‘अंतर्मनात डोकवा’ – बाहेर जाता येत नाही, पण अंतर्मनात तर डोकावता येतं ना? किती चुकीच्या गोष्टी आपण सांभाळत बसतो. पूर्वग्रह, गैरसमज, हट्टीपणा, ताठरपणा, स्वार्थ, क्रोध, अहंकार, लोभ, मत्सर… ही अशी यादी प्रत्येकाने करावी. गुणांचीही अन् दोषांचीसुद्धा. चुकीच्या, भ्रामक समजुती, ताठरपणा दूर केला अन् परिस्थितीचा स्वीकार केला, विचारात लवचिकता आणली, जोडीला सहनशक्ती आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवली तर परिस्थितीचं आकलनही वाढतं. समजूतदारपणे, शहाणीवेने प्रश्नांची उत्तरं शोधता येतात. यासाठी विचारात, दृष्टिकोनात बदल करणं आवश्यक असतं. म्हणजे ‘न्यू नॉर्मल’ला अधिक सक्षमपणे सामोरं जाता येईल.

Coronakalatil Manasik Aarogya

‘न्यू नॉर्मल’ – सध्या हा परवलीचा शब्द झाला आहे. करोनामुळे, लॉकडाउन काळात अनेक बदलांना आपण सामोरं जातोय. या बदलांना ‘न्यू नॉर्मल’ असं म्हणतात. त्यानुसार शाळेत वा ऑफिसात जाणं म्हणजे संगणकाच्या खोलीत जाऊन ठरलेल्या वेळेत लॉग इन करणं. संपूर्ण स्वावलंबी होणं; जुन्या सवयी सोडून नवीन सवयी जडवून घेणं. सांधा बदलताना आगगाडीच्या चाकांचा थोडा खडखडाट होतो, पण पुन्हा ती सुरळीतपणे मार्गस्थ होते. बदल अंगवळणी पडला की, नवी सवय रुजते. तंत्रज्ञान आणि संगणक हे जगण्याचं अविभाज्य अंग झालेत. त्यांची कास धरावीच लागेल. वास्तवाशी जुळवून घेण्याला पर्याय नाही. हे सगळं सोपं करण्यासाठी आपल्या विचारांची साथ असावी लागते. वास्तवाचं भान आलं की परस्परांना सांभाळत, मुलांनाही समजून घेत, बदलांशी जुळवून घेत पुढे जाता येतं. यासाठी आपली मानसिकता बदलणं आवश्यक असतं.
मानसिकता बदलायची कशी?
माणसं खरंच बदलतात का? स्वभावाला औषध असतं का? ताण न घेता, न भांडता, निराश न होता अगदी मजेत खरंच जगता येतं का? (असले प्रश्न कुरकुऱ्या स्वभावाच्या लोकांकडून हमखास विचारले जातात.) असले प्रश्न मला मानसतज्ज्ञ या नात्याने अनेक जण, अनेकदा विचारत असतात.
यावर माझं एकच उत्तर असतं, की होय. स्वभावाला औषध असतं अन् ते आपल्याच हातात असतं. स्वत:मध्ये बदल नक्कीच करता येतात. त्यासाठी –

१. मला बदलायचं आहे, स्वत:त सुधारणा करायची आहे ही जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे.
२. बदल घडवण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती हवी.
३. ताठरपणा बदलाच्या आड येतो हे लक्षात घेतल्यास स्वीकाराची मानसिकता तयार होते. ती झाल्यास समुपदेशनाचा निश्चित उपयोग होतो.
४. मानसिक पातळीवर बदलासाठी कष्टांची तयारी हवी.
५. शिकवलेल्या गोष्टी अमलात आणण्यासाठी आधी त्या आपल्या विचारात ठसायला हव्यात. त्यासाठी गृहपाठ आणि सराव पुरेशा गांभीर्याने करणे आवश्यक असतं.

  • ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेलं सोपं मार्गदर्शन’ पुस्तकातील निवडक भाग
  • लेखिका : डॉ. विजया फडणीस

आणखी काही असंही…

ऑनलाइन हा पर्याय आहे, पण तो एकच किंवा एकमेव नाही. वेगळा विचार केला तर एरवीही या कारखाना छाप शिक्षणाला आपणही कंटाळलो आहोतच. घेऊया या बंदची संधी. थोडं तरी पारंपरिक शिक्षणातून बाहेर पडूया. त्याबाहेर शिक्षणाची एक मोठ्ठी शाळा आहे. निसर्ग, परिसर, भवतीभवतीची माणसं कितीतरी शिकवत असतात. या सगळ्यांपासून आपण मुलांना बाजूला काढतो नि शिक्षण नावाच्या कप्प्यात टाकतो. तिथे मुलांवर पुष्कळ प्रक्रिया करतो (शिक्षा, सक्ती, बंधनं, आग्रह, उपदेश). एक दिवस बाहेर काढतो. बाहेर पडल्यावर मुलं गडबडतात. हे काय वेगळंच! जगणं वेगळं आहे. जगण्याशी नातं जोडायचंय. भूतकाळ-भविष्यकाळ वर्तमानाने जोडायचाय. सोपं करून समजून घेऊया.

Coronakalatil-Kalpak-palakatwa-cover

गंमत बघा हं. माझी आजी तिसरी शिकलेली. तिच्या ८०/८२ व्या वर्षी तिच्या पुस्तकातल्या कविता म्हणून दाखवायची. मी माझ्या पुस्तकातल्या कविता गुणगुणते तेव्हा माझं वय ६२/६३ असतं. माझा नातू म्हणतो, ‘आता कविता गुणगुणताही येत नाहीत आणि त्या पाठही करायच्या नसतात’. काळ बदललाय. जर मुलांना आवडत असतील तर ‘आठवणीतल्या कविता’ भाग १ ते ४ बघा. त्यातल्या कविता निवडा. पाठ करून घ्या. पाठांतरावर भर द्यायचा नाही, पण पाठांतर अजिबात नको– असंही नाही. देवासाठी नसले तरी भाषेसाठी काही संस्कृत श्लोक, स्तोत्रं म्हणून घेता येतील. उच्चारावर त्याचा चांगला परिणाम होतो. लक्षात ठेवण्यासही मदत होते. जमलं तर अर्थ सांगाच.
मुलांच्या सृजनाला चालना –
हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे मुलांच्या बोटांना काम देण्याची! आपल्या बोटांना काहीतरी करायला लावायची! मग मुलांच्या हाताला काही काम देता येईल? काही ऑनलाइन कोर्सेस करता येतील? कदाचित मुलांना मजा वाटेल.
कात्री, सुई-दोरा, टेस्टर, वायर, सुरी, पट्टी, टेप अशा किमान गोष्टी आपल्या घरात असतात. चिकटपट्टी, डिंक, रंग, पुठ्ठा, कार्डपेपर, रिकामे डबे-बाटल्या हेही असतं. शिवाय अनेक प्रकारचे मेकॅनो, इतर खेळ असतात. या सगळ्याला हात लावायला तशी परवानगी नसते. ‘हे तुझं काम नाही. नको ते उद्योग करू नकोस. आहे तो अभ्यास कर.’ मग बोटातली नवं काम करण्याची… नवं तयार करण्याची इच्छाच मरते. खरं तर मुलं म्हणजे नवनिर्मितीचा प्रचंड मोठा स्रोत आहे. त्यामुळे त्यांच्यातील या सर्जनशीलतेला संधी देण्याचा आपण प्रयत्न करूया. याचा अर्थ फक्त कविता करणं, गोष्ट लिहिणं एवढाच नाही. जे जे नवीन निर्माण केलं जातं ते ते सर्जक असतं. याचा आनंद मुलांना असतो. एक दिवस मुलांना सांगूया– ‘ज्याला जे बनवता येतं त्यांनी त्यांनी ते ते बनवा.’ काही दिवसांची मुदत देऊया. त्या तारखेत २/४ दिवस मागे-पुढे होईल. काही हरकत नाही. जे तयार होऊन येईल त्याचे प्रदर्शन भरवूया सोसायटीत. मात्र पालकांनी नाही सहभाग द्यायचा यात. वेडंवाकडं असू दे. पण मुलांनी बनवलेलं असू दे.

  • ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व मुलांच्या समस्यांशी जुळवून घेताना’ पुस्तकातील निवडक भाग
  • लेखिका : रेणू दांडेकर

पूर्वप्रकाशित रोहन साहित्य मैफल नोव्हेंबर २०२०


करोनासह आत्मविश्वासाने जगण्यासाठी उपयुक्त संच

अनलॉक मालिका संच

‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…

दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…

१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग

२. प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? – डॉ. लिली जोशी

३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस

४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर

पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…

मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…

300.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *