करोना नावाच्या इवल्याशा व्हायरसने सगळं जग वेठीला धरलेलं असताना, आपण सगळेच जण या व्हायरसशी लागण होऊ नये म्हणून काळजी घेतो आहे. या व्हायरससह जगायचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच करोनासोबत कसं जगायचं याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या पुस्तकांतील निवडक भाग इथे देत आहोत…


‘कोव्हिड-१९’मुळे ‘पॅन्डेमिक’ हा वैद्यकीय क्षेत्रातला शब्द पुन्हा आता सर्वश्रुत झाला आहे. ‘कोव्हिड -१९’ हे नामकरण डब्ल्यू.एच.ओ.च्या अध्यक्षांनी केलं आहे – करोना व्हायरस डिसीज-१९ (Corona Virus Disease-19), अर्थात कोव्हिड-१९. त्याचं ‘१९’ हे पालुपद आहे २०१९ सालात हा आजार प्रथम पुढे आला त्यावरून. कोव्हिडच्या या साथीचा उगम चीनमधल्या वुहानमध्ये झाला. साधारण १ कोटी १० लाख लोकसंख्या असलेल्या वुहानमधून मात्र ही साथ चीनमध्ये इतरत्र पसरली नाही. याला काही कारणं आहेत. चिनी सरवकारने वेगाने पावलं उचलून तिला आटोक्यात ठेवलं. पण त्यांनी सुरुवातीला या साथीविषयी कमालीची गुप्तता पाळली, आणि जगाला त्याचा सुगावा लागू दिला नाही. अर्थात, हा रोग ‘पॅन्डेमिक’चं स्वरूप धारण करेल याची त्यांनाही कदाचित तेव्हा कल्पना आली नसेल. परंतु, चीनने अतिशय कमी वेळात ही साथ आटोक्यात आणून दाखवली. त्याला पुढे ‘वुहान मॉडेल’ असं नाव पडलं. काय केलं त्यांच्या सरकारने? एक म्हणजे, उपलब्ध सर्व शक्ती आणि संसाधनं एकत्र आणून वुहानवर केंद्रित केली. सर्व पायाभूत सुविधा अतिशय कमी वेळात निर्माण केल्या – १४ दिवसांत १२०० बेड्सचं हॉस्पिटल तिथे उभारणं, हा बहुधा जागतिक विक्रम असावा. त्याबरोबर देशातल्या विविध भागांमधून ४६,००० डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक विमानाने किंवा ट्रेनने वुहानमध्ये दाखल केले. आणि वुहान आयसोलेट केलं; म्हणजे या शहराला जोडणारे सर्व रस्ते चाक खोदून टाकले! शहरभर सॅनिटायझरची फवारणी करणारे ट्रक्स फिरवले. या ‘पराक्रमा’ने जगभर चीनबद्दल एक राग-मिश्रित कौतुकाची भावना निर्माण झाली.

Coronasobat Jagtana

चीनमधून हा रोग इटलीमध्ये पोचला. त्यामुळे पुढे ही साथ स्पेन, बेल्जियम, फ्रान्स करत करत अमेरिका, ब्रिटन आणि मग ब्राझील, भारत आणि अन्य ठिकाणी पाहता पाहता पसरली. युरोप आणि अमेरिकेने ही साथ सुरुवातीला फारशी गांभीर्याने घेतली नाही, आणि त्याचे परिणाम हे देश भोगत आहेत.
या सर्व घडामोडी भारत कांहीशा अंतराने पाहत असल्याने, आपण वेळीच सावध होऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू आयात होत असूनही कोव्हिडचा प्रसार हळू झाला. कारण चीन आणि भारतादरम्यान माणसांची वर्दळ जवळपास नसल्यात जमा आहे.
कोव्हिड, ज्याला आपण सर्वसामान्यत: ‘करोना’ असं म्हणतो आहोत ते एक जैविक चक्रीवादळच आहे असं म्हणता येईल. प्रत्येक देशाने वेगवेगळ्या प्रकारे याचा सामना केलेला दिसतो. चीनने वुहानला संपूर्णपणे ‘सील’ करून टाकलं, तर भारताने लवकर, प्रदीर्घ ‘लॉकडाउन’चा मार्ग अवलंबिला. १४० कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या भारतात ‘भीती’चा योग्य वापर करण्यात आला. कशाचीही भीती तीन प्रकारची असू शकते – मानसिक, भावनिक, आणि शारीरिक (मृत्यूची भीती). कोव्हिडच्या बाबतीत, मृत्यूचं भय सर्वाधिक आहे. एकीकडे आधुनिक वैद्यकाची झगमगीत, डोळे दिपवणारी प्रगती लोकांना दिसते. त्यामुळे मनुष्यजातीने आता मृत्यूवर मात केली आहे असा भ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर जेव्हा हजारो लोक या साथीत दगावू लागले, तसं भीतीची जागा ‘पॅनिक’ने घेतली. संपूर्ण मानव जात जणू गर्भगळित झाली. या भीतीचा सामना तीन प्रकारे कता येतो – अज्ञान दूर करणं, आशा जागृत ठेवणं, आणि मनाचा निग्रह करून अंगी चिकाटी ठेवणं. या पुस्तकाचा हेतूदेखील वैद्यकीय माहिती सांगून लोकांमधलं अज्ञान दूर करणं, भीती कमी करून आशा जागृत ठेवणं हाच आहे!
म्हणूनच या पुस्तकात संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, मास्कचं महत्त्व, हातांची स्वच्छता, तपासण्या, होम आयसोलेशनची नियमावली, लहान मुलांची काळजी, हॉस्पिटलमध्ये केव्हा भरती व्हावं, प्लंबर, कॅब-रिक्षा ड्रायव्हर, सलून कामगार इ. कोणती काळजी घ्यावी, अशा न्यू-नॉर्मल काळात दैनंदिन जीवन जगण्यासाठी काय काळजी घ्यावी हे पुस्तकात अचूक व नेमक्या रितीने सांगितलं आहे.

  • करोना’सोबत जगताना’ पुस्तकातील निवडक भाग
  • लेखक : डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग

आपल्या शरीराची संरक्षणव्यवस्था म्हणजे इम्यून सिस्टिम आणि प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी. या संरक्षणसंस्थेचे सदस्य आहेत आपल्या पांढऱ्या पेशी, लिम्फ नोड्स, थायमस ग्रंथी, पाणथरी (स्प्लीन) आणि लिम्फोसाइट सेल्स. देशाची संरक्षणव्यवस्था लक्षात घ्या. सेना, वायू आणि नौ, ही तीन दलं, अनेक ठिकाणी चौकीपहारे, प्रत्यक्ष लढणारे सैनिक, त्यांना जरूर त्या ठिकाणी घेऊन जाणारे, दारूगोळा बनवणारे, सैनिकांना पुरवणारे, आणि सैन्याच्या हालचालींचा समन्वय ठेवून त्यांना योग्य आदेश देणारे असे वेगवेगळे लोक देशाच्या संरक्षणासाठी काम करतात. अगदी तसेच व्यवहार मानवी शरीरातही चालतात. आपल्या इम्यून संस्थेचीसुद्धा तीन दलं आहेत. सर्वांत बाहेरची संरक्षक भिंत किंवा तटबंदी म्हणजे आपली बाह्यत्वचा आणि अंतस्त्वचा हे पहिलं आघाडीचं दल. जी मुळात प्रत्येकाकडे जन्मजात असते, ती ‘इनेट इम्युनिटी.’ हे दुसरं दल; आणि जी विशिष्ट परिस्थितीत विकसित होते, ती ‘अडाप्टिव्ह किंवा अकवायर्ड इम्युनिटी’ तिसरं दल.
मित्रांनो, खरं सांगू? एखाद्या विषयाच्या आपण जेवढं खोलात शिरू, तेवढं आपल्या लक्षात येतं की, आपण पुन्हा मूलभूत गोष्टीकडे फिरून आलो आहोत. ‘मी जर चांगला धट्टाकट्टा असेन तर कोणत्याही रोगाला पुरून उरेन. त्या रोगावर कोणतंही रामबाण औषध किंवा लस निघाली नसेल तर माझी प्रतिकारशक्तीच मला तारून नेईल’ हे ओघाने आलंच. मग ही प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय करता येईल, हा आज आपला फोकस असला पाहिजे. बाहेरून मदत मिळणार नसेल, तर आपणच ‘आत्मनिर्भर’ व्हायला हवं!
निर्दोष निरामय जीवनशैली, स्वास्थ्याची जाणीवपूर्वक जोपासना हीच प्रतिकारशक्ती वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. आणि तिची महत्त्वाची सूत्रं आहेत – सम्यक आहार, सम्यक विहार, सम्यक विचार, पुरेशी विश्रांती, व्यसनमुक्ती आणि पूरक द्रव्यं. याशिवाय अजून दोन मुद्देही विचार घ्यावे लागतील – प्रदूषण टाळणं आणि व्यवसायजन्य घटकांची काळजी घेणं.

Pratikarshakti Kashi Vadhval

सम्यक आहार म्हणजे सर्व आहारघटक – प्रथिनं, कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वं आणि क्षार, तंतुमय पदार्थ आणि पाणी हे सर्व योग्य प्रमाणात असावं. म्हणजे नेमकं काय? आपलं जेवण घरात बनवलेलं, ताजं, सकस आणि चौरस असावं. ते गरम गरमच खावं. ज्या पदार्थांमुळे घसा खराब होऊ शकतो असे पदार्थ सध्या टाळलेले चांगले. उदाहरणार्थ- फ्रीजमधील पाणी, शीतपेयं, आइसक्रीम, तेलकट पदार्थ, बंद पॅकिंगमध्ये मिळणारे वेफर्ससारखे पदार्थ. त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा. त्यातून चुकून खाण्यात आलंच तर ताबडतोब हळद-मीठ घालून कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात आणि वाफारे घ्यावेत.
भारतीय आहारात प्रथिनं कमी असतात, विशेषत: शाकाहारात, हे लक्षात घेऊन दूध, दही, पनीर, डाळी, मोड आलेली कडधान्यं यांचा अंतर्भाव नियमित हवा. कारण इम्यून संस्थेसाठी, अ‍ॅण्टीबॉडीज बनवण्यासाठी ते आवश्यक आहे. प्रथिनांचे इतर स्रोत म्हणजे अंडी, मासे आणि मांस. हेही पदार्थ हवेत; पण शक्यतो घरी शिजवलेले. ताजी फळं असावीत. लिंबाचा वापर सढळपणे करावा. पारंपरिक मसाले, आलं, लसूण, हळद योग्य प्रमाणात असावं. भाज्या-फळं स्वच्छ धुऊन घ्यावीत, पण काही लोकांना मी पाण्यात पोटॅशियम परमँगनेट घालून या वस्तू बुडवून ठेवताना बघितलं. असा अतिरेक करायची गरज नाही. लक्षात घ्या, उकळलेला, शिजवलेला, प्रेशर कुक केलेला प्रत्येक पदार्थ सुरक्षित आहे, निर्जंतुक आहे. फळं धुऊन सोलून घ्यायची आहेत. गाजर-काकडी तर आपण सालं काढून खातो.
वेगळ्या शब्दांत सांगायचं तर जो आहार खाऊन तुम्ही लहानाचे मोठे झालात, जो तुम्हाला सोसतो, पचतो, रुचतो असा पारंपरिक आहारच बरा. घरात राहिल्यामुळे अनेकांना वेगवेगळे पदार्थ बनवायची स्फूर्ती येत आहे. चांगली गोष्ट आहे. पण नवीन पदार्थ बनवताना त्यांचे उष्मांक, त्यांची पोषणमूल्यं लक्षात घ्यायला विसरू नका. नाहीतर सक्तीच्या लॉकडाउमध्ये पटकन वजन वाढून बसायचं. सध्याच्या काळात पार्सल सर्विस किंवा टेकअवे खाद्यपदार्थ मागवू नयेत. त्यात पोषणमूल्यं कमी असतात आणि ते पदार्थ पुन्हा बरेच गरम न केल्यास जंतुसंसर्गाचा धोका असतो.

  • प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? पुस्तकातील निवडक भाग
  • लेखिका : डॉ. लिली जोशी

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०


करोनासह आत्मविश्वासाने जगण्यासाठी उपयुक्त संच

अनलॉक मालिका संच

‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…

दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…

१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग

२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल? – डॉ. लिली जोशी

३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस

४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर

पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…

मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…

300.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *