फॉन्ट साइज वाढवा

कठीण समयांतील सभ्यकथा…

गेल्या तीनेक वर्षांपासून करोनाची हजेरी लागून टाळेबंदी लागेपर्यंत आठवडी दोन दिवसांच्या सुट्टीतील माझी रविवारची सकाळ ही बहुतांश पुण्यातील बाजीराव रोडवरील पुस्तक खरेदीने सुरू होत होती. मार्च २०२०च्या पहिल्या आठवड्यात मी रहस्यकथेसाठी व्याख्यानानिमित्ताने नाशिकला गेलो. त्यानंतरचे दोन आठवडे रहस्यकथांच्या संदर्भाने वाचन-लेखनावर उपडी तापडी पडलो. पुढल्या आठवड्यात रविवारी पुण्याकडे निघण्याआधीच टाळेबंदी लागली आणि मार्च महिन्यापासून सप्टेंबर-ऑक्टोंबरपर्यंतचे सारे रविवार-सोमवार आहे त्या पुस्तकांवर उपडी-तापडी पडण्यावाचून गत्यंतर उरले नाही.
बुकरवरच्या पुस्तकांनी ऑगस्ट-सप्टेंबर सुसह्य केले. या दरम्यान राज्यांतर्गत प्रवासास मुभा मिळाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक दिवस पुस्तक पर्यटनासाठी पुणे गाठले. या दरम्यान न्यू यॉर्क टाइम्सच्या ‘डिकॅमेरॉन प्रोजेक्ट’च्या पुस्तिकेचे हार्डबाऊंड पुस्तकही आल्याच्या जाहिराती मॅगझिन्समध्ये झळकत होत्या.

नोव्हेंबरमधल्या वारीत फारशी पुस्तके हाती लागली नाही. शिवाय भवताली भकासपणा अधिक दिसला. संपूर्ण डिसेंबर महिना रहस्यकथांच्या प्रकल्पावर लिहिण्यात गेला. जानेवारी २०२१च्या दुसर्‍या आठवड्यात संदर्भाच्या काही पुस्तकांसाठी पुणेवारी केली. तेव्हा सार्‍या शहरानेच आपल्या मुखावर मास्क लावल्याची जाणीव व्हायला लागली. (तेव्हा तेथून दुसरी लाट सक्रिय व्हायची होती.) एका पिशवीत भरतील इतक्याच पुस्तकांच्या थोड्या असमाधानकारक खरेदीसह मी माझ्या पुस्तकमित्राबरोबर नारायण पेठेजवळील खानावळीत जेवलो आणि दुसर्‍या एका मित्राला भेटण्यासाठी मोकळा झालो. या दुसर्‍या मित्राची फोरव्हीलर असल्याने भटकंती आणखी सुकर होणार होती आणि काही दूर दोन टोकांच्या दुकानांची तातडीने पाहणी करता येणार होती. फक्त भेटल्यावर त्याने कार ‘ओएलएक्स’वर विकण्यासाठी काय प्रक्रिया असते याची चौकशी करून पुढील भटकंती करू असे सांगितले. आम्ही स्वारगेट स्थानकाजवळ असलेल्या ‘ओएलएक्स’च्या कार्यालयात धडकलो. काचेच्या तावदानात असलेल्या कार्यालयात चालणारा कारभार इतक्या वेगात होता, की तिथल्या खुर्चीवर मी काही पुस्तकांच्या प्रस्तावना वाचेपर्यंत मित्राच्या गाडीचा लिलाव सुरू झाला होता आणि त्यालाच त्याच्या गाडीतील काही सामान घेऊन रिक्षाने घरी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पुस्तकांची पिशवी घेऊन स्वारगेटवरून पुन्हा घरी येण्याची इच्छा मनात भरत असताना पुण्यातील पत्रकार मित्राचा फोन आला. मी पुण्यात असल्याची खात्री करून मला नेण्यासाठी तो स्वारगेट जवळच्या त्या ओएलएक्स शोरूमपाशी बाईकवरून आला. पुढले काही तास चर्चा-गप्पा आणि भावी कथा लेखनाच्या विषयांवर बोलून संपले. निघण्याआधी लकडी पुलावरील पुस्तकांची हालहवाल घेण्याची आणि काही नाही मिळाले, तरी तेथील प्रभाकर, समीर या पुस्तकवाल्यांची सदिच्छा भेट घेण्याची उबळ मनात आली. मित्राने बाईक लकडी पुलाच्या अलीकडे लावली. प्रभाकरकडे थोडी खरेदी केली तेव्हा समीर नुकताच पुस्तकांसाठी ताडपत्री पसरत असलेला दिसला. ‘करोना सुरू झाल्यानंतर आजच पहिल्यांदा येतोय.’ ही माहिती त्याने दिली. मराठी लोकप्रिय पुस्तकांचे, मुखपृष्ठ सुस्थितीत असलेल्या पुन्हा प्रकाशित झालेल्या रहस्यकथांचे, ऐंशी-नव्वदीत स्वत:च्या प्रकाशनाद्वारेच स्वत:ची पुस्तके काढणार्‍या स्वयंप्रकाशित लेखकांचे साहित्य बाहेर येऊ लागले. फिटनेस मंत्रा, यशशास्त्राची पुस्तके पुढे दाखल झाली. नंतर बायंडिंग केलेल्या गठ्ठ्यांत पिवळ्या रंगाची पडलेली जुनी पुस्तके समोर लागली. त्यात मला काशीबाई कानिटकरांचा ‘चांदण्यांतील गप्पा’ हा कथासंग्रह गवसला. एप्रिल १९२१ साली प्रकाशित झालेला. विविधज्ञान-विस्तार मासिकांतून मूळ प्रसिद्ध झालेल्या यातील गोष्टींची ही प्रथमावृत्ती मुंबईतील ‘लक्ष्मीनारायण’ प्रेसमध्ये छापली गेल्याचा पहिल्या पानावर उल्लेख होता. लक्ष्मणशास्त्री लेले यांनी या कथासंग्रहास ‘चार प्रास्ताविक शब्द’ म्हणत तब्बल बारा पानांची प्रस्तावना लिहिलेली आहे. अन् एक पान हे प्रकाशकांची पुरवणी प्रस्तावना आहे. ती तीन परिच्छेदात आटोपली असून, त्यातले दोन येथे मुद्दाम देतो.

‘विविधज्ञानविस्तारांत गेल्या ५० वर्षांत अनेक उपयुक्त लेख येऊन गेले आहेत. त्यांतून निवड करून पुनर्मुद्रित करण्यासारखे पुष्कळ लेख आहेत. आणि विस्ताराच्या ‘ज्युबिली’  उत्सवार्थ जे तीन ग्रंथ छापण्याचे काम सुरू आहे ते पुरे होतांच, या पुनरावृत्तीचे काम हाती घेणार आहों. वरील इच्छेस अनुसरून बरेच दिवसांपासून ‘‘चांदण्यांतील गप्पांचा’’ छापण्यास घेतल्या होत्या, व त्या आता वाचकांस सादर अर्पण करीत आहों.’

एप्रिल १९२१मध्ये आलेल्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मराठीत पहिल्या म्हणून गणल्या गेलेल्या लेखिकांपैकी एका कथालेखिकेचे आहे.
विशाखा प्रकाशनाने काढलेल्या ‘चौकट’ या विलास खोले संपादित स्त्रियांच्या महत्त्वपूर्ण कथांच्या संग्रहात खोले प्रस्तावनेत म्हणतात की, ‘स्त्रियांच्या कथालेखनाच्या दृष्टीने पाहता इ.स १८९६ ते १९२१ या पंचवीस वर्षांच्या कालखंडात दोन कथासंग्रह आणि सुमारे सव्वाशेच्या आसपास कथा, एवढढा ऐवज जमा झालेला आढळतो. पुढील काळात स्त्रियांचे कथालेखन वाढले, कथासंग्रहांचे प्रमाण वाढले, जाणीवपूर्वक कथालेखन करण्याची प्रवृत्ती बळावली, लेखनासाठी चाचपडणे कमी होऊन अंगात आत्मविश्वास आला आणि कथेच्या कलात्मक अंगाचा विकास होऊ लागला.’
प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच मराठीत पहिली कथा कुणी लिहिली याचा तपशीलही येथे मिळतो.
‘सौ. शांताबाई या लेखिकेने लिहिलेली व मासिक मनोरंजनच्या नोव्हेंबर-डिसेंबर १८९६च्या जोडअंकात प्रसिद्ध झालेली ‘बिचारी आनंदीबाई’ ही स्त्रीने लिहिलेली मराठीतील पहिली कथा. आनंदीबाईचा सुखी संसार, पतीचे क्षयाचे दुखणे, वैधव्य-दारिद्र्य अशा मार्गाने प्रवास करीत उपदेशाचा वळसा घेऊन कथा संपते. दुसरी कथा म्हणून ‘अभागी यमुना’ या जानकीबाई मराठे यांच्या कथेचा निर्देश करावा लागतो. मासिक मनोरंजनच्या मार्च-एप्रिल-मे १८९७च्या जोडअंकात या कथेला आरंभ झाला आणि जून १८९७च्या अंकात कथा संपली आहे.’ असे म्हटले आहे. मुंबईहून यमुनेचे आपली बहिण गंगू हिला ग्वाल्हेरला पत्र आणि ग्वाल्हेरहून गंगूचे यमुनेस उत्तर असे या कथेची अंतर्गत रचना असून पहिल्या दोन्ही कथांमध्ये स्त्रीच्या करुणास्पद जीवनाचे चित्रण आले आहे.
खोले यांनी याच प्रस्तावनेत मराठीतील पहिल्याने छापण्यात आलेला स्त्रीलेखिकेचा संग्रह कोणता याचीही माहिती दिली आहे –
‘सद्या:स्थिती’ अथवा ‘आजकालची संसारातील काही चित्रे’ हा सौ. लक्ष्मीतनया (लक्ष्मीबाई अभ्यंकर, सांगली) यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला कथासंग्रह मराठीतील स्त्रीचा पहिला कथासंग्रह.’

‘सदर लेखकेच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या गोष्टी संकलित स्वरूपात प्रसिद्ध केल्यास मध्यम स्थितीतील कित्येक कुटुंबातील सद्य:स्थिती अथवा संसारचित्रे कशी आहेत, याची कल्पना महाराष्ट्रातील लहान-थोर, गरीब-श्रीमंत अशा सर्व वर्गातील व दज्र्यांतील लोकांस सहज करता येईल, असे जाणून प्रस्तुतचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.’ अशी प्रस्तावनाच खोले यांनी येथे नमुद केली.

श्रीमती काशीबाई कानिटकर यांचा ‘चांदण्यांतील गप्पा’ हा एप्रिल १९२१मध्ये प्रकाशित झालेला कथासंग्रह कालानुक्रमे दुसरा होय.
या संग्रहाचे महत्त्व हे की त्या काळात स्त्रीने शिक्षण घेणे समाजातील सर्वच स्तरातून नामंजूर असताना पुरुषांच्या बरोबरीने आपल्या विचारांची पताका फडकवत ठेवण्याची महत्त्वाकांक्षा काशीबाईंच्या कथालेखणीमुळे समाजात पसरली. काशीबाईंविषयी खुद्द प्रस्तावनेत लक्ष्मणशास्त्री लेले यांनी दिलेली माहितीच येथे त्यांच्या शब्दांत म्हणजेच शंभर वर्षांपूर्वीच्या मराठीत येथे देतो.
‘शिक्षणाच्या पहिल्या अवस्थेत ज्या दोन कुलस्त्रिया महाराष्ट्रात उदय पावल्या त्या श्रीमती काशीताई कानिटकर व श्रीमती रमाबाई रानडे या होत. या दोघीही शिकण्याकरतां कोणत्याही शाळेंत गेलेल्या नाहीत. सर्वथैव प्रतिकूल परिस्थितीत त्या लिहिणे वाचणे शिकल्या, व विशेषत: स्वतांच्याच परिश्रमाने व दृढ निश्चयाने कर्तृत्ववान झाल्या. काशीताई पुणें येथें इ.स. १८६१ साली बापट आडनांवाच्या सुप्रसिद्ध जुन्या वळणांच्या घराण्यांत जन्मल्या. यांच्या वडिलांचे नांव कृष्णराव ऊर्फ अण्णासाहेब असें होतें. त्यांच्या घरांत त्यांची पत्नी व तीन मुले होती. काशीताई वडिल व दुसरे दोन लहान भाऊ होते. त्यांना पहाटे उठण्याचे वळण लागले व संध्याकाळीही अण्णासाहेबांनी व केव्हा केव्हा त्यांच्या उपाध्येबोवांनी या मुलांना स्तोत्रें, नामपाठ व देवांची गाणी शिकवावीं. त्यामुळे या भावांच्या वाणीला उत्तम संस्कार झाला.
काशीताईंना मुलांबरोबर शाळेत पाठवावे असे अण्णासाहेबांना पुष्कळ वेळा वाटे. पण त्यांची आई या विचारांच्या आड येई. काही नको मुलांच्या शाळेत जाऊन दांडगी व्हावयाला. बायकांना येवढे शिक्षण हवे कशाला? काशीताई आपल्या आईच्या मनाचा कल पाहून वागत. त्यांचे धाकटे भाऊ शाळेत जात सकाळी सात ते नऊ व दुपारी दोन ते चार अशी त्यांची शाळा असे. शिवाय त्यांना एक पंतोजीही शिकविण्याकरीता ठेवले होते. मुलें पंतोजीजवळ शिकत असतां काशीताई दूर बसून काय होते ते पाहत व ऐकत, व पंतोजी गेल्यावर पाटीवर धडे काढून धाकट्या भावाला दाखवित. धाकट्या भावाची व त्यांची फार गट्टी असे. फावल्या वेळेंत ते शाळा शाळा खेळत. त्यात तो पंतोजी होई व काशीताईला विद्यार्थी बनवी.

वडिलांचा नावलौकिक, कुटुंबाचा कुलीनपणा, व मुलीचे टिप्पण, या तीन गोष्टी पाहून काशीताईचे दहाव्या वर्षी लग्न झाले.
सासरी आणि माहेरी दोन्हीकडे त्यांनी चोरून मारून शिक्षण घेतले. त्यांची शाळा म्हणजे कोठीची खोली व पाटावर निवडायला घेतलेले डाळ-तांदूळ हे त्यांचे सोबती. कोठीच्या दाराला त्या आंतून कडी लावीत. मग थोडे वाचावें, थोडें निवडावे, असें चाले. अशा रीतीने काही वाचन होई. एखाद्या वेळी वाचीत असतां मध्येच खोलीच्या दाराला कोणी धक्का दिल्याचा भास व्हावा व त्यामुळे काशीताईंच्या पोटांत एकदम धस्स व्हावें. केव्हां केव्हां दाराच्या फटींतून, आंत काशीताई काय करीत आहेत, हें पाहण्याचा कोणी प्रयत्न करीत. त्यामुळे काशीताईस फार त्रास होई. एक दोन वेळां भातांत खडे व वरणांत डोळ लागले तेव्हां घरांतल्या बायांनी काशीताईंवर टीकास्त्राचा भडिमार केला.’
त्यांचे पती हे फारच सुधारणावादी असल्यामुळे घरच्यांचा विरोध न जुमानता त्यांनी काशीबाईंना लिहिण्या वाचण्याचेच नव्हे, तर प्रार्थना समाजाच्या व्याख्यानास जाण्याचे सुचविले. या व्याख्यानांना जाताना त्यांची होणारी लगबग आणि पुरुषांच्या घोळक्यात वाटणारी लज्जा यांबाबत काशीबाईंचे विस्तृत विवेचन आले आहे. समाजातील व्याख्याने ऐकून काशीबाईंना शास्त्रीय विषयांची गोडी लागली. त्यांनी मराठीत प्राथमिक शास्त्रीय पुस्तके वाचली. तसेंच मंडलिकांचा इतिहास, अर्थशास्त्र, कादंबरीसार, भारतसार, पेशवे-होळकर-पटवर्धन-शिवाजी महाराज इत्यादिकांच्या बखरीही त्यांंनी वाचल्या. काही मनोरंजक पुस्तके व संस्कृत नाटकांची भाषांतरे त्यांस वाचावयास मिळाली. पण त्यांची वाचनाची जागा कोठीच कायम झाली, व वेळही डाळतांदूळ निवडण्याचीच ठरून गेली, असे लेल्यांनी म्हटले आहे.
काशीबाईंच्या वाचन पसारा तात्कालिन बायकांच्या मानाने अफाट असला, तरी प्रचंड नव्हता. पण त्यांचा विचार मांडण्याचा, लेख लिहिण्याचा, कथा लिहिण्याचा उत्साह अमाप होता. १८९८ साली मुंबई आणि पुण्यात प्लेगची प्रचंड मोठी साथ आली. ब्रिटिशांनी ती आणखी तेवत ठेवली. त्या वेळी मुंबई इलाख्यातून त्यांचे कुटुंब इतर सुदृढ कुटुंबांसोबत गावाबाहेर झोपडीत वस्ती करून राहू लागले. प्लेगने येणार्‍या मृत्यूच्या बातम्यांमुळे मनाला ग्रासणार्‍या उद्विग्नतेचा परिहार करावयाचा एक मार्ग म्हणून दररोज गोष्टी सांगून एकमेकांची करमणूक करून घेण्याचे ठरविले. गोष्टी सांगण्याचा रसाळपणा प्रत्येकाच्या अंगी नसल्यामुळे व गोष्ट खुलवण्याचे चातुर्यही सर्वांकडे नसल्यामुळे त्या लिहून काढण्याचे काम काशीबाईंनी स्वीकारले. त्यांतून ‘शिसवी पेटी’ (जी एका इंग्रजी कथेवरून सुचल्याचे काशीबाईंनी सांगितले आहे.) ‘मारुतीचा प्रसाद’, ‘वनवास’, ‘सारसबाग’, ‘लावण्यवती’ या कथा तयार झाल्या आहेत.

लेले यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, इ.स. १८९८ साली रा.सा. कानिटकर अलीबाग येथे मुन्सफ होते. त्या साली तिथे प्लेग होता. म्हणून अलीबागेजवळ खंडाळीच्या आंग्र्यांच्या जुन्या बागेत ते राहत असत. तेथेच काशीबाईंनी ‘चांदण्यांतील गप्पा’ लिहिल्या.
या संग्रहाचे परीक्षण करायचे झाले, तर लेलेंच्याच शैलीत. या गोष्टींत सृष्टीची वर्णने जागोजागी आली आहेत. ती फार सुंदर आहेत. यांत काशीताईंची सूक्ष्म अवलोकन व वर्णनशक्ती ही स्पष्ट दिसून येतात. विविध मानवस्वभावही त्यांनी चांगले रेखाटले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये घेण्यासारखे काहीतरी तात्पर्य आहे. केवळ करमणुकीदाखल अशी एकही गोष्ट लिहिलेली नाही. भाषा सर्वत्र सरळ, सुबोध, सरस व हृदयंगम आहे.
१. शिसवी पेटीतील बाबासाहेब व त्यांच्या सुशील पत्नी यांच्यासारखी जोडपी संसाररंगभूमीवर मधून मधून चमकतात.
२. मारुतीचा प्रसाद या गोष्टीतील दारुच्या व्यसनाचे दुष्परिणाम परिणामकारक वठले आहेत. आनंदाच्या पात्राच्या मिषाने सत्समागमाचे फळ दर्शविले आहे.
३. वनवास या गोष्टीतील मानाजीराव व चंपी ही पात्रे सुंदर आहेत. अनंताचा समागम प्रथम अद्भुतरसाचा पोषक असून पुढे अस्पष्ट शृंगार व शेवटी परिस्फूटित शांत यात परिणत झाला आहे.
४. सारसबागेतील मथुराबाईचे चित्र अत्यंत करुणास्पद आहे. गणपती मंदिरातील तिचे प्रथमदर्शन कादंबरीतील महाश्वेतेचे स्मरण करून देणारे आहे. रघुनाथने आपल्या सुशील पत्नीचा केलेला छळ अमानुष आहे.  
५. लावण्यवती कथेत राजकन्येवर जी संकटपरंपरा आली आहे, तिचा शेवट वैराग्यात केला आहे. ते योग्य आहे.


Perfectchi Bai cover
परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष

‘मनापासून पतंग उडवणा‍ऱ्या’वर ‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं, पण ती त्याच्यासोबत जाईल की तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील? समस्त स्त्रीजातीला समाधान देईल असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला तरी वास्तवात खरोखरीच तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल? पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणा‍ऱ्या दोन अनवट दीर्घकथा!

खरेदी करा



काशीबाईंच्या कथांचा आरंभ होताना आणि त्यांनी आखलेल्या चांदण्यांत कथा सांगण्याच्या योजनेपर्यंत बकाचिओच्या सुप्रसिद्ध डेमेरॉनची आठवण होते. पण त्यांत वापरलेल्या सुसभ्य आणि सुसंस्कृत वर्णनांच्या फैरी झडायला सुरुवात झाल्या की वात्सायनाच्या कामसूत्राचा आणि गाता शप्तशतीचाच हा देश होता, यावर विश्वास बसणे अशक्य वाटू लागते. चावटीवरू सभ्यटीपर्यंत झालेल्या मरहट्ट भूमीवरच्या या परिवर्तनास अठराव्या शतकातील पेशव्यांचे रंगेल आणि रसाळ जीवन कारणीभूत होते. त्यामुळे ‘देवपूजेला लागण्याची’ अवस्था आणि मराठीत आधुनिक साहित्य निर्मितीचा काळ एकत्र आला. मनोरंजनासाठीचे वाचन बाद झाले. उद्बोधक गोष्टी, सल्ला, संसारोपयोगी विचारांची माला किंवा मालिका, हितोपदेश यांचे प्रस्थ वाढले. हा बदल महाराष्ट्रात शंभर वर्षांत टोकाला पोहोचला. ज्याची फळे म्हणजे पूर्ण पोशाखी साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला लागला.
समाज घडविण्यासाठी साहित्याने काम करावे हे लेखककर्मींना का वाटले असावे, याची काही उत्तरे अठराव्या शतकातील दुसर्‍या बाजीरावाच्या वर्तन वर्णनांमध्ये सापडू शकतात. निवडक लोकहितवादी – (संपादक- फडकुले-नासिराबादकर, फडके बुकसेलर्स, १९८९) पान क्रमांक १४४मध्ये हा नमुना सापडतो. त्यातील काही उतारे येथे घेतो –

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याने जे राज्य स्थापन केलं, ते बुडवलं धाकट्या बाजीरावाने. याच्याइतका विलासी, व्यभिचारी, बेजबाबदार आणि अकार्यक्षम राजा संपूर्ण मराठेशाहीत कधी झाला नव्हता.
तो ज्या वाड्यात असायचा तिथं दोन-तिनशे बायका नित्य नाहावयास येत. हा न्हाण्याचा समारंभ सकाळी सुरू व्हायचा तो दुपारपर्यंत चालायचा. नंतर जेवणाची तयारी झाली की मनात येईल त्या वाड्यात तो जायचा.
बाजीराव पेशवा येवढा शौकिन की त्यासाठी तो त्याच्या आश्रितांची चार-पाच लग्न लावून द्यायचा. म्हणजे आश्रितांनी आपली एक बायको घरी ठेवून बाकीच्या सरकार वाड्यावर पाठवायच्या. पुन्हा जो गृहस्थ वाड्यावर बायको पाठवणार नाही, त्यावर श्रीमंतांची इतराजी व्हायची. त्यामुळे अब्रुदार लोकांनी वाड्यात जाण्याचं सोडलं. काहींनी तर पुणंही सोडलं.
बयाबाई दातार, सीता शेंडे, काशी दीक्षित, उमा फडके, ताई पेठे अशा सुमारे दोन चारशे उनाड बायकांचा थवा वाड्यात असायचा. या बायकांशी शिष्ये, पाणके यांचाही व्यभिचार चाले.’

मर्‍हाटी लावणी या ग्रंथात बाजीरावाकडे येणार्‍या या स्त्रिया बहुत देखण्या, ज्वान, थट्टेखोर व बोलक्या असत असा उल्लेख आहे. बाजीरावाच्या वाड्यांत जे प्रकार चालत त्याचेच अनुकरण घरोघर होऊन समाज रसातळाला गेल्याचे वर्णन काही ग्रंथात आले आहे. आता इतक्या जोमात कामक्रीडा करण्यात रममाण झाले असता, इंग्रजांना राज्य बळकावणे सहज शक्य झाले. निर्लज्जपणाचा दरडोई झालेला कळस सभ्यपणाच्या दिखाऊ वर्तनात परावर्तीत झाला. म्हणजे दोनतीन बायका अधिक रक्षा बाळगून हितगुज, संस्कार, संसाराच्या बाता करणे संसारी-सभ्य माणसाचे लक्षण बनले. हा काळ मराठी कादंबरीच्या आधीचा. ज्यात विविध ज्ञान विस्तार करताना कामज्ञानावर चर्चाही अमंगळ मानण्यात आली.
काशीबाईंच्या कथा लिहिल्या जाण्यापूर्वीच्या दोन पिढ्या दांभिक निपजल्या. सामाजिक सुधारणेची चळवळ एकीकडे तर समाजात निकोप प्रवृत्तीला पोसणारे साहित्य दुसरीकडे. या प्रचंड दबावाखाली उद्बोधक, तात्पर्यशोधक कथा लिहिण्याची प्रवृत्ती लेखक-लेखिकेंत उत्पन्न झाली.
‘मराठी लेखिका : चिंता आणि चिंतन’ या भालचंद्र फडके यांच्या श्रीविद्या प्रकाशनाने काढलेल्या ग्रंथात फडके म्हणतात की ‘चांदण्यांतील गप्पा’ या संग्रहातील कथांमधून नीती व धर्मविषयक संस्कार करण्याचा प्रयत्न आहे. तसे काशीताईंना प्रतिकूल परिस्थितीत लेखन-वाचन करावे लागले होते. काशीताईंच्या कथांवर ‘डेकॅमेरॉन’ मधील कथांचा परिणाम झाला, हे नाकारता येत नाही. बोकॅशिओची निवेदनशैली इतकी आकर्षक आहे की, तिचा परिणाम जगाच्या अनेक भाषांतील आरंभीच्या कथालेखनावर झालेला आहे.’ मार्च १९८०मध्ये हे पुस्तक आले असून फडके यांना काशीबाई यांनी नक्कीच डेकॅमेरॉन वाचला असल्याची खात्री वाटत होती.
माझ्यासाठी फडके यांनी केलेले विधान हे सर्वात मोठे यासाठी वाटते, की काशीबार्ईंनी डेकॅमेरॉन डोक्यात ठेवून जर आपल्या चांदण्यांतील गप्पांना आकार दिला असेल, तर बकाचिओच्या रिबाल्ड कथांना वैराग्याच्या, त्यागाच्या कक्षेत बसवताना त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले असतील. काशीबाईंची लेखन हातोटी पानापानांत जाणवत राहते. निसर्गाच्या ऋतूंची त्यांची दोन-दोन पाने वर्णने कंटाळवाणी वाटत नाहीत. शिसवी पेटीत निसर्ग वर्णन तब्बल अडीच पानांचे म्हणजे पत्रकारी भाषेत इंट्रोच चारशे शब्दांचा केला आहे. तो शेवट करताना मुद्दाम देतो.

‘प्लेगमुळे आम्ही या अशा परिस्थितीचा अनुभव घेत अरण्यवासाचे व सृष्टिसौंदर्याचे अशा प्रकारचे सुख अनुभवीत असतांही चित्तास स्वास्थ म्हणून वाटत नाही. कारण, रोज व्यवसायी मंडळी आपल्या व्यवसायांसाठी प्लेगने पछाडलेल्या ठिकाणी जाऊन येतात व संध्याकाळी ही लागली, ती मेली, त्याला ‘सेग्रिगेट’ केला. अमकी गरीबाची बायको होती. तमक्याची बायको बुडाली, फलाण्याची पोरे उघडी पडली, अशा सारख्या उद्वेगजनक बातम्या आणतात. व पुन्हा पुन्हा त्याच विषयांवर बोलत बसतात. त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनाला मात्र उद्विग्नता येते. म्हणून मी एक दिवस आमच्या एकंदर मंडळींना म्हटले की आपण संध्याकाळी दररोज गोष्ट सांगून करमणूक करून आपल्या मनांची शांति करण्याचा मार्ग काढू.’

कठीण समयांत सगळ्याच काळात माणसांना कथांनी, गोष्टींनी तारले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शतकांची, संस्कृतींची, भाषेची आणि माणसांची भिन्नता असूनही अनेक घटकांचे मूलभूत साधर्म्य असणारे हे दोन ग्रंथ मासले. ते वाचणे अलीकडच्या परिस्थितीने अनिवार्य केले. तसेच त्यांचे अनपेक्षित समोर येणे माझ्यात कुतूहलाच्या लाटा निर्माण करणारे होते. अर्थात मन रंजनापेक्षा इतर अनेक गोष्टींचा उलगडा आणि अवांतर वाचन या निमित्ताने झाले. जे सर्वांत सुखद होते. वाचनसंस्कृती लोपण्याच्या, स्थानिक भाषा संपण्याच्या जागतिक प्रक्रियेशी समांतर असलेल्या या काळात या सुखालाच तर मोल फार आहे.

– पंकज भोसले


या दीर्घलेखाचा पहिला भाग

बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(१)

१. कठीण समयांतील रम्यकथा

शतकांची, संस्कृतींची, भाषेची, प्रकृतीची आणि माणसांची भिन्नता असूनही अनेक घटकांचे मूलभूत साधर्म्य असणारे ‘डेकॅमेरॉन’ आणि ‘चांदण्यांतील गप्पा’ हे दोन ग्रंथ मासले या लेखाचा मुख्य विषय…p>

लेख वाचा…


या दीर्घलेखाचा शेवटचा – तिसरा भाग

बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा… (३)

३. चावटी आणि सभ्यटी

बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील चावटी कथा वाचून झाल्यानंतर आणि त्यानंतर काशीबाई कानिटकरांच्या सभ्य आणि नीतीकथांनी भरलेल्या चांदण्यांतील गप्पा अनुभवल्यानंतर एक विचित्र कल्पना डोक्यात आली…p>

लेख वाचा…


रोहन शिफारस

‘करोना’ग्रस्त लॉकडाउनचे
पहिले आठ दिवस

दोन दीर्घकथा

करोना मुळे प्रथम ‘लॉकडाउन’ घोषित केला गेल्यावर पहिल्या आठ दिवसांत शहरातील सामान्य नागरिकांच्या मनाची झालेली घालमेल ते सैरभैर होऊन गावाकडे निघालेल्या विस्थापित श्रमिकांची झालेली परवड अशा विविध घडामोडींची दोन भिन्न आकृतिबंधामधून नोंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन दीर्घकथा .अचानक निर्माण झालेल्या असामान्य स्थितीमुळे परस्परांतील विश्वास वाढतो की , संदेह बाजूला ठेवण्यास माणसं सहजप्रवृत्त होतात, त्याचा वेध घेऊ पाहणारी संदेहकथा … लॉकडाउन’मधील हत्येचं रहस्य.

300.00Add to cart


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *