…सकाळचे नऊ वाजत आले तरी अगस्ती बेडवरच होता. सहा बाय सहाच्या त्याच्या आलिशान आणि आधुनिक बेडच्या तेवढ्याच गुबगुबीत हेडबोर्डला पाठ टेकवून, पाय लांब करून तो बसला होता. एक दीर्घ जांभई देत त्याने साइड टेबलवर ठेवलेल्या मोबाइलकडे पाहून ‘गुड मॉर्निंग’म्हटलं. मोबाइलचा स्क्रीन ऑन झाला आणि कामाला लागला. त्याने स्वत:लाच स्वॅन केलं आणि सांगितलं, ‘यू हॅव सिक्स मिस्डकॉल. ऑल फ्रॉम मल्लिका.’
‘ओके. एनी मेसेजेस?’
‘येस. वन फ्रॉम मल्लिका.’
‘प्लीज रीड इट फॉर मी.’
‘एफ यू. एकस्लमेशन मार्क.’ ‘ओके. रिलॅक्स,’ त्याने हसत हसत मोबाइलला आराम करायला सांगितलं आणि ‘टाइम्स’ हाती धरला. पेपर घेण्यासाठी म्हणून त्याने केलेल्या हालचालींमुळे त्याचं पांघरूण अंगावरून अर्धवट घसरलं. अंगावर शॉर्ट्सव्यतिरिक्त काहीच नव्हतं. डेरेक रोझची आकाशी निळ्या रंगाची परफेक्ट फिट शॉर्टस घातलेली असल्याने त्याची एक पुष्ट मांडी उघडी पडलेली होती. गोऱ्या नितळ त्वचेमुळे त्वचेखालच्या निळसर रक्तवाहिन्या टरारून आल्यासारख्या दिसत होत्या. हाती धरलेला ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वाचताना तो चाळा म्हणून उघड्या मांडीवर हळुवार तळहात फिरवत होता. त्या हातासोबत त्याच्या पिळदार दंडावर काढलेला टॅटूही जणू हलत होता. त्याने दंडावर गोंदवून घेतलेली ‘प्रायन’ ही ग्रीक सुंदरी स्वप्नाळू डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. मध्येच त्याने पेपर बाजूला ठेवला आणि सुंदरसिंगने साइड टेबलवर आणून ठेवलेल्या थरमॉसमधून गरमागरम ब्लॅक कॉफी मगात ओतली. कॉफीचे घोट घेत त्याने परत ‘टाइम्स’ हाती धरला, तेवढ्यात डॅक किनमधून पंजाने मिश्या साफ करत आली आणि बेडवर उडी घेऊन तिने अगस्तीच्या मांडीवरच बैठक मारली. पेपर वाचता वाचता तो तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला आणि डॅक डोळे मिटून त्याच्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागली. बातम्यांचे मथळे वाचून अगस्तीने मुख्य पेपर बाजूला टाकला आणि ‘बॉम्बे टाइम्स’ उघडला. पहिल्याच पानावर Eनह ब्दल् म्aह ुraं ूप rग्हु, Rग्ब्a ैदrा fदr १७ बर््ीrे असं शीर्षक होतं. सोबत रियाचा एक मादक फोटो आणि अझमत खानचा टॉर्न जीन्समधला हसरा फोटो. अगस्तीने बातमी वाचायला घेतली. १६ वर्षं संसार झाल्यावर रिया आणि अझमत खानचा डिव्होर्स झाला होता. अझमत खान हा बॉलिवूडमधील सध्याचा नंबर वन हिरो आणि रिया बॉलिवुडमध्ये सुरुवात करून आता हॉलिवुडमध्ये आणि नेटफ्लिक्सवरील वेब सिरीजमध्ये चांगलंच बस्तान बसवलेली हिरॉइन. गेले काही महिने दोघांमधील भांडणाच्या बातम्या येत होत्या. अखेर दोघांनीही आपण सेपरेट होत असल्याचं जाहीर करून टाकलं.
अझमत खान हा कोणाचंही बॅकिंग नसताना, चित्रपटांचं कोणतंही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना सुपरस्टार झालेला अभिनेता. बेफाम यशामुळे त्याला सेल्फ एस्टिमच्या अतिरेकाची सवय झाली होती. दोघं सेपरेट होणार असल्याची बातमी फुटल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने खास मुलाखत देऊन सांगितलं की, एंगेजमेंटच्या वेळी जी अंगठी त्याने रियाच्या बोटात घातली होती, ती त्याच्या घराण्यात शेकडो वर्षं चालत आलेली खास अंगठी असून आपल्या पहिल्या प्रेमाची भेट म्हणून तो ती तिच्याकडेच राहू देणार आहे. त्याला उत्तर म्हणून रियानेही लगेचच पत्रकार परिषद घेतली आणि सांगून टाकलं की, ती या अंगठीचा लिलाव करणार आहे आणि आलेली रक्कम चॅरिटी म्हणून देणार आहे. जे प्रेम राहिलेलंच नाही, त्या प्रेमाची निशाणी जवळ बाळगण्यात तिला इंटरेस्ट नाही. या दोघांच्या स्टेटमेंट्सला अर्थातच तुफान पब्लिसिटी मिळाली होती आणि त्याच सुप्रसिद्ध अंगठीचा आज लिलाव होणार होता. फेसबुकवर, सर्व वाहिन्यांवर त्याचं लाइव्ह टेलिकास्ट होतं. जगभरातून कोणीही त्या लिलावात भाग घेऊ शकणार होता. अगस्तीने लिलावाचं टायमिंग पाहिलं, पुढल्या १० मिनिटांत तो सुरू होणार होता. त्याने टीव्हीकडे पाहून ‘एनडीटीव्ही’ असे शब्द उच्चारले आणि टीव्ही ऑन होऊन एनडीटीव्ही ही वाहिनी दिसू लागली. ठळक बातम्यांत लिलावाची बातमी होतीच. तो सरसावून बसला – एक अनोखा लिलाव पाहण्यासाठी. ठळक बातम्या संपल्या संपल्या रिया आणि अझमत खान यांच्या लग्नाच्या, अफेअरच्या, प्रेमाच्या जुन्या फोटोंचं, व्हीडीओंचं फुटेज दाखवणं सुरू झालं. लिलावाची पार्श्वभूमी सांगितली जात होती. दोघांमधलं प्रेम संपून वाद, भांडणं कधी सुरू झाली, का सुरू झाली याबद्दलचे अंदाज वर्तवले जात होते. सर्वांच्या मते इंडस्ट्रीत सध्या नवा सुपरस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं, त्या कौशलशी रियाची वाढलेली जवळीक हे मुख्य कारण होतं. कौशल रियापेक्षा १३ वर्षांनी लहान होता. रियाच्या लग्नात तो ३ वर्षांचा होता, तेव्हाचे फोटोही दाखवले जात होते. पाठोपाठ, कौशलने त्याच्या घरात रियाचे लावलेले मोठेमोठे फोटो, त्याचं घर दिसलं. त्याच्या गार्डनमध्ये रियासोबत फिरतानाची काही दृश्यं दाखवली जात होती. गार्डनमधली नाना जातीची झाडं, विविध आकाराच्या कुंड्या बॅकग्राउंडला दिसत होत्या. मग दोघांच्याही चाहत्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जात होत्या. एवढी वर्षं संसार केल्यावर एखादा संसार मोडणं हे काहींना पटत नव्हतं. तर काहींनी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून भाष्य करण्याचं टाळलं होतं. काही वयस्कर स्त्रिया आणि पुरुष त्या दोघांच्या मुलांच्या मानसिक स्थितीविषयी चिंता व्यक्त करत होते. अगस्ती हे सगळं मजेने पाहत होता. फेसबुकवरही अगदी हमरीतुमरीवर येऊन चर्चा सुरू होत्या.
अगस्तीने चॅनेल बदललं. दुसऱ्या वाहिनीवरही विषय तोच, पण वेगळ्या पद्धतीने सुरू होता. अझमतने रियाला दिलेल्या अंगठीत वापरलेला हिरा कूठला आहे आणि तो किती दुर्मीळ आहे याची माहिती दाखवणं सुरू होतं, अगस्ती ते उत्सुकतेने पाहू लागला. कुणीतरी अवस्थी नावाचे एक डायमंड स्पेशालिस्ट सांगत होते की, अझमत खानने रियाला घातलेल्या त्या एंगेजमेंट रिंगमध्ये टॅफिएट या नावाने ओळखला जाणारा महागडा हिरा होता. श्रीलंका आणि टांझानियाच्या परिसरात मुख्यत: सापडणारा हा दुर्मीळ निळसर, गुलाबी झाक असलेला हिरा अत्यंत विलोभनीय होता. ३० लाख रुपये प्रति कॅरेट असा त्याचा दर होता. त्या मोठ्या हिऱ्याच्या भोवती पांढऱ्या रंगाचे आणखी आठ हिरे या अंगठीत होते.
टीव्हीच्या स्क्रीनवर मिस पेरिझादचा देखणा फोटो दिसू लागला. टीव्ही अँकरला ती फोनवर बाइट देत होती – ‘अझमत और रिया मेरे पास आये थे, एक साल पहले, तभी मैने उनको बोल दिया था के, यू ऑर नॉट गोइंग टू स्टे विथ इचअदर फॉर लाँग टाइम. दोनोने मेरी बातसे इन्कार कर दिया था तब, पर… नाव यू नो…’
पेरिझादला पाहिल्यावर अगस्तीला आठवण झाली. त्याने मोबाइल घेतला आणि सेन्सरने साठवून ठेवलेला ट्रॅक पाहिला. जिथे जाऊन गाडी थांबली होती तो स्पॉट झूम केला. पार्ल्याला जुहू स्किम एरियातील ब्ल्यूबेरी हौसिंग सोसायटीसमोर गाडी थांबली. तिथे ती ५७ मिनिटं होती, तिथून त्याच मार्गाने परत येऊन ती आता वर्सोव्यातील तिच्या मूळ जागेवर आलेली होती.
- ‘अंगठी १८२०’
- लेखक : श्रीकांत बोजेवार
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल २०२१ जानेवारी
डिटेक्टिव्ह अगस्तीचे कारनामे वाचण्यासाठी…
‘अगस्ती इन अॅक्शन’ मालिकेतील ‘हरवलेलं दीड वर्ष’ कादंबरिकेतील भाग
‘हरवलेलं दीड वर्ष‘ कादंबरिकेतील भाग
‘मला माहिती आहे ते. पण माझं तुमच्याकडे जे काम आहे ते काम पोलीस करू शकणार नाहीत, किंवा असं समजा की, मला पोलिसांकडे जायची इच्छा नाही.’ ‘अंडरवर्ल्डमधली माणसंही करू शकणार नाहीत?’
‘अगस्ती इन अॅक्शन’ मालिकेतील ‘न्यूड पेंटिंग @19’ कादंबरिकेतील भाग
‘न्यूड पेंटिंग @19‘ कादंबरिकेतील भाग
‘मी राघव, वेलकम टू माय प्रायव्हेट यॉट… प्लीज कम.’ अगस्तीने हसून, मान लववून स्वागताचा स्वीकार केला. ‘काय घेणार तुम्ही? मी व्हिस्की घेतो आहे.’…