पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. १४ जानेवारी १७६१च्या दिवशी जणू काही तिसरं महाभारत घडलं. महाराष्ट्रातली एक पिढी बहुतांशी जाया झाली.
दुपारपर्यंत खरंतर मराठ्यांचा आवेग आणि आवेश असा होता, की आता युद्ध आपण हरणार असं अब्दालीला वाटू लागलं. त्याने मागच्या मागे आपल्या कबिल्यासह पळण्याची तयारीही केली होती,पण दुपारनंतर मात्र चित्र अचानकपणे पालटलं.
बंदुकीची एक गोळी लागून विश्वासराव पडले, आणि पथपथ सदाशिवरावभाऊही गर्दीत नाहीसे झाले. आपले दोन्ही मोहरे, सेनापती युद्धात दिसत नाहीत हे पाहून फौजेचा धीर सुटला आणि फौज अक्षरशः उधळली.
विजयश्रीने अब्दालीच्या गळ्यात माळ घातली, पण अब्दालीला हा विजय सहजासहजी मिळाला नव्हता. या एकाच दिवशी अब्दाली इथे आला आणि जिंकला असं मुळीच नाही.
पानिपतच्या या संपूर्ण प्रकरणाला एका अर्थाने म्हणायला गेलं तर बावीस वर्षांची पार्श्वभूमी आहे, अन प्रत्यक्षात अब्दालीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बारा वर्षांची.
हे झालं पार्श्वभूमीबद्दल. पण पानिपत घडलं आणि सारं संपलं असं अजूनही आपल्यापैकी अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात, पानिपतच्या केवळ दहा वर्षातच मराठ्यांनी या साऱ्याचा बदला घेतला होता हे आपल्याला माहीत आहे का?
या साऱ्या घडामोडी आपण पुढच्या या लेखमालिकेतून पाहणार आहोत. यात प्रत्यक्ष पानिपतविषयी फारसं काही नसेल, कारण ते आपण नेहमीच वाचतो. पण पानिपतशी संबंधित प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एकमेकांत गुंफलेल्या ३३ वर्षांच्या घडामोडी आपण पुढच्या सहा भागात पाहणार आहोत…
- कौस्तुभ कस्तुरे
(लेखक इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक असून सध्या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.)
या लेखमालिकेत एकूण सहा लेख आहेत –
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६