फॉन्ट साइज वाढवा
एक मुलगी आणि मुलगा; अल्लड वयात भेटलेले. एकमेकांच्या सहवासात रमलेले. दोन निराळ्या देशांतले! तो तिच्याकडे घरीच येऊन राहिलेला, काही महिन्यांपुरताच! मग विरह, पुन्हा भेट, त्याच्या देशात, घरात! मंतरलेल्या रात्री आणि अखंड गप्पा, जन्मभराचे शेअरिंग आणि अखेर तो विरहाचा क्षण… विमानतळावर! त्या अगणित घट्ट मिठ्यांत न मावणारा संवाद! पुन्हा कधी भेट होईल अशी शक्यता नाही, तरी एक वचन दिलं, “पुन्हा भेटू ते आपल्या लग्नात!”
वर्षामागून वर्षं सरली, पत्र, ई-मेल, फोनचा आवेग ओसरला… प्रेम होतंच; मात्र ओढ निराळ्या वाटेने वळली. एक दिवस मुलाला त्या मुलीचा फोन आला, “ऐक ना, मी प्रेमात पडले आहे, एका मुलीच्या… मी समलैंगिक आहे, माझी मलाच नव्याने खात्री पटत चालली आहे… तिच्याही आधी हे मला तुलाच सांगावं वाटलं… तू आहेस ना माझ्या सोबत ह्यात? तुझं असणं खूप खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. माझ्या अस्तित्वाचा स्वीकार करशील?”
हेही वाचून पहा : रोहन शिफारस
हॅपी लग्न डॉट कॉम
लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या अन् सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी…
मित्र सटपटला, काहीसा बिथरला… तरी त्या क्षणी त्यांचं प्रेम जिंकलं! तो तिच्यासोबत कायम असणार होता, त्या दोघींसोबत आता, सदैव!
वर्षं पळत राहिली. एक दिवस मित्राने तिला फोन केला. “ऐक ना, आज मी माझ्या सखीला जन्माची साथ मागणार आहे, होईल ना सगळे नीट? लक्षात ठेव, माझ्या लग्नात तुम्ही दोघी हव्याच आहात मला!”
त्याच्या लग्नात ह्या दोघीही दणक्यात मिरवल्या! त्याच्या आनंदात न्हाऊन निघाल्या! दहा वर्षं सरली, सरकारं, कायदे आणि काळ बदलत राहिला. त्या दोघी बोहल्यावर चढल्या. ह्या मित्रांसोबत त्याची बायको, मुलं सगळेच त्या लग्नात आनंदाने सहभागी झाली…
निघतेवेळी विमानतळावर पुन्हा एकदा ते दोघेच, एकटे… “मग आता? आता भेट कधी?” दोघे समाधानाने तरी गोंधळून हसले!
ही काही परीकथा नाही… गोष्ट आहे प्रेमाची! इतर पठडीतल्या प्रेमकथा म्हणजे प्रेमाचे विराटरूप न झेपल्याने बहुदा मूळप्रवाहात प्रेमाला कापून छाटून कोंदणात बसवलेलं असावं अशा! ह्यात तसे अजिबात नाही! ह्यात प्रेमाचे अगणित कंगोरे आहेत. मैत्रीतलं प्रेम, अल्लड वयातलं आकर्षण, विस्तारणाऱ्या अस्तित्वाचा प्रगाढ स्वीकार, नव्या नात्याचा स्वीकार आणि पुन्हा खोल रुजलेल्या मैत्रीतल्या प्रेमाचा नवा आयाम! प्रेम दोन माणसांत सहज प्रवाही असावं. मिटून बांधून घालणारं, बंधनं अटी आणि जाचक नसावं. प्रेम प्रत्येक दोन माणसांत त्यांच्या त्यांच्या अमर्याद शक्यतांपाशी त्यांना घेऊन जाणारं असावं! बळ देणारं, मोठं करणारं असावं! पुष्कळदा प्रेम हे हेट्रोनॉर्मेटिव्ह (स्त्री पुरुष संबंध महत्त्वाचे मानणारं, प्रस्थापित मानणारं) प्रजननासाठी पोषक असंच दाखवलं आणि स्वीकारलं जातं. तेच प्रेम खरं; योग्य हे मनात, जनमानसांत बिंबवलं जातं. मात्र ते अतिशय थिटं आणि उथळ प्रेम असेल, कारण प्रेम ह्याहून पुष्कळ व्यापक आणि विशाल निश्चित असतं!
रोहन प्राइम
वाचकांसाठी एक खास सभासद योजना!
‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…
अधिक माहिती जाणून घ्या..
₹250.00Add to Cart
पुष्कळदा प्रेमातदेखील अगदी मर्यादित, संकुचित दृष्टिकोन असतो. प्रेम एकदाच होतं, लग्न एकदाच होतं इत्यादी… हे सारं धादांत खुळचट विचार आहेत. प्रेम हे अगणित वेळा होतं, असंख्य माणसांवर, वस्तूंवर, प्राण्यांवर होतं. त्यात अनेकदा मनासारखा प्रतिसाद मिळत नाही. मिळाला तर त्याची तीव्रता बदलत जाते आणि प्रेमाचे माप, आयाम आणि संदर्भदेखील बदलत जातात. ऐकेरी, एकसुरी वाटेने प्रेम कधीच जात नाही. प्रेम बाहेरून आत न जाता, आतून, आपल्या आतून बाहेर परावर्तित होत राहतं. म्हणून सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर करावं. ते सहज असावं, त्यात अहंकार मिसळलेला नसावा आणि ते सदैव आपल्यात स्त्रवत राहावं ह्यासाठी स्वतःला सतत खतपाणी घालत राहावं. प्रेम आणि त्यातून मिळालेला जोडीदार हा कधीच, आपल्यातील कोणत्याही कमतरता, रितेपण भरून काढू शकत नाही. स्वतःतील रितेपण, निर्हेतुकता, दुःख, अपेक्षा ह्यावर उतारा म्हणून खरंतर कधीच कोणत्याच नात्याकडे बघू नये. ते काम स्वतःचे आहे, इतर कोणत्याही प्रेमाच्या माणसाचे नाही! प्रत्येकाला मनातला राजकुमार/राजकन्या कशी असावी असे विचार घोळत असतात. मात्र ती व्यक्ती तुमच्यातील कमतरता कशी भरून काढू शकेल? उलट जेवढी सुंदर, रूपवान, धनवान आणि तेवढ्या ताकदीची, क्षमतांची जर ती व्यक्ती असेल, तशी व्यक्ती जर आपल्याला आपल्या आयुष्यात हवी असेल, तर आपण आपली पातळी, पात्रता किती वाढवू शकतो; असा विचार करायला हवा! शेवटी जगण्याचा प्रवास हा सदैव एकट्याचाच असणार आहे. मात्र तो एकाकीपणा साजरा करणारी निवडक माणसं आयुष्यात भेटणं, आपण कोणाच्या तरी आयुष्यात तशा प्रकारे सहभागी होणं हेच तर प्रेम आहे आणि ते तसं प्रेम सर्वार्थाने सुंदर आहे!
– प्राजक्ता पाडगांवकर
या सदरातले इतर लेख
ज्या यशाचं भरभरून कौतुक होतं, ज्याच्या आहारी बहुतांश समाज जातो, ते यश किती खुजं आणि फसवं आहे, हे समजून येईपर्यंत पुष्कळदा खूप उशीर झालेला असतो.
कंपाउंडिगची गंमत
आयुष्यातले दररोज निवडलेले प्रत्येक पर्याय हे चक्रवाढ व्याजासारखे वाढत असतात, त्यामुळे आपल्या वेळेची, फोकसची (एकाग्र चित्ताची) गुंतवणूक अगदी निगुतीने करायलाच हवी!
स्पर्धांपलीकडलं जगणं
आयुष्याच्या अनेक पातळ्यांवर ही अशी स्पर्धा, ईर्षा आपण अगदी क्षणोक्षणी अनुभवत असतो. अर्थात, ती तितकीशी गरजेची गोष्ट आहे का?