. तिने विरोध केला. ‘नको, नको’ म्हणू लागली. ‘कशापायी ही परतफेड’ असं बोलू लागली. पण मी ‘गप्प बस, ऱ्हाऊ दे’ म्हणत बळेबळे तिच्या हाती दिलेच. आणि ते माझ्या सुंदराआत्यासाठी घेतलेले पाच टरबुजी सोन्याचे मणी डबीसह तिच्या हवाली केले. तिने डबी उघडून पाहिलं. मणी हातात घेतले, तेवढ्यातही तिने प्रश्न केला, “डोरलं कुठाय?’’
मी काय बोलणार? तिचा प्रश्न खरा होता. काटेरी होता. जणू सूळकाटाच.

  • सूळकाटा
  • लेखक : ल.सि. जाधव


पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०१९


हे आत्मकथन खरेदी करण्यासाठी…

Sulkata-cover

सूळकाटा

प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं.
सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा…

250.00Add to cart


रोहन शिफारस

होरपळ

सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामथ्र्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे. साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…

Horpal Cover

250.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *