मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. वेगवेगळ्या बोलीभाषांमधले, वर्गांमधले लेखक वेगवेगळे आशय-विषय घेऊन कथालेखन करत आहेत. परंतु अजूनही मराठी वाचक, आस्वादक नवकथेच्या पुढे पाऊल टाकू शकलेला नाही. म्हणूनच गेल्या वीस वर्षांत लिहिल्या गेलेल्या कथांवर काहीएक चर्चा व्हावी, असा विचार करून आम्ही नीतीन रिंढे, दीपा देशमुख आणि किरण येले या तीन मान्यवर लेखकांना, गेल्या वीस वर्षांतल्या त्यांना आवडलेल्या कथांवर लेख लिहायला सांगितलं. हे लेख एक किंवा मोजक्या काही कथांवर असले, तरी वाचकांना दिशादर्शन व्हावं यासाठी त्यांना आवडलेल्या इतर कथांची यादीदेखील द्यायला सांगितलं. त्यातला आजचे लोकप्रिय व आघाडीचे कथाकार किरण येले यांचा लेख...
निवड : तीन लेखक, तीन कथा
जयंत पवार : बाबलच्या आयुष्यातील धाधांत सत्य
भारत सासणे : दाट काळा पाऊस
राजन खान : एका अटीचा संसार
मराठी साहित्यात जे काही गैरसमज, मूळ नियम म्हणून ठाम रूढ झाले आहेत, त्यांपैकी एक महान गैरसमज म्हणजे, कागदावर लिहिलेलं ते ‘सर्जन’ आणि ते लिहितो तो ‘लेखक’ वा ‘कवी’. पण ‘सर्जन’ म्हणजे ‘उत्पत्ती’, आणि उत्पत्ती म्हणजे ‘ज्यात जीव आहे त्याचा जन्म’. परंतु कागदावर जे साकारतं ते सजीव नसतं. मग सर्जन कुठे होतं, तर ते कागदावर लिहिलेलं वाचल्यावर वाचकाच्या मनात काही हलू लागतं, बीज रुजू लागतं, गर्भार पोटात बाळ हलू लागतं आणि वाचकाचं ट्रान्सफॉर्मेशन नव्या जिवात होऊ लागतं. हे वाचकाचं जिवंत होणं म्हणजे ‘सर्जन’. आणि असं ट्रान्सफॉर्मेशन घडवणारे, नव्याने जन्म देणारे लेखक, लेखिका म्हणजे साहित्यिक. मी हा माझा सर्जनाचा आणि लेखक या शब्दाच्या व्याख्येचा नियम काटेकोरपणे लावून ज्या कथा समोर उभ्या राहिल्या, त्या या गेल्या वीस वर्षांत मला आवडलेल्या कथा.
खरंतर गेल्या वीस वर्षांत तुम्हाला आवडलेल्या फक्त एका कथेविषयी लिहिणं ही गोष्ट खूप कठीण आहे. गेल्या वीस वर्षांत तुमच्या मनावर कायमचे कोरले गेलेले प्रसंग विचारले, तर तुमच्यापुढे प्रसंगाची जंत्रीच उभी राहील. तसं गेल्या वीस वर्षांत तुम्हाला आवडलेली कथा सांगा म्हटल्यावर, लहानपणी आपण ओल्या मातीत लोखंडी शीग मारून ती उभी रुतवण्याचा खेळ खेळायचो, तशा मनात रुतलेल्या अनेक कथा आणि ती शीग काढल्यावरही मातीत राहिलेली शिगांची भोकं दिसू लागली. अशा वेळी जर मी फक्त एका कथेवर लिहिलं तर ज्या कथांनी मनाच्या टणक जमिनीत रुतून त्यात पाणी जाण्यास वाव दिला, साक्षात्काराचे क्षण दिले, स्वत:चा चेहरा दाखवला, जग जाणून घेण्याचं भान दिलं आणि आईच्या मायेने, न मारता-ओरडता, माझ्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवलं, त्या कथांवर तो अन्याय ठरेल म्हणून मी पुन्हा त्या कथा वाचून काढल्या, काही नव्या कथा वाचल्या. आणि एक वेगळीच गोष्ट ध्यानात आली – मराठीतील तीन दिग्गज कथाकारांविषयी जी मी पुढे नमूद करेन.
अनेकदा चाळणी लावूनही गेल्या वीस वर्षांत ज्या कथा मनावर ओरखडे उमटवणाऱ्या वाटल्या, त्या मराठी भाषेतील कथा म्हणजे मेघना पेठे यांची ‘आये कुछ अब्र’, नीरजा यांची ‘जे दर्पणी बिंबले’, प्रज्ञा दया पवार यांची ‘अफवा खरी ठरावी म्हणून’, मिलिंद बाकील यांची ‘संकेत’, प्रणव सखदेव यांची ‘निळ्या दाताची दंतकथा’, सुभाष सुंठणकर यांची ‘एका दगडात तीन पक्षी’, बालाजी सुतार यांची ‘डहुळ डोहातले भोवरे’. या कथांनी मला फक्त वाचनानंद दिला नाही, तर खूप शिकवलं.
याव्यतिरिक्त तीन कथा अशा आहेत ज्यांची निवेदनशैली, मांडणी आणि कथेतील अंतर्प्रवाह यांमुळे त्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. त्या नव्याने वाचताना त्यांतील नवेच कोन आकळू लागतात आणि या तीनही कथांच्या कथाकारांचा तौलनिक अभ्यास करताना त्यांच्या एकमेकांपेक्षा वेगळ्या लेखनशैलीमुळेच मराठी वाचकांना तीन वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यांतल्या पात्रांचा परिचय होतो. या तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.
मला आवडलेल्या कथेतील पहिली कथा म्हणजे जयंत पवार यांची ‘बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य’. (कथासंग्रह : वरण भात लोन्चा काय कुठला कोन्चा) जयंत पवार यांच्या या कथेविषयी अभावानेच बोललं गेलं आहे. कदाचित असंही असेल की, माझ्या आवडीचा बाज वेगळा असावा. मला पडद्यावर जे दिसतं आहे त्यापेक्षा पडद्यामागे काहीतरी वेगळं चालू आहे ते सांगणारं साहित्य आवडतं. जयंत पवार यांची ही कथा या पठडीतली आहे. ही सररियलिस्टिक निवेदनशैलीतील कथा आहे. जयंत पवार यांच्या या संग्रहातील कथा गिरणगावातलं थेट चित्रण उभं करतात आणि पडद्यावरची गोष्ट सांगू पाहतात, तर ‘बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य’ कथेत पडद्यावर जे चित्र उभं राहत असतं ते लेखकाला सांगायचं नसतं. लेखक आणि कथा सांगत राहते वेगळंच काही. कथेतील बाबल लहान असताना शेतीकामं न करता फक्त पावा वाजवतो म्हणून त्याच्यावर बाप चिडायचा. एकदा शहरातील कुणीतरी त्याचा पावा ऐकून बाबलला ५० रुपये देतो आणि हे ५० रुपये बाबल हरवतो. हे कळल्यावर त्याचा बाप त्याला खूप मारतो आणि मग बाबल घरातच असलेल्या माळ्यावर जाऊन बसतो ते १४ वर्षं खाली येतच नाही. आता इथे जयंत पवार यांचा ‘सिरिअलिझम म्हणजे अतिवास्तववाद’ सुरू होतो. १४ वर्षं बाबल माळ्यावरून खाली उतरत नाही. लेखक लिहितो की, ते ५० रुपये बाबलचे स्वत:चे होते. त्यावर बापाने हक्क दाखवणं, बाबलला आवडलं नाही. छताच्या अपुऱ्या उंचीमुळे त्याचं चालणं खुंटतं. त्याचे पाय लुळे पडतात. तो माळ्यावर खुरडत चालू लागतो, पण कुणालाच तो दिसत नाही. अंधारात फक्त त्याचे डोळे तेवढे जेवण घेऊन जाणाऱ्या त्याच्या भावाला, बहिणीला दिसत राहतात. तो अंधारातच लाकडाच्या वस्तू- जसे पोळीपाट, खेळणी वगैरे बनवून खाली टाकत राहतो आणि गावातली गरजू माणसं त्या बदल्यात माळ्याच्या टोकावर ठेवलेल्या पेटीत पैसे टाकत राहतात. जेव्हा बाबलच्या बहिणीचं लग्न हुंड्याअभावी अडतं तेव्हा बाबल ती पैशाची पेटी खाली टाकतो आणि त्याचा भाऊ हे पैसे होणाऱ्या मेहुण्याला देण्यासाठी नेत असताना ते पैसे लुटले जातात, पण पोलीस त्याविरोधात काही करत नाहीत हे पाहून बाबल माळ्यावरून खुरडत खुरडत खाली उतरतो. आता बाबल खाली उतरला ही बातमी पंचक्रोशीत पसरते आणि बाबलला पाहायला लोकांचे जथेच्या जथे येऊ लागतात. खुरडत खुरडत बाबल पोलीस स्टेशनच्या दिशेने निघतो आणि त्याच्या मागे एक मोठ्ठा जनसमुदाय पाहून पोलीस घाबरतात आणि कारवाई करतात. आता हा बाबल म्हणजे खरंतर तुम्ही आहात. तुमच्यावर झालेला अन्याय सहन करत तुम्ही माळ्यावर बसलेले आहात, खुरडत चालले आहात. पांगळे झाले आहात. ज्या दिवशी तुम्ही बाहेर पडाल, त्या दिवशी तुमच्या मागे एक मोठ्ठा जनसमुदाय असेल तो या व्यवस्थेला खडबडून जागं करेल हा अंत:प्रवाह या कथेतून सतत वाहत असतो. कथा पडद्यावर दाखवत असते काही वेगळंच, पण तिच्यातील अंडरकरंट तुम्हाला वेगळंच काही सांगत असतात.
अशीच दुसरी कथा म्हणजे भारत सासणे यांची ‘दाट काळा पाऊस’. (कथासंग्रह : दाट काळा पाऊस). यात कथानायक मुजफ्फरजवळच्या एका खेड्यात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर उतरला आहे. रात्रीच्या अंधारात मुसळधार पाऊस लागला आहे. अनेक वर्षांनंतर तो एका व्यक्तीला भेटायला निघाला आहे, कारण त्याला काही गोष्टींची कबुली द्यायची आहे. ती कबुली देऊन तो मग अमेरिकेला जाणार आहे. आता इथून ही कथा वेगळे काही सांगू पाहते. कथानायकाला अमेरिकेत म्हणजे मोठ्या जगात जाण्याआधी आपल्या मनातल्या काळ्या कोपऱ्यात आपण केलेल्या चुकांची कबुली देण्यासाठी आडजागी असलेल्या, वाहन वगैरे सुविधा नसलेल्या गावात जायचं आहे. तिथे जाणं अवघड गोष्ट आहे. त्यात पाऊस आणि रात्र त्याला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही तो जातो आणि आपलं मन मोकळं करतो. आणि मग पुढे आकाश स्वछ होते आणि तो अमेरिकेला निघतो. या कथेतील पाऊस, रात्र, साप, मांजर ही सारी रूपकं आहेतच, पण जसं जयंत पवार यांच्या कथेत बाबल हा नायकच रूपक आहे, तसंच या कथेत प्रवासात कथानायकाला सतत सोबत करणारा कुत्रा आणि ती व्यक्ती भेटल्यावर तिच्यापुढे आपण केलेल्या चुका सांगताना लक्ष ठेवून पाहणारी मांजर ही रूपकं आहेत. त्या व्यक्तीला भेटण्याच्या प्रवासात जी माणसं नायकाला भेटतात, त्या सगळ्यांना कथाकार राहतो त्या पुण्याविषयी ओढ आहे, त्यांचं तिथे कुणीतरी नातलग आहे. एका मुलगी तर गतजन्मी ती पुण्यात राहत होती आणि टिळकांच्या आप्तांपैकी एक होती असं सांगते. या सगळ्यांना पुण्यात यायचं आहे ही बाब खूप काही सांगून जाते, जी पडद्यामागील आहे, जी कथा वाचताना तुम्हाला जाणवत राहते.
तिसरी कथा आहे ती राजन खान यांची ‘एका अटीचा संसार’. (कथासंग्रह : तत्रैव). या कथेत एक झोपडी, ज्यात एक म्हातारा आणि म्हातारी बसले आहेत आणि रात्रीची वेळ. बाहेर मुसळधार पाऊस लागलेला. आणि दारात एक मांजरीचं पिल्लू कळवळून ओरडतं आहे, थंडीने कुडकुडते आहे. म्हातारी म्हणते, त्याला झोपडीत घ्या. म्हातारा म्हणतो, इतकी माया उफाळून येते तर मूल का जन्माला घातलं नाहीस? आणि म्हातारी म्हणते, तुम्ही माझ्या नोकरीला नकार दिलात. मी मूल जन्माला घालण्याला नकार दिला. मूल जन्माला घालणं व न घालणं हा बाईचा अधिकार आहे, तो मी वापरला. आणि मग या वादात आयुष्यभर एकमेकांनी केलेल्या अन्यायाची उजळणी होऊ लागते. म्हातारपणी सगळं स्पष्ट होऊ लागतं आणि एका क्षणी दोघांना कळतं की, आपण एका गैरसमजामुळे आयुष्यभरची चूक करून बसलोय. मूल जन्माला घातलं नाही आणि आता रात्र झाली आहे, बाहेर पाऊस कोसळतोय आणि मनात, बाहेर सगळीकडेच एक पिल्लू कळवळून ओरडतंय. या कथेवरूनही तुमच्या लक्षात आलं असेल की, या जयंत पवार यांच्या कथेतील पात्रं वास्तवातील आहेत. त्यांच्या कथा आपल्याला वास्तवात दिसतात. या कथा फिक्शन असल्या तरीही फिक्शन नाहीत हे कळतं. तर भारत सासणे यांच्या कथा संपूर्ण फिक्शन आहेत हे कळतं. त्यांच्या कथेतील पात्रं, जागा आणि प्रसंग हे वास्तव नसलं, तरी कथाजाणिवा आणि आंतरिक संघर्ष मात्र जयंत पवार यांच्या कथेसारखाच खरा आणि प्रखर आहे. आणि राजन खान यांच्या कथा म्हणजे वास्तव आणि फिक्शन यांचं बेमालूम मिश्रण. जयंत पवार यांची पात्रं जागोजागी भेटत राहतात. सासणे यांची कथात्म पात्रं दिसत नाहीत, ती आपल्या आत कुठेतरी जाणवत राहतात आणि राजन खान यांची पात्रं आपल्याला कुठेही, रस्त्यात भेटतील – बाहेर वा आत – असं वाटत राहतं…
-किरण येले
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल नोव्हेंबर २०२०
गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा लेखमालिकेतील लेख
लेखक, समीक्षक व विचक्षण वाचक नीतीन रिंढे यांचा लेख
गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : छटाकभर रात्र, तुकडा तुकडा चंद्र
(लेखक : जयंत पवार)
‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत…
लेखिका व उत्तम वाचक दीपा देशमुख यांचा लेख
गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी
(लेखक- बालाजी सुतार.)
कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास…