ललित गद्याचा अलौकिक आविष्कार

मराठीतील ललित गद्य या साहित्यप्रकारात स्वत:ची निजखूण उजळ करणाऱ्या लेखकांमध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव अग्रस्थानी आहे. आत्मनिष्ठता हे या लेखनप्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अंतर्मुख होऊन जगण्याचा तळ गाठणारे चिंतनगर्भ लेखन करणे सहजसाध्य नाही. प्रयासाने लेखनकौशल्य प्राप्त करून भाषिक सामर्थ्यावर तडीला नेता येईल असा हा वाङ्मयप्रकार नाही. आत्मचिंतनातून निर्माण होणाऱ्या अनाहत नादाला साक्षीभावाने ओळखून त्याच्या प्रकटीकरणाला शब्दस्वरांचे माध्यम उपलब्ध करून देण्याची ही प्रक्रिया गुंतागुंतीच्या आत्मलक्ष्यी मनोव्यापारांची असते. तरल, संवेदनशील, सजग आणि कविवृत्तीच्या लेखकाने केलेले अशा प्रकारचे लेखन वेगळ्याच भाववृत्तीचे असते. म्हणून ते अल्प असते, अल्पायुषी मात्र नसते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी अशा जातकुळीचे लेखक आहेत. त्यांचा ललित लेखांचा पहिला संग्रह ‘डोह’ प्रसिद्ध होऊन आता पंचावन्न वर्षं झाली तरी तो आजही आपल्या मंद दरवळाने मराठी साहित्यविश्व सुगंधित करत आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे स्मरण म्हणून संकल्पित केलेल्या त्यावरील समीक्षेच्या संकलनाचे ‘डोह : एक आकलन’ हे देखणे पुस्तक अलीकडेच वाचकांच्या हाती पडले आहे. मराठीतील ललित गद्याच्या शिखरस्थानी असलेल्या ‘डोह’च्या मानमरातबाला साजेशी देखणी निर्मिती हे या पुस्तकाचे प्रथमदर्शन असले तरी त्या रूपाला शोभेल असेच त्याचे अंतरंग आहे.

गेल्या पन्नास-साठ वर्षांत मराठीतील बहुतांश नामवंत समीक्षकांनी केलेल्या समीक्षेचे काटेकोर संकलन यात आहे, ‘श्रीनिं’च्या इतर ललित लेखनाच्या पुस्तकावरील परीक्षणे यात आहेत, त्यांची ओळख सखोल करणारे इतरांचे व त्यांचे स्वत:चे परिचयपर व आत्मनिवेदनात्मक लेख यात आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाचे अतिशय साक्षेपी संपादन करणाऱ्या विजया चौधरी यांची संपूर्ण पुस्तकाचे सार मांडणारी, संकलनात्मक व विवेचनात्मक अशा दोन्ही अंगांनी जाणारी विस्तृत प्रस्तावनाही आहे.
श्रीनिवास कुलकर्णी हे ‘मौज’चे लेखक आणि भूतपूर्व संपादक. ‘डोह’ची प्रथमावृत्ती व पुढील नऊ आवृत्त्याही त्यांनीच प्रकाशित केल्या. त्यांचे इतर संग्रहही त्यांनीच काढले. ‘डोह’ची संकल्पना व निर्मिती हा आपल्या लेखकाचा व संपादकाचा सन्मान करण्याची वाङ्मयीन कृती आहे याचे भान मौज प्रकाशनाच्या विद्यमान संचालकांना असल्याचे प्रतिबिंब पुस्तकात उमटले आहे. त्यांचे मूल्यभान आणि अभिरुची इथे ठळकपणे अधोरेखित करणे समयोचित ठरेल.
या पुस्तकात समाविष्ट झालेले बहुतेक सारे लेखन हे स्वत: ‘श्रीनिवास’ कुलकर्णी यांनी गेले अर्धंशतक त्या त्या वेळी गोळा करून संग्रहित केले होते. यासाठी त्यांना दाद द्यायला हवी. वाङ्मयीन इतिहासलेखनासाठी अशा तऱ्हेची संग्राहक वृत्ती मोलाची ठरते, हे सर्वांना विदीत आहे.
अडीचशेवर पृष्ठांचे हे पुस्तक पाच भागांत विभागले आहे. चाळीस एक दिग्गज समीक्षक वा लेखकांना या पुस्तकावर व श्रीनिवास कुलकर्णी यांच्यावर लिहावेसे वाटावे हे त्यांच्या लेखनाचे वजन जोखणारे एक परिमाण आहे. वा. ल. कुलकर्णी, दुर्गा भागवत, म.द. हातकणंगलेकर, द. भि. कुलकर्णी, सरोजिनी वैद्य, सुधा जोशी, आनंद यादव, प्रल्हाद वडेर, वासंती मुझुमदार, प्रभा गणोरकर वगैरे कितीतरी नावं. प्रत्येकाची समीक्षादृष्टी आणि लेखनशैली आणि प्रत्येकाला आढळलेली सौंदर्यस्थळे भिन्न असली, तरी मराठी ललित गद्याला या लेखनाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले; याच समेवर येऊन ते थांबले आहेत.

या पुस्तकात समाविष्ट झालेले बहुतेक सारे लेखन हे स्वत: ‘श्रीनिवास’ कुलकर्णी यांनी गेले अर्धशतक त्या त्या वेळी गोळा करून संग्रहित केले होते. वाङ्मयीन इतिहासलेखनासाठी अशा तऱ्हेची संग्राहक वृत्ती मोलाची ठरते, हे सर्वांना विदीत आहे

एका निसर्गसंपन्न खेड्यातील बालमनाने घेतलेल्या उत्कट अनुभवांची एका सर्जनशील, प्रतिभावंत व संवेदनशील लेखकाने केलेली सौंदर्यशाली पुननिर्मिती हा ‘डोह’मधील लेखनाचा गाभा आहे. अनुभवांचं हे भावनांतून शब्दांत रूपांतर होताना लेखक त्याकडे एक निरीक्षक म्हणून अंतर ठेवून पाहू शकतो. अनुभव घेणाराही तोच आणि पाहणाराही तोच. एकाच व्यक्तीच्या दोन अवस्थांचा, बाल व प्रौढ मनांचा ऊन-सावलीसारखा होणारा पाठशिवणीचा खेळ शब्द व प्रतिमांच्या सामर्थ्याने वाङ्मयीन सौंदर्याचे अभूतपूर्व कलात्मक रूप धारण करतो. तरल सौंदर्यात्मक अंतर संपूर्ण लेखनात आणि लेखनाच्या प्रदीर्घ कालखंडात कायम ठेवण्याचे अग्निदिव्य लेखकाने पार पाडले आहे. काळाचे अंतर पार करून बाल व प्रौढ मनाचे अद्वैत साधाणारी लेखनशैली हे या ललित लेखनाचे सत्त्व आहे. आध्यात्मिक अनुभवांच्या संदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या संज्ञांचे ढोबळपणे प्रयोजन करायचे तर दृश्य, दर्शक आणि द्रष्टा यांतील एकरूपता, एकतानता मराठी ललित गद्यात असाधारण आहे. इथे ही त्रिपुटी विरून गेली आहे. दोन ‘मीं’चे स्वतंत्र आणि स्वायत्त अस्तित्व अबाधित ठेवतानाही त्यातील एकतानतेने निर्माण होणारा स्वरसंवाद व स्वरमेळ उच्च प्रतीचा काव्यात्मक अनुभव प्रकट करतो.
सरोजिनी वैद्य, वा.ल. कुलकर्णी यांची आस्वाद समीक्षा किंवा आनंद यादव यांनी संहितेचे केलेले शैली वैज्ञानिक विश्लेषण, ललित गद्याचे बालकवी म्हणून म.द.हातकणंगलेकर यांनी लेखकाची केलेली स्थाननिश्चिती असे अनेक लेख या पुस्तकाला समीक्षा ग्रंथाच्या उंचीवर नेऊन ठेवतात. अलीकडच्या काळात मराठी साहित्यातील जीवनदर्शनाच्या कक्षा विस्तारल्या आहेत आणि अभिव्यक्तीचा स्वरही उंचावला आहे. दलित, ग्रामीण आणि स्त्री साहित्याने पारंपरिक साहित्यिक चौकटींची सर्जनशील मोडतोड केली आहे. त्या तुलनेत ‘डोह’मधील अनुभव विश्वाच्या मर्यादा नव्याने ठळक होत आहेत. परंतु तरीही लेखकाच्या आत्मनिष्ठ अभिव्यक्तीच्या सामर्थ्यामुळे ‘डोह’ची वाचनीयता आणि लोकप्रियताही टिकून आहे.
या लेखनाची आणखी समीक्षा होण्याच्या शक्यता संपल्या आहेत असे वाटत असताना, कादंबरीसारखी लोकप्रियता मिळालेल्या या पुस्तकाच्या वाचकलक्ष्यी समीक्षेतून त्यांच्या लोकप्रियतेचे नवे गमक गवसू शकेल.
पुस्तकाचे निमित्त ‘डोह’ असले तरी त्याचा आनुषंगिक लाभ म्हणजे ललित गद्य या साहित्यप्रकाराच्या विस्तार आणि विकासातील विविध टप्प्यांचा येथील आढावा. ऐतिहासिक संदर्भात ‘डोह’चे वेगळेपण त्यामुळे लक्षात येते. प्रकाश संत आणि त्यांनी निर्माण केलेल्या ‘लंपन’ची चाहूल लागते. अशा तऱ्हेच्या लेखनाच्या भविष्यातील मार्गक्रमणाचे ते दिशादर्शक होते.
श्रीनि. कुलकर्णींचे ‘डोह’ व इतर लेखन वाचून या समीक्षा ग्रंथाकडे वळायचे, की समीक्षेच्या प्रकाशात मूळ लेखन वाचायचे हा पेच कसा सोडवायचा याची निवड वाचकाला आपल्या प्रकृतीनुसार करावी लागेल. एक मात्र खरे; वाचनानंद दोन्हीकडेही आहे.

– सदा डुंबरे

डोह : एक आकलन / संपादन : विजया चौधरी / मौज प्रकाशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • तुकोबाच्या अभंगांची शैलीमीमांसा / डॉ. दिलीप धोंगडे / राजहंस प्रकाशन.
    • लव्ह इन द टाइम ऑफ करोना / संपादन : अनुजा जगताप / रोहन प्रकाशन.
    • सातपाटील कुलवृत्तांत / लेखक- रंगनाथ पठारे / शब्दालय प्रकाशन.
    • जमीन अजून बरड नाही / लेखक- महावीर जोंधळे / आर्ष प्रकाशन.
    • आधुनिक भारताचे विचारस्तंभ / लेखक- रामचंद्र गुहा, अनुवाद : शारदा साठे / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२१


लक्षणीय ललित लेख संग्रह

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *