एक संपूर्ण उंचीचा पुरुष मावेल एवढ्या फाकवलेल्या मांड्या, त्यावर अनेक चुण्यांचा घेरदार झगा, प्रत्येक चुणीत दुःखाचा, विलापाचा कशिदा जणू. त्या सुकुमार देहावर किंचित झुकलेली तरी तो अवघा नर देह पेलून धरलेली ती आई! प्रत्येक जखमेतून रक्त वाहत असणार, त्या झग्याची प्रत्येक चूण त्याच्या रक्ताने माखलेली असणार आणि तिच्या डोळ्यातला साकाळलेला शोक कदाचित एकट्या मायकलअँजेलोने त्या शुभ्र संगमरवरात शोधला, पुन्हा कधीच न हरवण्यासाठी.

पियेता ह्या जगविख्यात शिल्पात मायकलअँजेलोने जे मांडले आहे ते जर मातृत्व असेल, तर मग मुलं होऊ देणं, न देणं हे प्रश्नच शिल्लक राहत नाहीत बहुदा. कारण स्वतःच्या जनुकीय कशिद्याला निराळेच पट तयार करणे, स्वतःतले काही काळापुढे घेऊन जाणे म्हणजे मुलं जन्मला घालणे, आणि ह्यात जेवढी आदिम ऊर्मी आहे तितकीच काव्यात्म गुंतागुंत आहे. मुलं होणं न होणं हे जरी आता पर्याय असले, ज्यांची उत्तरं निरनिराळी असू शकतात, मात्र निसर्गाच्या दृष्टीने बघितले तर मुलं जन्मला घालण्यासाठीच आपण आहोत असे समजू लागते. स्त्रीला प्रत्येक महिन्याला पाळी येते, ह्याचा अर्थ निसर्गाला अभिप्रेत काय आहे? प्रत्येक वेळी एक आठवण, का एक इशारा, की ह्या देहाचे कार्य प्रजनन आहे, आणि जेव्हा जेव्हा दर महिन्याला ती संधी हुकते, तेव्हा तेव्हा प्रलयच येतो की स्त्रीच्या उदरात! निसर्गाला अभिप्रेत आहे, मुलं जन्मला घालत राहणं. त्यांचे संगोपन करणं आणि तेवढेच काम खरेतर आहे असेच दिसते. अर्थात मानवीय प्रगतीत मुलं जन्मला घालणं हा आता एक पर्याय आहे, जो आपण डोळसपणे, ठरवून, नियोजन करून अमलात आणू शकतो. मात्र तिथून सुरु होतो एक प्रवास, एक मोठाच प्रकल्प! किमान २५ वर्षांचा नाहीतर आयुष्यभराचा!

मुलाचे अस्तित्व स्त्री देहात जाणवते तिथूनच निराळे भान येते आपल्याच देहाचे, त्याच्या शक्यतांचे आणि कुवतीचे! नुसत्या एका अंधाऱ्या पोकळीत जी किमया घडून येते आणि करत करत एक पूर्णाकृती मानवीय देह आपल्या गर्भाशयात आकार घेऊ लागतो! प्रत्येक अवयव तंतोतंत, अगदी मापातला आणि तरी इवलासा! हृदयाच्या प्रत्येक झडपेत शक्यता, यकृताच्या प्रत्येक पेशीत शक्यता, मेंदूच्या प्रत्येक तंतूत अमर्याद शक्यता आणि प्रत्येक पावलात हजारो मैल अंतर जाण्याची क्षमता! एक निराळी व्यक्ती घडू लागते, तरी ती आई बाबांच्या जनुकीय ठोकताळ्यांनुसार अगदी सुंदर तयार होत राहते, कोणाच्या डोळ्यांचा रंग, कोणाच्या जिवणीची ठेवण, कुठे एखाद लकब किंवा केसांची पोत, कुठली आजारपणं, कुठली रोगप्रतिकारक शक्ती, कुठे आवाज तर कधी कोणाचा तोंडवळा! करत करत बाळ जन्मला येतं! पहिल्यांदा अगदी बटाट्यासारखं सुमार दिसणारं बाळ अवघ्या असण्यावरच जोरकस पकड घेतं, त्याच्या बाळमुठीत जणू आपलं अस्तित्व तब्येतशीर आवळून धरतं!

त्याचे संगोपन आणि लीला बघत बघत पहिली पाच वर्षं तर सहजच सरतात. ह्या पाच वर्षांत अनेकदा वाटून जाते की एवढी झोपमोड, एवढी आजारपणं आणि सोबत पालकांच्या मनात नव्याने रुजलेली भीती, खरोखर हवीत का मुलं? मात्र प्रत्येक सरत्या वर्षागणिक ते बाळ आपल्या अस्तित्वाचं अविभाज्य भाग बनून जातं. मुलांचं येणं आयुष्यात संपूर्ण जगण्याला एक सणसणीत भान देऊन जातं, आपल्यावर आता एक जीव अवलंबून आहे हे भान खूपच शिकवणारं असतं. त्या जिवाची काळजी, त्याचे लाड ह्यासाठी मग कमाई, नियोजन, पैश्यांची साठवणूक आणि स्वतःचे असे एक शिस्तीचे वेळापत्रक आपोआप तयार होऊ लागते. त्या इवल्या जिवाच्या सोयीने, सगळे घर चालू लागते. असे कोणतेच घर नसेल, जिथे तान्ह्या मुलाच्या येण्याने काहीच बदलले नसेल !

तीच गत वाढीस लागलेल्या बाळांच्या घरातली. असंख्य प्रश्न, खडू, रंग, कागद आणि कुतूहल! बाळ सभोवताल जाणून घेऊ लागतं आणि एके अर्थी आपलेच बालपण आपल्या भेटीला तेच प्रश्न नव्या वेष्टनात घेऊन येतं!
हे का? ते का? वर खाली, आत बाहेर सर्वत्र प्रश्न, सर्वत्र कुतूहल, सर्वत्र एक निरागस शोधक प्रवास! मग तो अगदी घरातल्या अंगणातील चक्कर असो किंवा बाहेर भाजी खरेदी असो, वाटेत दिसणाऱ्या असंख्य गोगलगायी, पक्ष्यांची गाणी, गाड्यांचे आवाज, झाडांचे रंग, फुलं, पानं, माणसं, सगळे सगळे अगदी टीप कागदासारखे शोषून घेणारी बाळं! ह्याच वयातली पोरं असताना अगदी लख्ख जाणीव होते, पालक झाल्याची!

एक नवं समाजभान येतं, तोंडातल्या शिव्या आता ट्राफिकमध्ये देखील ओठांवर येत नाहीत, आरोग्याचे टळटळीत भान येतं, स्वतःच्या सवयींकडे जरा पुन्हा कटाक्षाने लक्ष जातं आणि मनातले वायफळ खर्चाचे पैसे आता हट्ट पुरवण्यासाठी वापरले जातात. इवले रंगीत लाल बूट लेकीचे, आपल्याच बिछान्यावर अगदी लीलया नाचतात, लेकाचा बॉल आता भिंतीवर टप्पे घेत घरभर हुंदडतो आणि बडबडगीतं आणि अंगाई सोडल्यास गाणीच उरत नाहीत आई वडिलांच्या जगात! ती अहोरात्र जागरणं, ते पेजेसारखे अन्न आणि वाटीतले गुळ खोबरे, घरभर उमटत राहते, बालपणाच्या ठश्यातून. फोटो काढायला आयते गिऱ्हाईक मिळते आणि मग उधाण येते हौसेला! नाक्यावर पोरींची छेड काढणारा पोऱ्या बाप बनतो पोरीचा आणि बदलूनच जातो, अभ्यासू कामसू शाळेतला स्कॉलर एकदम हळवा होऊन जातो आणि एकंदर पालकत्वाची पकड घट्ट बसली की भले भले बदलून जातात ते कायमचेच! एक हळवा कोपरा मनात उमलून येतो, तो काही केल्या आता मिटत नाही, एक अनाम भीती येते सोबतीला ती काही केल्या संपत नाही आणि नुसत्या लंगोटावर धावणारा इलुसा देह असतो, जणू आपलेच हृदय आपल्याबाहेर पडून धावत असते!

मग येते शाळा, तिथे आपल्याच लहानपणीच्या भित्या भेटतात, पुन्हा गणित, भूगोल हुज्जत घालू लागतात! पोरांना अक्कल शिकवताना, आपलेच चाचणी परीक्षेतले मार्क आपल्याला वाकुल्या दाखवू लागतात आणि आपल्याला लहानपणी मारलेले टोमणे पुन्हा गडद सावल्या बनून आपल्याच आतून पोरांना दटावू लागतात! आणि इथेच पुन्हा समजू लागते की पोरं जरी जन्मला आपण घातली असली तरी त्यांच्यासारखा शिक्षक आपल्याला मिळणार नाही! कारण आपल्याच भूतकाळातल्या दुर्लक्षित जख्मांवर हळुवार फुंकर घालायची का पुढची पिढी त्याहून कोडगी बनवायची हे तत्क्षणी आपल्याच हातात असतं, हे जाणवू लागतं. आपले दृष्टिकोन तपासायला मुलं भाग पाडतात, आपले समज, गैरसमज, आपल्या श्रद्धा-अंधश्रद्धा पुन्हा घासून पुसून घ्यायला मुलं भाग पाडतात, जे जे आपण आपल्या असण्याचे घटक मानून चाललो असतो, ते सर्व घटक मुलं असली की कधी ना कधी पुन्हा समोर येतातच, त्यांच्यासोबत प्रश्न, भित्या आणि न्यून येतात, त्या सगळ्यांना सामोरे जाताना आपल्याला पर्याय असतोच, नवीन वाट पकडून त्यावर जाण्याचा अथवा पुन्हा पिढी दर पिढी त्याच वाटेवरून पुन्हा पुन्हा जात राहण्याचा!

आपलीच कथा नव्याने लिहिण्याची प्रेरणा मुलं देऊन जातात, ती संधी मुलंच देऊ शकतात. म्हणून कदाचित मुलं हवीत!

तीच कथा वयात येणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची, स्वतःच्या देहाच्या व्याख्या, मर्यादा ज्या ज्या आपण मानून चाललो आहोत, तिथेच तिथवर थांबून राहायचे आणि मुलांना देखील त्याच चौकटीत ठेवायचे का केलाच बंड मुलांनी तर त्यांना अवघे अवकाश खुले करून द्यायचे हे पालक म्हणूनच शिकता येते. समंजस, सतर्क आणि हळवे मित्र बनायचे का भूतकाळाचे एक जोखड बनून मुलांच्या गळ्यावर रुतायचे हे पर्याय प्रत्येक पालकाला मिळू लागतात. एकंदर समाजात जे सुरु आहे, त्यात जर खरोखर बदल घडवून आणायचे असतील तर मुलं निश्चित जन्मला घालायला हवी, स्वतः त्यांचे संगोपन करायला हवे! कारण जर प्रत्येकाने आपली मुलं भविष्यातील समाजाचा एक घटक म्हणून बघायला सुरवात केली तर तुकड्या तुकड्याने एक नवीन सामाजिक चित्र तयार होऊ शकते निश्चितच! प्रत्येक पिढीचे मागच्या पिढीशी काही वितुष्ट असतेच, मात्र तो काळाचा दोष नसून तो बदल न स्वीकारण्याचा दोष आहे, मागली पिढी बदल स्वीकारत नाही, आणि तो बदल न स्वीकारल्याबद्दल पुढची पिढी त्या मागल्या पिढीवर भलतीच रुष्ट होते!

बदल स्वीकारायला सहसा माणूस थोडा कचरतो, मात्र स्वतःच्या मुलांचे बोट धरून पालक हे धाडस सहज करू शकतात!

इथून पुढच्या सर्व टप्प्यावर पालक आणि मुलाचे नाते सर्वार्थाने बदलून जाते! आता मुलांचे बोट धरून चालायची पाळी पालकांची! ज्या ज्या लोकांना मुले असतात, इतर मुलांच्या संगोपनात मोलाचे योगदान असते, ती सर्व मंडळी हळूहळू स्वतःच्या अहंकाराला मुरड घालायला शिकलेली असतात, करत करत स्वतःच्या शरीरातले आणि मनातले मुलांच्या सहवासात होणारे सर्व बदल ह्या मंडळींनी स्वीकारलेले असतात आणि स्वतःची निराळी आणि पक्व ओळख ह्यांना भेट म्हणून मिळालेली असते!

मुलं होऊ देणं म्हणजे बदल स्वीकारण्याचा वेग वाढवणं असे देखील असू शकते! कारण आपले समज, धारणा आणि श्रद्धा सतत तपासल्या जातात आणि करत करत आपल्याला आपलीच एक निराळी ओळख मिळून जाते.

मुलं एक प्रकारची अध्यात्मिक शिकवणी देखील ठरतात, एकाच वेळी आसक्ती आणि अनासक्ती शिकवून जातात. मुलं मेंदूच बदलून टाकतात त्यांच्या संगोपन करणाऱ्या स्त्री पुरुषांचा, त्यामुळे मग ती मुलं स्वतःची असो अथवा दत्तक घेतलेली, होणारे शारीरिक आणि मानसिक बदल हे निश्चित आहेत!

स्वतःलाच जर नव्याने जाणून घ्यायचे असेल तर मुलं होऊ द्यावीत, जगाला पुन्हा कुतूहलमिश्रित नजरेने, आशेने आणि गाढ विश्वासाने बघायचे असेल तर मुलं होऊ द्यावीत!

प्रेमाच्या, शोकाच्या आणि संपूर्ण भावना पटावरल्या सर्वच जाणिवा अगदी आसुसून अनुभवायची इच्छा असेल तर मुलं होऊ द्यावीत! म्हणूनच कदाचित मायकलअँजेलोला पियेता साकारता आली, येशू ख्रिस्त आणि त्याची शोकमग्न आई मेरी! कारण येशूच्या मृतदेहावर देखील जर कोणाचा हक्क होता, त्याचा मृत्यू जर कोणाला आमूलाग्र बदलत होता, तर ती होती मेरी! येशू ख्रिस्ताची आई!

  • प्राजक्ता पाडगांवकर
RohanSahityaMaifaljpg-1-1
या सदरातले इतर लेख

प्रेम आणि जोडीदार

पुष्कळदा प्रेमातदेखील अगदी मर्यादित, संकुचित दृष्टिकोन असतो. प्रेम एकदाच होतं, लग्न एकदाच होतं इत्यादी… हे सारं धादांत खुळचट विचार आहेत.

लेख वाचा…


या सदरातले इतर लेख

यश आणि प्रभुत्व

ज्या यशाचं भरभरून कौतुक होतं, ज्याच्या आहारी बहुतांश समाज जातो, ते यश किती खुजं आणि फसवं आहे, हे समजून येईपर्यंत पुष्कळदा खूप उशीर झालेला असतो.

लेख वाचा…


कंपाउंडिगची गंमत

आयुष्यातले दररोज निवडलेले प्रत्येक पर्याय हे चक्रवाढ व्याजासारखे वाढत असतात, त्यामुळे आपल्या वेळेची, फोकसची (एकाग्र चित्ताची) गुंतवणूक अगदी निगुतीने करायलाच हवी!

लेख वाचा…


स्पर्धांपलीकडलं जगणं

आयुष्याच्या अनेक पातळ्यांवर ही अशी स्पर्धा, ईर्षा आपण अगदी क्षणोक्षणी अनुभवत असतो. अर्थात, ती तितकीशी गरजेची गोष्ट आहे का?

लेख वाचा…


मुलं हवीत का?

मुलं होऊ देणं हे जरी व्यक्तिगत वाटलं, तरी हा निर्णय काही सामाजिक चौकटीत रुजल्यामुळे त्याचे परिणाम सर्वत्र जाणवतात; अधिक करून स्त्रियांना

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *