आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र

पर्यावरणाचा ढासळता समतोल, ताणतणाव, धकाधकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारपद्धती ही थेट अनारोग्याकडे जाणारी वाट आहे. याचे दुष्पपरिणाम आज आपल्या आरोग्याच्या बाबतीत दिसू लागले आहेत. लहान वयातच रोगांनी शरीरावर मिळविलेला ताबा, ते बरे करण्यासाठी रासायनिक औषधांचा होणारा मारा यामुळे माणसांचे आरोग्य बिघडत चालले आहे. तेव्हा वेळीच सावध होऊन तंदुरूस्त राहण्यासाठी काय करावे लागेल, याची चाचपणी करण्याशिवाय आणि ते मार्ग अनुसरण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

नेमके हेच लक्षात घेऊन रोहन प्रकाशनने आरोग्याशी संबंधित पुस्तकांचा एक संच प्रकाशित केला आहे. यात लहान मुलांपासून मोठ्यांर्यंतच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे योगासनांशी संबंधित आकृत्या पुस्तकात देण्यात आल्या आहेत. हे पुस्तक जरी स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले असले तरी यातील माहिती पुरुषांनाही उपयुक्त ठरेल अशी आहे. म्हणजेच कुटुंबातील सर्वाचेच स्वास्थ्य राखण्यासाठी हे पुस्तक साहाय्यकारी ठरेल.

नैसर्गिक उपायांनी वयावर मात

प्रत्येकाला आपण सदैव तरुण राहावे असे मनोमन वाटत असते. परंतु निसर्गनियमाप्रमाणे वार्धक्य कोणालाही चुकलेले नाही. मात्र नैसर्गिक उपायांनीच वार्धक्यातील दुखणी आणि समस्या दूर ठेवणे आपल्या हाती आहे. ‘नैसर्गिक उपायांनी वयावर मात’ या डॉ. पॉल गालब्रेथ यांच्या पुस्तकात हेच सांगितले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. अरुण मांडे यांनी केला आहे. नवतारुण्य देणारे प्रभावी व्यायाम, प्राणायाम, पोषक आहार, बौद्धिक शक्ती व संपूर्ण तंदुरुस्तीचे उपाय, चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी, यासाठीचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. नवतारुण्य देणारी गुपितेही या पुस्तकात उघड केली आहे.

शाकाहार, मांसाहार यांची शरीराला असणारी गरज तसेच विविध पदार्थ, फळे आणि भाज्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यात कशा उपयुक्त ठरतात, याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. पोषक आहार आणि विहार, योगासनं, व्यायाम यांच्या आधारे शरीर कशा प्रकारे तंदुरुस्त ठेवता येईल, हेही पुस्तकात सांगितले आहे.

स्त्रियांसाठी योग.. एक वरदान

आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य सांभाळताना अनेकदा स्त्रिया स्वत:च्या तब्येतीची मात्र काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी स्त्रियांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर योगाची मोलाची साथ लाभू शकते, हे सांगणारं पुस्तक म्हणजे ‘स्त्रियांसाठी योग.. एक वरदान’! योगशास्त्रात ज्यांचं नाव मोठय़ा आदरानं घेतलं जातं अशा डॉ. गीता अय्यंगार (योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या कन्या) यांनी अनेक वष्रे योग शिकवताना गाठीशी आलेल्या अनुभवांतून हे पुस्तक साकारले आहे. स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा योगमार्ग आहे. त्यासाठीचे योग्य ते मार्गदर्शन म्हणजे हे पुस्तक होय. योगतत्त्व, आसने, प्राणायाम, ध्यानधारणा यामुळे स्त्रिया आपलं आरोग्य कसं नीट राखू शकतात, याबद्दल हे पुस्तक सांगतं.

एक स्त्री म्हणून लेखिका स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक जडण-घडणीविषयी, त्यांच्या समस्यांविषयी अधिक जागरूक आहे. स्त्री हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचा चंग बांधला आणि त्यातून महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी सुयोग्य मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आकारास आलं.
योगासनांचा नियमित सराव स्त्रियांना अनेक कार्ये पार पाडण्यास तसेच शरीराची कांती, तेज आणि स्त्रीत्व जपण्यास उपयुक्त ठरतो. रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर झळाळी येते आणि सौंदर्यप्रसाधनांची गरज उरत नाही. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यात आणि कोणत्याही परिस्थितीत उपयुक्त ठरावी अशीच यातील योगासनांची रचना आहे, असं लेखिका सांगते.
ऋतुप्राप्ती, गर्भारपण व प्रसूती, रजोनिवृत्ती हे स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत. या स्थित्यंतरांचे परिणाम तिचे शरीर व मन यांवर होत असतात. अशावेळी तिला तिचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी योगाची महत्त्वपूर्ण मदत होते. सुरुवातीला योगासने करताना कोणत्या समस्या उद्भवू शकतात व त्यावर कशी मात करता येईल, याचेही विवेचन पुस्तकात दिलेले आहे. योगासने करताना कोणती विशेष काळजी घ्यावी, याबाबतच्या छोटय़ा छोटय़ा सूचनाही लेखिकेने केल्या आहेत. यात दिलेल्या योगासनांचा शरीराला कशा प्रकारे उपयोग होतो, ही माहितीही पुस्तकात मिळते. प्राणायाम हा सर्वसाधारपणे केला जाणारा योगप्रकार आहे. परंतु हा योगप्रकार करताना कोणते नियम व सूचना पाळाव्यात, प्राणायाम केव्हा करावा, त्यासाठी लागणारी जागा, वेळ, शारीरिक स्वच्छता याचे नियम लेखिकेने कथन केले आहेत.
या पुस्तकाचा विशेष म्हणजे योगासनांशी संबंधित आकृत्या पुस्तकात देण्यात आल्या आहेत. हे पुस्तक जरी स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले असले तरी यातील माहिती पुरुषांनाही उपयुक्त ठरेल अशी आहे. म्हणजेच कुटुंबातील सर्वाचेच स्वास्थ्य राखण्यासाठी हे पुस्तक साहाय्यकारी ठरेल.

पाठदुखी विसरा…

आज पाठदुखीच्या दुखण्यापासून कोणीही सुटलेले नाही. या पाठदुखीला कायमचा रामराम ठोकायचा असेल तर काही पथ्यं पाळायला हवीत. पाठदुखी दूर ठेवायची असेल तर ‘पाठदुखी विसरा..’ हे डॉ. यतीश अगरवाल व डॉ. ए. जी. सिंग यांनी लिहिलेले व डॉ. अरुण मांडे यांनी अनुवादित केलेले पुस्तक आवर्जून वाचायला हवे. त्यात दिलेले नियम काटेकोरपणे पाळायला हवेत. पाठीची रचना व तिचे कार्य, पाठीचे दुखणे होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी, पर्यायी उपचार, स्त्रियांनी गरोदरपणात व प्रसूतीनंतर कोणती काळजी घ्यावी, बसणे वा उभे राहण्याची योग्य-अयोग्य पद्धत आदी माहिती या पुस्तकात दिली आहे. पाठीचे दुखणे दूर ठेवण्यासाठीची योगासने, मान व पाठीचे व्यायाम यांची सचित्र माहिती यात मिळते. कॉम्प्युटरवर काम करताना कोणती काळजी घ्यावी, घरातील सोफा, गादी, खुच्र्या कशा असाव्यात, यांचे मार्गदर्शनही त्यातून मिळते. पाठदुखीबद्दलची शास्त्रोक्त माहिती देणारं हे पुस्तक वाचल्यास ही समस्या कायम दूर राहील.

मुले मस्त वाढवू या

उत्तम आरोग्यासाठी लहानपणापासूनच कोणती काळजी घ्यावी, याची इत्थंभूत माहिती देणारं बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी व डॉ. अर्चना जोशी यांचं ‘मुले मस्त वाढवू या’ हे पुस्तक! आठ विभागांमध्ये मुलांची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. अगदी सर्दी-पडशापासून ते डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारापर्यंत मुलांची काळजी कशी घ्यावी, स्तनपान, मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास, मैदानी खेळांची आवश्यकता, जंक फुडमुळे उद्भवणाऱ्या समस्या, शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण, मुलांसाठी नाश्त्याचे वेळापत्रक कसे असावे, अशी विविध उपयुक्त माहिती या पुस्तकात आहे. बालसंगोपनासंदर्भात योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक प्रत्येक पालकाने वाचून त्यातील सूचनांचे अनुकरण करावे असेच आहे.

औषधी गुणांच्या रूचकर रेसिपीज्

जंक फुडचे दुष्परिणाम दिसू लागल्याने पुन्हा एकदा पारंपरिक पौष्टिक पदार्थाकडे वळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रत्येक भाजीतील पोषकमूल्यं लक्षात घेऊन त्या रूचकर पद्धतीने करून त्यांचा आपल्या आहारात समावेश केला तर आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शोभना माने यांचे ‘औषधी गुणांच्या रूचकर रेसिपिज्’ हे पुस्तक याचा प्रत्यय देते. निरनिराळ्या फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, फळे यांसारख्या विविध अन्नघटकांचे पौष्टिक व औषधी गुणधर्म आणि त्यांच्या रेसिपीज् या पुस्तकात दिलेल्या आहेत. प्रत्येक भाजीतील पौष्टिक गुण आणि त्यांची शरीराला असलेली गरज या पुस्तकात देण्यात आली आहे. जेवण हे फक्त ‘उदरभरण नोहे..’ याची प्रचीती यातून येते.

– लता दाभोळकर

(सौजन्य : लोकसत्ता, लोकरंग शनिवार, ३० ऑक्टोबर २०१०)


आरोग्यदायी जीवनशैलीसाठी…


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *