…कुलाब्यातील रीगल थिएटरसमोर अगस्ती टॅक्सीमधून उतरताच एक जण अदबीने पुढे आला आणि म्हणाला, ‘सर, माझ्यासोबत या.’ त्या व्यक्तीसोबत चालत चालतच अगस्ती गेट वे ऑफ इंडियाला पोचला. ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची पत्नी क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी १९११ साली बांधण्यात आलेल्या, रोमन, भारतीय आणि मुस्लीम वास्तुशैलींचं मिश्रण असलेल्या त्या शानदार कमानीकडे अगस्ती कौतुकाने पाहत असतानाच, सोबतच्या व्यक्तीने समुद्रात उभ्या असलेल्या शुभ्र रंगाच्या शानदार यॉटकडे बोट दाखवलं. ‘लगून ५६०’ असं लिहिलेली ती चोवीस-फुटी डौलदार यॉट पाहताच तिच्या आतील ऐशारामी व्यवस्थेची कल्पना येत होती. ती व्यक्ती अगस्तीला यॉटपर्यंत घेऊन गेली. आत चार जणांच्या बसण्याची व्यवस्था होती, पण एकच व्यक्ती बसलेली होती. अगस्तीने आत पाऊल टाकताच ती व्यक्ती उठून उभी राहिली आणि पुढे होऊन तिने अगस्तीचं स्वागत केलं. त्या भरभक्कम माणसाने हात हाती घेतला तेव्हा अगस्तीला त्याच्या हातातली ताकद जाणवली.
सहा फूट उंच, उभा आणि अगडबंब आडवा देह, पोट सुटलेलं, अर्धवट टक्कल पडलेलं. वयाची पन्नाशी ओलांडून पाच-सहा वर्षं नक्कीच झाली असतील किंवा कदाचित साठीही गाठली असेल. टीशर्ट आणि स्पोर्ट्स शॉर्ट्समध्येही त्या व्यक्तीचा अधिकार कळत होता, रुबाब दिसत होता. समोरासमोर ठेवलेल्या दोन गलेलठ्ठ सोफ्यांच्या मध्ये असलेल्या टीपॉयवरील पसारा पाहून त्या व्यक्तीचा खाण्या-पिण्याचा कार्यक्रम तब्येतीत सुरू असल्याचं लक्षात येत होतं.
‘मी राघव, वेलकम टू माय प्रायव्हेट यॉट… प्लीज कम.’
अगस्तीने हसून, मान लववून स्वागताचा स्वीकार केला.
‘काय घेणार तुम्ही? मी व्हिस्की घेतो आहे.’
‘व्हिस्की मलाही चालेल,’ असं म्हणत अगस्ती सोफ्यावर बसला. यॉट आता समुद्राचं पाणी कापत निघाली होती.
राघवने अगस्तीच्या ग्लासाला ग्लास भिडवला आणि रोस्टेड डायमंडची पत्र्याची रंगीत, नक्षीदार डबी उघडून अगस्तीसमोर धरली आणि म्हणाला, ‘हिअर इट इज… योर फेवरेट.’ या राघव ऊर्फ आरकेचा काल सकाळी अगस्तीला फोन आला होता. राघवने पहिला प्रश्न विचारला होता, ‘आर यू महाराष्ट्रीयन?’ अगस्तीने होकार देताच राघवला आनंद झाला. ‘दॅट्स ग्रेट. माझं नाव राघव कोहली, पण लोक मला आरके या नावानंच ओळखतात.’
‘राघव कोहली? रोस्टेड डायमंड?’
‘ग्रेट… तू मला ओळखतोस तर.’
‘तुम्हाला नाही, पण तुमच्या ब्रँडला ओळखतो.’
‘नेव्हर माइंड, माय ब्रँड इज माय होल आयडेंटिटी.’
‘उत्तम व्हिस्कीचा स्वाद जिभेवर असतानाच तुमच्या रोस्टेड डायमंडच्या नाजूक डब्यातला खारवलेला, भाजलेला उत्तम प्रतीचा बदाम जिभेवर ठेवला की, त्या स्वादाची लज्जत वाढते… आयम थँकफुल टू यू.’
‘मस्त वाटलं हे ऐकून मला. आपण भेटू शकतो का? केवळ तुम्हीच करू शकाल असं एक काम आहे माझं तुमच्याकडे. उद्या इव्हिनिंगला चारच्या सुमारास तुम्ही गेट वे ऑफ इंडियाला येऊ शकाल?’
अगस्तीने होकार दिला आणि आता तो आरकेच्या समोर बसलेला होता. समुद्राच्या खालीवर होत असलेल्या लाटांवर सायंकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशाचा थर साचलेला होता आणि जणू त्याच सोनेरी पाण्याने भरलेले ग्लास दोघांच्या हाती होते. यॉट वेगाने अलिबागच्या दिशेने निघाली होती.
‘तू माझा गेस्ट आहेस आज रात्री. तुला पाहिजे असल्यास आपण अलिबागला माझ्या बंगल्यावर पोचल्यावर मुद्द्याचं बोलू आणि आत्ता छान गप्पा मारू.’
‘नको, गप्पा आपण रात्री मारू, आत्ता कामाचं बोलून घेऊ, शुद्धीत आहोत तोवर.’
यावर आरके मोठ्ठ्याने हसला. जवळजवळ गडगडाटच केला त्याने हास्याचा.
‘ओके. आय विल स्ट्रेट कम टू द पॉइंट. तुमच्या महाराष्ट्रातला एक मोठा चित्रकार आहे, हरामखोर आहे एकदम. आय विल फक् दॅट बास्टर्ड.’
‘ओके… तुमचा राग कळला मला. या रागाचं कारण आणि त्या चित्रकाराचं नावही सांगून टाका आता.’
‘सॉरी, मी जरा वाईट भाषेत बोललो. पण त्या माणसाचं नाव निघालं की, पाठोपाठ शिवी निघते माझ्या तोंडून. हिज नेम इज चंद्रप्रकाश गोरे.’
‘ओके. चंद्रप्रकाश गोरे. आय नो, ही इज वेलनोन अँड सिनिअर आर्टिस्ट. त्यानं काय केलं?’
आरकेचा स्वर थोडा कठोर झाला, ‘सी, त्याच्याकडे माझ्या बायकोचं एक पेंटिंग आहे. न्यूड पेंटिंग. व्हेन शी वॉज नाइन्टीन इअर्स ओल्ड, क्वाइट ओल्ड पेंटिंग. कारण आता ती चव्वेचाळीस वर्षांची आहे. माझ्या बायकोला ते पेंटिंग हवं आहे. बट दॅट बास्टर्ड इज नॉट रेडी टू सेल इट. मी त्याला तो मागेल ती किंमत द्यायला तयार आहे.’
‘ओके, एवढंच?’ राघवकडे रोखून पाहत अगस्तीने विचारलं.
‘लग्नाची सिल्वर ज्युबिली आम्ही लवकरच सेलिब्रेट करणार आहोत. सिल्वर ज्युबिलीचं गिफ्ट म्हणून बायकोनं मला ते पेंटिंग मागितलं आहे. तो माणूस ते द्यायला तयार नाही, विकायलाही तयार नाही. समबडी आस्कड मी टू सीक योर हेल्प.’
‘पण मी तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. मी यात काय करू शकतो? तुम्हाला माझ्याविषयी चुकीची माहिती मिळाली आहे काहीतरी.’
‘मला माहिती आहे तुझं प्रोफेशन. सी, माझ्याकडे पॉवर आहे, पैसा आहे. मी त्याच्यावर दबाव आणून ते पेंटिंग मिळवू शकतो. त्याला धमकी देऊनही माझं काम करून घेऊ शकतो किंवा त्याच्यावर इन्कम टॅक्सची रेड पडण्याची व्यवस्थाही करू शकतो. पण त्यामुळे उगाचच चर्चा होईल या गोष्टीची आणि मला ती व्हायला नको आहे… कारण तू समजू शकतोस. मला वाटतं की, त्या माणसाला कोणीतरी हे समजावून सांगावं की, बाबा रे, तू बऱ्या बोलानं ते पेंटिंग देऊन टाक. समहाऊ मला वाटलं की, तू त्याला कनव्हिन्स करू शकशील.’
‘तुमची बायको कधीकाळी न्यूड पेंटिंगसाठी मॉडेल म्हणून काम करत होती का?’
‘नाही.’
एवढं बोलून राघव थांबला. त्याने ग्लासातली उरलेली व्हिस्की एका घोटात संपवली आणि रिकाम्या ग्लासवर बोटातल्या जाडजूड अंगठीने नाजूकसे प्रहार करण्याचा चाळा तो करू लागला. आपल्या प्रश्नाने तो द्विधा झाला असावा, हे अगस्तीने ताडलं. अस्वस्थ, द्विधा झालेली माणसं स्वत:च्या नकळत असे चाळे करत असतात. कुणी नाक खाजवतं, कुणी कानाची पाळी बोटांच्या चिमटीत धरतं, कुणी मांडीवर हलकेच चापट्या मारतं. एकेकाची तऱ्हा असते. अगस्तीने राघवला विचार करायला वेळ दिला तोवर व्हिस्कीचा आणि रोस्टेड डायमंडचा आनंद घेत राहिला. एखाद-दोन मिनिटं गेली असतील. अलिबागची मांडवा जेट्टी दिसू लागली होती. राघव उठून उभा राहिला. ‘तुझ्या प्रश्नाचं उत्तर रात्री देईन मी. चल, मी तुला इथं उभारलेला माझा स्वर्ग दाखवतो.’…
- न्यूड पेंटिंग @19
- लेखक : श्रीकांत बोजेवार
पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२१
डिटेक्टिव्ह अगस्तीचे कारनामे वाचण्यासाठी…
‘अगस्ती इन अॅक्शन’ मालिकेतील ‘हरवलेलं दीड वर्ष’ कादंबरिकेतील भाग
‘हरवलेलं दीड वर्ष‘ कादंबरिकेतील भाग
‘मला माहिती आहे ते. पण माझं तुमच्याकडे जे काम आहे ते काम पोलीस करू शकणार नाहीत, किंवा असं समजा की, मला पोलिसांकडे जायची इच्छा नाही.’ ‘अंडरवर्ल्डमधली माणसंही करू शकणार नाहीत?’
‘अगस्ती इन अॅक्शन’ मालिकेतील ‘अंगठी १८२०’ कादंबरिकेतील भाग
अझमतने रियाला घातलेल्या त्या एंगेजमेंट रिंगमध्ये टॅफिएट या नावाने ओळखला जाणारा महागडा हिरा होता. दुर्मीळ निळसर, गुलाबी झाक असलेला हिरा…