‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही प्रणव सखदेव यांची पहिलीच कादंबरी आहे. कथाकार आणि कवी म्हणून प्रणव सखदेव मराठी वाचकांना परिचित आहेत. त्यांचे ‘निळ्या दाताची दंतकथा’ आणि ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हे कथासंग्रह आश्वासक होते. प्रणव सखदेव यांची फँटसीचा प्रयोग करायची आवड या दोन्ही संग्रहांतील कथांमधून जाणवत होती. या कथासंग्रहांमुळे त्यांच्या या नव्या कादंबरीकडूनही वाचकांच्या मोठय़ा अपेक्षा होत्या. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही कादंबरी त्या अपेक्षांना उतरली आहे.

या कादंबरीत फँटसी नाही. त्यात वास्तव जगातील माणसं आहेत. इथे महाविद्यालयीन जग आहे. या माणसांचं वैयक्तिक आयुष्य आहे. यातली माणसं अतिशय स्खलनशील आहेत. ही माणसं त्यांच्या भूतकाळाचं ओझं घेऊन जगत आहेत. पण वर्तमानकाळ हाच महत्त्वाचा आहे. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही मत्री, प्रेम, तिरस्कार, तडफड, मृत्यू, नियतीनं उद्ध्वस्त करणं, माणसाचा आत्मघातकीपणा, एकाकीपणा तसंच त्याच्या नराश्याबद्दलची कादंबरी आहे. प्रणव सखदेव यांचं कवीपण या कादंबरीत ठळकपणे जाणवतं. कवितेच्या ओळी कथानकाला जोडत राहतात. प्रणव सखदेव यांची ही पहिलीच कादंबरी एखाद्या काळसर पाण्याच्या प्रवाहासारखी थंड, शांतपणे आणि जीवघेण्या वेगाने तुमची पकड घेत सुटते. ती वाचताना वाचकाच्या मनात हळूहळू उतरत जाते यातली ‘मजबूत’ उदासी. आणि शेवटी मनात उरते तीही उदासीच. कादंबरीत बालकवींच्या ‘औदुंबर’ या कवितेचा उल्लेख येतो. ही कादंबरी वाचून बालकवींच्या औदुंबरासारखं उदासपणे जळात पाय सोडून केवळ बसावं आणि असावं, इतकंच वाटतं. प्रामुख्याने तीन व्यक्तींची ही कादंबरी असली तरी वाचनानंतर येते ती उदासीनता मात्र वैश्विक होते. आणि तिला केवळ निरखत बसावं असं वाटतं. उदासीनता ही तर आजच्या काळाची देणगी आहे. या डिजिटल युगात उदासीनतेसोबत जग अ‍ॅब्सर्डही झालंय. उदासीचा काळा आणि अ‍ॅब्सर्डनेसचा करडा (करडा रंग अनेक रंगछटा सामावून असतो.) या शेड्समध्ये कादंबरीतलं शब्दचित्र रेखाटलं गेलं आहे. चित्रकार अन्वर हुसेन यांनी कादंबरीसाठी मुखपृष्ठही त्याच रीतीने चितारलंय. लुकलुकणाऱ्या प्रकाशचित्रासारखं हे मुखपृष्ठ वाचकाला खेचून घेणारं झालंय. अधूनमधून उमटलेले लाल रंगाचे ठिपके म्हणजे अनपेक्षिततेचे चटके दाखवणं आहे. ब्लर्बवरचं चित्रही खास झालं आहे.

एखाद्या चित्रपटासारखी ही संपूर्ण कादंबरी फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जाते. पण हा काळ काही फार जुना नाही. तो जेमतेम सात-आठ वर्षांपूर्वीचा काळ असेल. ही आजच्या काळात घडणारी कादंबरी आहे. कादंबरीची भाषा आजच्या काळाची आहे.

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही समीर नावाच्या एका बंडखोर कॉलेजवयीन मुलाची कादंबरी आहे, तितकीच ती चतन्य, सानिका, सलोनी आणि अरुणचीही कादंबरी होते. एखाद्या चित्रपटासारखी ही संपूर्ण कादंबरी फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जाते. पण हा काळ काही फार जुना नाही. तो जेमतेम सात-आठ वर्षांपूर्वीचा काळ असेल. ही आजच्या काळात घडणारी कादंबरी आहे. कादंबरीची भाषा आजच्या काळाची आहे. तिच्यात इंग्रजी शब्द सहजतेनं येतात. काही विशिष्ट शिव्यांची पेरणी आणि तरुणांची कॅज्युअल बोलीभाषा या कादंबरीत आहे. यातल्या विशिष्ट शिव्या या आजवर घासून घासून इतक्या गुळगुळीत झाल्या आहेत, की त्या शिव्या आहेत हेदेखील आपल्याला आज विसरायला झालं आहे. त्यामुळे या शिव्या केवळ एक्स्प्रेशन म्हणून उरतात. प्रणव सखदेव यांनी या भाषेत लिहिताना कसलाही आव आणलेला नाही. कारण ते ज्या पिढीचे आहेत त्या पिढीची हीच भाषा आहे. तुम्ही आजच्या काळात कुठल्याही वास्तविक किंवा व्हच्र्युअल कट्टय़ावर डोकावलात तर ‘च्यूतिएटिक’, ‘फक’ यांसारखे शब्द अगदी सहज तुम्हाला ऐकू येतील. तेच इथंही आहेत. संस्कृतप्रचुर भाबडा प्राज्ञपणा मराठीने कधीच सोडून दिला आहे. कारण या काळानेही तो कधीचाच सोडून दिलेला आहे. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’च्या निमित्ताने मराठी कादंबरी भाषेचं सोवळं फेडून आता डिजिटल युगाच्या फेडेड ट्रेंडी जीन्समध्ये आलीय असं म्हणता येईल. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही अतिशय बोल्ड कादंबरी आहे. कादंबरीत कुठल्याही प्रसंगाची वर्णनं करताना लेखकाची लेखणी अडखळलेली नाही. आपल्याला काय सांगायचं आहे, वाचकाला त्या प्रसंगातून नक्की काय दाखवायचं आहे, हे लेखकाला पक्कं माहीत असलं की अशी सहजता येत असावी. त्यात अर्थातच लेखकाचं वय, सेक्सकडे बघायची त्याची नजर आणि वयासोबत येणारा धाडसी आणि खुला दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ म्हणूनच वास्तववादी आणि बोल्ड वाटते.

ATTACHMENT DETAILS Kalekarde-strokesBC

समीर हा डोंबिवलीतल्या सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील एक विशीतला तरुण आहे. आई-वडिलांशी करीअरसंदर्भात वाद असल्याने आणि एकूणच लहानपणापासून त्यांच्यात विसंवाद असल्याने तो कुठल्याच प्रकारे त्यांच्याशी कनेक्टेड नाहीए. त्याला फिल्म दिग्दर्शक व्हायचंय.

समीर मुळात बंडखोर प्रवृत्तीचा आणि बेदरकार आहे. डोंबिवलीचं छोटं, कोतं, मध्यमवर्गीय जग सोडून मुद्दाम तो मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये जातो. डोंबिवलीतून मुंबइला गेल्यावर त्याला साहजिकपणेच आपण वेगळे पडलो आहोत असं वाटतं. अशात चतन्य हा अंध मित्र आणि त्याची प्रेयसी सानिका हे दोघं त्याला भेटतात. चतन्य आणि सानिका समीरच्या एकाकी आयुष्यात येतात आणि या मत्रीने तो समृद्ध होऊ लागतो. मात्र, पुढे ही दोघं समीरच्या आयुष्यातून निघून गेल्याने वेगवेगळ्या कारणाने समीर उद्ध्वस्त होतो. समीर, चतन्य आणि सानिका यांच्यातील मत्रीचा भाग कादंबरीत सुंदररीत्या फुलत जातो. हा भाग अजून हवा होता असं वाटतं राहतं, इतक्यात कादंबरीचं पहिलं प्रकरण अचानकपणे संपतं. कादंबरीत अनेक अनपेक्षित घटना घडत राहतात. वाचकाला रिलॅक्स न होऊ देता चटके देत राहतात.

कादंबरीचा नायक व्यसनी आहे. मध्यमवर्गीय मुलांना भेडसावतील अशा संस्कारांच्या चौकटी समीर निर्दयपणे तोडत, चिरडत सुटतो. दारू, सिगारेट, गांजा आणि अर्निबध सेक्स या गोष्टी समीर सहजपणे नियमित रीतीने करतो. समीरला अरुण हा ‘सेक्पर्ट’ मित्र मिळतो. हा फकीर वृत्तीचा मित्र समीरपेक्षा वयाने मोठा आहे. अरुणला सेक्सची तुफान भूक आहे. समीरचा दादूकाका हाजरा हा एक वयस्कर मित्रही आहे. दादू आणि अरुण या व्यक्तिरेखा आणून लेखक त्यांच्यामार्फत जे तत्त्वज्ञान सांगतो ते रोचक आहे. समीरला आयुष्यात खरं प्रेम म्हणजे काय ते समजत नाही, किंवा ते समजून घ्यायची त्याची इच्छा नसते. सानिकामध्ये तो अतिशय खोलात गुंतलेला आहे. पण सानिका तिच्या स्वत:च्याच नराश्याच्या झगडय़ात संघर्षरत आहे. सानिका दुरावते तेव्हा सलोनी नावाची मुलगी समीरला भेटते. समीर आणि सलोनीचे नाते घडत जाते ते सगळे प्रसंग लेखकाने उत्तम रीतीने लिहिले आहेत. समीर आणि सलोनीचं आयुष्य एकदाचे रांगेला लागणार असं वाटत असतानाच एक वादळ येतं आणि ते समीरला चिरडून टाकतं. त्यात समीर सलोनीसोबतचं नातंही विस्कटून टाकतो. तरीही ते संपूर्णपणे तुटत नाहीच.

मुंबई हे पात्रदेखील एखाद्या अदृश्य पात्रासारखं या कादंबरीत सतत येत राहतं. मुंबईतील विविध ठिकाणं, मुंबईचा पाऊस आणि पूर, मुंबईवर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला अशा अनेक घटना कादंबरीत बॅकड्रॉपला येत राहतात. प्रणव सखदेव यांचा आणि त्यांचा नायक समीरचा आवडता जपानी लेखक हारुकी मुराकामी हा वेगळ्याच शैलीत लिखाण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वाचताना मुराकामीच्या ‘नॉर्वेजियन वुड्स’ या कादंबरीची सतत आठवण येत राहते. ही कादंबरी लिहिताना प्रणव सखदेव यांनी आपल्या कथांपेक्षा तिला वेगळाच घाट दिलाय. कादंबरीत त्यांनी एक हळवा सूर धरून ठेवलाय. आणि तो कुठेही सुटत नाही. याच सुरातले, विशेषत: सानिकाचे मुळशी परिसरातील प्रसंग लेखकाने सुंदर लिहिले आहेत. कादंबरी शेवटाला आल्यावर अरुणच्या वहिनीचं पात्र आणून लेखकाने या कादंबरीची खोली वाढवली आहे.

महाविद्यालयीन जीवनातील तरुणाचं भावविश्व भग्न होणं, त्यातून त्याचं आयुष्य ढासळणं हे याआधी ‘कोसला’ आणि आणखीही काही कादंबऱ्यांमधून आलंय. कादंबरीत कथानकाला तत्त्वज्ञानाची जोड देणं आवश्यक असतं. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’मध्ये अशी जोड दिलेली आहे. हे तत्त्वज्ञान कथानकात सहज मिसळलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली कादंबरी लिहिणाऱ्याला गोष्ट सांगता यायला लागते. कादंबरी म्हणजे कुणाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची केवळ वर्णनात्मक लांबण लावणं नसतं. कादंबरी लिहिताना लेखकाकडे नक्की काय विचार आहे, त्याचा दमसास किती आहे, याचा पुरेपूर कस लागतो. लेखकाच्या मनाचा आणि त्याच्या लेखनकलेचा तळ ढवळून काढलेला असावा लागतो, तरच वाचकांना बांधून ठेवणारं कथानक निर्माण करणं शक्य होतं. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ पहिल्यापासूनच वाचकाची अशी काही मजबूत पकड घेते, जी पुढे कुठेच ढिली पडत नाही. सलग वाचूून संपवावी अशी ही कादंबरी आहे. या उदासीच्या पोकळ गाण्याचा शेवट सकारात्मक नोटवर केलेला आहे. वर्तमानकाळाचा सूर समजून घ्यायचा असेल तर वाचायलाच हवी अशी ही कादंबरी आहे.

– जुई कुलकर्णी

(सौजन्य : दै. लोकसत्ता, लोकरंग, ३ मार्च २०१९)


ही कादंबरी खरेदी करण्यासाठी…

Kalekarde Cover

काळेकरडे स्ट्रोक्स

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या क्यानव्हासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !

250.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *